सोमवार, २ ऑक्टोबर, २०२३

लेख (१३१) ३ ऑक्टोबर २०२३

(१)

बुद्धी तर हवीच पण आर्थिक सुबत्ताही  मिळावावी . 

दिनांक ३ ऑक्टोबर २०२३ म. टा. अंकातील " बुद्धी दे गणनायका ! " संपादकीय वाचले.  गणेशोत्सवाचा महत्त्वाचा गुणधर्म हा परिवर्तनशीलता आहे. आनंदाबरोबर रोजगाराला उत्तम चालना देणारा हा उत्सव आहे.  हजारो हातांना काम देऊन, हजारो कोटींची उलाढाल करणाऱ्या गणेशोत्सवात मर्यादा उल्लंघनाचे स्वरूप लागले हे निर्विवाद सत्य आहे दर्शनासाठी, 
विसर्जन मिरवणुकीत लाखोंचा जनसमुदाय, कानठळ्या बसविणारा डीजे, ढोल ताशांचा आवाज , तासंतास  बेभान होऊन जाणारे सत्तर ऐशी टक्के स्थानिक मराठी जन,  आर्थिक, मानसिक, शारीरिक नुकसान करत स्वतःच्या वेळेचा , सार्वजनिक वाहतुकीचा , प्रशासनाचा , कायदा सुव्यवस्थेचा बोजा वाढवीत असतात. लाखोंच्या गर्दीमुळे ढोल वाजविणाऱ्यात ऊर्जा निर्माण होऊन, आवाजाच्या मर्यादेचा भंग केला जातो, परिणामी  प्रकृती अस्वस्थतेने हॉस्पिटल, खर्चिक उपचार आलेच . सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप देशभरातील उद्योगधंद्यांना सुगीचे दिवस आणतो . हे खरे असले तरी, त्याचा लाभ मुख्यतः वीस ते पंचवीस टक्क्यांवर काम करणाऱ्या परप्रांतीयांनाच होत असतो. आम्ही मात्र  गणेशोत्सवाची सुरवात , माझा महाराष्ट्र , आमची मुंबई , म्हाडा लॉटरी , मराठी पाट्या, परीक्षा , ओबीसी आंदोलन ,या कंड्या पिकविणाऱ्या बातम्यात वर्षानुवर्षे नव्हे अनेक दशके गुंतलेले वा गुंतवलेले आहोत.  देशात सर्वाधिक जीएसटी , इन्कमटॅक्स भरणाऱ्या राज्याच्या टक्क्यात, आपला मराठी टक्का किती याचेही शोध घेणे महत्वाचे आहे . एकंदरीत वर्षभरातील सर्वच सण उत्सवात उद्योगधंद्याचे महत्व लक्षात घेऊन, मराठी युवकांनी सहभागी होऊन बुद्धी वाढवावी सोबत आर्थिक सुबत्ता वाढविणेही तेवढेच महत्त्वाचे आहे . 

विजयकुमार वाणी , पनवेल  

(२)

सण उत्सवात उद्योग धंद्याचे महत्व लक्षात घेऊन आर्थिक सुबत्ता वाढविणे महत्वाचे. 


दिनांक २ ऑक्टोबर  २०२३ लोकसत्ता अंकातील "विसर्जन कशाचे " संपादकीय वाचले.  गणेशोत्सवाचा महत्त्वाचा गुणधर्म हा परिवर्तनशीलता आहे . आनंदाबरोबर रोजगाराला उत्तम चालना देणारा हा उत्सव आहे.  शाडूची माती , बांबू, ताडपत्री, डिझायनर कपडे , विद्युत रोषणाई,  नारळ, नैसर्गिक कृत्रिम फुले , वाद्य वाजंत्री इत्यादी हजारो हातांना काम देऊन हजारो कोटींची उलाढाल करणाऱ्या गणेशोत्सवास मर्यादा उल्लंघनाचे स्वरूप लागले हे निर्विवाद सत्य आहे .  श्रींच्या मूर्तीची अमर्याद उंची , रहदारीच्या रस्त्यावरील मंडप , आगमनाची मिरवणूक , पहिले दर्शनाच्या नावावर प्रतिष्ठापना पूर्व फोटो सेशन , दर्शनासाठी लांबच्या रांगा ,  व्हीआयपी संस्कृतीचे दर्शनाची व्यवस्था इत्यादी अवाजवी प्रसिद्धी लाभलेल्या
गोष्टींची सांगता विसर्जन मिरवणुकीत कळस चढविला जातो .  उंचच्या उंच श्रींच्या मूर्ती, त्यावर पुष्पवृष्टी साठी  उंचावरून केलेली व्यवस्था , मूर्ती सभोवताली लाखोंचा जनसमुदाय , कानठळ्या बसविणारा डीजे, ढोल ताशांचा आवाज , विविध रंगांचा 
नळ्यांतून उधळणारा गुलाल , अथांग समुद्रातील विसर्जन असे तासंतास  बेभान होऊन जाणारे युवक.  यातील खरे वास्तव म्हणजे एकंदरीत गर्दीच्या  ऐशी टक्के जनता स्थानिक मराठी जन,  केवळ क्षणिक, भौतिक  सुखाच्या मागे लागत,  आर्थिक, मानसिक, शारीरिक नुकसान करत स्वतःच्या वेळेचा , सार्वजनिक वाहतुकीचा , प्रशासनाचा , कायदा सुव्यवस्थेचा बोजा वाढवीत असतात.   याच गर्दीचा लाभ विविध ढोल झाँज ताशा पथकांना होऊन, त्यांच्या क्रियाशीलतेत ऊर्जा निर्माण होऊन आवाजाच्या मर्यादेचा भंग केला जातो, परिणामी  प्रकृती अस्वस्थतेने दवाखाने , हॉस्पिटल खर्चिक उपचार आलेच . घरगुती, सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप देशभरातील उद्योगधंद्यांना सुगीचे दिवस आणतो . हे खरे असले तरी, त्याचा लाभ मुख्यतः वीस ते पंचवीस टक्क्यांनी उद्योगधंद्यातील संधीचे सोने करणाऱ्या परप्रांतीयांनाच होत असतो हे हि सत्यच आहे .  आम्ही मराठी जन , गणेशोत्सवाची सुरवात , माझा महाराष्ट्र , आमची मुंबई , आम्ही पुणेकर , नादात गुंतलेले , गुंतवलेले असतो . दुकानावरील 
मराठीच्या पाट्या , मराठी माणसाला घर नाकारणे , प्रकल्प गुजरातला पळवले,  सरकारी नोकरीसाठी ओबीसी आंदोलन , परीक्षेत बदल,  या कंड्या पिकविण्याऱ्या बातम्यात वर्षानुवर्षे नव्हे दशके घालवीत म्हाडा सिडकोच्या लॉटरी ची वाट पाहत बसतो . देशात सर्वाधिक जीएसटी,  इन्कमटॅक्स भरणाऱ्या राज्याच्या टक्क्यात आपला टक्का किती याचेही शोध घेणे महत्वाचे आहे .  एकंदरीत वर्ष भरातील सर्वच सण उत्सवात उद्योग धंद्याचे महत्व लक्षात घेऊन, मराठी युवकांनी आर्थिक सुबत्ता वाढविणे महत्वाचे आहे .   

 
विजयकुमार वाणी , पनवेल 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: