मंगळवार, २७ जून, २०२३

लेख (९४) ३० जून २०२३


यांना आधी आवरा !! सारे सुरळीत होईल.

दिनांक २८ जून २०२३, लोकसत्ता संपादकीय "ॲनिमल फॉर्म"? वाचले.  लेखात निर्दयतेची, क्रुरतेची,  कठोरतेची, उग्रतेची, अमानुषतेची , कृपाहिनतेची, रानटीपणाची, हिंस्त्रतेची भीतीदायक, कठोर , दयाशून्यतेच्या ठराविक पणं ताज्या उदाहरणांचा उहापोह केला आहे. अशा अनेक वृत्तांचे वर्षभराचे संकलन केले तर, क्रौर्याची परिसीमा कधीच गाठली आहे हे दिसून येईल. 
संताप , क्रोध, राग, तिरस्कार या भावना आहेत,  ज्या परस्परात तेढ, शत्रुत्व निर्माण करतात.  रागाच्या भावना अनुभवण्यात अंतर्गत आणि बाह्य सामाजिक नियमांचा वाटा असतो, ज्यास शिष्टाचार म्हणतात.  हे शिष्टाचार घरातल्या संस्कारातून, शिक्षणातून, विचारातून आणि संस्कृतीतून मिळालेले असतात.  यात राज शिष्टाचाराचा भाग फार मोठा आहे.  शासकीय, सामाजिक, सार्वजनिक , राजकीय जीवनात वावरताना याचे भान बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.  पण हाच तोल सध्या सुटलेला तुटलेला आहे.  स्वच्छ प्रतिमेसाठी सारेच पांढरे असे बाह्यांग पणं आत सत्तेसाठीची हाव, कुरघोडीचे राजकारण, तत्वांना मूठमाती, वैरतेची भावनेतूनच रोजची सकाळ उजाडते.  गेल्या दोन तपांहून अधिकच्या काळात द्वेष , मत्सराने प्रेरित असे नेतृत्व वाढीस लागले आहे.  फक्त आणि फक्त येन केन प्रकरेण सत्ता हस्तंगत करणे.  सदा सर्वकाळ शिव्या, लाखोळ्या, बदला, टोमणे, रस्सीखेच, चारित्र्यहनन, चित्रविचित्र आवाज, भीम गर्जना अशा आणि अनेक भावनेने ग्रासलेल्यांकडून समाजाच्या शिष्टाचाराच्या काय अपेक्षा करणार आणि या साऱ्या घातकी वृत्तीची पाळेमुळे समाजात खोलवर रुतत गेलीत.  एकमेकांविषयी आदर, आपुलकी न रहाता केवळ द्वेष, मत्सराचे वातावरण निर्माण होऊ लागले.  शासकीय, राजकीय, सामाजिक धाक, आदरयुक्त भिती नाहीशी झाली. स्वतःच्या स्वार्थाचा विचार करणारी पिढी, जे हवे ते मिळायला हवे या अट्टाहासाने जगू लागली, नाही मिळाले तर ओरबाडून घ्यावे तरीही नाही मिळाले तर मुळासकट संपवावे या वासनामंध क्रूरतेच्या विचारांनी थैमान गाठले.  ना विचार ना संस्कार, त्यात सतत डोळ्यापुढे दिसणारी गलथान, दुबळी शासन व्यवस्था, राजकीय बेबंदशाही, फितुरी, दगा फटका, त्यामुळे असे कृत्य करण्याऱ्या विचारांचे धाडस वाढत गेले. त्याचेच परिणाम दिन दुबळे भोगत आहेत. याचा समतोल साधण्याचा अनेक उपायांपैकी धाक, आदरयुक्त भीती,  दरारा निर्माण होण्यासाठी  कठोर शासन व्यवस्था, स्वच्छ प्रशासन व्यवस्था, आणि स्वच्छ प्रतिमा आवश्यक असा समुदाय आवश्यक आहे, तोपर्यंत या साऱ्यांवर आवर घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना शोधावे लागतील.


विजयकुमार वाणी,  पनवेल 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: