शनिवार, १५ ऑक्टोबर, २०२२

लेख ११ (१४ ऑक्टोबर २०२२)


आम्ही मागास राहण्यातच धन्यता.

आजच्या १४ ऑक्टोबर लोकसत्तेतील दोन स्तंभ लेख ' हिंदुत्व सर्वसमावेशकच ' ' समाजवाद वेगळा कसा ' आणि संपादकीय ' उठ जाये गर ये ' या तिन्ही मथळ्याखाली आपण अजूनही संकुचित पध्दतीत जात ,धर्म, परंपरा या आणि अनेक रुढींमध्ये अडकलेले आहोत याचे द्योतकच दिसते आहे. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे साऱ्याच राजकीय पक्षांनी जाती धर्मावर आधारित राजकारण केले.    

सांगायचा मुद्दा हाच आहे की, किती वर्षे सारेच राजकीय पक्ष जात धर्माच्या बुरख्याखाली वावरणाऱ् आहेत. देशाची राष्ट्राची प्रगती साठी काही ठोस पावले, धोरणे निर्माण करण्याचे धारिष्ट्य दाखविण्यासाठी वेळ काढणार आहेत की नाही. सध्य घडीला

एकूण २९ राज्ये असलेल्या खंडप्राय देशात १०० पेक्षाही अधिक प्रादेशिक पक्ष आहेत. या प्रादेशिक पक्षांना ना राष्ट्राची चिंता ना राज्याच्या प्रगतीची. या प्रादेशिक पक्षांचा सारा वेळ युती, आघाडी यातील कुरबुरी सत्ता संघर्षातच जात असतो. यांना ना राज्यातील प्रगतीचे घेणे देणे, ते सारे केंद्र सरकारचे काम अशा आवेशात सरकारे चालविली जात आहेत. प्रत्येक आठवड्यात एक नवीन विषय आणून त्यावर यांच्या प्रवक्त्यांनी विरोधकांवर तोंड सुख घ्यावे, आणि विषय नसले तर केंद्रातील सरकारवर महागाई, परराष्ट्रधोरण यावर काही बाही बोलून प्रसिद्धी मिळवावी. या पेक्षा केंद्राची स्थिती वेगळी नाही, आधीच्या सरकारांनी काय केले यातच भाषणात लेखात वेळ दवडून स्वतःचा डांगोरा पिटण्यात धन्यता मानीत आहे. 

सुरवातीच्या काळात नेहरू राजवटीत अनेक सरकारी उत्पादन, आर्थिक, शैक्षणिक संस्था आजही प्रगतीची साक्ष देत उभ्या आहेत. उत्पादन क्षेत्रातील जागतिक घडामोडींमुळे किंवा परंपरागत धोरण न बदविल्यामुळे बरेचसे उत्पादन क्षेत्रे मोडीत निघाले, काढलेत. पण त्यावर पर्याय उपलब्ध करून आर्थिक प्रश्न रोजगार प्रश्न कसा सोडवावा याचा अभ्यास शून्य. तत्कालीन नेत्यांची दूरदृष्टी वाखाणण्याजोगी होती. परंतु ते विचार , दूरदृष्टी नेणारी फळी निर्माण न होण्या मागचं कारण का राजकारण कधी कळले नाही. गेल्या ५० वर्षांच्या काळात जेवढी राज्यात, देशात जेवढी सरकारे आलीत, त्यातील निम्म्याहून अधिक नेत्यांनी सरकारी खर्चाचे, वैयक्तिक परदेश दौरे केले आहेत. दौऱ्याहून आल्यानंतर त्या शहराचे, देशाचे वर्णन करण्यासाठी चर्चासत्रे आयोजून प्रगतीचे वर्णन केले. पण प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी प्रयत्न किती केले अथवा पुढाकार घेतला यावरून यांची देशाच्या, राज्याच्या विकासाप्रती असलेली दृढता/ उदासीनता दिसून येते. 

युरोपातील आजवर सर्वाधिक प्रगती झालेल्या देशांची विकासाची गती पहाता प्रचंड विस्मय वाटतो. साऱ्याच देशात पहिल्या शतका पासूनचे ते आजवरच्या आधूनिकीकरणचे द्योतक दिमाखात उभी आहेत. बरे तसे प्रत्येक देश परकीय आक्रमण म्हणा , महायुद्धाच्या खाईत लोटला गेला होता आणि साऱ्याच व्यवस्थेत शून्यात पोहोचला होता. पण गत वैभवाच्या साऱ्या खुणा, सारी ऐतिहासिक परंपरा जशीच्या तशी ठेवून, नवीन क्षेत्रात प्रगती करून साऱ्या जगतात वरचष्मा मिळवीत आहेत. या देशांमध्येही जात धर्म भाषेचा प्रखर अभिमान आहे पणं तो देशाच्या प्रगतीच्या आड येऊ देत नाही. शिस्त अनुशासन आणि देश प्रेम या जोरावर त्यांनी यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत एकंदरीत यांची प्रगती पाहून राष्ट्र प्रथम हिच निष्ठा दिसते. जी आपली निव्वळ पोकळ घोषणा ठरत आहे.

लोकसत्ता सारख्या अग्रगण्य दैनिकातून संपादकीयातून, अन्यथा स्तंभ लेखातून, या प्रगतीचे कौतुक केले जाते आणि खरचं सर्वसामान्यांना ते वाचून ते पाहण्याचा मोहही होतो. या शिवाय अनेक लेखांतून देशाच्या, राष्ट्राच्या , राज्याच्या प्रगती विषयी कायम ताशेरे ओढले जातात, पणं निर्ढावलेले नेते यातून कधी बोध घेत नाही. का बरे आम्ही अजून जात धर्म या पक्ष भाषा प्रांत घराणेशाही हिंदू समाजवाद सेक्युलॅरिझम परंपरा यावरच वाद घालतो किंवा घालयचाच असेच संस्कार पिढ्यान् पिढ्या होत आहेत, यात लोकशाहीचा भक्कम स्तंभ वृत्तपत्र माध्यम अक्षरशः बाजूला सारून परंपरा वादाचे भूत संचारल्यागत सारा समाज वावरतो आहे. फक्त थोड्या फार सुधारणांवर पोवाडे गायचे आणि धन्यता मानायची असेच चालायचे असे म्हणावे.



विजय आप्पा वाणी , 

(सध्या फ्रँकफर्ट मुक्कामी) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: