शनिवार, १५ ऑक्टोबर, २०२२

लेख १० (६ ऑक्टोबर २०२२)


असोनिया दृष्टी झालो मी आंधळा !!

भोजन एकच पणं वाढे दोन ठिकाणी , कुणा सोबत कसे जावे, कुठे जावे, किती जणांनी जावे, काय खावे, याचे आराखडे दशमी पूर्व सुर्यास्ता पर्यंत बांधले गेलेत. पहिल्यांदाच सभेचे प्रक्षोभक टिझरस् प्रक्षेपित करण्यात आलेत. सर्वत्र बालबाला जाहला आणि प्रत्यक्ष दोन्ही भोजनांना सुरुवात होण्याआधी, चवीसाठी कर्कश बेसूर संदर्भहीन ओरडणारे सरदार, त्यात मुखियाचे आगमन आणि सुरुवात, आणि हास्य जत्रेच्या गौरवच्या भाषेत पुन्हा पुन्हा तीच भाषा, तेच तेच संदर्भ, तोच आवेश, तोच आविर्भाव , मध्येच खरे आहे का? त्यावर विषय कळला असेल, नसेल तरी हो ओ ओ अशा आरोळ्या, धमक्या, द्वेष, आरोप प्रत्यारोपाच्या फेरीत समारोप.

का आणि कशासाठी एवढा खटाटोप , विचारांचे सोन लुटण्यासाठी मैदान आरक्षणा वरून कोर्ट कचेऱ्या आणि प्रत्यक्षात लुटले काय? प्राणी , मत्सर आणि दुसऱ्याप्रती दुस्साह. छत्रपतींच्या संस्कारात गत चार पाच शतके सार्या मराठ्यांनी काय कित्ते गिरविले तर छत्रपतींच्या उत्तर सत्तेत ज्या प्रमाणे बेबंदशाही निर्माण झाली, पेशव्यांची नियुक्ती झाली त्यात कधी मधी विजयाचे स्वप्न पूर्ण झालेत तर कधी आपआपसात वैर निर्माण होऊन राज्ये खालसा झालीत. तोच इतिहास गिरविला जातोय, आधीच चिंचोळया भागापुरता सत्ता त्यात विश्वाचा सत्ताधीश असल्याचा आवाका, आणि हेच गणित जमले नसावे, वारसदारांना ना रयतेच्या जाणत्यांना.  

मग असोनिया दृष्टी झालो मी आंधळा, या उक्तीप्रमाणे सारे लक्षावधी का बरे भरडले जातात. घरचे सण, अन्य कामधंदे , प्रापंचिक जबाबदारी सोडून , विचारांचे सोन लुटण्यासाठी आलेल्या या रयतेला काय मिळाले. घरोघरी सोन लुटण्याचे सोडून घरी बसून पणं लक्षावधी जनता नवे विचार टिव्ही वर ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आतुर होती पणं सारीच निराशा.  

नवीन नेत्यांकडून अपेक्षित होते ते राज्याच्या विकासाचे चित्र, प्रादेशिक विभागावर नवीन उद्योगधंदे आणि बेरोजगारीच्या समस्येचे निराकरण, दूध, शेती मालास योग्य हमी भाव, बाजारपेठा उपलब्धि, शासकीय पदांची निर्मिती किंवा पद भरती, शालेय विद्यार्थी वर्गास फी शुल्क सवलत माफी, वसतिगृहाची निर्मिती, व्यवसायभिमुख तंत्र शिक्षणाच्या दृष्टीने इन्स्टिट्युट ची निर्मिती, दळणवळण साधनांच्या जल मार्ग, रस्ते मार्गात सुधारणा, वीज, इंधन दरवाढविरोधात केंद्राकडे सवलतीची मागणी, गुन्हेगारीस आळा त्यासाठी पोलीस दल सक्षमीकरण ,या आणि अशा लोकाभिमुख योजनांच्या निदान घोषणा जरी केल्या असत्या तर पुढच्या खेपेस वारसदारांनी सुद्धा नियोजनाचे आराखडे मांडले असते तर नवल वाटले नसते. आता या बेबंदशाहीच्या तडाख्यातून दोघांनी बाहेर या, सत्य स्वीकारा, जबाबदारीची जाणीव ठेवा आणि एकास शासन निर्मितीचा मिळालेल्या संधीचे सोने करा, तर वारसदारांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे स्वतःला सिद्ध करा. 

पण यात एक सिद्ध झाले, दश कोटींच्या या राज्यात बाळा साहेबांप्रती श्रद्धा असलेले तीन ते चार लक्षांच्या संख्येने तहान भूक विसरुन सणासुदी मुंबापुरीत एकत्र येतात हा एक जागतिक विक्रमच म्हणावा लागेल आणि दोघांची विभागून दिसत असली तरी त्यात भगव्याची ताकद आहे, कधी जर एकत्र आले तर? 

याचा विरोधकांना नक्कीच विचार करायला लावणारा हा संदर्भ आहे. 

विजय आप्पा वाणी , 

(सध्या फ्रँकफर्ट मुक्कामी) 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: