मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०२३

लेख (१५१) २९ नोव्हेंबर २०२३

 



अडानी शेअर्सचे भाव वाढले एलआयसीचे काय ?

या वर्षी जानेवारी मध्ये,  अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडनबर्ग रिसर्चने अदानी ग्रुपवर स्टॉक मॅनिप्युलेशनचा आरोप केला.  हा अहवाल येताच त्यांची संपत्ती १२० अब्ज डॉलरवरून ३९.९ अब्ज डॉलरवर आली. त्याचा प्रत्यक्ष आणि त्वरित परिणाम एलआयसी भागधारकांना, अडीच लाख कोटींचा फटका बसला आणि एलआयसीच्या शेअर्स चे भाव रसातळाला गेले. त्यानंतर अहवाल, त्रुटी, सेबी, संसदीय समिती सगळ्यांच्या माध्यमातून अडाणी ग्रुपने पुनश्च स्थिर स्थावर होऊन आजच्या घडीला अडाणी शेअर्सच्या भावाने उत्तुंग भरारी घेतली आहे. परंतु रसातळाला लागलेला एलआयसी मात्र अजून तिथेच गटांगळ्या खात आहे. शेअर्सचे भाव उतरण्याचे कारण अडाणी होते तर, अडानीच्या प्रगतीत एलआयसी शेअर्स पणं त्याच टक्क्यांनी वधारले पाहिजेत. नाहीतर एलआयसी शेअर्स भाव कोसळण्याचे कारण दुसरे काही असू शकेल, फक्त ते अडाणी सोबत जोडून सत्यता लपविली गेली की काय ? याचा तपास व्हावा.


विजयकुमार वाणी,  पनवेल 

सोमवार, २७ नोव्हेंबर, २०२३

लेख (१५०) २७ नोव्हेंबर २०२३

 



म टा राउंड टेबल - राउंडची व्याप्ती चौफेर वाढवावी . 




म टा  दिनांक २७ नोव्हेंबर २०२३, अंकातील म टा राउंड टेबल  "सांघिक प्रयत्नांची गरज" मुंबई पालिकेचा लेखाजोगा वाचला.  म टा राऊंड टेबल अतिशय स्तुत्य उपक्रम असून, पालिकेचे शहरासाठी नियोजन कसे असावे, तसेच पालिकेला नागरिकांकडून काय अपेक्षा आहेत याचे सखोल विवेचन केले आहे .  या चर्चेतील महत्वाचा मुद्दा म्हणजे सोसायटी स्तरावर कचरा वर्गीकरण व्हावे .  आजच्या घडीला मुंबई आणि उपनगर परिसरात, मोठं मोठे कॉम्प्लेक्स , टाऊनशिप उभ्या रहात आहेत.  साधारणतः दोनशे तीनशे च्या पुढे कुटुंबे वास्तव्यास असलेल्या कॉम्प्लेक्स मधून प्रचंड प्रमाणात कचरा साठविला जातो .  पालिकेची अपेक्षा आहे ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण सोसायटी स्थरावरच व्हावे .  परंतु यातली एक पुढची पायरीचे सुद्धा पालिकेला नियोजन करता येईल, ते म्हणजे उपलब्ध कचऱ्याचे,  बायो गॅस संयंत्रावर अल्प प्रमाणात वीज निर्मिती करून सोसायटीच्या वापरासाठी उपयुक्त होऊ शकेल. यामुळे कचऱ्याचे विघटन जागच्या जागी होईल , ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, वाहुतुक समस्या आणि डम्पिंग आणि दुर्गंधी या साऱ्यांवर नियंत्रण राहू शकेल. भविष्यात मोठ्याला टाऊनशिप निर्मितीसमयी या सयंत्रासाठी जागा ठेवावी याची खबरदारी घेऊनच, प्लॅन पास करण्यात यावा .  तसेच म टा स विनंती की, म टा राउंड टेबलची एमएमआरडीए क्षेत्रात  चौफेर व्याप्ती वाढवून,   वसई विरार, अंबरनाथ बदलापूर , नवी मुंबई पनवेल उरण शहरांच्या समस्यांचाही अभ्यास करून, सर्व पालिकांना एकमेकांच्या साहाय्याने अनेक उपक्रम राबविता येऊन संपूर्ण मुंबईचा अल्पावधीतच कायापालट होईल .  याच आधारे नाशिक  पुणे नागपूर आदी शहरांचॆ सुद्धा नियोजन होईल .  
  

विजयकुमार वाणी , पनवेल   

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३

लेख (१४९) २३ नोव्हेंबर २०२३

 


भाषा सभ्यतेची ऐशीतैशी !!

 
दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ लोकसत्ता अंकातील  "पदोन्नतीचे पाहा" संपादकीय वाचले .  संपूर्ण लेखात विश्वचषक सामन्या दरम्यान पंतप्रधानांच्या उपस्थिती,  भारताचा पराभव आणि त्यानंतर झालेली पंतप्रधानांची निर्भर्त्सना यावर प्रकाश टाकताना , असा शब्दप्रयोग कोणत्याच व्यक्तीसाठी, कोणीही , कधीही वापरता नये असे म्हणताना मात्र कित्येक उदाहरणे देऊन सत्ताधाऱ्यांना अनुल्लेखाने मारले आहे हे मात्र दिसून येते . एकीकडे 'असली बिनडोकीं कृती  समाज माध्यमातील रिकामटेकड्या वाचाळवीरांवर सोपविणे, असे म्हणत, तर दुसरीकडे पप्पू ठरविणे , स्त्रीचे वर्णन परदेशी जर्सी गाय , ५० कोटींची गर्लफ्रेंड अशी उदाहरणे देत, सत्ताधारी आणि विरोधकांच्या भाषा सभ्यतेची, खालच्या पातळीची परंपरा कशी चालू आहे हे ही दर्शविले आहे .  एकंदरीत असे चित्र निर्माण होण्यास, गेल्या वीस पंचवीस वर्षांतील समाज माध्यमांचा वापर आणि वावर कारणीभूत आहे .  यापूर्वीच्या काळात एखाद्या सभेचे चित्रण , बातमी , केलेले वक्तव्य संक्षिप्त स्वरूपात रेडिओवर आणि  दुसऱ्या दिवशीच्या वर्तमान पत्रात वाचावयास मिळे, शिवाय साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याकारणे , वृत्तपत्र वाचन करणाऱ्यांनाच दृष्टीस पडे , त्यामुळे मुद्द्याचा , वक्तव्याचा , भाषणाचा प्रभाव कमी अधिक होत असे .  परंतु जसजसे समाज माध्यमांचे प्रगत स्वरूप सुरु झाले , तसतसे ब्रेकींग न्यूजच्या नावाखाली ठळक वक्तव्ये कारण्याऱ्यांची अहमिका सुरु झाली .   दिवसाचे चोवीस तास प्रसिद्धी साठी हपापलेले नेतृत्व निर्माण होउन , प्रसंगी अश्लाघ्य भाषेचा वापर करून हेतुपुरस्पर  एकमेकांवर कुरघोडी करण्यास कायम समाज माध्यमांचा वापर सुरु झाला .  अंधभक्त , टोळ्या , मिंधे , खोके , गद्दार , इत्यादी अनेक नवनवीन शब्दांचा सर्रास वापर होताना दिसत आहे .  कुणाचाही कोणावरही अंकुश राहिलेला दिसत नाही , कुणास काही देणे घेणे नाही ,  त्यामुळे उच्चपदस्थ  असो , वयस्कर असो , त्यांनीही आता मानापमानाची अपेक्षा करू नये, परिणामी भाषा सभ्यते विषयी आशा बाळगणे आता शक्य नाही , हे निरंतर चालूच राहील .  


विजयकुमार वाणी , पनवेल 

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०२३

लेख (१४८) २२ नोव्हेंबर २०२३




राज्यपाल हे पद न्यायाधीशां साठीच असावे . 


सकाळ दिनांक २२ नोव्हेंबर २०२३, अंकातील " काळ सोकावला " संपादकीय वाचले.  पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक, पंजाब, तामिळनाडू राज्यांमध्ये, राज्यपाल विरुद्ध सरकार असा संघर्ष चालू आहे. राज्यपालांनी महत्त्वाची विधेयकं जाणूनबुजून प्रलंबित ठेवल्याचा आरोप  केला असून , त्यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. सर्वोच्च न्यायालयानेही  प्रलंबित विधेयकांवर लवकरात लवकर निर्णय घ्या, असे आदेश दिले.   खरे म्हणजे , राज्यपाल हे केंद्रातील राष्ट्रपतींप्रमाणे राज्यांचे औपचारिक प्रमुख असतात. राज्यपाल हा केंद्र आणि राज्य यांच्यातील दुवा आहे, एक घटनात्मक पहारेकरी आहे आणि मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ कार्य करू शकत नसल्यास प्रशासन चालू ठेवण्यासाठी एक संरक्षण आहे.  चेक अँड  बॅलन्स हा संसदीय लोकशाहीचा एक आवश्यक भाग आहे.  परंतु, गेल्या सत्तर वर्षातील केंद्र शासनातील काँग्रेस आणि भाजप सरकारच्या कार्यकाळात राज्यपाल पदाचा गैरवापर झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत.  या सर्वांसाठी पर्याय म्हणून, राज्यपाल पदी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश समकक्ष न्यायाधीशाची नियुक्ती (निवृत्त नव्हे ) करावी.  न्यायाधीशांची नियुक्ती झाल्यास सत्ताधारी , विरोधकांवर अंकुश राहून केंद्रचाही हस्तक्षेप कमी होईल, तसेच न्यायालयात जायची वेळ येणार नाही . 

विजयकुमार वाणी , पनवेल 


मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०२३

लेख (१४७) २२ नोव्हेंबर २०२३

 


आरक्षणाचे वादळ !!




म टा  दिनांक २० नोव्हेंबर २०२३, अंकातील " रात्र वैऱ्याची; दिवस वाचाळांचे " संपादकीय वाचले . एकंदरीत राज्यात फक्त आरक्षण या विषयावरच वादळ घोंघावत आहे असे दिसून येते .  प्रकरण इतके हातघाईवर आणले गेले की, आजच्या आज आत्ताच्या आता आरक्षण मिळाले नाही तर परिस्थिती चिंताजनक होईल, दैनंदिन वर्तमानपत्रातील पहिल्याच पानावर भरून येणारे रकाने , टि व्हि वरील सर्वच चॅनेल च्या बातम्यांमध्ये पहिला अर्धा तास आरक्षण  विषयाला वाहिलेला आहे . एकीकडे सर्वोच्च न्यायायाल खाजगी क्षेत्रातील आरक्षण , स्थानिक म्हणून जागा राखीव ठेवण्याची कृती बेकायदा ठरवीत असताना, फक्त आरक्षण विषयासाठी राज्य सरकार महिने न महिने खर्ची घालत आहे .  ३६ जिल्ह्यातून, २८८ विधानसभा सदस्यांचे किती प्राबल्य आहे , अभ्यास आहे , कोणत्या उपाय योजना राबविल्यास याचा प्रभाव कमी होईल याचा सारासार विचार अजिबात झालेला दिसत नाही . विरोधाला विरोध आणि प्रश्न ज्वलंत ठेवण्याचे कसब मात्र या सर्वांमध्ये आहे हे दिसून येते .  असेच चालू राहिल्यास राज्य अधोगतीला जायला वेळ लागणार नाही . 


विजयकुमार वाणी , पनवेल 

सोमवार, २० नोव्हेंबर, २०२३

लेख (१४६) २१ नोव्हेंबर २०२३

 

(१)

स्थानिक आरक्षणाच्या मुद्द्याकडे विविध दृष्टीकोनातून (अँगल) ने बघितले पाहिजे 

दिनांक २० नोव्हेंबर २०२३ लोकसत्ता अंकातील  "अन्वयार्थ " सदरातील "आरक्षणाचा हरियाणाच्या धडा " लेखातून एकूण सर्वच राज्यातील विविध प्रकारचे आरक्षण आणि न्यायालयांचे निकाल याचा उहापोह  करून,  
सर्वोच्च न्यायालयाने रहिवास, जन्म किंवा स्थानिक म्हणून जागा राखीव ठेवण्याची कृती बेकायदा ठरवली आहे असे म्हटले आहे .  स्थानिक आरक्षणाच्या मुद्द्याकडे विविध दृष्टीकोनातून (अँगल) ने बघितले पाहिजे .  कोणतेही खाजगी कारखाने, शासकीय प्रकल्प, मध्यवर्ती कार्यालये  ज्या भूमीवर उभे केले जातात , त्या जागा पूर्वी स्थानिक सामान्य शेतकरी/नागरिकांच्याच होत्या.  सरकारी दराच्या भावाने जमिनींचे अधिग्रहण करून तुटपुंजा मोबदला दिला जातो .  उदाहरणार्थ, महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिडको , न्हावा शेवा बंदर , ओएनजीसी, आयपीसीएल (रिलायन्स) आरसीएफ (थळ ) एचसोसी (रसायनी ),  तळोजा , बेलापूर एम आय डी सी पट्ट्यासाठी हजारो एकरांनी 
जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या .  जे प्रकल्प , कारखाने , कार्यालये स्थानिकांच्या जमिनीवर उभी राहिलीत, त्या आस्थापनांमध्ये अन्य  जिल्ह्यातील, राज्यातील (परप्रांतीय) यांच्या नियुक्त्या होऊ लागल्या .  
जमिनी गेल्यात आणि मिळालेल्या तुटपुंज्या मोबदल्यावर जीवन जगणे कठीण होऊ लागल्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्त  शेतकऱ्यांचा असंतोष 
दिसू लागल्यामुळे,  राज्याने पुनर्वसन कायदा मंजूर करून, जमिनीच्या बदल्यात सरकारी भावाने दर, घरासाठी जागा आणि घरटी एक नोकरी असे समीकरण जुळवून आणून पुढील जमिनींचे अधिग्रहण सोपे केले.
 
इथे मूळ मुद्दा, स्थानिक आरक्षणाच्या मुद्द्याकडे विविध दृष्टीकोनातून (अँगल) ने बघितले पाहिजे हा आहे . या सर्व प्रकल्पांमध्ये अंदाजे दहा हजाराच्या वर स्थानिकांना रोजगार मिळाला असे गृहीत धरल्यास, स्थानिकांना जवळच उपलब्ध असलेल्या कामाच्या ठिकाणी जाणे सोयीस्कर ठरते.  जाण्या येण्याचा वेळ वाचतो , कोणत्याही क्षणी उप्लब्धतते मुळे उप्त्पादन क्षमता वाढते.  या उलट,  हाच रोजगार दूरच्या शहरातील हजारो लोकांना मिळाला असता तर, त्यांनी स्थानिकांच्या गावात वास्तव्य केले असता,  तेथील दैनंदिन सुविधांवर ताण पडला असता.  जात पात , भाषा, धर्म, वर्ण या साऱ्या गोष्टींचा अजूनही पगडा असल्यामुळे दुही निर्माण होऊन वातावरण प्रदूषित होण्याचा संभव 
वाढतो .  किंवा त्यांनी दूरच्या शहरात वास्तव्य केले तर  तेथील दैनंदिन सुविधांवरचा ताण , जाण्या येण्याचा प्रवास त्यातून वाहतूक कोंडी , प्रदूषण, वैगेरे क्रमानुसार परिणाम होत जातो.  प्रदूषण , वाहतूक कोंडी , दैनंदिन सुविधांवर ताण, आपापसातील मतभेद  , टाळायचे असल्यास स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षण ठेवावे.  शिक्षणाची , अनुभवाची अट शिथिल करून, स्थानिकांना प्रशिक्षण देण्यात यावे , अप्रेन्टिस म्हणून नियुक्त करून कायम स्वरूपी नोकरी देण्यात यावी. एक प्रयोग म्हणून राज्यातील ३६ जिल्ह्यात, कमीत कमी हजार रोजगार उपलब्ध करून दिल्यास छत्तीस हजार स्थानिक रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे स्थलांतर वाचून सर्व सुविधांवरील ताण वाचेल .   हळू हळू याचे प्रमाण लाखांवर गेल्यास चाळीस लाख लोकांचे स्थलांतरण वाचविण्याचे श्रेय शासनाला मिळू शकते . 


विजयकुमार वाणी , पनवेल 

(२)
आरक्षणाचे वादळ !!




म टा  दिनांक २० नोव्हेंबर २०२३, अंकातील " रात्र वैऱ्याची; दिवस वाचाळांचे " संपादकीय वाचले . एकंदरीत राज्यात फक्त आरक्षण या विषयावरच वादळ घोंघावत आहे असे दिसून येते .  प्रकरण इतके हातघाईवर आणले गेले की, आजच्या आज आत्ताच्या आता आरक्षण मिळाले नाही तर परिस्थिती चिंताजनक होईल, दैनंदिन वर्तमानपत्रातील पहिल्याच पानावर भरून येणारे रकाने , टि व्हि वरील सर्वच चॅनेल च्या बातम्यांमध्ये पहिला अर्धा तास आरक्षण  विषयाला वाहिलेला आहे . एकीकडे सर्वोच्च न्यायायाल खाजगी क्षेत्रातील आरक्षण , स्थानिक म्हणून जागा राखीव ठेवण्याची कृती बेकायदा ठरवीत असताना, फक्त आरक्षण विषयासाठी राज्य सरकार महिने न महिने खर्ची घालत आहे .  ३६ जिल्ह्यातून, २८८ विधानसभा सदस्यांचे किती प्राबल्य आहे , अभ्यास आहे , कोणत्या उपाय योजना राबविल्यास याचा प्रभाव कमी होईल याचा सारासार विचार अजिबात झालेला दिसत नाही . विरोधाला विरोध आणि प्रश्न ज्वलंत ठेवण्याचे कसब मात्र या सर्वांमध्ये आहे हे दिसून येते .  असेच चालू राहिल्यास राज्य अधोगतीला जायला वेळ लागणार नाही . 


विजयकुमार वाणी , पनवेल 


मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०२३

लेख (१४५) १५ नोव्हेंबर २०२३



शेतकऱ्यांसारखे हाल अपेष्टाचे पुढवे रूप शिक्षित तरुण !!


लोकमत दिनांक १४ नोव्हेंबर २०२३  "आकांक्षाचीच चाळण" अतिशय परखड लिहिलेले  संपादकीय वाचले.  मुळात मनुष्य जन्माला आला म्हणजे त्याचे संगोपन , शिक्षण , कमविण्यासाठी व्यवसाय किंवा नोकरी आणि पुढे विवाह अशा सोपस्कारातून ऋतुचक्र सुरू असते. अगदी साठ सत्तर वर्षांपूर्वी ठीक चालले होते.  कुटुंबात चार मुले जरी जन्माला आली तरी एकत्र कुटुंब व्यवसायात शेती, दूध विक्री, किराणा दुकान वैगेरे व्यवसायात सामावून घेतले जात असे. पुढे विभक्तीकरण झाल्याने आणि कुटुंबीय संख्या वाढल्याने, शेतीची वाटणीत अल्पशी जमीन, घरगुती व्यवसायांवर उतरती कळा लागली.  शिक्षण आवश्यक आणि उदर निर्वाहासाठी रोजगार , नोकरी आवश्यक वाटू लागले.  परिणामी शिक्षित तरुणांची संख्या आणि उपलब्ध होणारा रोजगार याचा ताळमेळ बिघडत गेला.  शासकीय, अशासकीय, खाजगी जागा कधी काळी उपलब्ध झाल्यास, गाव पुढाऱ्यांच्या , नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या दलदलीत योग्य, पात्रता असलेल्या उमेदवारांना डावलले जावून वशिलेबाजीच्या तट्टुंची वर्णी लागत गेली.  सामान्य तरुण मात्र पदवी शिक्षण, स्पर्धा परीक्षा क्लासेस , जाहिराती, अर्ज , मोर्चा आंदोलने, पुढाऱ्यांची आश्वासने  या दृष्ट चकात गुरफटून गेला आहे. यातून हे युवक बाहेर पडण्याची सुतराम शक्यता नाही, हे राज्यकर्त्यांना देखील ठावूक आहे.  परंतु थाथुर मातुर अमिषे दाखवित शेतकरी जसे हाल अपेष्टा सहन करीत जीवन कंठीत आहेत, त्याची पुढची पायरी शिक्षित युवकांची होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ते बदलण्याची चिन्हे येत्या दशकभर तरी दिसत नाही.


विजयकुमार वाणी,  पनवेल 

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०२३

लेख (१४४) १४ नोव्हेंबर २०२३

 "भारताच्या परराष्ट्र धोरणाची रणनिती "


दिनांक १४ नोव्हेंबर २०२३ लोकसत्ता अंकातील "तोतरेपणास तिलांजली ?"  आणि  ३० ऑक्टोबरच्या अंकातील "तोतरी तटस्थता " संपादकीय लेखातून एकूण इस्रायल पॅलेस्टिन परिस्थितीचे विश्लेषण वाचले.  या आधी,  ठरावतील तटस्थपणा आणि आताचा ठरावाच्या बाजूने मतदान, यातून परराष्ट्र नीतीची सावधगिरीची भूमिका दिसून येते. सुरवातीस हमास ने स्वतःहून युद्ध पुकारले आणि त्याच्या बदल्यात इस्त्रायल ने केलेले प्रत्युत्तर समर्थनीय होते, म्हणून तटस्थता योग्य होती.  परंतु इस्रायलची हमास बदल्याची मानसिकता, सुड भावनेने, प्रदेश विस्तार वादात बदलत गेल्यामुळे भारतानेही पॅलेस्टिन मानवता दृष्टीने भूमिकेत बदल केल्याचे जाणवते.
इतिहास पाहता, भारताने, राष्ट्रीय हित पाहून वेळोवेळी माणुसकीच्या भावनेने इस्रायल आणि पॅलेस्टिन देशांशी सामंजस्याची भूमिका घेत, संतुलन ठेवल्याचे धोरण आहे . पाकिस्तानी दहशतवादा विरुध्द जाणीवपूर्वक पाठिंब्यासाठी, भारताने विशेषतः इस्रायलशी व्यापार वाढवून मैत्रीचे संबंध ठेवल्याचे सर्वश्रुत आहे .  तरीही,  परंतु या संबंधात मानवतावादी दृष्टीकोन ढळू न देता,  पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी केलेली मदत लक्षणीय ठरते.  या आधीही भारताने, १९९१ मध्ये  इस्त्रायल पॅलेस्टाईन देशात माद्रिद शांतता करारानुसार समेट घडवून आणला होता.  २०१७ च्या यु एन सभेत जेरुसलेमला इस्रालयची राजधानी घोषित करण्याच्या विरोधात मतदान केले आहे.  नवीन परराष्ट्र धोरणात भारताने जी २० परिषदेत मध्य पूर्व इकोनोमि कॉरिडॉर पायाभूत प्रकल्पासाठी स्वाक्षरी केली आहे, त्याचाही विचार झाला असेल .  म्हणजे भारताचे तटस्थ राहणे , ठरावाच्या बाजूने राहणे, हे परराष्ट्र धोरण नितींमध्ये बदल होत राहणे दिसत असले तरी भविष्यातील सामर्थ्याची चाल असू शकेल.  

विजयकुमार वाणी , पनवेल  

गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०२३

लेख (१४३) १० नोव्हेंबर २०२३

 

आरक्षणाचे चक्रव्यूह !!




लोकसत्ता  दिनांक ९ नोव्हेंबर २०२३, अंकातील "जात आडवी येणार " संपादकीय वाचले .  पूर्व परंपरेनुसार चातुर्वण्य व्यवस्थेला छेद देत जातीपातींवर धारीत, स्वातंत्र्यानंतर  
आरक्षण व्यवस्था निर्माण झाली .  लोकसंध्या कमी , शिक्षण कमी , त्या काळात या आरक्षण पद्धतीला कुणी आपलेसे केले नाही का विरोध केला नाही .  नव्वदीच्या दशकानंतर जागतिकीकरणाचा वेगात शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होऊन, पदवी , अभियांत्रिकी , वैद्यकीय शाखेतील शिक्षण सहज उपलब्ध होत गेले , परिणामी उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या वाढत गेली . शासनाच्या निर्माण होणाऱ्या जागा आणि यांचे प्रमाण व्यस्त होत गेले , एवढे की आरक्षणाचा गुंता वाढत गेला, वाढवला गेला .  सध्य कालीन राज्याचा विचार केला असता, आरक्षणासाठी वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले जाऊन संभ्रमावस्था वाढत गेली, त्याचे निराकरण होईल तेव्हा होईल .  याच समयाला बिहार राज्यातील जातगणना पूर्णत्वाला जाऊन नवीन निकष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही . जातगणनेच्या निकषांवर आरक्षणाची टक्केवारी वाढविल्यास, उर्वरीत पंचवीस टक्केवारीत कोणत्या आणि किती जाती रहातात याचा साकल्याने विचार करण्याची वेळ आली आहे .  सध्याचा केंद्राचा / राज्याचा चतुर्थ ते प्रथम श्रेणीच्या पदभरतीचा वेग आणि पदांची संख्या  पहाता वर्षाला अदमासे शेदोनशे च्या पुढे आकडा गेलेला दिसत नाही .  त्यातही शंभरात पंचाहत्तर टक्के आरक्षित, उर्वरित पंचवीस टक्क्यात अनारक्षित आणि त्या अनारक्षित जागांसाठी पण, पंचाहत्तर टक्क्यातले आरक्षित सुद्धा अर्ज करू शकतात .  म्हणजेच पंचवीस टक्क्यांना ,अशा किती जागा उपलब्ध राहू शकतात ?  याचा विचार कोणता आयोग करणार आहे .  नियमाने आरक्षित पंचाहत्तर टक्क्यांसाठी जर अनारक्षित अर्ज करू शकणार नाहीत , तर अनारक्षित जागांसाठी सुद्धा आरक्षितांना अर्ज करण्याची परवानगी नसावी . याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवले पाहीजे .  

विजयकुमार वाणी , पनवेल 

मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०२३

**. ७ नोव्हेंबर २०२३

 पन्नाशीच्या टप्प्याच्या निमित्ताने !!


*पन्नाशी* जीवनाचा एक महत्त्वाचा दुसरा टप्पा पूर्णत्वाकडे जाणारा. पहिल्या टप्प्यात बालपण, शिक्षण, नोकरीतील उमेदवारी, की लगेच लग्नाची उमेदवारी.  त्यानंतर दुसऱ्या टप्प्याची सुरुवात, खरेतर धावपळीची असते.  नुकतेच लग्न -  *बायकोपरी प्रीती* नोकरीतील दोन तीन वर्षच झालेली म्हणून - *नोकरीप्रती प्रीती*, त्यात समवयस्क भावंडांची बहिणींची लग्न - *कुटुंबापरी प्रीती* , या प्रीतीच्या चक्रात फिरत असतानाच पुढच्या पिढीचे निर्माण होते ती *मायेची प्रीती* न्यारीच.  वर्षभर जाते ना जाते तोच क्रश, डे स्कूल, केजीपीपी प्रवेशाचे सोहळे पार पाडत असताना तिशीचा उंबरठा ओलांडला जातो.  पुढची वर्षे स्थिरतेची म्हणून भविष्याकडे पहात असतानाच, दुसऱ्या अपत्याची चाहूल, नोकरीतही प्रमोशनची चाहूल.  अन् मग सुरू होत ते डेडीकेशन, डिवोशन, करिअर प्रोग्रेशन वैगेरे वैगेरे , कधी तरी मनासारखे होते,  नाहीतर खट्टू मनाने काम करत पुढच्या आशेने काम करत चाळीशी ओलांडली जाते.  दोन्ही अपत्यांचे पालन पोषण , शाळा, संमेलने,  क्राफ्ट वर्क, फ्युचर प्लॅनिंग , त्यात वन टू चे टू बेड, टू चे थ्री बेड मागणी होतच रहाते, त्यात आता हे पुरे म्हणतच *पन्नाशी* येते हो. *पन्नाशी*  दोन टप्प्यातला आरसा दाखविते, चष्मा डोळ्यावर सरकलेला असतो, त्यातून मी, माझा, मला, स्वतःलाच न्याहळत असतो.  उजव्या भांगातली बट पांढरी होतानाच , त्याखालील चंद्र उजळलेला दिसू लागतो.  पोटाचा घेर कमी व्हावा म्हणून उद्यापासून जॉगिंग, वर्किंग, योगासने आदींचा फक्त विचार करून ठेवायचा असतो. मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने,  आप्त स्वकियांच्या भेटीत आता वर्ष वर्षांचे अंतर पडू लागते .  पण हिच *पन्नाशी* , पुढच्या आयुष्याचे गणित मांडायला शिकविते, मुलांचे उच्च शिक्षण, पेन्शन मिळणार नसल्याने , त्याची तजवीज,  अध्यात्म, परमार्थ कडे हळूहळू सरकायचे म्हणून चार धाम यात्रेचे नियोजन करायचे असते. म्हणून *पन्नाशी* महत्वाची, कारण प्रौढत्वाकडून विशेष प्रौढत्वाकडे नेणारी. 

ह्या सुवर्ण पन्नाशीच्या गोल्डन🥇🥇🪙 शुभेच्छा* *!! शतायुषी भव !!*

बुधवार, १ नोव्हेंबर, २०२३

लेख (१४२) २ नोव्हेंबर २०२३

 


व्यवसाय , रोजगारनिर्मिती साठी ताबडतोब प्रयत्न व्हावे !!

 म टा  दिनांक १ नोव्हेंबर २०२३, अंकातील "धोक्याच्या वळणावर" संपादकीय वाचले .  मराठा समाज गत ३० वर्षे सगळ्याच सरकार विरुद्ध आरक्षणाचा लढा देत आहे. पण दुर्देवाने सगळ्या सरकारांनी, अनेक क्लृप्त्या लढविल्या पणं मार्ग काही मिळत नाही.  राज्यकर्त्यां पुढे पेच निर्माण झाला आहे ,  विरोधकही सत्ताधाऱ्यांना नामोहरम करण्याची अनायसे मिळालेली संधी सोडत नाहीत . लेखात केंद्र राज्य सरकार , आंदोलकांचे नेते , सर्व पक्षीय नेते यांनी त्वरित तोडगा काढावा,असे म्हटले आहे, जे पहिल्याच प्रयत्नात होणे अपेक्षित होते.   दुसऱ्या प्रयत्नात, केंद्र राज्य शासनाने, मराठा समाजातील तरुणांच्या वय, शिक्षण याचा विचार करून ,व्यवसाय ,रोजगार निर्मितीसाठी, त्वरित पॅकेज घोषित करावे. प्रत्येक गाव पातळीवर , तालुका पातळीवर , समन्वयक नेमून शासनाचीच जागा , उत्पादन, विक्री याचे साखळी व्यवस्थापन करून, प्रत्येक तरुणाला सामावून घेऊन, शिक्षणा प्रमाणे , वयाप्रमाणे रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावे . व्यवसाय, रोजगार संधी उपलब्ध करून दिल्यास मराठा समाजास थोडा तरी दिलासा मिळेल.  आर्थिक उत्पन्नावर कुटुंब व्यवस्था चालते, पण कुटुंब होण्यासाठी , लग्न होणेही महत्वाचे असते, जे बेरोजगारीमुळे, अत्यल्प , तुटपुंज्या कमाई मुळे होतच नाही . या आधाराने उत्पनाचे साधन निर्माण होऊन, जीवन जगण्याच्या आशा पल्लवीत  होतील.  आरक्षण मिळणारच , त्यामार्फत नोकऱ्याही मिळतील ,  इतक्या वर्षांचा अनुशेष भरून निघणार नाही,  परंतु नवीन मार्गक्रमण सुरु होईल .  

विजयकुमार वाणी , पनवेल