सोमवार, २८ ऑगस्ट, २०२३

लेख (११७) २८ ऑगस्ट २०२३

 स्थलांतरण हे प्रगतीचे मुख्य कारण होऊ शकते का ? 


लोकसत्ता दिनांक २८ ऑगस्ट २०२३ "बजाव पुंगी " संपादकीय वाचले . लेखात सर्वच क्षेत्रातील मराठी भाषिकांची पीछेहाट संबधी विश्लेषण केले आहे. यातील स्थलांतरणाचा महत्वाचा मुद्दा मांडावासा वाटतो . गेली कित्येक वर्षे, अन्य राज्यातील नागरिक, त्यांच्या राज्यात शिक्षण , नोकरी , उद्योग , व्यवसायाच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे, देशातल्या प्रमुख शहरांमध्ये स्थलांतर करून स्थायिक होत गेले . 
पर्यायाने याचा  परिणाम मुंबई , महाराष्ट्रावर जास्त झाला .  ब्रिटिशांनी वसवलेल्या स्वप्न नगरीची  भुरळ देशातील आम जनतेच्या मनात असल्याकारणाने स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्रोत्तर परप्रांतातून येणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.  त्यांचे उपजीविकेचे साधन मिळेल ती नोकरी , धंदा असल्याने कठोर मेहनत, जिद्दीच्या जोरावर मुंबई सोबतच राज्याच्या प्रत्येक शहरात परप्रांतीयांनी बस्तान बसविलीत .   या सर्व भाषिकांच्या मुलांसाठी,  खाजगी कॉन्व्हेंट स्कुलची आवशक्यता विविध संस्थांनी पूर्ण केली, ज्यात मॉयनरीटीज म्हणून या साऱ्यांना आरक्षण मिळायला लागले . इथेच मराठी विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी कुचंबणा सुरु झाली.  स्थानिक संस्थेच्या , पालिकेच्या , जिल्ह्याच्या शाळेत मराठी भाषेत शिक्षण घ्यावे,  का, खाजगी कॉन्व्हेंट मध्ये जाऊन इंग्रजी माध्यमातून शिकावे . अन्य भाषिकांच्या मुलांना इंग्रजी शिवाय पर्याय नसल्या कारणाने, त्यांना शिकावेच लागले .  पण अन्य भाषिकातील विद्यार्थ्यांसमोर, मराठी भाषिक विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड कायमच राहिला आहे . त्यात कुशाग्र बुद्धीच्या मुले तग धरू शकलीत , पण सामान्य विद्यार्थी ना मराठी ना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवू शकल्यामुळे त्याचा निम्मा परिणाम करियरवर होत राहिला .  देशातल्या अन्य राज्याच्या शिक्षणात अशी सरमिसळ नसल्याकारणाने , त्या विद्यार्थ्यांना कित्येक वर्षे मातृभाषेतूनच शिक्षण मिळत गेले . इंग्रजी माध्यमांच्या शाळेत देखील एकाच भाषेच्या, जातीच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्या कारणाने स्वाभाविक स्पर्धेतून शिक्षणात प्रगती होत गेली .  आधीच स्थलांतरीत असलेली उदाहरणे असल्याने यांच्यातही स्थलांतराचा धीर असतो आणि याच माध्यमातून प्रगतीची पायरी अधिक जोमाने मिळवितात .  देशांतर्गत स्थलान्तरा नंतर विदेशी स्थलांतराचे प्रमाण सुद्धा मराठी भाषिकांपेक्षा अन्य राज्यांचे अधिकच आहे .   या मुद्द्यामुळे पालिका , जिल्ह्याचा शाळेत शिकणारा मराठी टक्का, पदवी पर्यंतचे जेमतेम शिक्षण घेत शिक्षकी पेशा , बँक , पोस्ट , तहसील, आदी क्षेत्रात तिसऱ्या वर्गात स्थिर होऊ लागला .  त्यातले हुशार विद्यार्थी , अभियांत्रिकी , वैद्यकीय सेवेत जाऊन, सरकारी सेवेत पहिल्या वर्गात स्थान मिळवू लागलेत, यातील काही जणांनी उच्च शिक्षणासाठी परदेशाची वाट धरली आणि तिथेच स्थायिक झालेत .  अत्यंत काठिण्य पातळीची बुद्धिमत्ता गाठण्यात यशस्वी न होण्याच्या कारणातील हे एक महत्वाचे कारण असू शकेल.  राज्याच्या उन्नतीसाठी, तत्कालीन बुद्धिमान वर्ग , राजकारणी वर्ग यांनी किती आणि कसे प्रयत्न केले याचेच फलित लेखात छापलेल्या यादीत दिसून येते .  याच राज्यात  मराठी भाषेला अभिजात दर्जा , मराठी चित्रपटांना प्लॅटफॉर्म, मराठी पाट्या साठी आजही भांडावे लागते आहे .  यातील सर्वात मोठे वास्तव की , वीस मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत , मुख्य सचिव जे राज्याचा कारभार चालवितात त्यांच्यातल्या ४६ पैकी साठ टक्के परभाषिकच होते, हि या राज्याची ओळख सारे काही सांगून जाते .  अंतिमतः दहा कोटींच्या आसपास मराठी भाषिकांकडे पाहण्यासाठी वेळ कुणाला आहे , अशा कितीही पुंगी वाजल्या तरी कुंभकर्णी सत्तेला त्याचे काही देणे घेणे नाही.

विजयकुमार वाणी , पनवेल 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: