सोमवार, ६ फेब्रुवारी, २०२३

लेख (५०) ६ फेब्रुवारी २०२३

 


समन्वयातून समृध्दी. . . .

६ जानेवारी २०२३ लोकसत्तातील अतिशय परखडपणे लिहिलेले " सयंत, समंजस, संतुलित! " संपादकीय वाचले. साधारणतः प्रत्येक साहित्य संमेलन हे, संमेलनाची जागा, अध्यक्ष निवड, स्वागताध्यक्ष, परिसंवाद, कवी -संमेलनातील निवड, त्या वर्षातील राजकीय घडामोडी, पुस्तक विक्री, या आदी कारणांनी कोणत्या ना कोणत्या कारणाने वाजले गाजले आहे. त्या त्या वर्षी संमेलन अध्यक्षांनी विशेषतः सरकार वर केलेल्या टिका टिप्पण्या, मराठी भाषेची अवस्था, विश्वकोशाच्या निर्मितीचे प्रयत्न , हे सारे जय घोष एखाद महिन्यात विरून जातात. मध्येच सरकारच्या धोरणांविरुद्ध निषेधाचा भाग म्हणून पदाचे राजीनामे, पुरस्कार वापसी असे घडते, परत ये रे माझ्या मागल्या रड गाऱ्हाणे सुरू. अर्थात हे सारे सामान्यजनांना कळते ते अर्थात वृत्तपत्र माध्यमातूनच. खूप प्रभावी असणाऱ्या या माध्यमातून साहित्यकारांना खूप काही करता येण्यासारखं आहे. 

हे संमेलन ते पुढचे संमेलन या काळात नियोजीत समितीने विविध माध्यमांतून विविध ठिकाणी स्थानिक वृत्तपत्र, आणि अग्रगण्य वृत्तपत्राच्या संपादकांच्या सहकार्याने संमेलनाची उद्दिष्टे, मराठी भाषे संबंधी प्रचार प्रसार याची अंमबजावणी करणे सहज शक्य आहे. महिन्याला एक या प्रमाणे, १० महिन्यात राज्याच्या १० प्रमुख शहरात विभागीय साहित्य, कला, विद्यालये, या क्षेत्रातील मंडळींना सहभागी करून विविध विषयांवर परिसंवाद, कवी संमेलनाचे आयोजन करता येऊ शकते. विद्यालये आलीत म्हणजे कार्यक्रमासाठी सभागृह आणि विद्यार्थी यांचा सहभाग, स्थानिक/अग्रगण्य वर्तमान पत्रातून जाहिरात करणे, जेणेकरून सामान्यांचा सहभाग होऊ शकतो. परंतु यासाठी संमेलनातील मान्यवरांनी स्थानिक साहित्य मंडळ, विद्यालये, वर्तमान पत्र संपादकांशी योग्य समन्वय साधणे, खूप गरजेचे आहे. या लोक सहभागातून वर्षभर कार्यक्रमांची रेलचेल राहून मराठी भाषा समृध्दी साठी प्रयत्न होतील आणि संमेलन अध्यक्ष म्हणून ठळक कार्य करण्याचा मान मिळेल पणं यासाठी योग्य समन्वय हवा, ज्यातून मराठी भाषेची समृध्दी होईल, मग ना गरज सरकारची ना सरकारी मदतीची. 

विजयकुमार आप्पा वाणी, पनवेल 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: