मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०२३

**. ७ नोव्हेंबर २०२३

 पन्नाशीच्या टप्प्याच्या निमित्ताने !!


*पन्नाशी* जीवनाचा एक महत्त्वाचा दुसरा टप्पा पूर्णत्वाकडे जाणारा. पहिल्या टप्प्यात बालपण, शिक्षण, नोकरीतील उमेदवारी, की लगेच लग्नाची उमेदवारी.  त्यानंतर दुसऱ्या टप्प्याची सुरुवात, खरेतर धावपळीची असते.  नुकतेच लग्न -  *बायकोपरी प्रीती* नोकरीतील दोन तीन वर्षच झालेली म्हणून - *नोकरीप्रती प्रीती*, त्यात समवयस्क भावंडांची बहिणींची लग्न - *कुटुंबापरी प्रीती* , या प्रीतीच्या चक्रात फिरत असतानाच पुढच्या पिढीचे निर्माण होते ती *मायेची प्रीती* न्यारीच.  वर्षभर जाते ना जाते तोच क्रश, डे स्कूल, केजीपीपी प्रवेशाचे सोहळे पार पाडत असताना तिशीचा उंबरठा ओलांडला जातो.  पुढची वर्षे स्थिरतेची म्हणून भविष्याकडे पहात असतानाच, दुसऱ्या अपत्याची चाहूल, नोकरीतही प्रमोशनची चाहूल.  अन् मग सुरू होत ते डेडीकेशन, डिवोशन, करिअर प्रोग्रेशन वैगेरे वैगेरे , कधी तरी मनासारखे होते,  नाहीतर खट्टू मनाने काम करत पुढच्या आशेने काम करत चाळीशी ओलांडली जाते.  दोन्ही अपत्यांचे पालन पोषण , शाळा, संमेलने,  क्राफ्ट वर्क, फ्युचर प्लॅनिंग , त्यात वन टू चे टू बेड, टू चे थ्री बेड मागणी होतच रहाते, त्यात आता हे पुरे म्हणतच *पन्नाशी* येते हो. *पन्नाशी*  दोन टप्प्यातला आरसा दाखविते, चष्मा डोळ्यावर सरकलेला असतो, त्यातून मी, माझा, मला, स्वतःलाच न्याहळत असतो.  उजव्या भांगातली बट पांढरी होतानाच , त्याखालील चंद्र उजळलेला दिसू लागतो.  पोटाचा घेर कमी व्हावा म्हणून उद्यापासून जॉगिंग, वर्किंग, योगासने आदींचा फक्त विचार करून ठेवायचा असतो. मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने,  आप्त स्वकियांच्या भेटीत आता वर्ष वर्षांचे अंतर पडू लागते .  पण हिच *पन्नाशी* , पुढच्या आयुष्याचे गणित मांडायला शिकविते, मुलांचे उच्च शिक्षण, पेन्शन मिळणार नसल्याने , त्याची तजवीज,  अध्यात्म, परमार्थ कडे हळूहळू सरकायचे म्हणून चार धाम यात्रेचे नियोजन करायचे असते. म्हणून *पन्नाशी* महत्वाची, कारण प्रौढत्वाकडून विशेष प्रौढत्वाकडे नेणारी. 

ह्या सुवर्ण पन्नाशीच्या गोल्डन🥇🥇🪙 शुभेच्छा* *!! शतायुषी भव !!*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: