शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०२३

लेख (६०) १७ फेब्रुवारी २०२३

 

#लोकसत्ता 

लोकसत्ता वृत्तपत्रातर्फे २०२३ अर्थसंकल्पाचे विश्लेषण कार्यक्रम दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ रोजी , पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. श्री गिरीश कुबेर, मुख्य संपादक आणि श्री दीपक टिकेकर, वरिष्ठ सनदी लेखापाल यांनी अर्थसंकल्पा संबंधी विविध मुद्द्यांवर मते मांडली. त्यातील महत्वाचे म्हणजे अर्थसंकल्प निवडणुकीच्या पूर्वीचा आहे त्यामुळे तो पैशांची उधळपट्टी करणारा असेल अशी अटकळ लावली जात होती. मात्र ती अटकळ चुकीची ठरवत निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला, ही बाब अतिशय अभिनंदनास्पद म्हणायला हवी असं मत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केलं आहे. प्रश्नोत्तरे कार्यक्रमात मी विचारलेल्या कृषिविषयक धोरण संबंधी प्रश्नावर श्री कुबेर यांनी सविस्तर उत्तर दिले. 

या कार्यक्रमातून काही आठवणी जागृत झाल्यात. लोकसत्ताचे नाते बालपणापासूनच, लोकसत्ता वाचनाची आवड होती. आठवणीत असलेले संपादक सर्वश्री र.ना. लाटे, विद्याधर गोखले, माधव गडकरी, कुमार केतकर, अरुण टिकेकर आणि आताचे गिरीश कुबेर. यातील थोर नाटककार, संपादक विद्याधर गोखले यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आमचे विक्रोळीचे शेजारी सन्माननीय पत्रकार दिवंगत मुजफ्फर हुसेन यांच्या निवासस्थानी, आणि श्री माधव गडकरी यांना लोकसत्ता कार्यालयात १९८७ मध्ये न्हावा शेवा पोर्टच्या परप्रांतीय भरती संदर्भात भेटलो होतो. श्री गडकरींनी ५ ऑगस्ट १९८७ च्या लोकसत्तातील चौफेर सदरात न्हावा शेवा पोर्ट मधील परप्रांतीयांची भरतीवर पुराव्यासह टिका केली होती. त्याचे प्रचंड परिणाम राज्याच्या राजकारणावर होऊन, तत्कालीन मुख्यमंत्री श्री शरद पवार यांना परप्रांतीयांची भरती रद्द करावी लागली होती. अशा अनेक आठवणी लोकसत्ता संदर्भात आहेत. सेवानिवृत्ती घेतल्यानंतर लोकसत्ता विषयी आणखी प्रेम वाढू लागले आणि अग्रलेख, स्तंभलेख, वृत्तान्त, यावर टिप्पणी लिहिण्याचा सराव सुरू झाला. गत आठ महिन्यात लोकसत्तातच लोकमानस सदरात बाविसच्या आसपास लिखाण छापून आले आणि याच आवडत्या वृत्तपत्राचे संपादक प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद काही औरच होता. त्यांच्याशी संभाषणात जेएन पोर्टचा उल्लेख आला असता, त्यांनी वाढवणं (डहाणू) पोर्टच्या प्रगती विषयी चर्चा केली. आजची भेट अविस्मरणीय अशी ठरली. 

विजयकुमार आप्पा वाणी, पनवेल 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: