गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०२२

लेख ४ (२७ ऑक्टो २२ प्रसिद्धी)


राज्यपाल पदच गोठवा. 

दिनांक २६ ऑक्टोबर , संपादकीय राज्यपाल नव्हे -  राज्यपलांच्या अधिकारात अनेक बाबी आहेत, कायदेविषयक, न्यायिक, आर्थिक, आणीबाणी विषयक, विशेष नेमणुका अर्थात या साऱ्या घटनांवर नियंत्रण करण्याचे आहेत.

या साऱ्या अधिकारात केंद्राची सत्ता असणाऱ्या पक्षाचा पाठिंबा असणाऱ्या आणि राज्यात केंद्रातील सत्तेतील विरोधी पक्षाचे सरकार असल्यास राज्यपालांच्या कार्याचे विशेष मोजमाप केले जाते.  देशातील अनेक वर्षांच्या इतिहासात ह्याच घटनांचे दाखले दिले जातात. नियुक्त केलेले राज्यपाल एकतर निवृत्त राजकारणी, सनदी/सुरक्षा अधिकारी असतात त्यांना केंद्रातील सत्ताधीशांना कर्तुत्व दाखविण्यासाठी संधी शोधीत असतात, ती संधी राज्यातील विरोधी पक्षनेते अर्थातच केंद्रातील सत्तेतील भागीदार मिळवून देत असतात. 

राजकारणाचा भागापुरता म्हणा किंवा खरोखर चुकीचे निर्णय असल्यास त्यास थांबविणे हे सारे ठीक आहे.  पण कारण नसता आडकाठी आणून, कायद्याच्या कोणत्यातरी कलमात घुसवून अडचणी निर्माण करण्याची घातक वृत्ती राज्यपाल पदाकडून बळास लागण्याचे लक्षण वाढत आहेत. गेल्या ५० वर्षांच्या इतिहासात एकूण २९ राज्यात , राज्यपालांच्या वर्तणुकीचा दाखला देणाऱ्या ५० च्या वर घटना या लोकशाहीच्या दृष्टीने नक्कीच घातक ठरल्या आहेत. परंतु त्या त्या काळातील केंद्रातील सत्ताधीश म्हणा किंवा राज्यातील सत्ताधीश यांनी त्याचा स्वतःपुरता अर्थ लावून लोकशाहीचे धिंडवडे काढले आहेत.  या सर्वात जे झाले आहे ते म्हणजे राज्यपाल पदाची, नियुक्त केलेल्या व्यक्तीची किंमत केली जात आहे.  अगदी उण्या पुऱ्या गेला बाजार सदस्य असलेला पक्ष प्रमुखही, राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर , व्यक्तीवर, नावावर टीका करू लागला आहे.  यात राज्यपालाना काही देणे घेणे नाही अथवा कार्य पद्धतीत सुधारणा करीत नाही आणि आहे तोपर्यंत कार्यकालात अशा प्रकारच्या कुरापती करणे हेच ध्येय दिसते.  ना जनाची ना मनाची लाज बाळगणाऱ्या या पदाची शान घालविणाऱ्या शोभेच्या पदास एकतर विसर्जित करावे , गोठून टाकावे आणि न्याय संस्थेवर विश्वास ठेवून प्रत्येक राज्याच्या न्यायाधिशांना हे अधिकार सोपविण्यात यावे. अर्थात हे पुन्हा अधिकार लोकशाही कक्षाच्या विधिमंडळात पास होणे आणि राज्यपालांकडून , केंद्राकडे जाणे अपेक्षित आहे ते होणे शक्य नाही.  पण माध्यमांनी उचलून धरण्यात तरच शक्य होईल.

विजय आप्पा वाणी ,
(सध्या फ्रँकफर्ट मुक्कामी)




शनिवार, २२ ऑक्टोबर, २०२२

लेख १३ (२२ ऑक्टोबर २२)


शनिवार दिनांक २२ ऑक्टोबर लोकसत्ताा अन्यथा  "माझा कुणा म्हणू मी" 

ब्रिटनच्या ऋषी सूनक ते यू एस च्या कमला हॅरिस यांच्यासह भारतीय वंशावळीचे "अन्यथा" नेहमी सारखेच माहितीपूर्ण अर्थात खुमासदार आहे.  

भारतातल्या भारतात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नोकरी व्यवसायानिमित्त स्थलांतरीत होणाऱ्या व्यक्तीकडून नोकरी व्यवसाय मिळण्यासाठी अपेक्षा केली जाते, म्हणजे दूर असला तरी आपल्या कामाचा अशी मानसिकता बनली आहे. त्याचप्रमाणे भारतातून अनेकांनी पोटा पाण्यासाठी, नोकरीसाठी युरोप, यू एस मध्ये स्थलांतर केले. त्यांच्या आज दुसऱ्या, तिसऱ्या पिढ्या या देशांत वाढत आहेत. त्याकाळात या सर्वांनी अनेक संकटाना तोंड दिले. वातावरण बदल, खाण्याच्या सवयी, भाषा, शिक्षण, वर्णभेद, यातून मार्गक्रमण करीत स्वतःला सिद्ध करून पुढची पिढी घडविली. दुसऱ्या पिढीही यातून कमी अधिक प्रमाणात त्रास सहन करून स्थिरावल्या आहेत. हे सारे त्रास सहन करीत असताना याच देशांच्या सवयी अंगवळणी पडल्यामुळे साहजिकच त्या देशाचे प्रेमही वाढीस लागले. खरंच हे सारे देश स्वच्छ्ता, शिस्त, शिक्षण, आर्थिक नियोजन, वर्तणूक वैगेरे बाबीत आपल्या देशाच्या पुढे आहेत , हे "अन्यथा" सदरात वेळोवेळी अधोरेखित केलेच आहे. ज्या देशात जन्माला आले, किंवा शिक्षण झाले आणि स्थायिक झालेत , साहजिकच अंगवळणी पडलेले गुणच स्वभावात येतात आणि तशी वर्तणूक होते.  

परदेशस्थ नागरिकांना आपल्या देशाचे बाह्यरूप अथवा महत्वाच्या घडामोडी कळतात, परंतु अनिवासी भारतीयांना अथवा भारतीय वंशाच्या लोकांना अंतर्गत घडामोडी सोबत देशातील संस्कृती म्हणा किंवा असमंजस वर्तणूक करणारे साऱ्याच आघाडीतील गुणवंत पणं दिसतात. हळू हळू त्यांच्या विचारात व्यक्तींविषयी, नातेवाईकांविषयी , समाजाविषयी, राजकारणाविषयी, देशाविषयी एक अढी निर्माण होते आणि ओढ कमी झाल्यामुळे, त्याचे प्रतिबिंब उच्च पदावर पोहोचल्यावर त्यांच्या धोरणात दिसून येते. परंतु आपल्या सवयीनुसार आपल्याला सारेच आपले वाटतात आणि साहजिकच आशा अपेक्षा वाढीला लागतात. सदरचा लेख खरोखर माझा माझा म्हणणाऱ्यांना चपराक आहे . म्हणून माझा कुणास न म्हणता , आमचे आम्हीच तालेवार असे व्हावे लागेल. 

विजय आप्पा वाणी , 

(सध्या फ्रँकफर्ट मुक्कामी) 









मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०२२

लेख १२ (१७ ऑक्टोबर २०२२)


सांस्कृतिक वारसा ( कौटुंबिक वारसदार) शुद्ध बेगडीपणा

सध्या राज्यातील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भात वादळ उठले आहे. वादळाची सुरुवातच नाव, चिन्ह, राजीनामा या गदारोळातच नॉमिनेशन भरण्याचा दिवस मावळताच, ज्यांचा निवडणुकीत उमेदवार नाही, अशांनी फतवा, विचार मांडलेत. यांना आत्ताच, राज्याचा सांस्कृतिक वारसा जपण्याचा मोह? का सारे आता सुरळीत सुरू असताना खोडा घालण्याचा मत्सर निर्माण झाला. हे न कळण्या इतके जनता मूर्ख नाहीत. यावरून निवडणूक विषयांतील तळमळ आणि दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्याची मळमळ दाखवाविशी वाटते.

विधानसभेतील एकूण २८८ जागांपैकी पाच वर्षात एकूण सदस्यांच्या दिड दोन टक्के जरी निधनाचे प्रमाण धरले तरी संख्या ५ होते. या रिक्त जागांची निवडणूक घोषित करतेवेळी सत्ताधारींचे, आघाडी, युती,विरोधी, अपक्ष अशी वर्गवारी करून राजकीय धुरंधर, निवडणुकीचे आखाडे बांधून त्यात निवडून येण्याची सुरक्षितता पाहून त्वरित कौटुंबिक उमेदवारी घोषित केली जाते. सहानुभूतीच्या लाटेवर निवडणूक जिंकली जाते आणि घराणेशाही, कौटुंबिक वारसाचा जन्म इथेच होतो. एकूण पाच वर्षात ५ अशा पद्धतीने गेल्या ५० वर्षात १० विधानसभेत एकूण अंदाजे ५० च्या आसपास असे सहानुभूतीच्या लाटेवरचे वारसदार सर्व सवलतींचा लाभ घेत आहेत.  

राज्याचा या पन्नास वर्षांचा (१० विधानसभा) इतिहास पाहता, २८८ सदस्यांपैकी अंदाजे निम्मे १५० च्या वर उमेदवार हे घराणेशाहीचेच वारसदार आहेत. त्यातील काही जिल्ह्यात तर कित्येक घराण्यातील तिन्ही पिढ्यांतील सदस्य त्यांच्या म्हणण्यानुसार कर्तुत्वावर निवडून येत आहेत. म्हणजे या हिशोबाने गेल्या १० विधानसभेत काही प्रमाणात वर्षानुवर्षे तेच सदस्य धरले तरी अंदाजे ५०० विधानसभा निवडणुकांत घराणेशाही म्हणा, वर्षानुवर्षे तेच उमेदवार म्हणा आल्याने, दुसऱ्या फळीतील असंख्य नेत्यांना, कार्यकर्त्यांना कधीही संधी मिळाली नाही अथवा सरकारी सवलतींचा लाभ घेता आला नाही. या प्रकारे ग्रामपंचायती पासून ते लोकसभे पर्यंत असे किती घराणेशाही द्वारे, वारसदार, सहानुभूतीने निवडून येत असतील याचा विचार करता येत नाही.  

एकूण सांगण्याचा मतीतार्थ हाच आहे की, एक तर पाच वर्षात एकदाच निवडणुका होतात, त्यात सदस्य संख्ये इतकेच उमेदवार उभे करता येतात, त्यात पारंपरिक विजेता प्रबळ दावेदार, त्यात घराणे शाहीला प्राधान्य मिळते, त्यात युती आघाडीचा धर्म पाळून तिकिटे वाटप होते. यातही एखाद्या उमेदवाराचे निधन झाल्यास त्या ठिकाणीही सहानुभूती म्हणून घराणेशाहीला प्राधान्य देण्यात येते, भले ती व्यक्ती पक्षाचे सदस्य असो किंवा नसो, सरकारी नोकरीत असल्यास राजीनामा देऊन निवडणुक लढण्यास भाग पाडले जाते. पण त्यावेळेस हे जे पक्ष नेतृत्व, त्यांच्याच पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्याचा विचार का करीत नाही, त्याला निवडून आणण्याची जबाबदारी का घेत नाही. केवळ सीट टिकविण्याच्या नादात, सत्ता संघर्षाच्या नादात जुलमी राजाप्रमाणे वागत आहेत. यातच दुसऱ्या फळीतील नेता, कार्यकर्ता डावलला जातो आणि म्हणूनच याच तिकिटासाठी, सत्तेसाठी, पक्ष नेतृत्वासाठी, पक्ष बदल , सत्तांतरे घडत आहेत.

सरकारी नोकरीत असताना मृत्यू आल्यास वारसदाराना चतुर्थ श्रेणी किंवा तृतीय श्रेणीतील (एन्ट्री लेव्हल) पोस्ट वर अनुकंपा तत्वावर नियुक्ती केली जाते, याचे प्रमाणही एकूण उपलब्ध असलेल्या रिक्त जागांसाठी अंदाजे २ किंवा ३ टक्केच असते. आणि सरकार चालविणाऱ्या ह्या साऱ्यांना हे हि माहिती आहे की मृत पावलेल्या नोकरदरांपैकी, त्यांच्या किती वारसदारांना सरकारी नोकरीत सामावून घेतले आहे. या ठिकाणी असे पत्रके काढून नवीन नियुक्ती थांबवून, या साऱ्या वारसदारांना सरकारी नोकरीत सामावू शकतील का? याचे यांनाच माहिती. यांचा विचार फक्त सत्तेतील भागीदारी मिळण्यासाठी अथवा नाम निराळे राहून मोठे होणे, राज्याचा सांस्कृतिक वारसा जपणे वैगेरे सगळे शुद्ध बेगडिपण आहे.


विजय आप्पा वाणी , 

(सध्या फ्रँकफर्ट मुक्कामी) 






शनिवार, १५ ऑक्टोबर, २०२२

लेख ११ (१४ ऑक्टोबर २०२२)


आम्ही मागास राहण्यातच धन्यता.

आजच्या १४ ऑक्टोबर लोकसत्तेतील दोन स्तंभ लेख ' हिंदुत्व सर्वसमावेशकच ' ' समाजवाद वेगळा कसा ' आणि संपादकीय ' उठ जाये गर ये ' या तिन्ही मथळ्याखाली आपण अजूनही संकुचित पध्दतीत जात ,धर्म, परंपरा या आणि अनेक रुढींमध्ये अडकलेले आहोत याचे द्योतकच दिसते आहे. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे साऱ्याच राजकीय पक्षांनी जाती धर्मावर आधारित राजकारण केले.    

सांगायचा मुद्दा हाच आहे की, किती वर्षे सारेच राजकीय पक्ष जात धर्माच्या बुरख्याखाली वावरणाऱ् आहेत. देशाची राष्ट्राची प्रगती साठी काही ठोस पावले, धोरणे निर्माण करण्याचे धारिष्ट्य दाखविण्यासाठी वेळ काढणार आहेत की नाही. सध्य घडीला

एकूण २९ राज्ये असलेल्या खंडप्राय देशात १०० पेक्षाही अधिक प्रादेशिक पक्ष आहेत. या प्रादेशिक पक्षांना ना राष्ट्राची चिंता ना राज्याच्या प्रगतीची. या प्रादेशिक पक्षांचा सारा वेळ युती, आघाडी यातील कुरबुरी सत्ता संघर्षातच जात असतो. यांना ना राज्यातील प्रगतीचे घेणे देणे, ते सारे केंद्र सरकारचे काम अशा आवेशात सरकारे चालविली जात आहेत. प्रत्येक आठवड्यात एक नवीन विषय आणून त्यावर यांच्या प्रवक्त्यांनी विरोधकांवर तोंड सुख घ्यावे, आणि विषय नसले तर केंद्रातील सरकारवर महागाई, परराष्ट्रधोरण यावर काही बाही बोलून प्रसिद्धी मिळवावी. या पेक्षा केंद्राची स्थिती वेगळी नाही, आधीच्या सरकारांनी काय केले यातच भाषणात लेखात वेळ दवडून स्वतःचा डांगोरा पिटण्यात धन्यता मानीत आहे. 

सुरवातीच्या काळात नेहरू राजवटीत अनेक सरकारी उत्पादन, आर्थिक, शैक्षणिक संस्था आजही प्रगतीची साक्ष देत उभ्या आहेत. उत्पादन क्षेत्रातील जागतिक घडामोडींमुळे किंवा परंपरागत धोरण न बदविल्यामुळे बरेचसे उत्पादन क्षेत्रे मोडीत निघाले, काढलेत. पण त्यावर पर्याय उपलब्ध करून आर्थिक प्रश्न रोजगार प्रश्न कसा सोडवावा याचा अभ्यास शून्य. तत्कालीन नेत्यांची दूरदृष्टी वाखाणण्याजोगी होती. परंतु ते विचार , दूरदृष्टी नेणारी फळी निर्माण न होण्या मागचं कारण का राजकारण कधी कळले नाही. गेल्या ५० वर्षांच्या काळात जेवढी राज्यात, देशात जेवढी सरकारे आलीत, त्यातील निम्म्याहून अधिक नेत्यांनी सरकारी खर्चाचे, वैयक्तिक परदेश दौरे केले आहेत. दौऱ्याहून आल्यानंतर त्या शहराचे, देशाचे वर्णन करण्यासाठी चर्चासत्रे आयोजून प्रगतीचे वर्णन केले. पण प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी प्रयत्न किती केले अथवा पुढाकार घेतला यावरून यांची देशाच्या, राज्याच्या विकासाप्रती असलेली दृढता/ उदासीनता दिसून येते. 

युरोपातील आजवर सर्वाधिक प्रगती झालेल्या देशांची विकासाची गती पहाता प्रचंड विस्मय वाटतो. साऱ्याच देशात पहिल्या शतका पासूनचे ते आजवरच्या आधूनिकीकरणचे द्योतक दिमाखात उभी आहेत. बरे तसे प्रत्येक देश परकीय आक्रमण म्हणा , महायुद्धाच्या खाईत लोटला गेला होता आणि साऱ्याच व्यवस्थेत शून्यात पोहोचला होता. पण गत वैभवाच्या साऱ्या खुणा, सारी ऐतिहासिक परंपरा जशीच्या तशी ठेवून, नवीन क्षेत्रात प्रगती करून साऱ्या जगतात वरचष्मा मिळवीत आहेत. या देशांमध्येही जात धर्म भाषेचा प्रखर अभिमान आहे पणं तो देशाच्या प्रगतीच्या आड येऊ देत नाही. शिस्त अनुशासन आणि देश प्रेम या जोरावर त्यांनी यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत एकंदरीत यांची प्रगती पाहून राष्ट्र प्रथम हिच निष्ठा दिसते. जी आपली निव्वळ पोकळ घोषणा ठरत आहे.

लोकसत्ता सारख्या अग्रगण्य दैनिकातून संपादकीयातून, अन्यथा स्तंभ लेखातून, या प्रगतीचे कौतुक केले जाते आणि खरचं सर्वसामान्यांना ते वाचून ते पाहण्याचा मोहही होतो. या शिवाय अनेक लेखांतून देशाच्या, राष्ट्राच्या , राज्याच्या प्रगती विषयी कायम ताशेरे ओढले जातात, पणं निर्ढावलेले नेते यातून कधी बोध घेत नाही. का बरे आम्ही अजून जात धर्म या पक्ष भाषा प्रांत घराणेशाही हिंदू समाजवाद सेक्युलॅरिझम परंपरा यावरच वाद घालतो किंवा घालयचाच असेच संस्कार पिढ्यान् पिढ्या होत आहेत, यात लोकशाहीचा भक्कम स्तंभ वृत्तपत्र माध्यम अक्षरशः बाजूला सारून परंपरा वादाचे भूत संचारल्यागत सारा समाज वावरतो आहे. फक्त थोड्या फार सुधारणांवर पोवाडे गायचे आणि धन्यता मानायची असेच चालायचे असे म्हणावे.



विजय आप्पा वाणी , 

(सध्या फ्रँकफर्ट मुक्कामी) 

लेख १० (६ ऑक्टोबर २०२२)


असोनिया दृष्टी झालो मी आंधळा !!

भोजन एकच पणं वाढे दोन ठिकाणी , कुणा सोबत कसे जावे, कुठे जावे, किती जणांनी जावे, काय खावे, याचे आराखडे दशमी पूर्व सुर्यास्ता पर्यंत बांधले गेलेत. पहिल्यांदाच सभेचे प्रक्षोभक टिझरस् प्रक्षेपित करण्यात आलेत. सर्वत्र बालबाला जाहला आणि प्रत्यक्ष दोन्ही भोजनांना सुरुवात होण्याआधी, चवीसाठी कर्कश बेसूर संदर्भहीन ओरडणारे सरदार, त्यात मुखियाचे आगमन आणि सुरुवात, आणि हास्य जत्रेच्या गौरवच्या भाषेत पुन्हा पुन्हा तीच भाषा, तेच तेच संदर्भ, तोच आवेश, तोच आविर्भाव , मध्येच खरे आहे का? त्यावर विषय कळला असेल, नसेल तरी हो ओ ओ अशा आरोळ्या, धमक्या, द्वेष, आरोप प्रत्यारोपाच्या फेरीत समारोप.

का आणि कशासाठी एवढा खटाटोप , विचारांचे सोन लुटण्यासाठी मैदान आरक्षणा वरून कोर्ट कचेऱ्या आणि प्रत्यक्षात लुटले काय? प्राणी , मत्सर आणि दुसऱ्याप्रती दुस्साह. छत्रपतींच्या संस्कारात गत चार पाच शतके सार्या मराठ्यांनी काय कित्ते गिरविले तर छत्रपतींच्या उत्तर सत्तेत ज्या प्रमाणे बेबंदशाही निर्माण झाली, पेशव्यांची नियुक्ती झाली त्यात कधी मधी विजयाचे स्वप्न पूर्ण झालेत तर कधी आपआपसात वैर निर्माण होऊन राज्ये खालसा झालीत. तोच इतिहास गिरविला जातोय, आधीच चिंचोळया भागापुरता सत्ता त्यात विश्वाचा सत्ताधीश असल्याचा आवाका, आणि हेच गणित जमले नसावे, वारसदारांना ना रयतेच्या जाणत्यांना.  

मग असोनिया दृष्टी झालो मी आंधळा, या उक्तीप्रमाणे सारे लक्षावधी का बरे भरडले जातात. घरचे सण, अन्य कामधंदे , प्रापंचिक जबाबदारी सोडून , विचारांचे सोन लुटण्यासाठी आलेल्या या रयतेला काय मिळाले. घरोघरी सोन लुटण्याचे सोडून घरी बसून पणं लक्षावधी जनता नवे विचार टिव्ही वर ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आतुर होती पणं सारीच निराशा.  

नवीन नेत्यांकडून अपेक्षित होते ते राज्याच्या विकासाचे चित्र, प्रादेशिक विभागावर नवीन उद्योगधंदे आणि बेरोजगारीच्या समस्येचे निराकरण, दूध, शेती मालास योग्य हमी भाव, बाजारपेठा उपलब्धि, शासकीय पदांची निर्मिती किंवा पद भरती, शालेय विद्यार्थी वर्गास फी शुल्क सवलत माफी, वसतिगृहाची निर्मिती, व्यवसायभिमुख तंत्र शिक्षणाच्या दृष्टीने इन्स्टिट्युट ची निर्मिती, दळणवळण साधनांच्या जल मार्ग, रस्ते मार्गात सुधारणा, वीज, इंधन दरवाढविरोधात केंद्राकडे सवलतीची मागणी, गुन्हेगारीस आळा त्यासाठी पोलीस दल सक्षमीकरण ,या आणि अशा लोकाभिमुख योजनांच्या निदान घोषणा जरी केल्या असत्या तर पुढच्या खेपेस वारसदारांनी सुद्धा नियोजनाचे आराखडे मांडले असते तर नवल वाटले नसते. आता या बेबंदशाहीच्या तडाख्यातून दोघांनी बाहेर या, सत्य स्वीकारा, जबाबदारीची जाणीव ठेवा आणि एकास शासन निर्मितीचा मिळालेल्या संधीचे सोने करा, तर वारसदारांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे स्वतःला सिद्ध करा. 

पण यात एक सिद्ध झाले, दश कोटींच्या या राज्यात बाळा साहेबांप्रती श्रद्धा असलेले तीन ते चार लक्षांच्या संख्येने तहान भूक विसरुन सणासुदी मुंबापुरीत एकत्र येतात हा एक जागतिक विक्रमच म्हणावा लागेल आणि दोघांची विभागून दिसत असली तरी त्यात भगव्याची ताकद आहे, कधी जर एकत्र आले तर? 

याचा विरोधकांना नक्कीच विचार करायला लावणारा हा संदर्भ आहे. 

विजय आप्पा वाणी , 

(सध्या फ्रँकफर्ट मुक्कामी) 



लेख ३ (२९ सप्टेंबर,प्रसिद्धी ३०सप्टेंबर)


 मा संपादक, 

लोकमानस विभाग, लोकसत्ता


महोदय, 

विषय : सी डी एस कर्तव्यदक्षता आणि जबाबदारी


संपादकीय - सी डी एस कसोटी, लेखातील सर्वच मुद्द्यांचा सविस्तर परामर्श घेतला आहे. यात प्रामुख्याने चीन विषयी धोरणांची अंमबजावणी यावर भाष्य केले आहे. पाकिस्तान धार्जिणा काश्मीर प्रश्ना विषयी सी डी एस ची जबाबदारी अधिक आहे असे वाटते. कित्येक दशके पाकिस्तानची आक्रमणे आणि दहशतवाद यांचा त्रास काश्मीर पंजाब सीमावर्ती भागात गत चार पाच पिढ्यान् हूनही अधिक कायम राहिला आहे. गोळीबार, बॉम्ब ग्रेनेड हल्ले, घुसखोरी, निष्पाप नागरिकांचा जीव घेणे या साऱ्यांची लाखात घटना घडून लाखाच्या वर जीव या दशहतवादी हल्ल्यांनी घेतले असतील.  

देशातील दोन्ही प्रमुख पक्षांची काँग्रेस, भाजपा आणि मध्यंतरी काळातील अल्पजीवी जनता पक्षाचे सरकार येऊन सुद्धा हल्ले कमी होत नाहीत अन जीव घेणे हल्ले काही थांबत नाही. राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार ही गत ८ वर्षे कार्यरत आहे, पणं दहशतवाद तसूभर ही कमी झालेला नाही. तिन्ही दल सैन्य प्रमुख या प्रश्नात गांभीर्याने पहात असतील, पणं त्यांना मिळालेला कार्यकाल हा नेहमी अल्पसा ही ठरत असेल. या साऱ्या विवंचनेत सी डी एस ची नेमणूक या संकटासाठी किती जमेची ठरते हे महत्वाचे ठरते. त्यांच्या युद्ध कौशल्याच्या अभ्यासाच्या पद्धती आणि त्यांना मिळणारा परराष्ट्र नीतीचा पाठिंबा यावरच या दहशत वादाचा बीमोड होणार आहे. त्यांना मिळालेला कार्यकाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचे धोरण, गृह मंत्रालयाच्या अंतर्गत शिफारशी आणि महत्वाचं म्हणजे विद्यमान सरकारचा असलेला उर्वरित कार्यकाल शिवाय जागतिक घडामोडींचे केंद्र असलेल्या अमेरिका ,रशिया यांची युद्ध निती यावर सारे अवलंबून आहे. 



विजय आप्पा वाणी , 

(सध्या फ्रँकफर्ट मुक्कामी) 


( महोदय आपणास विनंती की, लोकमानस सदरात सदर छापण्याची कृपा करावी). 


लेख ८ ( २८ सप्टेंबर २०२२)


लोकसत्ता संपादकीय - आजा मेला नि - पक्ष्याध्यक्ष - या लेखात विस्तृतपणे काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. राजकीय पक्षाचे अध्यक्षपदाचे महत्व अधोरेखित केले आहे. देशात एकंदरीत सर्वच राजकीय पक्षांच्या कार्याविषयी आढावा घेतला असता, असे निदर्शनास येते की, स्वातंत्र्या नंतरच्या काळात काँगेस एकमेव पक्ष होता की ज्यांची साऱ्याच राज्यांवर सत्ता होती. केरळ, बंगाल मध्ये कम्युनिस्टांची, तामिळनाडू मध्ये द्रमुक,अण्णा द्रमुक पक्षाची. या कालखंडात विरोधी पक्ष म्हणून जनसंघ प्रभावशाली नव्हता. पण या साऱ्याच पक्षांचे अध्यक्ष अत्यंत प्रभावशाली आणि कर्तबगार होते. सत्ता मिळत नसली तरी पक्ष संघटना मजबूत असावी यावर त्यांचा भर असे. गेल्या तीन चार दशकात साऱ्याच राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य निर्माण झाले. तामिळनाडू होतेच, त्यात आंध्र, तेलंगणा, प.बंगाल, हरियाणा, पंजाब, दिल्ली, काही प्रमाणात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र. महाराष्ट्रातील शिवसेना या प्रादेशिक पक्षाने सुरवातीस पालिकांमध्ये जम बसविला आणि युती, आघाडीच्या माध्यमातून राज्याच्या , केंद्राच्या सत्तेत भागीदारी मिळविली यात पक्ष नेतृत्वाचा अर्थात पक्ष अध्यक्षांचा दूर दृष्टिकोन असेल. याच काळात भाजपने ज्यांची पक्ष संघटनेवर मजबूत पकड असलेले पक्षाध्यक्ष निर्माण केलेत आणि त्यांच्या कारकीर्दीत पक्ष साऱ्याच उत्तरी राज्यात, कर्नाटका पर्यंत बहरत गेला. देशात, राज्यात सत्ता पटलावर भाजपने सार्वभौमत्व मिळविले ते केवळ पक्ष संघटनेवर मजबूत पकड असल्यामुळेच. या उलट परिस्थिती काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट, समाजवादी, अकाली दल, तेलगू देसम आणि अन्य काही प्रमाणात प्रादेशिक पक्ष यांची पक्ष स्थिती खिळखिळी झाली याचे प्रमुख कारण म्हणजे पक्ष संघटने कडे दुर्लक्ष, घराणेशाहीला प्रोत्साहन, सत्तेसाठी पक्षांशी युती करणे, काडीमोड घेणे , नको त्या विषयावर टिका टिप्पणी करणे आणि कुरघोडी करणे, या महत्वाच्या आणि अनेक कारणांनी यांचे पक्ष कमकुवत होऊन, सत्तेच्या सारीपाटापासून दूर सारले गेलेत. याचे ताजे उदाहरण महाराष्ट्रात घडले आहे. या पक्षाने तरी आता संपादकीयात म्हंटल्याप्रमाणे काँग्रेस पक्षा सारखी वाताहत करून घ्यायची नसेल तर शहाणे व्हावे, शिकावे आणि योग्य धडा घ्यावा. 

विजय आप्पा वाणी , 

(सध्या फ्रँकफर्ट मुक्कामी) 


लेख ७ ( १४ सप्टेंबर २०२२)


*राजकीय घोषणांचे आकर्षण आणि पायावर धोंडा*

"प्रकल्प गुजरातकडे आणि लोकसत्ता संपादकीय - महाराष्ट्राविना" या सदरातील वेदांत समूह आणि फॉक्सकॉन् यांच्या जॉइंट व्हेंचरची गुंतवणूक गुजरातकडे वळविल्यामुळे, सगळ्यांनीच जाहीर ताशेरे ओढले आहेत. पण संपादकीयात म्हटल्याप्रमाणे प्रकल्प येण्यासाठी एक हजार एकर जमीन ९९ वर्षांच्या कराराने मोफत, पाणी आणि वीज कमीत कमी २० वर्षे स्वस्त दराने या अटी राज्यास कितपत हितकारक होत्या. शिवाय टेस्ला या कंपनीच्या गुंतवणुकी संदर्भात माहिती दिली आहे. प्रकल्प गुंतवणूक महाराष्ट्रात झाली नाही, तर गुजरात मध्ये झाली म्हणून आरडाओरडा का सदर गुंतवणूक अन्य राज्यात झाली असती तर एवढा गदारोळ झाला असता का? या वरून राजकीय मंडळाच्या बुध्दीची कीव करावीशी वाटते.

१९९० च्या जागतिकीकरणानंतर म्हणजे गेल्या ३२ वर्षात किती गुंतवणूकदारानी रस दाखविला,अशा किती गुंतवणूक महाराष्ट्रात झाल्यात. या कालावधीत, राज्यात आणि देशात साऱ्याच प्रमुख पक्षांचे सरकार येऊन गेलीत. राज्याच्या गुंतवणूक धोरणानुसार अनेक कॉन्फरन्स, मीट, इत्यादी नावाने सोहळे आयोजित करण्यात आले, त्यातील स्वारस्य दाखविणाऱ्या किंवा गुंतवणूक घोषित करणाऱ्या किती प्रकल्पांची अंम्मलबजावणी झाली. या व्यतिरिक्त गुंतवणूक सदरेखाली साऱ्याच मंत्र्यांचे झालेले परदेश दौरे आणि त्यातील हजारो कोटींच्या गुंतवणुकीचे अमिषे हि कागदावरच राहिली आहेत, मग याच गुंतवणुकी संदर्भात एवढा गदारोळ का?

१९९० नंतरची हि सारी राजकीय गणिते आहेत सत्तेत असलेल्या मंडळींची. यांना ना रोजगार उपलब्धीचे पडलेले ना राज्याच्या आर्थिक धोरणांचे. जो पर्यंत सत्तेत आहेत तो पर्यंत प्रत्येक ऋतूत होणाऱ्या नुकसानी विषयी मदतीचे फक्त आकडे जाहीर करणे, सहानुभूतीची भाषणे करणे आणि उर्वरित वेळेत सत्तेतील, विरोधातील लोकांच्या उखळ्या पाखाळ्या काढणे. एकाही सत्ताधारी पक्षाने राज्यातील सर्वच मुख्य मुद्द्यांचा ना अभ्यास केला ना ती सोडविण्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर केला. सार्वजनिक शौचालये मुताऱ्यांच्या खाजगीकरणाच्या विरोधात, सामान्यांना भडकवण्याचा प्रयत्न करणारी हिच मंडळी, राज्यात एक छदाम ही न गुंतविलेला प्रकल्प गुजरातेत गेला म्हणून गळा काढतायेत. राज्यात गुंतवणुकीसाठी एकमेव असलेली एमआयडीसीची परिस्थिती काय आहे. शहराच्या दूर उभ्या केलेल्या या एमआयडीसी आता लोक वस्तींच्या मध्यावर आल्या आहेत, म्हणून प्रत्येक कंपनी विरोधात आवाजाचे, धुळीचे, हवेचे-वायूंचे प्रदूषण म्हणून मोर्चे काढले जातात आणि कंपन्या बंद केल्या जातात, त्यावेळेस बुडालेले रोजगार , गुंतवणूक कुठे जाते, तर पुन्हा गुजरातेत गेली म्हणून ओरडा केला जातो, ही आपली धोरणे. तरीही कुठल्या तोंडाने आपण गुंतवणूक व्हावी असा आग्रह धरतो, या घडीला कोणत्या एमआयडीत मुबलक दरात सोडा, तर २४ तास पाणी वीज दळणवळण उपलब्ध करू शकलो आहे.

शिवाय जर समजा याच वेदांत समुहास अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे स्वस्तात जमीन, वीज, पाणी पुरविले असते तर, हिच मंडळी , गुजराती गुंतवणूकदार म्हणून त्याच्यावर मेहेरबानी केली म्हणून सुद्धा गळे काढले असते. गुंतवणुकीत भ्रष्टाचार झाला असे आरोप केले असते. याचाच अर्थ ना गुंतवणूक होऊ द्यायची आणि ना झाली नाही म्हणून ओरडा करायचा.  

पण गुंतवणुकीसाठी राज्य सरकारच्या समंती साठी वाट पहात असलेले ६०हजार कोटींचा वाढवणं डहाणू पोर्ट, १००० हजार कोटींचा नाणार प्रकल्प , समुद्रात बुडविलेला एनरॉन, अहमदाबाद बुलेट, पुणे लुप मार्ग अशी आणि प्रकल्प केवळ राजकीय इच्छेपोटी , विरोधापोटी वाट पहात आहेत. राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यातील अंदाजे २०० च्या वर असलेल्या एस टी बस स्टँड आणि डेपोची दुर्व्यवस्था पहाता या गळे काढणाऱ्या मंडळींना याचे खाजगीकरणातून नीट नेटकी व्यवस्था करण्याचे निर्णय घेता येत नाही, रस्त्यांच्या दुतर्फा मुताऱ्यांची साधी व्यवस्था ही करू शकणाऱ्यानी हजारो कोटींच्या गुंतवणुकीवर भाष्य करावे हे केवळ हास्यास्पद आहे.  

विजय आप्पा वाणी , पनवेल.


लेख ६, (१२ सप्टेंबर २०२२)


लोकसत्ता संपादकीय - संस्कृतीसातत्याचा सेतू! 

अतिशय माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण लेख. या लेखात संपूर्ण जागतिक घडामोडींचा परामर्श घेतला असून इंग्लंडच्या राणीचे महत्व अधोरेखीत केले आहे. तसे पाहिल्यास एकूण सव्वा दोनशे च्या वर देश असलेल्या या जगात सौदी, कुवेत, कतार, अबुधाबी आणि इंग्लंड हि राजघराणे सर्वात श्रीमंत म्हणून गणली जातात. इंग्लंडचे राजघराणे जगातील पाचव्या स्थानावर असले तरी जगातील सर्वाधिक प्रभावशाली राजघराणे आहे. एकेकाळी हे राजघराणे जगावर राज्य करत होते. या राजघराण्याकडे अनेक अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. असेही म्हटले आहे की, जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे इंग्लंडची राणी की जीला परदेश दौरा करताना पासपोर्ट व्हिसा ची गरज पडली नाही. त्यांचा भारत दौरा हा 1961, 1983 आणि 1997 जेव्हा भारतीय स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाली होती. एलिझाबेथ यादेखील स्वातंत्र्यच्या सुवर्णमहोत्सवात सहभागी होत्या. 

उपरोल्लेखात युरोपातील साम्राज्यवाद्यांचे वर्णन करताना स्पेन, पोर्तुगीज, डच यांची साम्राज्ये अत्याचारासाठी लक्षात रहातात, त्या तुलनेत ब्रिटिशांची राजवट सभ्य यासाठी की रेल्वे उभारणी, दळणवळण, नियमाधारित राज्यव्यवस्था यासाठी आठवतात. पुढे असेही म्हटले राजवट निर्दोष होती असे नाही. यातील "सभ्य राजवट" शब्द खटकतात. ब्रिटिशांच्या दिडशे दोनशे वर्षांच्या राजवटीत सभ्यता असती तर भारतवर्षातील लक्ष लक्ष जनतेचा जुलमी राजवटीत जो अनन्वित छळ झाला , जुलूम झाले ते झाले नसते. असो, पण एकंदरीत एकोणाविसाव्या शतकापासून एकविसाव्या शतका पर्यंत सार्वभौमत्व राणी पद मिरविणे खरोखर भाग्याचे आणि ऐतिहासिक आहे, जे पुढील भविष्यात होणे नाही. 

विजय आप्पा वाणी , पनवेल.

लेख २ (दिनांक १८ ऑगस्ट २०२२)



अबलीकरण का गुन्हेगारीचे उदात्तीकरण. . . . . .

सामूहिक गुन्हा होतो त्याकाळात फार मोठ्या प्रमाणावर चर्चा,संवाद, विरोध, मागणी, धोरणे, कायदा, सरंक्षण व्यवस्था, धर्म,जात, स्त्री, पुरुष सर्व मुद्दे घासून घासून चर्चिले जातात. खर म्हणजे अन्याय कोणावर, कुठल्या ठिकाणी होती, त्या शहराची, राज्याची वर्तमान पार्श्वभूमी काय, सत्ता कुणाची, अन्याय व्यक्तीची जातपात, गुन्हेगाराची जातपात यावर बरेच अवलंबून असते. 


गुन्हा घडण्याच्या वेळेस आणि नंतर चौकशीसाठी पोलीस यंत्रणेचा वापर कशा प्रकारे केला जातो किंवा होतो, या साऱ्यांच्या चीरफडीतून न्याय व्यवस्थेकडे गुन्हा वर्ग केला जातो. यातही पुढे हे प्रकरण हाताळण्यासाठी वकील वर्ग, अर्थात निष्पक्ष न्यायसंस्थेतील न्यायाधीश यांच्या कडून कशा प्रकारे, कोणत्या प्रकारे सदर प्रकरण हाताळले जावे, याची सुद्धा बारकाईने विचार करूनच मार्ग अवलंबला जातो.  


गुन्हा घडण्यासमयी माध्यमातून आलेले वृत्त, न्यायसंस्थेत असताना आलेले वृत्त आणि निकालाच्या वेळेस आलेले वृत्त, यात कुठेही ताळमेळ नसतो. कारण या तीनही वेळेस (गुन्हा वेळ, न्यायालय आणि निकाल) सत्ता कुणाची यावरच वृत्तांकनाची धार बऱ्याच प्रमाणावर अवलंबून असते. या मुळेच गुन्हा करणाऱ्यांचे फावते कारण गुन्हा करण्यास प्रवूत्त करण्यापासून ते निकाल लागेपर्यंत कुणी ना कुणी तरी यांची पाठराखण करणारा असतोच. सारांश हाच असू शकतो, गुन्हा मॅनेज, पोलीस यंत्रणा मॅनेज, वकील मॅनेज, साक्षीदार मॅनेज, न्याय व्यवस्था मॅनेज, या सर्वावर कडी म्हणजे शासन व्यवस्था मॅनेज करणारे आणि करून घेणारेही मॅनेज. कुणी कुणास जबाबदार नाही कारण सर्वच मॅनेज.


विजयकुमार आप्पा वाणी , पनवेल.


दिनांक १ऑगस्ट २०२२


"राजभवनातील राधाक्का" अतिशय समर्पक असे नाव या लोकसत्ता  संपादकीय लेखास आहे. अनेक योग्य संदर्भ या लेखात मांडलेले आहेत.  

यातील मूळ मुद्दा मुंबईच्या जडण घडणीत वाटा मराठ्यांचा का परप्रांतीयांचा, जो एक कित्येक वर्षे पेटविला जात आहे. मुंबई, ज्यात पिढ्यानपिढ्या मराठी जनांचीच वस्ती होती त्यात पारतंत्र्यात असल्या करणे, साहजिकच कमी वस्ती आणि स्वतंत्र बेट म्हणून पोर्तुगीज, इंग्रजांनी व्यापार उदिमाची सुरुवात केली.

त्यासाठी लागणारे मनुष्य बळ मुंबईच्या आसपास प्रांतातून आलेच पणं पारतंत्र्यात असलेल्या देशाच्या सर्वच भागातून रोजगार शोधण्याच्या निमित्ताने स्थायिक झाले. म्हणजेच आपले स्वतःचे स्थान सोडून उदरनिर्वाहासाठी आलेले फक्त ते फक्त स्थायिक झाले पणं ते स्थानिक म्हणून कधीच नव्हतेच. 

जसं जशी यांची संख्या वाढू लागली तसतशी जातीयवाद, प्रांतवाद, धर्माची ठिणगी या शहराच्या स्वामित्वासाठी पडू लागली. तत्कालीन तथाकथित नेते ज्यांचे राष्ट्रीय स्थरावर राजकारण संबंध होते, त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत हा मुद्दा केवळ मतांसाठी , परप्रांतियांना खुश ठेवण्यासाठी तेवत ठेवला. स्थानिक राजकारण्यांनी सुद्धा निवडणुकीपुरता या मुद्याचा वापर वर्षानुवर्षे केला.  

पण मराठ्यांचे सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने, अग्रगण्य मराठी वृत्तपत्रांनी, तत्कालीन सारस्वतानी, साहित्यिकांनी, खेळाडूंनी, मोठमोठ्या हुद्द्यावरील प्रतिष्ठितांनी, उद्योग व्यवसायातील व्यापारी, कारखानदारांनी आणि तथाकथित पुढाऱ्यांनी , कधीही एकत्र येऊन यासाठी पुढाकार घेतला नाही का हिम्मत दाखविली नाही.  

एकदा का मुंबई फक्त आणि फक्त मराठ्यांचीच अशी चळवळ या साऱ्या नेतृत्वाने सर्व पक्ष भेद, जाती भेद सारून सुरू केली तर एक वर्ष, दोन वर्षे जातील पणं सर्व दूर धाक निर्माण होऊन, भविष्यात तरी मुंबई कुणाची असे म्हणण्याची हिम्मत होणार नाही, नव्हे तर मुंबईत सर्वच प्रशासकीय पदांवर नेमणूक सुद्धा मागणार नाहीत आणि मिळाली तरी लज्जेने, शरमेने, घाबरून तरी राहतील असा दबदबा निर्माण होणे आवश्यक आहे. नाहीतर दर वर्षी एखाद दुसरा सोंगाड्या मुंबई अमक्याची असे म्हणणे चालूच ठेवेल आणि असे परखड अग्रलेख लिहिणारे संपादक राहतील याची शास्वती नसल्यामुळे या पुढील डिजिटल युगातील साऱ्या पिढ्या, विरार, कसारा, कर्जत, पनवेल येथे राहून इंटरनेटवर मराठी टक्का शोधीत राहतील.  

विजयकुमार आप्पा वाणी , पनवेल.

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०२२

दिनांक १० जुलै २०२२


मध्यम वर्गाला नाही उरले देणे घेणे? 

१० जुलै २०२२ च्या लोकसत्ता रविवार विशेष ' समोरच्या बाकावरून ' या सदरात माजी अर्थमंत्री श्री चिदंबरम यांनी, मध्यम वर्गीय आणि त्यांचे नेतृत्व, यांच्या कार्याच्या मूल्यांवर आधारीत चर्चा केली आहे. सदर लेखात स्वातंत्र्यपूर्व काळातील मध्यम वर्गीयांकडून निर्माण केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे. आवाज उठविण्यासाठी अन्यायच झाला पाहिजे असे नाही तर त्या काळात होणाऱ्या चुकांमधून भविष्यात निर्माण होणाऱ्या त्रासा संबंधी मध्यम वर्गीय जागृत असायचे आणि आंदोलन, चळवळ या सनदशीर मार्गाने विरोध दर्शवायचे आणि ते खरोखरीच मनास पटण्यासारखे आहे.

लेखकांनी मध्यम वर्गाच्या नेतृत्वा विषयी केलेले भाष्य अगदी प्रकर्षाने जाणवते. स्वातंत्र्योत्तर काळात एकाच पक्षाची सत्ता वर्षानुवर्षे होती. त्यांची राष्ट्रा विषयी ध्येय धोरणे नक्कीच प्रगती पथाकडे नेणारी होती. परंतु राजकारण, समाजकारण , जाती, धर्म, या व्यवस्थेतून बाहेर पडण्यास तत्कालीन सरकार आणि वर्तमान सरकार सुद्धा नाहीये. केवळ विरोधासाठी विरोध करणारे विरोधी पक्ष आणि कुणालाच श्रेय मिळू नये या साठी धडपडणारे पक्ष यातच सर्व गुंतले असून , प्रगती, विकास , दूरदृष्टी या सर्वांच्या विरोधातच रहावे असे नियोजन तर होत नाहीना असे वाटणे स्वाभाविक आहे. 

शेवटच्या परिच्छेदात, नित्यपायोगी वस्तूंवर लावल्या जाणाऱ्या जीएसटी संबंधी उदाहरणे देऊन लेखकांनी , अर्थ क्षेत्रात काम करणाऱ्या साऱ्याच संघटनांनी आवाज न उठवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे आणि ती खरोखरच रास्त आहे. गॅस सिलिंडरची दरवाढ, पेट्रोल डिझेल सीएनजी अनुक्रमे होत असलेली दरवाढ आणि त्या वाहतुकीवर अवलंबून असलेली नित्य गरजेची भाजीपाला, दूध, दरवाढीचा दर फुगतच चालला आहे. परवाच्या जीएसटी परिषदेतील हॉटेल बिलावरील सेवा करावरील निर्णयावर अजूनही संदिग्नता आहे. खरे म्हणजे नियम बनवून सेवा कर काढूनच टाकायला हवा. पण मध्यम वर्गीय नेतृत्व, या क्षेत्रातील तज्ञ, अर्थ क्षेत्रातील परिषद वैगेरे तत्सम संघटना यास विरोध करताना दिसत नाहीत. 

विजयकुमार आप्पा वाणी , पनवेल


दिनांक ३० जून २०२२


संपादकीय, लोकसत्ता गुरुवार दिनांक ३० जून २०२२

हत्याच; पणं . . . . .

उपरोल्लेखित अग्रलेखात संपादकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्या संबंधात मांडलेली उदाहरणे राज्य आणि केंद्र शासनाच्या कार्यावर अंजन घालणारी आहेत. त्यातील उदयपूर घटना, नृशंस हत्या होणाऱ्या तालिबान राजवटीतील वाटते. मोहम्मद झुबेर, तिस्ता प्रकरण कोणत्या वर्षातील होती आणि आता वर्तमानात ती दिशाभूल करण्यासाठी खणून काढली जात आहेत असे सुकृत दर्शनी तरी वाटते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची दोन प्रकरणे नुकतीच महाराष्ट्रात सुद्धा घडलीत, तुरुंगवासा पुरत्या निभवल्यामुळे आणि राज्यातील राजकीय अस्थिरतेमुळे जास्त बोभाटा झाला नाही.   

अनेक राज्ये संघटीत असलेल्या लोकशाही भारत देशात अशा घटना वारंवार होत आहेत. दररोज म्हणा ते वर्षभरात म्हणा जाती पातीच्या, धर्माच्या राजकारणात सामान्य नागरिक, राजकीय कार्यकर्ता बळी पडत आहेत. याचे ना राज्यकर्त्यांना देणे घेणे ना प्रशासनाला. नव्हे तर अशा घटना घड्याव्यात म्हणून सोचे समझे प्लॅनिंग सुद्धा होत असेल जेणे करून मागच्या घटनांवर पांघरूण आणि वर्तमान स्थितीतील ज्वलंत प्रश्नांना बगल देऊन साऱ्यांचे लक्ष विचलित करणे. जागृत संघटना, वृत्तपत्रे, माध्यमे या विषयावर प्रकाश टाकत राहतील आणि जागृत नागरिक वाचून दृकश्राव्य माध्यमे पाहून मुग गिळून बसण्याशिवाय काही करू शकत नाही.

विजयकुमार आप्पा वाणी, पनवेल.

लेख १ (२५ जून स्तंभलेख प्रसिद्धी २७ जून)


 मा संपादक लोकसत्ता, लोकमानस विभाग,

बिहार मागास राहिले, कारण. .

प्रशांत रूपवते यांचा "लास्ट अमंग इक्वलस: पॉवर कास्ट अँड पॉलिटिक्स इन बिहार व्हीलेजेस, लेखक एम आर शरण यांच्या पुस्तकावरील परीक्षण वाचले. वाचताना, जाती धर्माचे राजकारण प्रगतीला कसे आड येते याचे विदारक चित्र लेखकाने उभे केले आहे.  

संपूर्ण भारतात अनेक राज्यात, प्रांतात थोड्या फार प्रमाणात का होईना जाती धर्माच्या राजकारणाची झळ स्वातंत्र्यानंतर ही अनेक दशके जनतेने भोगली आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार अडीच ते तीन लाखांच्या वर लोकसंख्या असलेली अंदाजे ३०० शहरे आहेत जिथे महापालिका अस्तित्वात आहेत. नगरे आणि मोठ्या खेड्यांमध्ये २००० च्या आसपास नगरपालिका आहेत. उर्वरित गाव पातळीवर ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत आहेत. विश्लेषण देण्याचे कारण हेच की या मोठाल्या महापालिकेतही चकचकीत कार्यालयांचा , मॉल थिएटर, रेल्वे स्टेशन प्रभाग सोडता कित्येक प्रभागांमध्ये जाती धर्माच्या राजकारणाची झळ अजूनही अस्तित्वात असून अनेक शासकीय योजना कागदावरच पडून असतात. अस्वच्छता, दुर्गंधी, बकाल लोकवस्ती, अनधिकृत बांधकामे, अनियमित पाणी, वीज पुरवठा, हे तर वर्षानुवर्षे पाचीला पुजले आहे. विकासाची कामे करणे शासनाचे कर्तव्य आहेच, परंतु अद्यापही महापालिका विभागात तत्सम वस्तीत शाळा, विद्यालये यांचा अभाव जाणवतो त्यामुळे साक्षरतेचे प्रमाण वर्षानुवर्षे जैसे थेच राहते.  

लेखकाने जरी गाय पट्ट्यातील स्थितीचे विदारक चित्र उभे केले आहे, ते इतर सर्वच राज्यात, प्रांतात वेगवेगळ्या माध्यमातून परावर्तित होत आहे. याचा अर्थ प्रगतिशील राज्ये, शहरे थोड्याफार फरकाने सारे अनुभवीत आहेत, पणं लेखकाने बिहार राज्यातील स्थिती दाखवून सत्य साऱ्या समोर मांडले आहे.

विजयकुमार आप्पा वाणी , पनवेल.

( महोदय आपणास विनंती की, लोकमानस सदरात सदर छापण्याची कृपा करावी).