सोमवार, १३ फेब्रुवारी, २०२३

लेख (५७) १४ फेब्रुवारी २०२३



गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी !!


सकाळचे भ्रमण झाले आणि वृत्तपत्र वाचना समयी टाळ चिपळ्यांच्या संगतीने  "सकाळच्या पारी हरीनाम बोला"  भल्या मोठ्या आवाजात हे गाणे ऐकायला मिळाले आणि जाणविले वासुदेवाची स्वारी आली.  आपल्याच तंद्रीत भजने म्हणत, मध्येच विठू रायाला साद देत भिक्षा फेरी साठी निघालेला वासुदेव बिल्डिंगच्या गेट मध्ये उभा ठाकला.  क्षणात वासुदेवाची डोक्यात असलेली माहिती बाहेर पडू लागली आणि प्रत्यक्ष भेटण्याचा मोह झाला.  समोर पाहिले आणि वर्षानुवर्षे असलेले तेच चित्र दिसले.
डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, धोतर, कमरेभोवती शेलावजा उपरणे गुंडाळलेले, एका हातात चिपळ्या, दुसऱ्या हातात पितळी टाळ कमरेला पांवा, मंजिरी अशी वाद्ये आणि काखेला झोळी, गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, हातात तांब्याचे कडे, कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे हे रुप पाहिलं. अखंड हरीनामाचा जप करणारा वासुदेव नजरेस पडला.  वासुदेवास विनंती करून एक फोटो काढला आणि पहाटेच्या परंपरेतील साक्षीदारावर थोडेसे लिहावेसे वाटले.

वासुदेव आपल्या ग्रामीण भाषेच्या गीतातून जे तत्त्वज्ञान सांगतो त्यामध्ये देवाची आळवणी आहे.  चांगले काम करीत रहा, आयुष्यात मिळणार-या चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी ईश्वरावर सोपवा अशी वासुदेवाची जीवनदृष्टी आहे.
संताच्या मांदियाळीतील संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांच्या यांच्या काव्यात वासुदेवावरील अनेक रूपके आढळतात, त्यात त्यांना वासुदेव धर्म अपेक्षित होता.  छत्रपती शिवाजी  महाराजांनी युद्धाभ्यास, राजकारण आणि दूरदृष्टी ठेवून  वासुदेवाला आपला हेर बनवल्याच्या दाखले आहेत. 

सकाळच्या प्रहरी गाव जागं करत येणारा वासुदेव एव्हाना लोप पावत चालला आहे. पूर्वी खेडोपाडय़ातून वासुदेव फिरायचा, साऱ्यांना जाग करायचा, रंजन करयचा.  पण वाढत्या शहरीकरणात रूप पालटून गेल्याने लोकसंस्कृतीतला महत्त्वाचा घटक असलेल्या वासुदेवाला स्थानच उरलं नाही.  मात्र आज काही निवडक लोककलाकारांनी ही परंपरा जपून ठेवली आहे, आपल्या पोटपाण्यापुरती कमाई करून जगतात. भिक्षा देणाऱ्याचे भविष्य सांगतात, आशीर्वाद देतात. वर्षातून एखाद वेळी वासुदेवाची फेरी मराठी भाषिक नगरात झाली तरी वासूदेवाच्या संस्कृतीची ओळख होत राहील असेच वाटते.

विजयकुमार आप्पा वाणी, 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: