पर्यायी इंधनाचा वापर मंत्री महोदयांच्या दमदार वृत्तीनेच शक्य आहे .
लोकसत्ता दिनांक १४ संप्टेंबर २०२३ "नितिनभौ जरा दमाने " संपादकीय वाचले . श्री गडकरी यांच्या पर्यायी इंधनाच्या प्रयत्नांसंबधी मीमांसा करताना सक्षम पर्याय पर्यावणपूरक इंधन येईपर्यंत पेट्रोल डिझेलच्या गरजे विषयी भाष्य केले आहे.
दिवसेंदिवस ऑटोमोबाईल क्षेत्रातील आधुनिकतेमुळे पेट्रोल डिझेल यांच्या इंधन कार्यक्षमतेला अनुसरून, पर्यावरणपूरक पर्यायाचा विचार करून, पेट्रोल डिझेलच्या वाहनांच्या किमतींपेक्षा, वाढीव दरात
पार्टली सीएनजी, पार्टली हायब्रीड (बॅटरी ऑपेरेटेड), पूर्णतः इलेक्ट्रिक अशा विविध प्रकारच्या वाहनांची निर्मिती होत आहे . पर्यायी इंधनामध्ये इलेक्ट्रिक (बॅटरी ऑपेरेटेड) चा उपयोग करून वाहने निर्मिती सुरु झाली आहे. जीवाश्म इंधन , जैवइंधन , हायड्रोजन यांचा वाहनांमधील वापराची प्रक्रिया अद्यापही फलदायी ठरलेली दिसत नसली तरी, त्यातही संशोधन सुरु आहे . अन्य देशांच्या मानाने भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेने वाहनांना लागणारे इंधन, एकंदरीत महिन्यास बारा ते तेरा अब्ज डॉलर्स खर्चकरून दिड लक्ष बॅरल्सची आयात केली जाते . या साऱ्या घटनांचा, घटकांचा विचार करूनच रस्ते वाहतूक केंद्रीय मंत्री मा श्री गडकरी यांचे पर्यायी इंधनासंबंधी प्रयोग संशोधन सुरु आहे, हे खरोखरच प्रशंसनीय आहे . पर्यायी इंधनाच्या बाबतीत आग्रही भूमिका घेण्या मागे दूरदृष्टी , इंधनावर मोठ्या प्रमाणात आयात खर्चाची बचत करण्याचा व्यापक विचार असू शकतो . दूरचित्रवाणीमुळे आकाशवाणी , ऑनलाईन मुळे छापील वर्तमानपत्रे , मेट्रोमुळे रस्त्यावरील वाहतूक याच्यावर परिणाम झाला नाही , असे म्हणणे असले तरी , नव्वदच्या दशकातील मोबाईल क्रांतीमुळे लँडलाईन संचांवर प्रचंड परिणाम झाल्याचे दिसून आले, श्रीमंतांच्या हातातील मोबाईल संच आज सर्व सामान्यांच्या हातातील झालेला आहे . त्याच प्रमाणे आज आर्थिक आवाक्याच्या बाहेर असणाऱ्या वीजेवर चालणाऱ्या गाड्या , त्यांच्या चार्जिंग साठी लागणार वेळ , या साऱ्यात सुटसुटीत बदल होऊ शकतो आणि येत्या दहा वर्षात वाजवी किंमतीतही मिळू लागल्यास सर्व सामान्यांना पेट्रोल डिझेल बंद नाही झाले तरी परवडण्याऱ्याना इलेक्ट्रिक गाडीचा पर्याय उपलब्ध झाल्यास पेट्रोल डिझेल इंधन बचतीचा मार्ग मिळू शकतो . नितिनभौ यांच्या दमदार वृत्तीनेच दृष्ट लागणाऱ्या रस्त्यांची निर्मिती झाली त्याप्रमाणेच दमाने घेतल्यास पर्यायी इंधनाचा मार्गही खुला होण्यास हरकत नसावी.
विजयकुमार वाणी , पनवेल

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा