भाषा सभ्यतेची ऐशीतैशी !!
दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ लोकसत्ता अंकातील "पदोन्नतीचे पाहा" संपादकीय वाचले . संपूर्ण लेखात विश्वचषक सामन्या दरम्यान पंतप्रधानांच्या उपस्थिती, भारताचा पराभव आणि त्यानंतर झालेली पंतप्रधानांची निर्भर्त्सना यावर प्रकाश टाकताना , असा शब्दप्रयोग कोणत्याच व्यक्तीसाठी, कोणीही , कधीही वापरता नये असे म्हणताना मात्र कित्येक उदाहरणे देऊन सत्ताधाऱ्यांना अनुल्लेखाने मारले आहे हे मात्र दिसून येते . एकीकडे 'असली बिनडोकीं कृती समाज माध्यमातील रिकामटेकड्या वाचाळवीरांवर सोपविणे, असे म्हणत, तर दुसरीकडे पप्पू ठरविणे , स्त्रीचे वर्णन परदेशी जर्सी गाय , ५० कोटींची गर्लफ्रेंड अशी उदाहरणे देत, सत्ताधारी आणि विरोधकांच्या भाषा सभ्यतेची, खालच्या पातळीची परंपरा कशी चालू आहे हे ही दर्शविले आहे . एकंदरीत असे चित्र निर्माण होण्यास, गेल्या वीस पंचवीस वर्षांतील समाज माध्यमांचा वापर आणि वावर कारणीभूत आहे . यापूर्वीच्या काळात एखाद्या सभेचे चित्रण , बातमी , केलेले वक्तव्य संक्षिप्त स्वरूपात रेडिओवर आणि दुसऱ्या दिवशीच्या वर्तमान पत्रात वाचावयास मिळे, शिवाय साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याकारणे , वृत्तपत्र वाचन करणाऱ्यांनाच दृष्टीस पडे , त्यामुळे मुद्द्याचा , वक्तव्याचा , भाषणाचा प्रभाव कमी अधिक होत असे . परंतु जसजसे समाज माध्यमांचे प्रगत स्वरूप सुरु झाले , तसतसे ब्रेकींग न्यूजच्या नावाखाली ठळक वक्तव्ये कारण्याऱ्यांची अहमिका सुरु झाली . दिवसाचे चोवीस तास प्रसिद्धी साठी हपापलेले नेतृत्व निर्माण होउन , प्रसंगी अश्लाघ्य भाषेचा वापर करून हेतुपुरस्पर एकमेकांवर कुरघोडी करण्यास कायम समाज माध्यमांचा वापर सुरु झाला . अंधभक्त , टोळ्या , मिंधे , खोके , गद्दार , इत्यादी अनेक नवनवीन शब्दांचा सर्रास वापर होताना दिसत आहे . कुणाचाही कोणावरही अंकुश राहिलेला दिसत नाही , कुणास काही देणे घेणे नाही , त्यामुळे उच्चपदस्थ असो , वयस्कर असो , त्यांनीही आता मानापमानाची अपेक्षा करू नये, परिणामी भाषा सभ्यते विषयी आशा बाळगणे आता शक्य नाही , हे निरंतर चालूच राहील .
विजयकुमार वाणी , पनवेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा