" हि अनादी भरत भू, हि अनादी संस्कृती - रोज अरुण चंद्रमा आरतीस उगविती "
दिनांक २४ ऑगस्ट २०२३ च्या लोकसता अंकातील "चंद्रावर भारताचा विक्रम " लेख आणि "चंद्रमाधवीच्या प्रदेशात " संपादकीय वाचले . १४ जुलै ते २३ ऑगस्ट या ४१ दिवसात आणि विशेषतः २२ आणि २३ जुलै या दोन दिवसात सहस्त्र कोटींच्या मुखी एकच नाद होता चंद्र. ज्याचे नाते जन्मापासूनच चंद्राशी जोडले जाते . नवजात शिशुच्या नामकरणासाठी त्याची चंद्र राशी पाहूनच, नामकरण केले जाते . अंगाई गाणारी आई चांदोबाला हाक मारतच बाळाला निजवीत असते . ज्योतिषांच्या कार्यात तर चंद्राचे फार महत्व आहे . सात्विक प्रेमाचा, शीतलतेचा , मनाचा ,गतीमान ग्रह चंद्र आहे . इतकेच काय, अजूनही नव्वद टक्के विवाहाच्या वेळेस चंद्रबळ पहिले जाते .
नुकताच श्रावण मास सुरु झाला आहे . श्रावणाचे अन भगवान शंकराचे अतूट नाते आहे , त्यात भगवान शंकराचे अन चंद्राचे तर जिव्हाळ्याचे नाते आहे . भाळी अर्ध चंद्र मिरविणारे श्री भगवान शंकराला चंद्रचूड , चंद्रशेखर, भालचंद्र , चंद्रपाल , चंद्रप्रकाश , श्रेष्ठ अशा अनेक विशेषणांनी चंद्र युक्त नावांनी संबोधिले जाते . श्री मत भगवत गीतेतील १५ व्या अध्यायात श्री भगवान म्हणतात " गामाविश्यच भूतानी धारयाम्यहमोजसा । पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः ॥ म्हणजे सर्व शक्तीने अमृतमय चंद्र होऊन सर्व जीवांचे रक्षण करतो . सर्जनशील कल्पनेतील प्रियकरांना चंद्राने उत्तेजित करत प्रणयाच्या लक्षावधी कवितांना, चित्रपट गीतांना जन्म घातला आहे . एवढ्यावर न थांबता सौंदर्याला चंद्राचेच नाव दिले जाते . चंद्राच्या कलांनी घडणाऱ्या अमावस्या पौर्णिमाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने समुद्राच्या भरती आणि ओहोटीच्या दिशा दर्शक ठरतात, त्यावर मानवाच्या मनाचा हि संबंध जोडला जातो . श्रावणातल्या श्री भगवान शंकराच्या महात्म्याचा, चांद्रयान ३ च्या दक्षिण ध्रुवावर अवतरण्याने, भारतीय अवकाश संशोधनाला विशेष महत्त्व प्राप्त होऊन अज्ञात असलेल्या गोष्टींचा साऱ्या विश्वाला लाभ होईल. हि अनादी भरत भू, हि अनादी संस्कृती - रोज अरुण चंद्रमा आरतीस उगविती " या उक्ती सारे काही सांगून जातात.
विजयकुमार वाणी , पनवेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा