सत्तेच्या सारीपाटातील महत्वाचा वजीर अजित दादा !!
दिनांक ६ ऑक्टोबर २०२३ लोकसत्ता अंकातील "भाजपचे बालक पालक" अजितदादांच्या वर्चस्वाचे संपादकीय वाचले. संपादकीयात दादांचे वर्णन मुत्सद्दी, धोरणी , सावचित्त असेच आहे . २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीने अजितदादांनी चांगलाच धडा शिकून, काकांच्याच साहाय्याने त्रिकुटांच्या साथीत सत्ता हस्तगत केली . वर्ष दोन वर्षांच्या कालावधीत, अंतर्गत कुरुबुरी वाढल्यामुळे, सेनेच्या एकनाथ शिंदे यांनी अचानक निर्णय घेऊन बंड करून, मुख्यमंत्री पदाची संधी मिळविली . परंतु शिंदेंचे सदरचे बंड कोणताही अभ्यास न करता , विचारपूर्वक नियोजन न केल्यामुळे, परिणामी अपात्रतेचे कायम टांगलेले संकट ,स्वपक्षाचे कोणतेही ध्येयधोरण न आखल्यामुळे, भाजपचा वरचष्मा दबाव राहिल्यामुळे, आजच्या घडीला विस्कळीत, गोंधळात राहिलेले मुख्यमंत्री म्हणून वागताना दिसत आहेत .
याच काळात, भाजपला लोकसभेतील बलाबल वाढिण्यसाठी खंद्या नेतृत्वाची जोड हवी असताना , सत्तेपासून दूर राहिलेल्या, अजितदादांनी या अस्थिर, दोलायमान राजकीय परिस्तितीचा लाभ घेत , नियोजनपूर्वक चाल करीत , उपमुख्यमंत्री पदाची संधी पुन्हा मिळवून सत्तेवर मांड मिळविली . नव्या खेळात अजितदादांनी शिंदें, मुख्यमंत्री असून त्यांना गारद केलेच , पण भाजपच्या पक्ष शिस्तीला , कार्यक्षमतेवर खिंडार पाडत, सहा महिन्यात पुणे जिल्हाही हस्तगत केला . मेधा कुलकर्णींना नाराज करून आमदारकी मिळविल्यामुळे तसे चंद्रकांतदा दांना पुण्याने कधी आपलेसे केले नाही . त्यात कसब्याची जागा काँग्रेसने मिळविल्यामुळे चंदकांतदादांची अकार्यक्षमता सिद्ध झाली . केवळ अमितभाईंशी सलगी किती काळ वर्चस्वात ठेवेल, याचा निकाल पालकमंत्री पद, काढून घेण्यात आला . तसे पाहता पुणे जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे , एकूण २८ लोक प्रतिनिधींत राष्ट्रवादीचे २ लोकसभा , २ राज्यसभा आणि १० विधान सभा सदस्य आहेत . उर्वरित भाजप दुसऱ्या क्रमांकांवर आहे. राष्ट्रवादीची एवढी सद्दी असताना, चंद्रकांतदादांनी पालकमंत्री साठी आग्रही रहाणे भाजप पक्ष नेतृत्वालाही मान्य नसेल . या सत्तेच्या सारीपाटाच्या खेळात अजितदादा पुण्याच्या सत्तेच्या आडून मुख्यमंत्री पदाची माळ कधी ओढतील याचा पत्ता, सुगावा सुद्धा शिंदेंना लागणार नाही हेही तेवढेच खरे .
विजयकुमार वाणी , पनवेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा