सोमवार, ३ जुलै, २०२३

लेख (९५) ४ जुलै २०२३



(आधुनिक) आश्रम व्यवस्थेचे पालन होणे आवश्यक !!


दिनांक ३ जुलै २०२३ लोकसत्ताचे संपादकीय "आशीर्वाद की शाप ?" वाचले.  राजकीय सुंदोपसुंदी, बेबंदशाही, घातपात अशा घटना, स्वातंत्र्यपूर्व राजेशाही घराण्यांमध्ये आणि स्वातंत्र्योत्तर राजकीय पक्षांमध्येही झालेल्या आहेत, त्याची इतिहासात नोंद आहे. फरक एवढाच की त्या काळात रयतेला कर्णोपकरणी, स्वातंत्र्योत्तर जनतेला दुसऱ्या दिवशी वृत्तपत्र माध्यमातून आणि आताशा काळात थेट दिसणे, ऐकणे माध्यमातून प्रतिक्रिया देण्याचे परिणाम जास्त दिसत आहेत. 
आता विषय आहे तो पदांना चिकटून राहण्याचा. आश्रमव्यवस्था कालबाह्य झाली असली तरी संस्कृती, प्रकृती, व्यक्ती त्याच आहेत. आधुनिकतेच्या जगात बाह्यस्वरूप बदलत गेले तरी जगण्याचा ढाचा थोडाफार बदलत, त्याच स्वरूपात आहे.  जीवनात अर्थार्जन/स्वतःचे कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी पंचविशी ते साठी/पासष्टी पर्यंतचा काळ अधोरेखित आहे. एकाच पदावर पुन्हा पुन्हा येणे अथवा एकाच पदावर वर्षानुवर्षे राहणे, यात बरेचसे साम्य आहे.  पणं ऋतुचक्रापणे स्वाभाविकपणे पुढच्या पिढीस संधी मिळणे क्रमप्राप्त आहे.  तरच सुदृढ कुटुंब व्यवस्थेचे मूळ पकडुन राहून, प्रत्येक पिढीस योग्य वयात कर्तुत्व सिद्ध करण्यास वाव मिळतो.  वयोमानापरत्वे निःसंशय परिपक्वता, अनुभव संपन्नता येते, पणं म्हणून त्यास चिटकुन राहणे कितपत योग्य आहे. अगदीच निवृत्ती न धरता, आहे त्या मार्गातून आनंदाने बाजूला सरून, वेगळ्या वाटें जावे, जिथे स्वार्थ, उत्पन्न मर्यादा, मान सन्मानाची अपेक्षा नसावी.  आपल्यामुळे पुढच्या पिढीचे कुठे अडत नाही ना ? ह्या उदात्त विचारांनी आयुष्यातील संध्या कडे मार्गक्रमण असावे हाच सर्वसाधारण नियम आहे. पणं ह्याच्या विरुद्ध , सर्वच क्षेत्रात सत्ता स्थाने बळकविण्याच्या नादात, जग जिंकण्याच्या आविर्भावात, वर्षानुवर्षं एकाच पदावर चिकटून राहणे, अथवा ते  मिळविण्यासाठी संघर्ष करणे. मी, मीच, माझे, हा अंहकार बाळगून, या उपर सर्वास सार्वभौमत्वाचा उपदेश देण्याचा आव आणणे, हे फक्त स्वार्थाच्या वृत्तीत दिसते.  त्यामुळे अशा प्रवृत्तीना न काळाची भिती, न पुढच्या पिढीच्या अवहेलनेची.  त्यामुळे चुल, विस्तव, तवा, कणिक, आणि भाकरी या सर्व कल्पना विस्तार कथा चर्वण करण्यापलीकडे सामान्यजन काही करू शकत नाही.  फक्त यांना उमगले पाहिजे आधुनिक आश्रम व्यवस्थेचे खरे वास्तव आणि हे खरेच अंगीकारले तर स्वातंत्र्योत्तर अमृत महोत्सवी वर्षानंतर नवी पिढी शतकोतोत्सव, आधुनिक विचारांनी साजरा करेल यात शंका ठेवण्याचे कारण नाही.


विजयकुमार वाणी, पनवेल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: