मंगळवार, १३ जून, २०२३

लेख (९१) १४ जून २०२३


तडे तर गेलेच पणं दरीही रुंदावतेय !!!

मंगळवार दिनांक १३ जून २०२३ लोकसत्ता संपादकीय "तडे जाऊ लागले " वाचला. एकंदरीत पहाता लेखात म्हटल्याप्रमाणे मविआ आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार घालविणे ह्या एक कलमी कार्यक्रमात पुढे काय वाढून ठेवले याची सुतराम कल्पना , देवेंद्र फडणवीस आणि राज्य भाजपला नसेल. केंद्राने, सत्तांतरात शिंदे यांना मुख्यमंत्री पदी बसवून, देवेंद्रजींना सबुरीचा इशारा दिला इथेच बलाढ्य राज्य भाजपा पंचवीस वर्षे मागे गेला. गेल्या वर्ष भरात, शिंदे ठाकरे गटांचे कोर्टाचे निकाल, जनतेचा किरकोळ विरोध , उबाठा गटाचे थंडावलेल राजकारण याचा फायदा शिंदे गट अधिकच घेत आहे. त्यात भाजपची कसबा, कर्नाटक निवडणुकीतील हार शिंदे गटाच्या पथ्यावरच पडली. आजच्याच अंकातील मुखपृष्ठावरील जाहिरातीत हे दिसून आले. राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रामध्ये शिंदे आणि टक्केवारीत शिंदेच सरस आहेत हे दाखवून , भाजपची पुरती जिरविली आहे. म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी एवढा उदार झाला की राज्य भाजपला माविआ ५ वर्षे सत्तेत राहिलेले परवडले असते. ह्या मुखपृष्ठ जाहिरातीने तडे तर जातीलच पणं दरी सुद्धा रुंदावतेय, निवडणुकीपर्यंत ती तुटली तर आश्चर्य वाटायला नको, एवढी अवस्था बिकट दिसतेय. एकंदरीत राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपची अवस्था प्रादेशिक पक्षापेक्षा कठीण झालेली आहे. कर्नाटक पाठोपाठ महाराष्ट्र जायला वेळ लागणार नाही हे नक्की.

विजयकुमार वाणी, पनवेल 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: