गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०२३

लेख (११९) १ सप्टेंबर २०२३

इंडियाच्या नकारात्मक प्रचारावर भाजपचा कायम वरचष्मा  !!


लोकसत्ता दिनांक १ सप्टेंबर २०२३ संपादकीय " इंडिया चे "आण्णा" कोण ? आणि योगेंद्र यादव यांचा " खरी परीक्षा काँग्रेसचीच" लेख वाचले.  दोन्ही लेखात विरोधकांनी करावयाच्या कृतीचा तुलनात्मक लेखाजोगा मांडला आहे. येत्या अर्ध्या वर्षात २८ पक्षांची मोट बांधून भारतवर्षात भाजपच्या विरोधात जनमत प्रवाह निर्माण करून स्वतःचीही प्रतिमा निर्माण करण्याचे कसब तथाकथित आण्णांकडे असावयास हवे. सध्या काँग्रेस धुरीणांकडे अडाणी, मणिपूर, चीनचे अतिक्रमण व्यतिरिक्त कोणतेही ठोस मुद्दे मांडलेले नाही अथवा अजून त्यांनी जनतेचे लक्ष वेधून घेतले नाही.  सगळ्याच प्रश्नांना "मोदीजी जबाब दो" म्हणून जनतेची विश्वासार्हता घालवून बसत आहेत. अन्य प्रादेशिक पक्षांची स्थिती राज्यापूरता सिमित आहे. त्यातही या छोट्या पक्षांना  भाजप सह "इंडिया" आघाडीतील सुद्धा विरोधक आहेत. केवळ भाजप विरोध म्हणून लोकसभेसाठी एकत्र आल्याने यांच्या साथी पक्षांची स्थिती सुधारली तर विधानसभेसाठी, पालिका निवडणुकीसाठी धोकादायक ठरू शकते, याचीही गणिते मांडली जातील. पर्यायाने एकास एक उमेदवारी देताना स्वतःचे अस्त्तित्व धोक्यात आणण्याचा डाव कुणी मांडणार नाही, हे तितकेच महत्वाचे.  आज घडीला १८ राज्यांमध्ये विरोधी पक्षांची सत्ता आहे. उर्वरित राज्यात भाजप , साथी पक्षांची.
इंडियाच्या प्रचारात, महागाई, बेरोजगारी, पेट्रोल डिझेलचे दर, आरोग्य समस्या, जीवनावश्यक वस्तूंचे भाव, तुटवडा आदी प्रश्नांचा सातत्याने भडिमार केला जातो.  या प्रश्नात इंडिया आघाडी शासित राज्य शासनाने खंबीर भूमिका घेतल्यास ह्या प्रश्नांची थोडी उकल होऊ शकते आणि या सुशासनाची तुलना भाजप शासित राज्यांवर करून प्रचाराची राळ उठवू शकतात.  पण उत्तरे न शोधता आरोप करण्यातच वेळ घालविला जातो.  श्री योगेंद्र यादव यांच्या लेखात निवडणूक पूर्व सर्वेक्षणाचा उल्लेख केला आहे, जो वस्तूस्थितीला धरून आहे.   यातून तरी थोडाफार बोध घेत इंडिया आघाडीने ठोस कार्यक्रम जाहीर करावा. चीनचे अतिक्रमण बाबत, मणिपूर दुरावस्था , तेल आयातीचा मुद्दा,  जीवनावश्यक वस्तूंच्या आयात निर्यात निर्बंध, शहरीकरण, शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी या ठळक मुद्द्यांवर इंडियाची भूमिका, तळागाळात पोहोचल्यावर विचार करण्याची कृती निर्माण होईल.  सारखे भाजपच्या चुका, धोरणांवर आक्षेप घेत राहिल्यास , भाजपचा विरोधकांच्या करण्यात येणाऱ्या नकारात्मक बाजूंच्या विश्लेषणावर गेल्या दहा वर्षांतील असलेला  वरचष्मा निर्विवाद आहे. भाजपने २०१४ मध्ये बोर्डाची, २०१९ मध्ये पदवीधारकाची आता २०२४ मध्ये मॅनेजेंटमध्ये उत्तीर्ण होण्याची तयारी पूर्ण झाली आहे.  इंडिया आघाडीने यासाठी आणण्यात येणारे आण्णा विश्व गुरू नकोत तर कमीतकमी मॅनेजेंटमध्ये गुरू तरी हवेत, तेव्हा काटेकी टक्कर होऊ शकेल अन्यथा विश्व गुरू अर्थात बॉस तिसरी टर्म सुद्धा मोठ्या फरकाने जिंकतील, हे सुज्ञ जाणून आहेतच.

विजयकुमार वाणी, पनवेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: