नैतिकेचा टिकाव कसा लागणार ?
दिनांक २ सप्टेंबर २०२३, लोकसत्ता अंकातील "नैतिकतेचे काय ? " संपादकीय वाचले . सदर लेखात, शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांच्या समोरील आव्हाने आणि एकूण परिस्थितीचे विश्लेषण केले आहे . नैतिकता, समर्पण , त्याग, संयम , चिकाटी ,आदर्शव्रती ,चारित्र्यवान अशा विविध गुणांनी समृद्ध असणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक असे चित्र सामान्यपणे स्वातंत्र्यपूर्व , उत्तर काळात होत राहिले. शक्यतो एकाच घराण्यात शिक्षकांची पिढी निर्माण होत राही, त्यांची शिक्षकांची किर्ती दूरवर असे . त्या काळात मर्यादित शिक्षणाची माध्यमे असल्यामुळे, उपलब्ध शिक्षकांच्या संख्येवर गरज पूर्ण होत असे. पिढीजात , परंपरागत शिक्षकांच्या अंगी साहजिकच सारे नाही तरी बरेच गुण भिनलेले असत. सत्तरीच्या दशकानंतर शिक्षण व्यवस्थेत बोर्डाच्या परीक्षेतील बदल , इंग्रजी भाषांच्या शाळांत वाढ , खाजगी शाळांना परवानगी , अशा अनेक बदलांमुळे शिक्षकांची वाढती गरज भासू लागली . शिक्षक निर्मितीच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयां व्यतिरिक्त खाजगी अध्यापक विद्यालये निर्माण झालीत. शासकीय विद्यालयात गुणवत्तेच्या आधारावर मिळणारा प्रवेश, खाजगी विद्यालयात सहज उपलब्ध होऊ लागला. एकूणच अधिकच संख्येने शिक्षकांची निर्मिती होऊ लागल्यामुळे त्याचा परिणाम प्रत्यक्ष,अप्रत्यक्षरीत्या शिक्षकांच्या गुणवत्तेवर झाला . खाजगी शाळांनाही शासनाचे अनुदान प्राप्त होऊ लागल्याने आणि एकूणच प्रगतिशील, बाह्य, अंतर्गत स्वरूपामुळे खाजगी शाळांकडे विद्यार्थ्यांचा एवढा ओढा वाढला की , मोठ्या स्वरूपात देणगी देऊन विद्यार्थी प्रवेश घेऊ लागलेत. संस्था , शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थी यांची संयुक्तरित्या प्रगती साधली. दुसऱ्या बाजूस प्रचंड संख्येने विना अनुदान खाजगी शाळांना परवानगी दिल्याने , संस्था चालकांनी नफ्याच्या गुणोत्तरावर शिक्षकांना सुविधांशिवाय अत्यंत कमी पगारावर वापरून घेतात . शासकीय, अनुदानित आणि खाजगी शाळांतील शिक्षकांच्या वेतनातील तफावत, दरी रुंदावत गेल्यामुळे त्याचे चौफेर परिणाम दिसू लागले . या घडीला प्रचंड संख्येने अध्यापक विद्यालयातून पदवी घेतलेल्या उमेदवारांना सरकारी धोरणे, उदासीनता, प्रवृत्ती मुळे शिक्षकांच्या रिक्त जागेवरील नियुक्त्या रखडल्या आहेत . उत्तीर्ण वेळी असलेले वय आणि नियुक्ती साठी दहा दहा वर्षे वाट पाहत राहिल्यामुळे शारीरिक, मानसिक परिणामांमुळे नियुक्त झाल्यावर शिकविण्याच्या शैलीवर परिणाम होणारच . दुसऱ्या भागात ठराविक योग्यतेचे शिक्षक वगळता , उर्वरित मात्र, बदली ,पदोन्नती ,जवळची शाळा , पुरस्कार, समित्यांवर वर्णी , वरिष्ठांची मर्जी, या शिवाय सामाजिक ,सार्वजनिक , राजकीय क्षेत्रात क्रियाशील झाल्याने एकमेकांवर कुरघोडी करत आहेत . त्याचे असंख्य परिणाम शिक्षकांच्या गुणवत्तेवर, नैतिकतेवर वा अनेक गुणांवर होत आहे . या आणि अनेक कारणांनीं शिक्षण क्षेत्रातील बजबजपुरीचा खेळ खंडोबा झाल्याचे दिसत आहे . या सर्वांपुढे नैतिकेचा टिकाव कसा लागणार हे विचार करण्यासारखे आहे .
विजयकुमार वाणी , पनवेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा