गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

लेख (४०) ६ जानेवारी २०२३

 


५ जाने २३, लोकसत्ता संपादकीय "यात्रेतील युगलगान" या लेखातून भारत जोडो यात्रेला, राहुलना, पक्षाला मिळणारा प्रतिसाद, प्रसिद्धी , होत असलेले कौतुक आणि वर्तणुकी संबंधी भाष्य व्यक्त करताना यात्रा संपल्यानंतर पुढे काय याची चिंता व्यक्त केली आहे. ९ डिसेंबर २२ च्या "पर्यायास पर्याय नाही" या लेखात सुद्धा या प्रश्नांची जाणीव संपादकीयात करून देण्यात आली होती. भारत जोडो यात्रेने काँग्रेस पक्षाला संजीवनी मिळते आहे. याच आनंदात असलेल्या काँग्रेसला भविष्याचे नियोजना बद्दल चिंता नाही असे दिसते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा हिमाचल प्रदेशातील विजय, गुजरात दिल्ली पराभवामुळे झाकोळला गेला, परंतु तेच भाजपने गुजरातच्या विजयापुढे दिल्ली हिमाचलचे पराभव झाकून टाकलेत. हाच काँगेस भाजप कार्यशैलीतील फरक आहे.  

आजच्याच दुसऱ्या चतु:सूत्र स्तंभलेखात गुजरात निवडणुकीतील शेतकरी, कोळी, यांचे प्रश्न सोडविण्याची मानसिकता सत्ताधारी पक्षात नाही, असे निदर्शनात आणले आले. वानगीदाखल असे अनेक प्रश्न प्रत्येक राज्यात आहेत. प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने साऱ्या प्रश्नांची उकल करून, गेल्या सार्वत्रिक निवडणुकी पासून महत्वाच्या प्रश्नांवर संसदेत, राज्यांमध्ये आंदोलन करून राळ उठवायला हवी होती. तेव्हा कुठे प्रबळ पर्यायी दावेदार म्हणून काँगेस कडे पाहता आले असते. आता उरलेल्या सव्वा वर्षात येणाऱ्या ९ विधानसभा आणि सार्वत्रिक निवडणुकांत विजयासाठीचे नियोजन ना काँग्रेसकडे नाही , ना उर्वरित विरोधकांकडे. प्रादेशिक पक्षांना स्वतःच्या राज्यात स्थिरतेसाठी झगडावे लागते आहे. पण मिशन लोकसभा, विधानसभा यासाठी केंद्रीय पक्ष्याध्यक्ष , प्रदेशाध्यक्ष यांचे दौरे भाजपने पूर्ण ताकदीने स्वबळावर, मित्र पक्षांच्या मदतीने सुरू केले असून , निवडणूक पूर्व मतदार चाचणी घेऊन बहुमताचा आकडा मिळविण्याचे आखाडे बांधले जात आहेत. सशक्त पर्याय तातडीने विचारपूर्वक उभा करणे हाच पर्याय आता उरला आहे. 


विजय आप्पा वाणी, पनवेल. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: