गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३

लेख (१३०) २९ सप्टेंबर २०२३

 


इंडियन सायन्स काँग्रेसने लखनौ परिषद भरवावीच .  

दिनांक २८ सप्टेंबर २०२३ लोकसत्ता अंकातील "काँग्रेस मुक्तीचा आनंद " संपादकीयात, १०८ वर्षांच्या  इंडियन सायन्स काँग्रेस या संस्थेच्या विज्ञान परिषदेतून केंद्राच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याने अंग काढून घेतल्याने अप्रत्यक्षरीत्या सरकारवर, नेतृत्वावर टिका केली आहे .  ब्रिटिशांच्या काळात, संस्था उभारणे, चालविणे जिकरीचे होते, त्यात संशोधन, प्रगती विषयक संस्था उभारणे अवघडच असेल . त्या कारणाने तत्कालीन सरकारच्या साहाय्याने विज्ञान संशोधन क्षेत्रात कार्यासाठी  "इंसाकाँ" ची  स्थापन झाली असेल .  सरकारी सहाय्यता मुळे कार्य सहज सुलभतेस वाव मिळाल्यामुळे, स्वातंत्र्या नंतरही परंपरा कायम राहिली असेल ,   गेल्या सहा सात दशकांत भारताने संशोधन क्षेत्रात मानाचे स्थान प्राप्त केले आहे .  संशोधन क्षेत्रातही विविध शासकीय , खाजगी संस्थांचे प्रचंड कार्य सुरु आहे .  १९६२ मध्ये 'भारतीय अंतराळ संशोधन समिती ' स्थापून अवकाश संशोधनातील संघटित प्रयत्नांना सुरुवात झाली, याच संस्थेच्या १९६९ मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो ) ने अंतराळ तंत्रज्ञान संशोधनात उल्लेखनीय कामगिरी बजावत आजच्या घडीला सर्वोच्च जागतिक मानांकन मिळविले आहे .  या शिवाय , केंद्राने "आंतर 
विद्याशाखीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन" क्षेत्रातही बेहरामपूर , भोपाळ, कोलकाता ,  मोहाली , पुणे , तिरुअनंतपुरम , तिरुपती  येथे " आय आय एस इ आर " संस्थेची स्थापना करून प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांना विज्ञानातील संशोधनाद्वारे सक्षम करणे हे प्रयत्नांनी साध्य केले आहे.  डॉ सी व्ही रामन , डॉ भाभा , मेघनाद साहा , रामानुजन , डॉ कलाम , डॉ बोस , एच खुराणा , सी सुब्रमण्यम या आणि अनेक प्रतिभा संपन्न शास्त्रज्ञांच्या कर्तबगारीने जागतिक महासत्तांच्या मांदियाळीत संशोधन क्षेत्रात भारताचे स्थान उंचावले आहे .
भारतातील अनेक शास्त्रज्ञ भौतिक क्षेत्रात संशोधनातं कार्यरत 
आहेत.  केंद्राच्या संशोधन क्षेत्रात व्यतिरिक्त,  टि आय एफ आर , इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजि , आय आय टी , बॉम्बे , मद्रास,  इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च संस्थेत सर्वाधिक शास्त्रज्ञ कार्यरत आहेत . 
ब्रिटिशांच्या काळात संशोधनात प्रोत्साहन देण्यासाठी जर्नल्स, व्यवहार प्रकाशित करून विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी, इंडियन सायन्स काँग्रेस चा उपयोग,  अन्य संस्थांच्या मानाने कमी होत चालला असल्या असे ही कारण असू शकेल , या कारणाने केंद्राने सहभाग काढला असे वाटू शकते .  पण एका अर्थी ते चांगलेच झाले आहे.  लेखात म्हटल्याप्रमाणे आधुनिक युगातील संशोधनात पुराण काळातील कहाण्यांच्या आधारे गोष्टी सांगण्याचे व्यासपीठ कमी झाले आहे . चांद्रयानाच्या यशस्वी भ्रमणामुळे संशोधनास एक नवी दिशा मिळाली आहे, याचा आधार घेत ,आणि आता कोणत्याही सरकारी धोरणांचा अडथळा नसल्यामुळे, सध्या प्रगतीपथावर असलेल्या उत्तर प्रदेशातील खाजगी प्रायोजकांच्या साहाय्याने  इंडियन सायन्स काँग्रेसने लखनौ परिषद यशस्वी करण्यास हरकत नसावी . 


विजयकुमार वाणी , पनवेल .  

मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३




१५ सप्टेंबर २०२३ रोजी, लोकसत्ता प्रायोजित पनवेल महानगरपालिका "शहरभान" कार्यक्रम , फडके नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता.  मनपा आयुक्तांनी मनपा कार्याविषयी संपूर्ण माहिती देऊन, दर्जेदार शहर उभारणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.  आयुक्तांच्या भाषणानंतर प्रश्नोत्तरे भागात , मी प्रश्न विचारला होता.
प्रत्येक शहराला चेहरा असतो आणि एसटी बस डेपो आणि रेल्वे स्टेशन इथूनच शहराची सुरुवात होते.  परंतु या दोन्ही केंद्र आणि राज्य शासनाचे दोन्ही विभाग अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत. मनपा आयुक्त यांच्याशी संपर्क करून स्वच्छ आणि सुंदर परिसर करून घ्यावा.  यावर मनपा आयुक्तांनी दोन्हीही परिसर स्वच्छ योजने अंतर्गत घेतले असून, येत्या तीन महिन्यात बदल दिसून येतील असे सांगितले.
                                        ------


लेख (१२९) २७ सप्टेंबर २०२३

 


(१) 

निसर्गास जबाबदार म्हणून सुटका करून घेणे योग्य नाही .   

महोदय , २६ सप्टेंबर २०२३ मटा अंकातील, अल्प काळातील धुवांधार पावसाने उडविलेला हाहाकार, याचे वर्णन  "नागपुरी दैना "  संपादकीयात  वाचले.  राज्याचा विचार केला असता ,  क्षेत्रीय  नगर नियोजन अधिनियम कायदा, रिजनल प्लॅन, स्थानिक वैधानिक महामंडळे,  मेगासिटीज , स्मार्टसिटीज , अशा अनेक योजनांचे नियोजन केले पण ते प्रभावीपणे अंमलात आले नाही .  शहर नियोजन, स्थापत्य अभियांत्रिकी , वास्तुशास्त्र ,  राजकीय इच्छाशक्ती आणि लोकसहभागाचा समावेश,  यावर सारे गणित  अवलंबून आहे . शहरांचे बदल लक्षात घेता , अद्ययावत नकाशे तयार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर , वर्तमान गरज पूर्ण करताना, पुढील पिढ्यांच्या क्षमतेशी तडजोड न करता नियोजन करणे ,सामाजिक चळवळ निर्माण होऊन, पुरेशी स्वच्छता ,  वाहतूक व्यवस्था,  सुविधा , आर्थिक प्रगतीचा मागोवा , पर्यावरणीय संवेदशीलता , सौंदर्यविषयक धोरण, खाजगी क्षेत्राचा प्रभाव आणि राजकीय विचारांपासून दूर, या साऱ्यांचा विचार प्रतीक्रीयेतून मास्टर प्लॅन तयार होणे आवश्यक आहे . शहरांच्या सरंचनेत, व्यवस्थेत, कार्यक्षमता वाढविण्याची गरज धोरण निर्मात्यांना जाणविली नाही .  केवळ वाढलेल्या रहिवाशी क्षेत्राला सरंक्षित कसे करायचे, मतपेढी कशी वाढवायची याचे अप्रत्यक्षरीत्या निर्धारण केले , यात मूळ शहराच्या गाभ्याचे मरण कधी झाले याचा सुगावा न लागल्यामुळे बकालपणा , भोंगळपणा , बेदरकारपणा उकिरड्यांच्या रूपात प्रतींबिंबित होऊ लागला . अनेक पालिकांमध्ये  कर्मचारी, अधिकाऱ्यांची  कमतरता काँट्रॅक्ट,  प्रतिनियुक्तीत कशी बशी ढकलली जात आहे , ज्यांना शहरांशी काहीही देणे घेणे नसते .  प्रादेशिक मंडळे , सचिवालयातील जबाबदार अधिकारी वर्ग , वरचेवर होणाऱ्या सत्ताबदलास कंटाळले आहेत .  कधी धोरण लकवा  तर कधी धोरणांचा सुळसुळाट, अशा  परिस्थतीत काम करावे लागत असल्यामुळे, अकार्यक्षमता निर्माण होत आहे .  अशा अनेक घटनांनी, बेजबाबदार धोरणकर्त्यांनी राज्यातील प्रत्येक शहराची , तालुक्याची , गावाची दुर्दशा मांडलेली आहे , परिणामी , निसर्गास जबाबदार म्हणून सुटका करून घेणे योग्य नाही .   

विजयकुमार वाणी , पनवेल 




(२) 

शहरे आणि विकास त्या ऐवजी म्हणा " जुने द्यावे मरणालागुनी जाळुनी किंवा पुरुनी टाका सादत न एक्या ठायी ठाका "  

१८ सप्टेंबर २०२३ लोकसत्ता अंकातील संपादकीय  "भंगती शहरे, दुभंगता विकास !"  वाचले.  जगभरात गेल्या दोन शतकाहूनही अधिक  विशेषतः अमेरिका , युरोपातील देशांमध्ये  "शहर नियोजन"  बऱ्याच अंशी स्थानिक आर्थिक आणि पर्यावरणीय गरजांवर आधारित विविध पद्धतीने राबविले जाते .  निसर्गाचा संतुलित विकास,  ग्रामीण भागात विकास , प्रभावी वाहतूक व्यवस्था, जमिनीचा वापर ( विकासात्मक आणि पर्यावरणातील क्षेत्र विकास)  हे सर्व राष्ट्रीय, क्षेत्रीय आणि स्थानिक पातळीवर ठरविले जाते .  परिणामी परदेशातील असंख्य शहरे नियोजित, शाश्वत विकासाच्या प्रगतीपथावर आहेत . 

भारतातही  १९६० पासून क्षेत्रीय नियोजनाची गरज लक्षात घेता देशाच्या प्रमुख महानगरात क्षेत्रीय योजना मंडळांची स्थापना करण्यात आली .  देशातील पहिला क्षेत्रीय आणि नगर नियोजन अधिनियम कायदा महाराष्ट्र राज्यात १९६६ आणि बॉम्बे रिजनल प्लॅन १९७० मध्ये  करण्यात आले .  याच धर्तीवर, स्थानिक वैधानिक महामंडळे,  मेगासिटीज , स्मार्टसिटीज , आंतरराज्य क्षेत्र , घाट प्रदेश , अशा अनेक योजनांचे नियोजन केले पण ते प्रभावीपणे अंमलात आले नाही .   शहर नियोजन, स्थापत्य अभियांत्रिकी , वास्तुशास्त्र , सामाजिक, राजकीय चिंतां, राजकीय इच्छाशक्ती आणि लोकसहभागाचा समावेश आणि महत्वाचे शिस्त यावर अवलंबून आहे .  नियोजन हे  खुल्या जमिनीचा विकास , विद्यमान भागांचे पुनरुज्जीवन या दोन्ही गोष्टींशी संबंधित आहे .  स्थानिक पातळीवरील जुने दस्तऐवज, संकलन , विश्लेषण , रचना , धोरणात्मक विचार , या सर्वांचा  सार्वजनिक वापर याचा विचार होणे आवश्यक आहे .  शहरांचे बदल लक्षात घेता , अद्ययावत नकाशे तयार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर , वर्तमान गरज पूर्ण करताना, पुढील पिढ्यांच्या क्षमतेशी तडजोड न करता नियोजन करणे .  सामाजिक चळवळ निर्माण होऊन, पुरेशी स्वच्छता ,  वाहतूक व्यवस्था, सुविधा , आर्थिक प्रगतीचा मागोवा , पर्यावरणीय संवेदशीलता , सौंदर्यविषयक धोरण, खाजगी क्षेत्राचा प्रभाव आणि राजकीय विचारांपासून दूर, या साऱ्यांचा विचार प्रतीक्रीयेतून मास्टर प्लॅन तयार होणे आवश्यक आहे .  

आज देशात विशेषतः महाराष्ट्र राज्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून ज्या शहरांचा विशेष नामोल्लेख झाला तीच शहरे थोड्या फार फरकाने अस्तित्वासाठी झगडत आहेत .  फार थोडी नवीन शहरे उदयास आलीत, उर्वरित प्रमुख शहरांच्या आसपास विखुरलेल्या छोट्या छोट्या गावांचे नागरीकरण होऊन जुळी शहरे निर्माण होत गेलीत .  प्रमुख शहरात औद्योगिककरणांचा झपाट्याने विस्ताराने , रहिवासी भागांची गरज वाढू लागल्याने,  औद्योगिक राखीव क्षेत्रावर अतिक्रमणे होऊन रहिवासी विभाग बकालपणे वाढत गेला .   मूळ शहराचा ढाचा, तोच राहून , आसपासचा भाग सुटलेल्या अवयवागत फुगू लागला आहे .  शहरांच्या सरंचनेत, व्यवस्थेत, कार्यक्षमता वाढविण्याची गरज धोरण निर्मात्यांना जाणविली नाही .  केवळ वाढलेल्या रहिवाशी क्षेत्राला सरंक्षित कसे करायचे, मतपेढी कशी वाढवायची याचे अप्रत्यक्षरीत्या निर्धारण केले , यात मूळ शहराच्या गाभ्याचे मरण कधी झाले याचा सुगावा न लागल्यामुळे बकालपणा , भोंगळपणा , बेदरकारपणा उकिरड्यांच्या रूपात प्रतींबिंबित होऊ लागला .  जीएसटी मुळे आधीच बाजार समित्यांची कर वसुली बंद झाली.  पूर्वी आर्थिक स्थरानुसार रहिवास राहिल्यामुळे, विभागांची वर्गवारी करून मालमत्ता कर आकारला जायचा, जे पालिकांचे उत्पन्नाचे मोठे साधन होते , पण आजच्या परिस्थतीत  शासकीय योजनांचे धोरण , पुर्नविकास धोरण,   अतिक्रमणे, या ढिसाळ कारभारामुळे मालमत्ता कर आकारणीत बट्ट्याबोळ होऊन , पालिकांच्या तिजोरीवर नकळत परिणाम झाला .  कमी क्षेत्रफळा वरील जागेत , जुन्या बंद पडलेल्या कारखान्यांच्या  जागेत , जुन्या चाळींच्या जागेत, वाढीव एफएसआय, टिडीआर घेऊन, खाजगी विकासकांनी बक्कळ आर्थिक उलाढाल केली, परिणामी उंच मजल्यांच्या इमारती उभ्या राहिल्यामुळे रहिवासी क्षेत्रांची प्रचंड वाढ होऊन, पिण्याचे पाणी, उंच सखल भागामुळे मलनिःस्सारणाच्या प्रवाहातील अडचणी , दूरवर असलेले बंद स्थितीत असलेले सिवेज प्लॅन्ट , अनुदान घेऊन बनविलेले पण बंद पडलेले बायो गॅस सयंत्र या साऱ्यांच्या परिणामी अस्वच्छ शहर होण्यात मोठा हात आहे .  पुर्नविकासाच्या नावाखाली , छोट्याच्या जागेत, अरुंद गल्लीत बोळात , दोनशे बिऱ्हाडांची टोलेजंग इमारत उभी राहते , परिणामी त्या कॉम्प्लेक्स मधून पडणारी दुचाकी , चार चाकी , सामानाची ने आण  करणाऱ्या मालगाड्या , अशा असंख्य वाहनांच्या रांगा गल्ली बोळापासून चौकापर्यंत प्रत्येक शहरात दिवस रात्र दिसत आहेत .  सणासुदी तर कर्कश्श हॉर्ननी पादचाऱ्यांच्या कानाचे पडदे फाटतील एवढे ध्वनी प्रदूषण असते .  गल्ली बोळातील , मोठ्या रस्त्यांवरील फूट पाथ तर दुकानांना, फेरीवाल्याना आंदण दिलेले आहेत .  अनेक पालिकांमध्ये  कर्मचारी, अधिकाऱ्यांची  कमतरता काँट्रॅक्ट,  प्रतिनियुक्तीत कशी बशी ढकलली जात आहे , ज्यांना शहरांशी काहीही देणे घेणे नसते .  प्रादेशिक मंडळे , सचिवालयातील जबाबदार अधिकारी वर्ग , वरचेवर होणाऱ्या सत्ताबदलास कंटाळलेले आहेत .  कधी धोरण लकवा  तर कधी धोरणांचा सुळसुळाट अशा  परिस्थतीत काम करावे लागत असल्यामुळे, अकार्यक्षमता निर्माण होत आहे .  अशा अनेक घटनांनी, बेजबाबदार धोरणकर्त्यांनी राज्यातील प्रत्येक शहराची , तालुक्याची , गावाची दुर्दशा मांडलेली आहे .  या स्थितीचा विचार न करणाऱ्या या दृष्टीहीन शासनकर्त्यांच्या तोंडी हे तर येत नसेल ना  " जुने द्यावे मरणालागुनी जाळुनी किंवा पुरुनी टाका सादत न एक्या ठायी ठाका "  या कविवर्य केशवसुतांच्या ओळींचीही विटंबना मांडण्याची शक्यता नाकारता येत नाही .  


विजयकुमार वाणी , पनवेल 


शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३

लेख (१२८) २४ सप्टेंबर २०२३

 


"शासनाच्या दरवर्षीच्या अर्थ संकल्पाचे प्रत्येक महिन्यास ऑडिट व्हावे ." 


महोदय, दिनांक २३ सप्टेंबर २०२३ लोकसत्ता अंकातील अन्यथा सदरातील  " मग सरकार काय करते ? "  स्तंभ लेख वाचला .  प्रस्तुत लेखात शासनाच्या विविध खात्यातील,  निधीतील कमतरते मुळे सोयी सुविधांची असलेली वानवा यावर प्रकाश टाकला आहे . राज्याचा स्वतःचा अर्थसंकल्प सहा लक्ष कोटींचा , त्यात ३६ जिल्हा परिषद, २९ महापालिका , २२५ नगरपरिषद , यांचा उत्पन्नांच्या स्रोतांवर आधारित प्रत्येकाचा अर्थसंकल्प.  या साऱ्या निधीतून विविध खात्यांच्या मागण्या , प्रकल्प , शेती , पायाभूत सुविधा , उद्योग , आरोग्य , शिक्षण ,आर्थिक दुर्बल घटक या सर्वांचा प्रामुख्याने विचार केला जातो.   दरवर्षी सादर होणाऱ्या अर्थ संकल्पाचे निधी वितरण , त्याचा प्रत्यक्ष विनियोग कशा प्रकारे होतो, याचे लेखा परीक्षण वैगेरे नियमित होणे आवश्यक आहे . आधीच्या निधीच्या विनियोगाचे लेखा परीक्षण सादर केल्याशिवाय पुढील निधीचे वाटप होऊ नये, असे निर्बंध घातल्यास आर्थिक शिस्त निर्माण होईल.  सामान्यांच्या भरलेल्या कारांवरच शासन कारभार चालतो .
   
या अंतर्गत एक सूचना करावीशी वाटते .  "अर्थ संकल्प २०२३-२४ - लेखाजोगा (ऑडिट ) " अशी अशासकीय समिती राज्यपालांच्या अध्यक्षतेत गठीत करावी.  समितीत राज्यातल्या सर्व विद्यापीठांचे 
कुलगुरू , अग्रगण्य मराठी दैनिकांचे संपादक , राज्यातल्या राष्ट्रीयकृत बँकांचे प्रमुख, सर्वच जिल्ह्यातील एक प्रथितयश सी ए, यांच्या समावेशाने या समितीची मासिक , द्वैमासिक बैठक बोलावून सर्वच मुख्य बाबी, गेल्या वर्षीची तूट , चालू वर्षाचा निधी , आता पर्यंत झालेला खर्च , मिळालेले उत्पन्न , याची शासनाकडून माहिती घेऊन, परामर्श घेण्यात यावा .  अशा अभ्यासाने शासनालाही पारदर्शी ऑडिट होऊन, धाक निर्माण होऊन , घोषणा केल्याप्रमाणे निधी पुरवावा लागेल किंवा पुढील अर्थ संकल्प मांडताना विचार करावा लागेल.  
तसेच सर्वाधिक जीएसटी, इन्कम टॅक्स भरण्यात राज्याचा प्रथम क्रमांक आहे.  साहजिकच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या , मोठे उद्योगधंदे,  यांच्याकडून "सीएसआर"  निधी निश्चितच मोठ्या रकमेचा असतो.  शासनाने , मध्यवर्ती   "सीएसआर विभाग"  स्थापून  सीएसआर फंडातून मिळालेला निधी एकत्रित करून, प्रत्येक खात्यास,  जिल्ह्यास,  समसमान वाटप करावे .  राज्यपालांच्या समितीमुळे शासनाच्या अर्थ संकल्पास लागणारी शिस्त तसेच सामान वाटपामुळे मिळणार सीएसआर निधी,  परिणामी खात्यांमध्ये , जिल्ह्यांमध्ये पन्नास टक्के सुधारणांना वाव मिळेल आणि "अन्यथा लेखात " प्रस्तुत केल्याप्रमाणे सुविधांची उपलब्धता होऊन, वानवा थांबेल.  एक लक्ष कोटी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य महाराष्ट्र येत्या पाच वर्षात गाठणारच आहे,  याला  अनुसरूनच २०२४ ते २०२९ या पाच वर्षात येणाऱ्या सरकारने असे नियोजन केल्यास आदर्श अर्थ व्यवस्था निर्माण होईल .   हा एक छोटासा प्रयोग लोकसत्ता संपादकांच्या प्रयत्नाने होण्यास हरकत नसावी.


विजयकुमार वाणी , पनवेल   

गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३

लेख (१२७) २१ सप्टें २०२३

  "सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिक्त जागा चिंताजनक विषय " 


२१ सप्टेंबर २०२३ अंकातील, मटा विशेष "मेकॅनिकल, सिव्हिल इंजिनिअरिंग ओस "  वृत्तात, दिड लक्ष अभियांत्रिकी प्रवेश खुले असताना मेकॅनिकल, सिव्हिल या कोअर अभ्यासक्रमाच्या, तब्ब्ल चाळीस हजार जागा रिक्त आहेत, असे विदारक सत्य मांडले आहे .  दोन तीन दशकांपूर्वी सिव्हिल इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या गुणांवर प्रवेश मिळणाऱ्या कोअर ब्रँच म्हणून  गणल्या जात .  परंतु कॉम्प्युटर, मॅनेजमेंट क्षेत्रातील प्रगतीने या तिन्ही शाखा आता इतिहास जमा होऊ लागल्यात .  १९९० पर्यंत मुंबई ठाणे, पुणे या तिन्ही जिल्ह्यात, ऑटोमोबाईल, 
इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल च्या हजारोंच्या संख्येने कंपन्या होत्या .  पॉलिटेक्निक मधून पदविका धारण केलेल्या युवकांसाठी नोकरीचे हे माहेरघर होते .  आधुनिक क्षेत्रातील कॉम्प्युटर प्रगतीने ,  जागांच्या वाढत्या दराने , कारखाने बंद पडत गेले परिणामी रोजगार संधीचे मार्ग खुंटत गेलेत.  वृत्तात म्हटल्याप्रमाणे, अभियांत्रिकी प्रवेशासाठी 
विद्यार्थ्यांचा कल कॉम्प्युटर कडे जास्तच आहे, परिणामी  या शाखा मागे पडू लागल्यात .  परंतु सिव्हिल शाखेच्या जागा रिक्त राहण्याचे कोडे उलगडलेले नाही . कारण , बंद पडलेल्या गिरण्या, कारखाने , जुन्या चाळींचे पुनर्वसन आदी क्षेत्रात  टोलेजंग इमारतींचे बांधकाम, वाहतुकीचे रस्त्यांचे जाळे , फ्लाय ओव्हर्स , मेट्रो , मोनो रेल वैगेरे साठी प्रचंड प्रमाणावर बांधकामे आजतागायत सुरु आहेत , जिथे सिव्हिल अभियांत्रिकी शाखेच्याच विद्यार्थ्यांचे काम असते .  भविष्यात अजूनही बांधकामे अपेक्षित असताना देखील,  सिव्हिल इंजिनिअरिंग च्या जागा रिक्त राहणे धोक्याचे ठरू शकते . आय टी क्षेत्रातील मिळणारे वेतन कार्यालयीन कामकाजातील वेळ , बढतीच्या , परदेशात काम करण्याच्या संधी  अशा विविध कारणांनी सिव्हिल इंजिनिअरिंग कडे जाण्याचे टाळले जाणे असू शकते .  पायाभूत सुविधा, स्टार्ट अप, सेवा, कृषी क्षेत्रातील  तंत्रज्ञानाचा वापर याच्या बळावर एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था नेण्याची स्वप्ने पाहणाऱ्या राज्याची, शिक्षणाची स्थिती राज्यकर्ते, प्रशासनाला अवगत नसावी का ?  एकूण चौदा लक्ष विद्यार्थी बारावीची परीक्षेतील,  ८५ % उत्तीर्णांना, पदविका , पदवी. पदव्युत्तर शिक्षणानंतर योग्य रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचे शासनाचे कोणतेही धोरण अथवा नियोजन नाही. अभियांत्रिकी, व्यवस्थापन शाखेतील मोजक्याच कॉलेजातील मोजक्याच विद्यार्थ्यांना आय टी क्षेत्र , सेवा क्षेत्र कँपस माध्यमातून नोकरी मिळते.  अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कॉम्प्युटर लँग्वेजेस प्रोग्रामिंग वैगेरे आत्मसात करून सुद्धा ट्रेनी , अप्रेंटिसशिप मिळविण्यासाठी युवकांची पंचविशी खर्ची होते .  उर्वरित पन्नास टक्के स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत तिशी गाठतात . उर्वरित लाखाच्या वर पदवीधर युवक अक्षरशः रोजगार संधीची वाट पहात असतात . वर्षानुवर्षे याचे प्रमाण वाढतच आहे .  मात्र शासनाने या वृत्ताची दाखल घेणे आवश्यक असून,  भविष्यात सिव्हिल इंजिनिअर मिळणे कठीण होऊन बांधकाम क्षेत्रावर प्रचंड परिणाम होऊ शकतो .  


विजयकुमार वाणी , पनवेल  



रविवार, १७ सप्टेंबर, २०२३

लेख (१२६) १८ सप्टेंबर २०२३



(१)

शासनाने कोकणवासीयांचे २०२४ गणपती उत्सवाचे नियोजन आतापासूनच करावे.

१७ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र टाइम्स अंकातील पहिल्या पानावरील "कोकणात गणपतीस जाताना "  वृत्त वाचले.  गेली अनेक दशके बहुतांशी कोकणवासीय गणपती निमित्ते कोकणात जात आहेत. पूर्वी केवळ एसटी द्वारे आणि १९९८ नंतर  कोकण रेल्वेची सुविधा, सोबतच स्वतःची वाहने आणि खाजगी ट्रॅव्हल्स प्रवासी साधने उपलब्ध झालीत.  अर्थातच या साऱ्यांचा परिणाम प्रवाशांच्या वाढीवर झाला.  तीन जिल्ह्यातील मिळून दोन अडीच हजार गावातील पाच ते सहा लक्ष ग्रामस्थ चतुर्थीच्या फक्त एक ते दोन दिवस आधी एकदमच प्रवासाला निघाल्यामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीवर प्रचंड ताण पडतो.  यावर उपाय म्हणून, फक्त आणि फक्त कोकण कोकणवासीयांसाठीच प्रत्येक तासाला एक या दराने सोळा डब्यांच्या चोवीस विशेष एक्स्प्रेस, सोडल्यास , एका एक्स्प्रेस मध्ये सरासरी पंधराशे प्रवासी धरल्यास चोवीस एक्स्प्रेसने छत्तीस हजार प्रवासी , तीन दिवसात लाखावर प्रवासी जातील.  रोडच्या प्रवासाचे, मिनिटाला एक याप्रमाणे चोवीस तासांच्या अंदाजे पंधराशे एसटीच्या प्रवासात सदूसष्ट हजार , तीन दिवसात दोन लक्ष प्रवासी जावू शकतात.   दिवसाला पाच हजार स्वतःच्या चार/सात सिटर ने गेल्यास पंचवीस हजार प्रवासी तीन दिवसात पंचाहत्तर प्रवासी. म्हणजे तीन दिवसात रेल्वेचे एक लक्ष आणि एसटीचे दोन लक्ष आणि चारचाकिंचे पंचाहत्तर हजार, असे एकूण चार लक्ष प्रवासी जावू शकतात.  ७ सप्टेंबर २०२४ रोजी पुढील वर्षी होणाऱ्या श्री आगमनाचे ४,५ आणि ६ सप्टेंबर २०२४ रोजींचे नियोजन , दिवसाला चोवीस रेल्वे, पंधराशे एसटी, पाच हजार चारचाकी वाहने असे करावे.  राज्य प्रशासनाने पालक मंत्रांच्या देखरेखीखाली मुख्य सचिव, तिन्ही जिल्हाधिकारी , सर्व पक्षीय खासदार, आमदार यांची संयुक्त समिती गठीत करून, रेल्वे, रस्ते प्रवासा सोबत, जलमार्गाने, हवाई मार्गाने प्रवासी वाहतूक होईल.  आतापासूनच रेल्वे बोर्डास अर्ज करून फक्त मुंबई मंडळासच आरक्षण करता यावे असे म्हणणे मांडावे.  ज्या कोकण वासीयांना प्रवास करावयाचा आहे, त्यांना क्यू आर कोड देण्यात यावा, त्यांनाच फक्त रेल्वे, एस टी आरक्षण देण्यात यावे.  सेच एस टी महामंडळ, रस्ते दुरुस्ती मंडळ, वाहतूक नियंत्रण विभाग यांना आदेश करून , मे , जून २०२४ पूर्वीच अंतिम आराखडा जनतेस जाहीर करावा. श्री गणराया शासनाला बुध्दी दे आणि कोकण वासियांचा खडतर प्रवास थोडा तरी सुखकर होऊ दे.


विजयकुमार वाणी, पनवेल.

(२)

शासनाने कोकणवासीयांचे २०२४ गणपती उत्सवाचे नियोजन आतापासूनच करावे.

१७ सप्टेंबर २०२३ लोकसत्ता अंकातील पहिल्या पानावरील "कोकणची बिकट वाट"  वृत्त वाचले.  गेली अनेक दशके बहुतांशी कोकणवासीय गणपती निमित्ते कोकणात जात आहेत. पूर्वी केवळ एसटी द्वारे आणि १९९८ नंतर  कोकण रेल्वेची सुविधा, सोबतच स्वतःची वाहने आणि खाजगी ट्रॅव्हल्स प्रवासी साधने उपलब्ध झालीत.  अर्थातच या साऱ्यांचा परिणाम प्रवाशांच्या वाढीवर झाला.  तीन जिल्ह्यातील मिळून दोन अडीच हजार गावातील पाच ते सहा लक्ष ग्रामस्थ चतुर्थीच्या फक्त एक ते दोन दिवस आधी एकदमच प्रवासाला निघाल्यामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीवर प्रचंड ताण पडतो. यावर उपाय म्हणून, ७ सप्टेंबर २०२४ रोजी पुढील वर्षी होणाऱ्या श्री आगमनाचे ४,५ आणि ६ सप्टेंबर २०२४ रोजींचे नियोजन , राज्य प्रशासनाने पालक मंत्रांच्या देखरेखीखाली मुख्य सचिव, तिन्ही जिल्हाधिकारी , सर्व पक्षीय खासदार, आमदार यांची संयुक्त समिती गठीत करून, रेल्वे, रस्ते प्रवासा सोबत, जलमार्गाने, हवाई मार्गाने जास्तीत जास्त प्रवासी वाहतूक होईल याचा अभ्यास करावा.  आतापासूनच रेल्वे बोर्डास अर्ज करून, लागोपाठ तीन दिवस,  २४ तासात २४ विशेष एक्स्प्रेस , मुंबई विभागातून सोडण्यात याव्यात.  फक्त मुंबई मंडळासच आरक्षण करता यावे असे म्हणणे मांडावे.  ज्या कोकण वासीयांना प्रवास करावयाचा आहे, त्यांना क्यू आर कोड देण्यात यावा, त्यांनाच फक्त रेल्वे, एस टी आरक्षण देण्यात यावे.  तसेच एसटी महामंडळ, रस्ते दुरुस्ती मंडळ, वाहतूक नियंत्रण विभाग यांना आदेश करून , मे , जून २०२४ पूर्वीच अंतिम आराखडा जनतेस जाहीर करावा. श्री गणराया शासनाला बुध्दी दे आणि कोकण वासियांचा खडतर प्रवास थोडा तरी सुखकर होऊ दे.

विजयकुमार वाणी,  पनवेल 


बुधवार, १३ सप्टेंबर, २०२३

लेख (१२५) १५ सप्टेंबर २०२३


पर्यायी इंधनाचा वापर मंत्री महोदयांच्या दमदार वृत्तीनेच शक्य आहे . 

लोकसत्ता दिनांक १४ संप्टेंबर २०२३  "नितिनभौ जरा दमाने " संपादकीय वाचले . श्री गडकरी यांच्या पर्यायी इंधनाच्या प्रयत्नांसंबधी मीमांसा करताना सक्षम पर्याय पर्यावणपूरक इंधन येईपर्यंत पेट्रोल डिझेलच्या गरजे विषयी भाष्य केले आहे.   
दिवसेंदिवस ऑटोमोबाईल क्षेत्रातील आधुनिकतेमुळे पेट्रोल डिझेल यांच्या इंधन कार्यक्षमतेला अनुसरून, पर्यावरणपूरक पर्यायाचा विचार करून, पेट्रोल डिझेलच्या वाहनांच्या किमतींपेक्षा,  वाढीव दरात 
पार्टली सीएनजी,  पार्टली हायब्रीड (बॅटरी ऑपेरेटेड), पूर्णतः इलेक्ट्रिक अशा विविध प्रकारच्या वाहनांची निर्मिती होत आहे .  पर्यायी इंधनामध्ये इलेक्ट्रिक  (बॅटरी ऑपेरेटेड) चा उपयोग करून वाहने निर्मिती सुरु झाली आहे.  जीवाश्म इंधन , जैवइंधन ,  हायड्रोजन यांचा वाहनांमधील वापराची प्रक्रिया अद्यापही फलदायी ठरलेली दिसत नसली तरी, त्यातही संशोधन सुरु आहे .  अन्य देशांच्या मानाने भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेने वाहनांना लागणारे इंधन, एकंदरीत महिन्यास बारा ते तेरा अब्ज डॉलर्स खर्चकरून दिड लक्ष बॅरल्सची आयात केली जाते .  या साऱ्या घटनांचा, घटकांचा विचार करूनच रस्ते वाहतूक केंद्रीय मंत्री मा श्री गडकरी यांचे पर्यायी इंधनासंबंधी प्रयोग संशोधन सुरु आहे, हे खरोखरच प्रशंसनीय आहे . पर्यायी इंधनाच्या बाबतीत आग्रही भूमिका घेण्या मागे दूरदृष्टी , इंधनावर मोठ्या प्रमाणात आयात खर्चाची बचत  करण्याचा  व्यापक विचार असू शकतो .  दूरचित्रवाणीमुळे आकाशवाणी , ऑनलाईन मुळे छापील वर्तमानपत्रे , मेट्रोमुळे रस्त्यावरील वाहतूक याच्यावर परिणाम झाला नाही , असे म्हणणे असले तरी , नव्वदच्या दशकातील मोबाईल क्रांतीमुळे लँडलाईन संचांवर प्रचंड परिणाम झाल्याचे दिसून आले, श्रीमंतांच्या हातातील मोबाईल संच आज सर्व सामान्यांच्या हातातील झालेला आहे .  त्याच प्रमाणे आज आर्थिक आवाक्याच्या बाहेर असणाऱ्या वीजेवर चालणाऱ्या गाड्या , त्यांच्या चार्जिंग साठी लागणार वेळ , या साऱ्यात सुटसुटीत बदल होऊ शकतो आणि येत्या दहा वर्षात वाजवी किंमतीतही मिळू लागल्यास सर्व सामान्यांना पेट्रोल डिझेल बंद नाही झाले तरी परवडण्याऱ्याना इलेक्ट्रिक गाडीचा पर्याय उपलब्ध झाल्यास पेट्रोल डिझेल इंधन बचतीचा मार्ग मिळू शकतो .   नितिनभौ यांच्या दमदार वृत्तीनेच दृष्ट लागणाऱ्या रस्त्यांची निर्मिती झाली त्याप्रमाणेच दमाने घेतल्यास पर्यायी इंधनाचा मार्गही खुला होण्यास हरकत नसावी.  


विजयकुमार वाणी , पनवेल 

मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३

लेख (१२४) १३ सप्टेंबर २०२३



बैठकांचे सत्र नको नियोजन हवे !


सामना दिनांक १३ सप्टेंबर २०२३ संपादकीय " खोकी खर्ची पडतील काय? शेतकऱ्यांच्या आत्महत्या ! " वाचले.  लेखात शेतकऱ्यांच्या आत्महत्या , पावसाने ओढ दिल्याने पिकांवर पर्यायाने शेतकऱ्यावर झालेल्या परिणामांची मीमांसा केली आहे. सरकारवर टिकेचा आसूड ओढतानाच, चार गोष्टी पणं कराव्यात याची आठवण देखील केली आहे.  दिड ते पावणे दोन कोटी लोकसंख्या असलेल्या मराठवाड्यात जाऊन मंत्रिमंडळाची बैठक घेण्यापेक्षा, मराठवाड्यातील ८ जिल्ह्यातील ७६ तालुक्यांतील एकूण शेतकऱ्यांची संख्या, ओलिताखाली असलेली जमीन, बी बियाण्यांचे वाटप, पिण्याच्या पाण्याची स्थिती, जनावरांच्या चाऱ्याची गरज, आदी शेती पूरक गोष्टींची माहिती घेऊन या शेतकऱ्यांना तातडीची मदत, सहाय्य करून पूर्तता केल्यास लेखात म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण नक्कीच थांबू शकते.  मंत्रिमंडळ बैठक, दुष्काळ जाहीर झाल्यावर बांधावर जाणे,  अल्पसे पॅकेज जाहीर करणे, वैगेरे फाफट पसाऱ्यात न अडकता, गावागावांतून प्रत्येक शेतकऱ्याची नोंद घेऊन त्यास सहाय्य करावे, जेणेकरून दुर्लक्षित मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील आणि सरकारच्या पदरी थोडे तरी पुण्य जमा होईल.

विजयकुमार आप्पा वाणी, पनवेल.

लेख (१२३) १२ सप्टेंबर २०२३

 


पत्रकारिता लोकशाहीचा आधार  !!

दिनांक १२ सप्टेंबर २०२३, महाराष्ट्र टाइम्स  "नाही मी बोलत " संपादकीय वाचले .  समर्पक मथळा, वेगवेगळ्या संदर्भात देशाच्या पंतप्रधानांचे पत्रकारीते बद्दल असेलला आकस याचे योग्य वर्णन केले आहे.  विविध कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या माध्यमात विशेषतः टिव्ही , सोशल मीडियावर साधारणतः  सामान्य जनांना रोज, देशाचे पंतप्रधान कोणत्या न कोणत्या कार्यक्रमात दिसतातच . महिन्याला मन की बात सह , पंतप्रधानांची उपस्थिती असणारा प्रत्येक कार्यक्रम भव्य दिव्य नेत्रदीपक असतो , भारावून जावून , सहस्त्रावधी जनतेला त्यांच्या वक्तृत्वाच्या शैलीविषयी,  त्यांच्या कार्याविषयी विशेष आकर्षण निर्माण झालेले आहे .  परंतु देशाच्या पंतप्रधानांनी गेल्या दशकभरात एकही पत्रकार परिषद घेतली नाही, या तक्रारीत सुद्धा तथ्य आहे असे वाटते .  देशाच्या अर्थात आता विश्वाच्या उच्चस्थरीय नेत्याची मुलाखत घेणे , त्यांना प्रत्यक्ष बघणे , विविध प्रश्नांमधून त्यांचे वैयक्तिक मत , पक्षाचे मत , देशाचे मत विचारणे , यात पत्रकारितेचा कस , कसब दाखविण्याची संधी काँग्रेस कार्यकाळात मध्यम वयाच्या परंतु आता ज्येष्ठ असलेल्या पत्रकारांना नक्कीच बोचत असणार .  त्यांच्या अपेक्षा कधी पूर्ण होतील प्रत्यक्ष विश्वगुरूच जाणे .  पत्रकारितेने लोकशाही टिकविण्यात महत्वपूर्ण योगदान दिले आहे .  सत्ताधारी असोत किंवा विरोधक त्यांच्या निरंकुश आचार विचारांवर अंकुश ठेवण्याचे एक विश्वासार्ह शस्त्रास्त्र म्हणून वापरले आहे .  "नाही मी बोलत " या शब्दांनी सं मानापमानातील गीताची नक्कीच आठवण झाली.  " विनयहीन वदता नाथा नाही मी बोलत " . 


विजयकुमार वाणी , पनवेल 

शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०२३

लेख (१२२) १३ सप्टेंबर २०२३



(१)

आरक्षण आणि मानसिकता !

लोकसत्ता दिनांक १२ सप्टेंबर २०२३ चे संपादकीय " हे अपत्य कोणाचे ? आणि या आधीचे याच विषयावरील लेख
"संघ आणि आरक्षण" वाचले.  दोन्ही संपादकीय लेखात म्हटल्याप्रमाणे, बेरजेच्या राजकारणाचा भाग म्हणून आरक्षण मुद्द्याकडे पाहिले जाते.  काँग्रेसच्या काळातील आ
रक्षणच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष आणि आरएसएस पर्यायाने भाजपाचे जातपातीच्या आरक्षणातील रसाचे राजकारण सर्वश्रुत आहे.  स्वातंत्र्योत्तर काळानंतर विशेषतः गेल्या २५ वर्षांपासून, सर्वच जातीच्या, ज्ञाती समाजात स्थित्यंतरे झालीत,  शिक्षणाचे प्रमाण वाढल्यामुळे घरटी एकजण सरकारी, खाजगी, नोकरी व्यवसायात सामावला गेला, परिणामी कुटुंबाचा आर्थिक स्थरही रुंदावत गेला.  सरकारी नोकरीच्या पणं संधी वाढू लागल्यात.   पण तरीही कधी सत्ताधाऱ्यांनी तर कधी विरोधकांनी आरक्षण विषय पेटवित ठेवला. त्यासाठी दोन्हीही बाजू सकारात्मक राहिल्या नाहीत.


यावर उपाय म्हणून, राज्य शासनाने, आजच्या आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करताना, सन २००० ते २०२२ अखेर, बावीस वर्षात, आरक्षणाच्या माध्यमातून किती आणि कोणत्या वर्गवारीच्या उमेदवारांच्या नियुक्त्या केल्यात, याचे स्टेटस्टिकस् काढावे.  यामुळे वर्गवारीतील प्रत्येक जातीस किती न्याय मिळाला याचे चित्र स्पष्ट होईल.  लेखातील दुसरा महत्वाचा मुद्दा २०२१ पासून केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे होत नसलेल्या जातीनिहाय जनगणनेचा.  पण केवळ केंद्रावर न ढकलता , राज्य सरकारही जातीनिहाय जनगणना करू शकते याचे उत्तम उदाहरण बिहार, ज्यांनी हे करून दाखविले (आपले राज्यकर्ते फक्त जिरून दाखविल्याचा आविर्भावात जगत आहेत) .  अशा पद्धतीने पुढाकार घेऊन राज्याने त्वरित डिसेंबर २०२३ अखेरच्या आत, मोबाईल ॲपच्या माध्यमातून, नागरिकांकडून 
पूर्ण नाव, पत्ता,  पॅन, आधारकार्ड क्र, लिंग, वय, जात, उपजात, धर्म, शिक्षण, नोकरी,  व्यवसाय, वार्षिक उत्पन्न, आधीची आरक्षण सवलत, वैगेरे माहिती संकलित करून जातीनिहाय जनगणना करावी.  (हि माहिती त्वरित भरून देण्यासाठी जनगणना नियमानुसार सक्ती करावी, या माहितीचा उपयोग, निवडणुका, शासकीय योजना आदी कामांसाठी उपयुक्त होऊ शकते)

संकलित झालेल्या माहितीची  डिसेंबर २०२२ अखेर पर्यंत नियुक्त झालेल्या जातीनिहाय वर्गवारीची तुलना करावी, यातून प्रत्येक जातीची एकूण लोकसंख्या, या घडीला नोकरीसाठी गरज असलेल्यांची संख्या, रिक्त जागा उपलब्धतेची संख्या यांचे खरे स्वरूप सार्वजनिक पोर्टलवर जाहीर करावे, जेणेकरून कुणास किती आरक्षण मिळाले, भविष्यात मिळू शकेल याची नोंद घेऊनच, २०२४ नंतरचे उमेदवार स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागतील.  राज्याने पुढाकार घेऊन, तज्ञांकडून अधिक माहिती घेऊन आरक्षणाच्या नियमांत बदल करावा.  विशेषतः आर्थिक निकषांवरच आरक्षण देण्यात यावे.  सरळसेवा उच्चपदस्थ अधिकारी नियुक्तीनंतर त्याच्या कुटुंबीयांना आरक्षणाच्या लाभात बदल करण्यात यावा, वैगेरे वैगेरे.  शासनाच्या मानसिकतेत प्रश्न सोडविण्याची इच्छा हवी, अथवा ज्वलंत प्रश्न धगधगता ठेवणे हेच मर्म असू शकते.

विजयकुमार वाणी, पनवेल 

-----------

(२) 

आरक्षण आणि मानसिकता !


लोकसत्ता दिनांक ८ सप्टेंबर २०२३ संपादकीय "संघ आणि आरक्षण" वाचले.  प्रस्तुत लेखात संघाची, पर्यायाने भाजप आणि जनमानसाचा बघण्याचा दृष्टीकोन विस्तृत केले आहे.  लेखातील दुसरा महत्वाचा मुद्दा जनगणना आणि आरक्षण यांचे योग्य विश्लेषण केले आहे. यात संघाला महत्वाची आहे, ती दोन हजार वर्षांपासूनची जात सरंचना, जी आजतागायत आहे.  विषमता दूर करण्यासाठी सहस्त्र संतांनी प्रयत्न केलेत, परिस्थितीत तसूभर पणं फरक पडला नाही.  उलटपक्षी आरक्षणामुळे हा जातीयवाद जास्तच अधोरेखित झाला.  पहिल्या बाजूत शाळांमध्ये, वसाहतीत, प्रवासात, नोकरीत, संस्थांमध्ये, पहिल्या भेटीतील सवांदात नाव विचारले जाते, नावावरून विशेष बोध झाला नाही तर गाव विचारले जाते. नाव, आडनाव , गावावरून,  जाती , आहार, राहणीमान, बुदध्यांकाचा विचार झाल्यावरच संबंध प्रस्थापित होतात. जातपातीची खरी मानसिकता इथूनच सुरू होऊन त्याची विषवल्ली फोफावली जाते.  दुसऱ्या बाजूस, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा, नोकरीच्या स्पर्धात्मक परीक्षा, नोकरीतील सेवाज्येष्ठता नियमानुसार पदोन्नती यातील आरक्षणाच्या मुद्द्याने डावलले जाणे सामान्यांना जीवघेणे ठरते.  प्रस्तुत लेखात जातीनिहाय जनगणनेचा आग्रह धरण्यात आला आहे. नुकतीच बिहार राज्याची जातीनिहाय जनगणना पूर्ण झालेली आहे, त्याच धर्तीवर आधुनिक पद्धतीने मोबाईल ॲप द्वारा,  जनगणना करून, स्त्री पुरुष , वयोमान, साक्षरता, नोकरी , बेरोजगारी यांचे प्रमाण उपलब्ध होईल. ह्या डेटा चा उपयोग मुख्यतः आरक्षणाचा मुद्दा, जाती जमातीतील संख्येच्या अनुसार सुधारित सरंचना अंमलात आणून, प्रवेश, नियुक्ती, पदोन्नती, साठी वापरता येईल.  या मुद्द्यांत एक महत्वाचा प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा सुद्धा निर्दिष्ट करावासा वाटतो. फक्त नियोजित प्रकल्पापुरताच नियुक्तीसाठीच प्रकल्पग्रस्त दाखला वापरल्यावर तो रद्द करण्यात येतो. पदोन्नती साठी, अथवा निवृत्तीनंतर पाल्याला वापरता येत नाही,  पाल्य सर्वसाधारण वर्गात मोडला जातो.  सुधारित आरक्षण व्यवस्थेत याचा विचार व्हावा.  यासह, सर्वच जातींच्या रिक्त जागांवर मराठा समाजाला प्राधान्य दिल्यास सहस्रावधी उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रश्न सुटेल तेव्हा सुटेल, जी आर, वटहुकूम, यात अडकून न राहता,
शासनाच्या मानसिकतेत प्रश्न सोडविण्याची इच्छा हवी, अथवा ज्वलंत प्रश्न धगधगता ठेवणे हेच मर्म असू शकते.

विजयकुमार वाणी, पनवेल 

सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३

लेख (१२१) ५ सप्टेंबर २०२३.


आरक्षण राज्याचे अपयश का दुर्लक्ष !

दिनांक ४ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र टाइम्स अंकातील "महाराष्ट्र पेटवू नका " संपादकीय वाचले.  आरक्षणाची प्रत्यक्ष स्थिती, शासनाची कृती आणि समाजाच्या अपेक्षा याचे योग्य चित्रण प्रस्तुत लेखात केले आहे. यातील सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्र पेटवू नका, हे आहे.  राज्य स्थापने पासून ६० वर्षांच्या इतिहासात मराठा समाज गत ३० वर्षे सगळ्याच सरकार विरुद्ध आरक्षणाचा लढा देत आहे. पणं दुर्देवाने सगळ्याच सरकारांनी दुर्लक्ष करून पळवाट शोधली.  या पाठीमागे मोठे कट कारस्थान असण्याची शक्यता नाकारता येत नाही.  अनेक क्लृप्त्या लढविल्या पणं मार्ग काही मिळत नाही.  यात एक मार्ग काढता येऊ शकतो, गेल्या ६० वर्षात आरक्षण माध्यमातून जातीनिहाय टक्केवारीचे  सर्वेक्षण करावे. यात ज्या जातीतून पुरेसे,अपेक्षित संख्याबळ मिळत नसेल तर तो कोटा रिक्त न ठेवता, मराठा समाजाला देण्यात येण्याची सुरुवात करावी.  जेणेकरून मराठा समाजाला जातीनिहाय टक्केवारीत स्थान मिळण्यास सुरवात होईल.  न्यायालयीन लढाई, आयोग, वटहुकूम वैगेरे कामकाजात आतापर्यंत पंचवीस तीस वर्षांचा कालावधी लोटला आहे, त्यात मार्ग निघेल तेव्हा निघेल, त्या दरम्यान छोटासा प्रयोग करून बघावा. 


विजयकुमार वाणी, पनवेल.

शनिवार, २ सप्टेंबर, २०२३

लेख (१२०) २ सप्टेंबर २०२३


नैतिकेचा टिकाव कसा लागणार ?

दिनांक २ सप्टेंबर २०२३, लोकसत्ता अंकातील "नैतिकतेचे काय ? " संपादकीय वाचले . सदर लेखात,  शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांच्या समोरील आव्हाने आणि एकूण परिस्थितीचे विश्लेषण केले आहे . नैतिकता, समर्पण , त्याग, संयम , चिकाटी ,आदर्शव्रती ,चारित्र्यवान अशा विविध गुणांनी समृद्ध असणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक असे चित्र सामान्यपणे स्वातंत्र्यपूर्व , उत्तर काळात होत राहिले.  शक्यतो एकाच घराण्यात शिक्षकांची पिढी निर्माण होत राही, त्यांची शिक्षकांची किर्ती दूरवर असे . त्या काळात मर्यादित शिक्षणाची माध्यमे असल्यामुळे, उपलब्ध शिक्षकांच्या संख्येवर गरज पूर्ण होत असे.  पिढीजात , परंपरागत शिक्षकांच्या अंगी साहजिकच सारे नाही तरी बरेच गुण भिनलेले असत.  सत्तरीच्या दशकानंतर शिक्षण व्यवस्थेत बोर्डाच्या परीक्षेतील बदल , इंग्रजी भाषांच्या शाळांत वाढ , खाजगी शाळांना परवानगी , अशा अनेक बदलांमुळे शिक्षकांची वाढती गरज भासू लागली .  शिक्षक निर्मितीच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयां व्यतिरिक्त खाजगी अध्यापक विद्यालये निर्माण झालीत.  शासकीय विद्यालयात गुणवत्तेच्या आधारावर मिळणारा प्रवेश, खाजगी विद्यालयात सहज उपलब्ध होऊ लागला.  एकूणच अधिकच संख्येने शिक्षकांची निर्मिती होऊ लागल्यामुळे त्याचा परिणाम प्रत्यक्ष,अप्रत्यक्षरीत्या शिक्षकांच्या गुणवत्तेवर झाला . खाजगी शाळांनाही शासनाचे अनुदान प्राप्त होऊ लागल्याने आणि एकूणच प्रगतिशील, बाह्य, अंतर्गत स्वरूपामुळे खाजगी शाळांकडे विद्यार्थ्यांचा एवढा ओढा वाढला की , मोठ्या स्वरूपात देणगी देऊन विद्यार्थी प्रवेश घेऊ लागलेत.  संस्था , शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थी यांची संयुक्तरित्या प्रगती साधली.  दुसऱ्या बाजूस प्रचंड संख्येने विना अनुदान खाजगी शाळांना परवानगी दिल्याने , संस्था चालकांनी नफ्याच्या गुणोत्तरावर शिक्षकांना सुविधांशिवाय अत्यंत कमी पगारावर वापरून घेतात .   शासकीय, अनुदानित आणि खाजगी शाळांतील शिक्षकांच्या वेतनातील तफावत, दरी रुंदावत गेल्यामुळे त्याचे चौफेर परिणाम दिसू लागले .  या घडीला प्रचंड संख्येने अध्यापक विद्यालयातून पदवी घेतलेल्या उमेदवारांना सरकारी धोरणे, उदासीनता, प्रवृत्ती मुळे शिक्षकांच्या रिक्त जागेवरील नियुक्त्या रखडल्या आहेत .  उत्तीर्ण वेळी असलेले वय आणि नियुक्ती साठी दहा दहा वर्षे वाट पाहत राहिल्यामुळे शारीरिक, मानसिक परिणामांमुळे नियुक्त झाल्यावर शिकविण्याच्या शैलीवर परिणाम होणारच .  दुसऱ्या भागात ठराविक योग्यतेचे शिक्षक वगळता , उर्वरित मात्र, बदली ,पदोन्नती ,जवळची शाळा , पुरस्कार, समित्यांवर वर्णी , वरिष्ठांची मर्जी, या शिवाय सामाजिक ,सार्वजनिक , राजकीय क्षेत्रात क्रियाशील झाल्याने एकमेकांवर कुरघोडी करत आहेत . त्याचे असंख्य परिणाम शिक्षकांच्या गुणवत्तेवर, नैतिकतेवर वा अनेक गुणांवर होत आहे .  या आणि अनेक कारणांनीं  शिक्षण क्षेत्रातील बजबजपुरीचा खेळ खंडोबा झाल्याचे दिसत आहे .  या सर्वांपुढे नैतिकेचा टिकाव कसा लागणार हे विचार करण्यासारखे आहे .  


विजयकुमार वाणी , पनवेल