"सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिक्त जागा चिंताजनक विषय "
२१ सप्टेंबर २०२३ अंकातील, मटा विशेष "मेकॅनिकल, सिव्हिल इंजिनिअरिंग ओस " वृत्तात, दिड लक्ष अभियांत्रिकी प्रवेश खुले असताना मेकॅनिकल, सिव्हिल या कोअर अभ्यासक्रमाच्या, तब्ब्ल चाळीस हजार जागा रिक्त आहेत, असे विदारक सत्य मांडले आहे . दोन तीन दशकांपूर्वी सिव्हिल इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या गुणांवर प्रवेश मिळणाऱ्या कोअर ब्रँच म्हणून गणल्या जात . परंतु कॉम्प्युटर, मॅनेजमेंट क्षेत्रातील प्रगतीने या तिन्ही शाखा आता इतिहास जमा होऊ लागल्यात . १९९० पर्यंत मुंबई ठाणे, पुणे या तिन्ही जिल्ह्यात, ऑटोमोबाईल,
इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल च्या हजारोंच्या संख्येने कंपन्या होत्या . पॉलिटेक्निक मधून पदविका धारण केलेल्या युवकांसाठी नोकरीचे हे माहेरघर होते . आधुनिक क्षेत्रातील कॉम्प्युटर प्रगती ने , जागांच्या वाढत्या दराने , कारखाने बंद पडत गेले परिणामी रोजगार संधीचे मार्ग खुंटत गेलेत. वृत्तात म्हटल्याप्रमाणे, अभियांत्रिकी प्रवेशासाठी
विद्यार्थ्यांचा कल कॉम्प्युटर कडे जास्तच आहे, परिणामी या शाखा मागे पडू लागल्यात . परंतु सिव्हिल शाखेच्या जागा रिक्त राहण्याचे कोडे उलगडलेले नाही . कारण , बंद पडलेल्या गिरण्या, कारखाने , जुन्या चाळींचे पुनर्वसन आदी क्षेत्रात टोलेजंग इमारतींचे बांधकाम, वाहतुकीचे रस्त्यांचे जाळे , फ्लाय ओव्हर्स , मेट्रो , मोनो रेल वैगेरे साठी प्रचंड प्रमाणावर बांधकामे आजतागायत सुरु आहेत , जिथे सिव्हिल अभियांत्रिकी शाखेच्याच विद्यार्थ्यांचे काम असते . भविष्यात अजूनही बांधकामे अपेक्षित असताना देखील, सिव्हिल इंजिनिअरिंग च्या जागा रिक्त राहणे धोक्याचे ठरू शकते . आय टी क्षेत्रातील मिळणारे वेतन कार्यालयीन कामकाजातील वेळ , बढतीच्या , परदेशात काम करण्याच्या संधी अशा विविध कारणांनी सिव्हिल इंजिनिअरिंग कडे जाण्याचे टाळले जाणे असू शकते . पायाभूत सुविधा, स्टार्ट अप, सेवा, कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर याच्या बळावर एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था नेण्याची स्वप्ने पाहणाऱ्या राज्याची, शिक्षणाची स्थिती राज्यकर्ते, प्रशासनाला अवगत नसावी का ? एकूण चौदा लक्ष विद्यार्थी बारावीची परीक्षेतील, ८५ % उत्तीर्णांना, पदविका , पदवी. पदव्युत्तर शिक्षणानंतर योग्य रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचे शासनाचे कोणतेही धोरण अथवा नियोजन नाही. अभियांत्रिकी, व्यवस्थापन शाखेतील मोजक्याच कॉलेजातील मोजक्याच विद्यार्थ्यांना आय टी क्षेत्र , सेवा क्षेत्र कँपस माध्यमातून नोकरी मिळते. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कॉम्प्युटर लँग्वेजेस प्रोग्रामिंग वैगेरे आत्मसात करून सुद्धा ट्रेनी , अप्रेंटिसशिप मिळविण्यासाठी युवकांची पंचविशी खर्ची होते . उर्वरित पन्नास टक्के स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत तिशी गाठतात . उर्वरित लाखाच्या वर पदवीधर युवक अक्षरशः रोजगार संधीची वाट पहात असतात . वर्षानुवर्षे याचे प्रमाण वाढतच आहे . मात्र शासनाने या वृत्ताची दाखल घेणे आवश्यक असून, भविष्यात सिव्हिल इंजिनिअर मिळणे कठीण होऊन बांधकाम क्षेत्रावर प्रचंड परिणाम होऊ शकतो .
विजयकुमार वाणी , पनवेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा