रविवार, १३ ऑगस्ट, २०२३

लेख (१११) १४ ऑगस्ट २०२३




"कामाशी काम - 
फालतू भाषणाला आराम " 


दिनांक १३ ऑगस्ट २०२३, लोकसत्ता विशेष  "पर्यायी इंधनाला प्राधान्य ", केंद्रीय मंत्री मा.  नितीन गडकरीजी यांचे चांदणी चौक उड्डाणपुलाचे लोकार्पण सोहळ्यातील भाषण वाचले आणि पाहिले देखील .  गेल्या वर्षभरातील चाललेल्या राज्याच्या गढूळ राजकीय भाषणांच्या गदारोळात, मा गडकरजींचे अतिशय अभ्यासू, मार्मिक, कार्यतत्परता दाखविणारे भाषण खरोखरच  मनास  सुखावून गेले .  त्यांच्या भाषणातील प्रत्येक मुद्द्याचे वर्तमान स्थिती ते भविष्य काळातील गरज संबोधून त्यांनी विश्लेषण केले. त्यांचा नम्र आणि गोड आवाज , बोलण्याची पद्धत , व्यासपीठावरील नेत्यांविषयीचा आदर आणि फक्त कामासंदर्भातील  विषयाचेच भाषण, ऐकणाऱ्याला खिळवून ठेवणारे होते .  पेट्रोल डिझेलमुळे होणारे प्रदूषण , इथेनॉलचा वापर , रिक्षांचे फ्लेक्स इंजिन , कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन , ट्रॉली बस सेवा , अपघात रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना , इत्यादी विषयांवर चौफेर भाषण केले .  गेल्या वर्षभरातील वर्तमानपत्रातील राज्याच्या सर्वच नेत्यांच्या भाषणात, रोज प्राणी , ढाली तलवारी कोथळा , खोके , गद्दारी , घरकोंबडे, टक्केवारी , आदी शब्दांच्या वृत्तांचे रकाने वाचून वाचून राजकारणाचा, नेत्यांचा उबग आला होता.  या भाषणाने प्रसन्नता वाटली .  असेच प्रत्येक नेत्याने आपापल्या    पोर्ट फोलिओ संबधी अभ्यास करून, शेती प्रश्न , खतांचा,पाण्याचा वापर , मालाची विक्री , रोजगार निर्मिती साठी उद्योगधंदे वाढीस प्राधान्यक्रम, विद्यार्थी , शिक्षण , शिक्षक , शाळा कॉलेज, परीक्षा यांचे नियमन , सार्वजनिक वाहतूक व्यवस्था , बसेस , निवारा , प्रवाशांचे प्रश्न , रस्ते, वृक्षारोपण संवर्धन या आणि संबंधित विषयवारच बोलावे.   "कामाशी काम - फालतू भाषणाला आराम "   एवढा जरी धर्म पाळला, तरी आरोप प्रत्यारोप यांच्या फैरी झडणार नाहीत. सुजलाम सुफलाम महाराष्ट्र येत्या दोन तीन वर्षातच दिसण्याची आशा निर्माण होईल , फक्त सर्वांनीच मा श्री  नितीन गडकरी यांच्या सारखे कामकरी व्हावे , हिच अपेक्षा .  

विजयकुमार वाणी , पनवेल  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: