सोमवार, १६ जानेवारी, २०२३

लेख (४५) १६ जानेवारी २०२३

 डॉ दत्ता सामंत - कामगारांचे दैवत 

दि १६ डिसेंबर २०२३ मुंबई चौफेर बिटवीन द लाइन्स सदरात डॉ दत्ता सामंत यांच्याविषयीचा माहितीपूर्ण लेख वाचला आणि ४० वर्षांपूर्वीचा इतिहास डोळ्या समोर तरळला. डॉक्टरांच्या कारकिर्दीस घाटकोपर मधून सुरवात असल्यामुळें कुर्ला ते मुलुंड या पट्ट्यातील कामगारांना डॉ म्हणजे दैवत होते. उदाहरण द्यायचे ते म्हणजे कुर्ल्यातील प्रिमियर ऑटोमोबाइल्स फियाट कंपनीचे. मे १९७८ मध्ये पहिल्याच चार महिन्यांच्या संपात इन्सेंटिव्ह ,प्रोडक्शन बोनस घोषित करणारी भारतातील पहिली कंपनी म्हणून डॉक्टरांनी करार केला. करार करताना जसे कंपनीच्या मालकाशी कडक धोरण होते, तसेच कामगारांनाही रोजच्या कमीतकमी ५० फियाट कारचे उत्पादन सक्तीचे आणि

त्यावरील दहाच्या टप्प्यात इन्सेंटिव्ह ,प्रोडक्शन बोनस मिळेल असे ठणकावून सांगणारे कामगार नेते होते. कामगारांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे डॉक्टर, निवडणूकीत पदयात्रा करताना वाटेत कामगारांनी घरी बोलाविल्यास हक्काने जाऊन वडील धाऱ्यांचा आशीर्वाद घेणारे डॉक्टर होते. त्याच दशकात डॉक्टरांनी गिरणी कामगार संप घोषित केला आणि औद्योगिक कारखानदारांच्या कामगारांची नाळ तुटली. कुर्ला मुलुंड पट्ट्यातील सारे कारखाने बंद पडलेत, तिथे टोलेजंग इमारती, मॉल्स उभे आहेत. आजही त्या विभागातून फिरताना कारखान्यांचे वैभव असलेले शहर अशी आठवण कायम राहते. डॉक्टरांच्या पुण्यतिथी निमित्त सलाम. 

विजयकुमार आप्पा वाणी, पनवेल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: