बळीराजा चिंताग्रस्त - दीर्घकालीन पर्याय शोधणे आवश्यक.
म.टा. दिनांक २६ डिसेंबर २२ च्या, बळीराजा चिंताग्रस्त या दर्शनी पानावरील वृत्तात वर्षभरातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शासनाचे अर्थ सहाय्य याचे सविस्तर वृत्त भयानक परिस्थितीची जाणीव करून देणारे आहे. २०२२ आणि या मागील कित्येक वर्षे याचा तौलनिक विचार करता यात तस्सू भर पण फरक पडलेला नाही. वर्षानुवर्षे आत्महत्या होत आहेत आणि सरकारी यंत्रणा आर्थिक मदतीचे आकडे जाहीर करीत आहेत. शासनाच्या नोंदीनुसार राज्यात एकूण १ कोटी ६० लक्ष शेतकरी आहेत. त्यातील ८२% शेतकरी अल्पभूधारक असून निम्म्यावर औरंगाबाद आणि पुणे महसूल क्षेत्रातील आहेत. गेल्या तीन वर्षात शासनाने, पंतप्रधान कृषी सन्मान निधी, महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना, २ लक्ष थकीत कर्ज माफी योजना, रू.९६४ कोटी कर्जमाफी आणि अनेक योजनांच्या केवळ घोषणा केलेल्या दिसतात याची अंमलबजावणी नीट होत नाही, असे एकंदरीत परिस्थिती वरून दिसून येते.
महाराष्ट्रासाठी पडणारा पाऊस, जमिनी, पीक पद्धती, वनस्पती आणि उष्णतामान या साऱ्याचा विचार करता, शेती ही पावसावर अवलंबून आहे. पावसाचे प्रमाण हे अनियमित व कमी कालावधीत जास्त पाऊस किंवा दोन पावसांत मोठा खंड पडत असल्यामुळे पीक उत्पादन हे निश्चित स्वरूपाचे राहिलेले नाही.
त्यामुळे पिकांची उत्पादकता अतिशय कमी असून त्यात नेहमीच अस्थिरता आढळून येते. निरनिराळ्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाताना शेतक-यांना त्यांच्या उपजीविंकेचे साधन केवळ शेती असल्याने मोठ्या संकंटाचा सामना करावा लागतो. अन्न धान्य पिकविणाऱ्या आणि आहे तो जमीन जुमला टिकवून, दुधदुभत्या गुरढोरांचे पालन, शेतांमुळे पक्ष्यांचा अधिवास, पर्यायाने पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या शेतकऱ्यांना कायम स्वरुपी उत्पन्नासाठी योजना आखणे जरुरीचे आहे. खरीप पिकांचे नियोजन, रब्बी हंगामाचे नियोजन, उन्हाळी पिक वाढीच्या महत्वाच्या अवस्था आणि पाण्याच्या गरजेनुसार पिकांचे पाणी व्यवस्थापन, सिंचन पद्धतीचा अवलंब, विहीर पुनर्भरण, या साऱ्या योजना केवळ कागदावर न राहता , एक गाव किंवा १०० हेक्टर एक कृषी अधिकारी नेमून, पीक लागवड, उत्पादन ते विक्री यासाठी साखळी बनवून प्रत्येकास आवश्यक पीक उत्पादनाचे लक्ष्य देणे आवश्यक आहे. या कठीण परिस्थितीतून शेतकऱ्याला बाहेर काढणे गरजेचे आहे. याचा शासनाने दिर्घ कालीन योजना आखून पर्याय शोधणे जरुरीचे आहे.
विजयकुमार आप्पा वाणी, पनवेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा