सोमवार, २६ डिसेंबर, २०२२

लेख ३४ (२७ डिसेंबर २०२२)

ही दिशा कोणती ? - दिशाहीनांना उत्मातासाठी दिशाच उरली नाही. 

दिनांक २७ डिसेंबर २२ च्या संपादकीय लेखात सध्याच्या राजकीय परिस्थितीचे अनेक दाखल्यांसह योग्य वर्णन करून त्यांच्या वर्तणुकीचे दुसऱ्या परिच्छेदात तर अक्षरशः वाभाडे काढले आहेत. पण निर्लज्ज शब्दासही यांच्याप्रती लावून घेण्यास लज्जा वाटावी एवढा कोडगेपणा यांच्यात ठासून ठासून भरला आहे. गेल्या तीसेक वर्षात, एका क्षणासाठी पणं सत्ता, संपत्ती आणि प्रसिद्धीच्या वलयापासून दूर राहू न शकणाऱ्या लोकप्रतिनिधींची वेगळीच टीम, प्रत्येक टर्म ला उभी राहत आहे आणि आज याच सर्व टीम एकत्रित येवून दोन्ही सभागृह, ना कुणाची भीड ना कुणाची भाड याला अनुसरून आलटून पालटून चालवित आहेत.  

परंपरागत कुटुंबातून म्हणा, प्रतिष्ठानातून संसदीय कार्याचा अभ्यास करणाऱ्यांकडून स्त्री पुरुष भेदभाव न करता बेताल वक्तव्य, विरोध म्हणून किळस वाटणारा संदर्भ जोडणारी विरोधी वक्तव्ये, असे शाळेचा तास बदलतो तसा विषय बदलवून तासनतास, दिवसेंदिवस, महिनेमहिने वर्षानुवर्षे गलिच्छ राजकारण सुरू आहे. अभ्यासू प्रतिनिधी, संसदपटू, साधनसुचिता, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, उत्कृष्ट कामाचे श्रेय, समाजसेवक, या शब्दांऐवजी घृणास्पद, असंसदीय शब्दांचा संचय वाढविणारे सभागृह असे वर्णन करावे लागते.  

सामान्य माणसाला याचे काही देणे घेणे नाही, हे जेवढे खरे तरी पण प्रतिनिधी म्हणून यांचे काहीतरी देणे आहे. दूध भाजीपाला, आहार, प्रवास व्यवस्था, शालेय शिक्षण, बाग बगीचा, परिसरात स्वच्छता, आरोग्य व्यवस्था, सवलतीत निवास, या जीवनाश्यक गोष्टीं किंमत लावून का असेना पण मिळावी हिच माफक अपेक्षा असते. पण हे प्रतिनिधी "सीसीटीव्ही दृष्टिक्षेपात" या सूचनेप्रमाणे प्रत्येक जण दुसऱ्याच्या घरी दारी बाजारी घुसून घुसून मागे लागले आहेत. त्यांना जनतेच्या गरजांविषयी काही देणे घेणे नाही. स्वतःचे स्वत्व कधीच गमावून बसले याची जाणीव यांना नाही. जाणीव करून देणारे अग्रलेख, संपादकीय यांच्या वाचण्यात येत नाहीत आले तरी उमजत नाही कारण "घटं भिन्ध्यात, पटं छिन्द्यात कुर्याद्रासभरोहण। येन केन प्रकारेण प्रसिद्ध: पुरुषो भवेत।। या प्रमाणे गाढवावर जरी बसावं लागलं तरी बसतील अशा वृत्तीच्या प्रतिनिधीच्या राज्यात आपण राहतो आहे. कोण जाणे "धर्म-राजकारण समवेत चालती | शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती | पसरे यत्कीर्ति अशी विस्मयावहा || प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा || असे या शताब्दीत तरी घडेल का? 

विजयकुमार आप्पा वाणी, पनवेल. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: