पूर्वांचलातील अशांतता - धरसोड राजकीय धोरण
दिनांक २८ जुलै २०२३ लोकसत्ता "विवस्त्र विश्वास " संपादकीय वाचले . विरोधकांनी सर्वप्रथम मणिपूर विषयासंबंधी अविश्वास ठराव मांडण्यासाठी परवानगी मिळाल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन केले पाहिजे. चर्चा होणे ठराव बारगळणें या गोष्टी ठराव मांडूच दिला नसता तर शक्यच नव्हते .
१९५० पासूनच संसदेत, राजकारणात ईशान्य राज्यातील प्रश्न चर्चेत आहेत . इमिग्रेशन एक्ट (एक्स्पलशन) , प्रिव्हेंशन ऑफ इनफिल्ट्रेशन, नैशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स, डिटरमिनेशन बाय ट्रिब्युनल या विविध मुद्द्यांवर चर्चा, कृती घोषित केली होती. संबंधित वृत्तांचे संकलन करता असे लक्षात येते की , गेल्या ७३ वर्षांच्या इतिहासात, १७ पंतप्रधानांच्या काळात कमी अधिक प्रमाणात इथल्या परिस्थितीत तसू भरही फरक पडलेला नाही . यापूर्वीही अनेक रक्तरंजित, अमानवी , अमानुष अत्याचार झालेले असतील, परंतु आजच्या सारखी प्रभावी माध्यमे उप्लब्धतेतेमुळे उजेडात आली नसतील. परंतु प्रत्यके नागरिकाला सरंक्षण देणे आणि जीवन जगण्याचा अधिकार कोणतेही सरकार हिरावू शकत नाही . भारताच्या सीमेंतर्गतच बंडखोरी आणि दहशतवादी कारवाया पूर्वांचलातील राज्यांमध्ये व्यापला आहे. आर्थिक स्थिती विदारक आहे. दहशतवादी आणि देशद्रोही संघटना या सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि व्यापार्यांकडून खुलेआम खंडणी वसूल करतात, सर्रास हत्या करतात. घुसखोर स्थानिक जनजातींना लुटतात आणि त्यांच्या जमिनींवर कब्जा करतात. मणिपूरमध्ये अतिरेक्यांच्या दबावाखातर गेल्या अनेक वर्षांपासून हिंदीवर बंदी घालण्यात आली आहे. ‘इंडियन्स गो बॅक’ असे फलक लागलेले असतात. बंद आणि संपाचे साम्राज्य असते. या काळात पेट्रोल आणि डिझेल स्वयंपाकाच्या गॅस साठी चौपट पाचपट रुपये मोजावे लागतात. कोणत्याही क्रमिक पुस्तकामागे शेवटी राष्ट्रगीत छापलेले नसते. एकट्या मणिपुरात दहापेक्षा अधिक दहशतवादी संघटना कार्यरत आहेत. या संघटनांना विदेशी शक्तींकडून पैसे आणि शस्त्रे मिळत असतात आणि त्या बळावर ते भारतात विद्रोहाची आग भडकावीत आहेत. भारताचे पशुधन, प्रामुख्याने गोवंश आणि मादक द्रव्यांची तस्करी तर सर्रासपणे सुरू असते. सर्व राज्ये दहशतवाद आणि अराजकताच नव्हे, तर दिल्लीत बसलेल्या सत्ताधारी सरकारच्या पाषाणहृदयी उपेक्षेचे बळी ठरले आहेत. आताच्या मणिपूर घटनेचे घृणास्पद स्वरूप, सामाजिक समुहाविरुद्ध अन्याय आणि हिंसेचा भाग दिसत असला तरी प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटते आणि या विरोधातच विरोधकांनी मांडलेला अविश्वास ठराव महत्वाचा वाटतो . यावर केंद्र सरकारने मागच्या कोणत्याही घटनेचा उल्लेख टाळून, फक्त मणिपूर घटनेसंबंधी केलेली कारवाई आणि मणिपूर मधील घटना का घडत आहेत याची पार्श्वभूमी विषद करून, प्रकाश टाकल्यास विरोधकांना , भारतीय जनतेला तेथील परिस्थितीची जाणीव होईल आणि केंद्रावर होणाऱ्या निष्कारण टिकेचा भार हलका होईल .
विजयकुमार वाणी, पनवेल


