शनिवार, २० मे, २०२३

लेख (८४) २६ मे २०२३

कोंकण रेल्वे प्रवासी संख्या, आसन क्षमता, वेळेचे गणित आणि रेल्वे गाड्यांचे व्यस्त प्रमाण !!

लोकसत्ता २१ मे २०२३, पहिल्याच पानावरील " दीड मिनिटात प्रतीक्षा यादी हजारपार !!" या वृत्ताच्या संदर्भात.

या वर्षीच्या गणेश चतुर्थी निमित्ताने कोंकणातील रहिवाशांची रेल्वे आरक्षणाची चर्चा सुरू झाली. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे , त्यातील रायगडचे रेल्वे प्रवास करणारे ४ तालुके आणि तिन्ही जिल्ह्यांचे मिळून २१ तालुक्यातील २००० च्या आसपास गावे होतात. प्रत्येक गावात कमीतकमी १०० रहिवाशांचा प्रवास धरल्यास अंदाजे २ लक्ष प्रवासी होतात. दिवसाकाठी २४ रेल्वे गाड्यांचे प्रमाण . (एक्सप्रेसला मोजून ५ ते ६ थांबे आणि पॅसेंजरला २५ च्या आसपास). एका एक्सप्रेसची १५०० पर्यंतची आसन/शयन क्षमता पाहता दिवसाला फक्त ३६००० प्रवासी प्रवास करू शकतात. यातील निम्म्या रेल्वे, दूर पल्ल्याच्या असल्याने, चोवीस -पंचवीस हजारांच्या आसपास प्रवासी लॉट कोकण पट्टीसाठी असू शकतो, म्हणजे पंचवीस हजार प्रवाशांनी ८ दिवस रोज प्रवास केल्यास, दोन लक्ष प्रवासी संख्या पूर्ण होऊ शकते. पणं विद्यार्थी, नोकरदार, व्यवसायिक यांच्या सुट्टीची सांगड घालत, सणाच्या एक दोन दिवस आधीच प्रत्येकास जावयाचे असते, म्हणजे एक लक्ष प्रवासी, २४ रेल्वे गाड्यांच्या पंचवीस हजार आसन कपॅसिटीसाठी, एकाच वेळेस आरक्षण करायला सुरवात केल्यावर क्षणातच ब्लॉक होणारच. सणाच्या दिवशी दोन दिवसासाठी २४ ऐवजी ४८ रेल्वे गाड्या दिल्या तरी दुप्पट प्रवाशांचे नियोजन होऊ शकते , पणं तरीही निम्म्याहूनही अधिक बाकीच राहतात. यासाठी रेल्वे प्रशासनाने सणांच्या एक दोन दिवस आधी, दहा तासांच्या प्रवासासाठी जास्तीचे रेक्स उपलब्ध करून कुर्ला, ठाणे , दिवा, पनवेल येथून शटल सर्व्हिस माध्यमातून चेअरकार्स, मेमू ट्रेन, ठराविक अंतरावर लोकल ट्रेन यांचे पद्धतशीर नियोजन करावे जेणेकरून उर्वरित निम्म्या प्रवाशांची समस्या सुटण्यास मदत होईल, उर्वरित प्रवासी रस्ते मार्गे नेहमीप्रमाणे पोहोचतीलच. 

विजयकुमार वाणी, पनवेल


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: