महामंडळ नफ्यात , प्रवाशी मात्र त्रासात.
महामंडळ एसटीच्या ताफ्यात इलेक्ट्रीक बसेस, स्लीपर कोच, नवीन गाड्या आणि सवलतींमुळे चांगले उत्पन्न वाढत आहे. आता क्यूआर कोडची सुविधाही करून डिजिटल पेमेंट करणे सोपे होईल. एसटी च्या या सकल उत्पन्नातून कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याचं पाहिजे, यात वादच नाही. परंतु प्रवाशांच्या सेवेसाठी ब्रीद वाक्य असणाऱ्या, प्रवाशांना कशा सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत, याचाही विचार व्हावा. प्रत्येक स्थानक, स्टँड, आगार यांची आजची परिस्थिती अत्यंत दयनीय, दुर्लक्षित आहे. कानाकोपऱ्यात उभ्या असलेल्या एस्ट्या, त्यांची तुटलेली तावदाने, गावांच्या नावांच्या वाकड्या तिकड्या ठेवलेल्या पाट्या, आगारातील खड्डेमय रस्ते, तुटलेल्या शेड्स, त्यामधील आसन, जळमटे पांघरलेली चौकशी केबिन, फुटलेल्या फरशा त्यावरील अस्वच्छता, संध्याकाळनंतर अंधारलेला फलाट, दुर्गंधीयुक्त उघड्या मुताऱ्या, शौचालयाची तर बोंब असते. आदी सर्व त्रासांसह आजही प्रवास करावा लागतो. लांबच्या प्रवासातील चहा पानासाठी दिलेल्या रेस्टॉरंटचे वर्णन तरी काय करावे. जास्तीचा मोबदला घेऊन, उपकार करत चालणारे उपहार गृह आहे असेच वाटते. महामंडळाने, शासनाने या मिळकतीवर त्वरित, सर्व आगारांची, बसेसची योग्य निगा राखावी. रेल्वेच्या यूटीएस , रेडबस सारखे ऍप बनवून ऑनलाईन तिकिटे बुकिंगची सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात. यामुळे शासनाच्या उपक्रमातील एस टी महामंडळ कायम आघाडीवर राहिल्यास, खाजगी वाहनांचा वापर कमी होऊन बऱ्याच शहरातील वाहतूक कोंडीच्या त्रासातून मुक्तता मिळाल्यास, प्रवासी जास्तीत जास्त एस टी चा वापर करतील.
विजयकुमार वाणी, पनवेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा