गुरुवार, ९ मार्च, २०२३

लेख (६४) ०८ मार्च २०२३


मी , मीच . . . .

मीच मुलगी, मीच कन्या, मीच बालिका, मीच स्त्री, मीच बाई या सर्वनामाने, सर्वसाधारण समाजात, अहं,  जगात ओळखली जाणारी मी.  मीच मला जन्म देणारी, मीच मला वाढवणारी, मीच मला ओळख देणारी, अशी अनेक रूपे या विधात्याने मला बहाल केलीत.  आदिनाथाची पार्वती ते पृथ्वीतलावावरील एखाद्या गरीब कुटुंबातील द्रूपदा पणं मीच.  या विविध रुपात मी, मला वेगवेगळ्या पद्धतीने वागविते.  कुठे माझा सन्मान, तर कुठे माझा अपमान.  काही कार्यात पहिले स्थान तर काही ठिकाणी दुय्यम स्थान.  मीच माझे कौतुक करते, मीच मला आनंद देते, मीच माझा आदर करते आणि तीच मी माझा दुस्वास करते,  मीच मला दुःख देते, मीच माझा अनादर करते. 
होय, आदिमाया शक्ती धारण करणारी, दुर्जनांचा संहार करणारी दुर्गा,  सत्यवानाचा प्राण वाचविणारी सावित्री, ज्ञानदेवाची मुक्ताई, राजमाता जिजाई, पुण्यश्लोकी अहिल्याबाई, शिक्षणाचे धडे देणारी सावित्रीमाई, भारताचे सार्वभौमत्व सांभाळणारी इंदिरा, कॉम्पुटर युगात स्वतःचे मालकीचे स्थान घट्ट रोवणारी सुधा मूर्ती, अशा प्रत्येक युगात,शतकात, दशकात, वर्षात, महिन्यात, पंधरवड्यात, सप्ताहात, नव्हे रोजच कर्तबगार रत्ने जन्माला येत होत्या, आहेत आणि येतील.  पण ? माझ्या घरी नको ती दुसऱ्याच्या घरी आली पाहिजे हा विचार करणारी मीच, तिचा जन्म नाकारणारी मीच, तिच्यावर संस्कार करताना हात आखडता घेणारी मीच, तिला दुय्यम स्थान देणारी मीच, तिच्या आकांक्षा, महत्त्वाकांक्षा यांना मुरड घालणारी मीच, तिला सून म्हणून आणताना तिच्यावर बंधन घालणारी मीच, तिला जास्तीत जास्त उपहासात्मक वागणूक देणारी मीच, तिच्या पोटी मीच आली तरी तिला अव्हेरणारी, अस्तित्व नाकारणारी मीच. इतकंच काय वास्तविकतेच्या दुनियातील सर्वच वाहिन्यांच्या मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये, छोट्या छकुली ते आजीवर अन्याय करणारी मीच. 
मग कुणा फुकाचा दोष का द्यावा, त्यातला त्यात महिला सक्षमीकरण, सबलीकरण, लेडीज फर्स्ट, सत्तेत तेहत्तीस टक्के आरक्षण, अबोली रिक्षा, बस, ट्रेन मध्ये बसण्यास आरक्षण,  बाळंतपणाची रजा, हिरकणी कक्ष,माझे रूप छान दिसण्यासाठी ड्रेस साडी डिझायनिंग मध्ये लक्षावधी रंगसंगतीचे पेहराव, केशरचना, छान पाककृती करणारी मी पणं जागतिक पातळीवरील आधुनिकता दाखविणारे  बल्लवाचार्य (शेफ),
ब्बाबा,  अंतता एकच सर्वार्थाने काळजी घेणारे हे सारे राम, शंकर, नारायणच असतात. तरी त्यांचाच दुस्वास. आपण मात्र आपल्याच कर्तुत्वाने, वर्तणुकीने, कार्याने आपलेच नुकसान करून घेत आलो आहोत. म्हणून महिला दिन साजरी करताना माझी स्वतःची, स्वत:बद्दलच तक्रार आहे. आता हे सारे ऐकल्यावर , मी नाही बाबा त्यातली, मी स्वतंत्र्य विचारांनी वाढले, माझ्या मुलींस , सूनेस, हवं तेवढे स्वातंत्र्य दिले, देते, हे सारे होते ते तीच्याघरी असे म्हणून पुन्हा मीच माझ्याकडेच बोट दाखविले हेच मुळी मी विसरले. 
महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: