रविवार, २२ जानेवारी, २०२३

लेख (४८) २१ जानेवारी २०२३

 (१)

विचारांची, जाणीवेची प्रगल्भता !!

२३ जानेवारी २०२३ चे लोकमत संपादकीय "ती बाई होती म्हणुनी? अतिशय भावना प्रधान लेख वाचला. न्यूझीलंडच्या जेसिंडा अर्डन यांचा एक स्त्री म्हणून, पंतप्रधान म्हणून जीवनातला प्रवास अगदी साधाच होता हे निदर्शनास आणले आहे. या शतकात साऱ्या विश्वातील विभिन्न कार्यक्षेत्र असलेल्या, सतत नानाविध पातळ्यांवर संघर्ष करत, विशेष कर्तृत्त्व गाजविलेल्या , चिवटपणे उभ्या राहणाऱ्या, कर्तबगार महिलांचा आलेख हा चढताच आहे हे बिबीसीस नक्की ज्ञात आहे. तरीही त्यांचा उल्लेख स्त्री म्हणून केला जातो हे खटकणारे आहे. लेखाच्या उत्तरार्धात त्यांची पंतप्रधान पदाची मुदत संपली आणि आता देशाला देण्यासारखे काही नाहीच, या मर्यादांची सगळ्या देशासमोर कबुली दाखविण्याचे धारिष्ट्य, विचारांची, प्रगल्भतेची पक्की बैठक दर्शविते. मिळालेल्या संधीचे सोने केले, थोडक्यात समाधान मिळविले आणि दुसऱ्यास संधी मिळवून दिली, याचे कौतुक करावे तेवढे आहे. आपल्याकडे राजकीय क्षेत्रात सेवानिवृत्ती नाहीच. परंतु निवृत्ती असणाऱ्या सरकारी क्षेत्रात उच्चपदस्थ, उतारवयातील आयएएस , न्यायाधीश, सेना अधिकारी समित्यांवर वर्णी मिळवून लठ्ठ मानधन मिळवीत असतात. खाजगी क्षेत्र म्हणजे वैयक्तिक मालमत्ता असल्याकारणाने आजन्म सेवा आलीच. कुटुंबातील आजी आजोबा सुद्धा नातवांच्या लग्नापर्यंत जबाबदारी सोडत नसतात. पण या साऱ्या पसाऱ्यापुढे, तेजोवलयीन ज्ञानदेवांना याची जाणीव, प्रगल्भता, विश्वाची आर्तता होती म्हणूनच असंख्य संतांच्या मांदियाळीत अल्पवयात गुरूआज्ञेने समाधी घेतली. परंतु सोयीस्कररीत्या आपण हे विसरून मतलबी दूनियात जीवन जगत असतो. आता न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी कमी वयातच निवृत्ती, समाधानी वृत्तीचे दर्शन घडविले आहे, त्याचे अनुकरण करता आले नाही तरी चालेल परंतु त्यांचा आदर्श तरी ठेवावा. 

विजयकुमार आप्पा वाणी, पनवेल.

(२)

विचारांची, जाणीवेची प्रगल्भता

२१ जानेवारी २०२३ चे लोकसत्ता संपादकीय "ही प्रगल्भता येते कोठून? जेसिंडा अर्डन यांचा ४२ व्या वर्षी न्यूझीलंडच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा संबंधी आणि अनेक गोष्टींचा परामर्श घेणारा लेख वाचला. लेखात सद्यकालीन वयस्कर राजकीय पक्षांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. राजकीय क्षेत्रातील ढुढाडाचाऱ्यांचे आजन्म सेवेत राहणे सर्वश्रुत आहेच, त्या व्यतिरिक्त सेवा क्षेत्रात वयोमानापरत्वे नियमाप्रमाणे सेवानिवृत्ती असली तरी , आयएएस न्यायाधीश आदी उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, सल्लागार म्हणून, शासनाच्या चौकशी समित्यांचे अध्यक्ष म्हणून लठ्ठ मानधनासह काम करीत असतात. या व्यतिरिक्त खाजगी क्षेत्रातही पंचाहत्तरी गाठली तरी ज्येष्ठांची सद्दी संपत नाही. हिच परंपरा प्रत्येक कुटुंबात, घराण्यातही चालूच आहे. नात,नातुंच्या विवाहापर्यंत तरी आजोबा आज्जींचे वर्चस्व असते. विश्वात कमी अधिक प्रमाणात साऱ्याच देशात असेच चित्र असू शकते. स्वतःचे आत्मपरीक्षण करून, माझ्याकडे देशाला देण्यासारखे काही नाहीच, या मर्यादांची सगळ्या देशासमोर कबुली दाखविण्याचे धारिष्ट्य ऐऱ्या गैऱ्यात असूच शकत नाही, हे धारिष्ट्य विचारांची प्रगल्भतेची पक्की बैठक असणाऱ्यांकडूनच होऊ शकते. संस्कृती संस्कार असलेल्या ऋषितुल्य भारत देशातच असे घडू शकते असे म्हणणाऱ्यांना हे डोळे विस्फारणारे आहे. तेजोवलयीन ज्ञानदेवांना याची जाणीव, प्रगल्भता, विश्वाची आर्तता होती म्हणूनच असंख्य संतांच्या मांदियाळीत अल्पवयात गुरूआज्ञेने समाधी याचेच द्योतक आहे. ती टिकविण्याची समृध्दी आपल्या विचारात आहे पणं फक्त कृतीत दिसत नाही. या लेखाच्या समुपदेशनातून कमीत कमी सरकारी अधिकाऱ्यांनी तरी सेवानिवृतती नंतरच्या सेवेस आराम देतील असे वाटते.

विजयकुमार आप्पा वाणी, पनवेल.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: