प्रादेशिक अस्मिता हिच खरी एकात्मता
"अस्मिता अंताकडे" हा अग्रलेख (११ जानेवारी) वाचला. स्वातंत्र्योत्तर काळानंतर ते आजतागायत कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळ ही पाचही राज्ये केवळ प्रादेशिक अस्मिता,भाषा, जातीचा प्रचंड अभिमान या अनेक वैशिष्ट्यांमुळे उभी आहेत. अनेक धर्म, जाती , ख्रिस्ती, मुस्लिम बांधवासह, श्रीमंतीची, गरिबांची सर्वांची मायबोली एकच स्थानिक भाषा असून अन्य भाषांना इथे थारा नाही. साक्षरतेचे प्रमाण या सर्वच राज्यात वाखाणण्याजोगे आहे. अनेक त्रासांवर दुर्लक्ष करून यांनी प्रगती केली आहे. लुंगी लावणारा, सांबार खाणारा , मद्रासी आण्णा अशी बऱ्याच अंशी लोकांनी हेटाळणी पूर्वक उल्लेख करून सुद्धा गेल्या ७५ वर्षात हिंदी भाषिक पट्ट्यात , इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर केंद्रातील राजधानीतील, सर्वच सचिवालयात, मंत्रालयात, सार्वजनिक उपक्रमात, सर्वोच्च न्यायालयात आदी क्षेत्रात उच्चपदस्थ अधिकारी म्हणून यांची तिसरी पिढी कार्यरत आहे. सर्वधिक प्रशासकीय अधिकारी याच राज्यांमधून उत्तीर्ण होतात. देशातील सर्वच शहरात राहून देखील भाषा, वेशभूषा, प्रादेशिक अस्मितेवर कधीच तडजोड केली नाही.
अन्य राज्यांमध्ये स्थलांतरित जनतेने स्वतःच्या भाषेचे जातीचे महत्व जपून, राजकारणात सामाजिक कार्यात ठसा उमटविला, असे प्रकार या राज्यांमध्ये झालेले कधी ऐकिवात नाही. एवढी जबरदस्त भिती, दबाव यांच्या प्रादेशिक अस्मितेमुळे आहे. स्थानिक नेतृत्वावर प्रचंड विश्वास ठेवणारी, जीवापाड प्रेम करणारी जनता या राज्यांमध्ये आहे. यामुळे विधानसभेतील सत्ता यांची स्थानिक नेतृत्वाचीच असते. लोकसभेतील एकूण १२९ सदस्य देखील आपापल्या राज्यासाठी दबाव गट म्हणून कार्यरत असतात. त्यामुळे गेल्या ७५ वर्षात केंद्रातील सत्ताधारी असो, देश पातळीवरील विरोधी पक्ष असो, यांना सत्ता मिळविण्यासाठी अपयश येते. केंद्रातील न पटणाऱ्या निर्णयांना विरोध करण्याचे सामर्थ्य केवळ हेच दाखवू शकतात. त्यामुळे उर्वरित जागांमधून सर्वाधिक बहुमत मिळविणे हाच एकच पर्याय या प्रादेशिक अस्मितेमुळे सत्ताधारी पक्षाला निवडावा लागतो. अशीच अस्मिता साऱ्या देशाने ठेवल्यास प्रगतीचे वारू चौखूर उधळतील.
विजयकुमार आप्पा वाणी, पनवेल

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा