सुदृढ कुटुंब व्यवस्था हाच पर्याय
शनिवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ संपादकीय "पेच नातेसंबंधांचा" वाचले. लिव्ह इन रिलेशनशिप संबंधी दिलेली उदाहरणे आणि एकमेकांना समजून घेणे याविषयी योग्य विचार मांडले आहेत. विवाह संस्थेतील मुळ गाभा म्हणजे, कांदे पोह्यातील कार्यक्रमात एकमेकांना दाखवून केलेली पसंती हि पहिली पायरी. नातेवाईकांमधीलच मुलगी सर्वांनी पसंद करणे हि दुसरी पायरी. स्वजातीय मुलाशी, मुलीशी प्रेम पसंती म्हणजे तिसरी पायरी . परजातीय पसंती असेल तर चौथी पायरी, आंतरधर्मीय पसंती असेल तर पाचवी पायरी आणि या सर्वातून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये पसंतीत असेल तर सहावी पायरी. वर्षानुवर्षे याच पद्धतीत थोड्या फार कमी अधिक टक्क्यांनी चौथ्या पायरी पर्यंत जास्तीचे विवाह होत आहेत. या विवाहांमध्येही देखील अंतर्गत कुरबुरी, घटस्फोटाचे प्रमाण काही प्रमाणात आहेच. यातील मुळ मुद्दा म्हणजे विवाह म्हणजे दोन जीवांचे एकत्रिकरण आहे, पण सोबत दोन कुटुंबातील सदस्यांच्या एकत्रीकरणातून एक नवीन कुटुंब, पिढी तयार होत असते. यांच्यावर कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य, आप्तेष्टांचा अप्रत्यक्ष धाक दबाव असतो, त्यामुळे कुरबुरी, कटकटी जरी झाल्यास समझोता होतो अथवा समेट होत नसल्यास घटस्फोटाच्या निर्णयाप्रत येऊ शकतात. यात महत्वाचे की, कुटुंबाचा सहभाग असल्यामुळे मुला मुलीच्या मनात क्रूर, निर्घृण विचार येऊन एकमेकांना जिवानिशी संपवून टाकण्याचा प्रकार, होण्याची शक्यता कमी आहे.
शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि मुलीने संरक्षण म्हणून लिव्ह इन् रिलेशनशिप मध्ये राहणे , पुढे त्याचे रूपांतर आई वडिलांच्या परवानगी शिवाय प्रेमात होऊन विवाहात होणे, हे दोन्ही परिवारास खूप कष्टदायक असू शकतात. या कारणाने, दोन्ही परिवारातील कुटुंबाचे दुर्लक्ष होते. पर्यायाने दोघांवर कुणाचाही नसलेला धाक, दबाव यांना क्रूर, निर्घृण विचारांपासून प्रवृत्त करू शकत नाही. नातेसंबंध संपविण्याचे धाक नसणे, एक मोठे कारण असू शकेल. यासाठी दोन कुटुंबातील संबंध जेवढे सुदृढ राहतील तेवढे या नवीन कुटुंबातील पिढीचे नाते घट्ट होत राहील, त्यासाठी दोन्ही कुटुंबे नातेवाईक, जातीचे, परजातीचे , आंतरधर्मीय असोत, पणं दोन्ही कुटुंबातील संबंधावरच पुढची सुदृढ कुटुंब व्यवस्था निर्माण होते हे नमूद करावेसे वाटते.
विजयकुमार आप्पा वाणी, पनवेल
( मी स्वतः वाणी समाज मुंबई वधू वर परिचय संस्था , विवाहोत्तर समस्या दक्षता संघ , मुंबई या संस्थांचा सन १९९९ पासून संस्थापक अध्यक्ष आहे).


