शब्द बदलविणे महत्वाचे आहेच , परंतु शब्द व्युत्पत्ती थांबविणे देखील तेवढेच महत्वाचे .
लोकसत्ता दिनांक १९ ऑगस्ट २०२३ अंकातील " साच्याबाहेरची भाषा" संपादकीय वाचले. लेखातील पहिल्या ओळीतील सारी विशेषणे स्त्रीनेच स्त्रीला दिलेली आहेत . मानल्या जाणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीत कर्मठतेचे दर्शन घडते, परंतु त्याच्यामागे दोष दाखवून , निंदा करत , अशी भाषा वापरत , एक भक्कम स्त्री उभी असते. पारंपरिक चित्रपट , नाटके ते आज पर्यंतच्या आधुनिकेतच्या गोडवे गाणाऱ्या साऱ्याच चित्रपट , टिव्ही मालिकांमध्ये, स्त्रीवर अन्याय सतत दाखवला जातो . या सततच्या भडिमारामुळे लिखाणामुळे , चित्रपट /नाटकात /मालिका दाखविण्यामुळे समाजमनावर पुरुष/स्त्री मानसिकतेवर परिणाम होऊन दैनंदिन जीवनात याच पद्धतीच्या वागण्याचा, भाषा वापरण्याचा सराव होतो . स्त्री हिंसाचाराचे अनेक प्रसंग कुटुंबातून घडत असतात , न्यायालयात प्रविष्ट होतात, याची वर्णने वृत्तपत्र माध्यमातून दिली जातात . साऱ्याच भाषांच्या मालिकांमध्ये वीसच टक्के चित्रपट , नाटके , मालिका मनोरंजनात्मक असतात, उर्वरित मालिकांमध्ये छोट्या मुली पासून ते वयस्कर आजी पर्यंत फक्त आणि फक्त स्त्री वरच अन्याय , जीवघेणे हल्ले , दोष निंदा नालस्ती ,षडयंत्र , कट कारस्थान करणारी दुसरी स्त्रीच असते , हेच कायम दाखिवले जाते . लेखात म्हटल्याप्रमाणे, पिढ्यानपिढ्या रूढ झालेल्या , नेहमीच्या शब्दांमधून स्त्रीवर अन्याय करतो आहोत , हि जाणीव होऊन शब्द बदलणे संवेदनशीलतेचे लक्षण हे परिणामकारक आहे. तसेच या शब्दांची व्युत्पत्ती न होण्यासाठी असे पारंपरिक, आधुनिक संदर्भ माध्यमातून दाखविले जाणे , यावर मर्यादा घातल्यास निम्म्यांवर अशी भाषा वापरण्याचे प्रमाण कमी होईल, हे हि तितकेच महत्वाचे आहे . चित्रपट , नाटक , मालिका लिखाणातून स्त्रीद्वेष्ठे पात्र निर्माण करून प्रसिद्धी, धनलाभ होतो , परंतु त्याच वेळेस लेखात म्हटल्याप्रमाणे स्त्रीच्या विरुद्ध शब्द निर्माण होत होत, तिच्या चारित्र्याचे हनन होऊन ऱ्हास सुद्धा होत आहे . शतकानुशतके हे चालू आहे आणि या पुढील शतकात देखील असेच चालू ठेवावे का ? यास कुठेतरी मर्यादा घालून हे शोषण थांबविता येणार नाही का ? असे प्रश्न केवळ अर्थकारण महत्वाचे असल्याने सुटू शकत नाहीत. यासाठी लेखन शैलीत, मांडणीत आमूलाग्र बदल घडविण्याचा क्रांतिकारी निर्णय घ्यावा लागेल , आज लगेच होणार नाही पण एक दिवस नक्की होईल असा विश्वास निर्माण व्हावा लागेल . शब्दांची व्युत्पत्ती, शब्द बदल यापुढे करावे लागणार नाही असे भान हे समाजमन दाखवेल का ?
विजयकुमार वाणी , पनवेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा