वडाळे तलाव - सुर पनवेलचा
ऐतिहासिक शहर पनवेलच्या सौंदर्यात नाकातल्या नथी सारखा लांब गोलाकार वडाळे तलाव, आदिनाथ बल्लाळेश्वर, दिड शतकांचे धुतपापेश्र्वर, बांठीया हवेली, व्हिके हायस्कूल संकुल, मोक्षाचे स्थान वैकुंठ धाम, मुंबई पुणे महामार्ग, श्रींचे विसर्जन स्थळ, विविध दुर्मिळ पक्षांचे माहेरघर अशा अनेक अंगांनी पनवेलच्या सीमांवर पहुडलेला. शहराचे सौंदर्य खुलविण्यासाठी तलावाला तटबंदी करून नागरिकांना चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅकची निर्मिती करतानाच , ठराविक अंतरावर गोल काठड्यांचे व्ह्यू पॉइंट सह, एक सुंदरसा पायऱ्यांच्या घाटाची निर्मिती करण्यात आली. विद्युत रोषणाईने घाटाचे, तलावाचे , पर्यायाने शहराचे सौंदर्य सायंकाळी अधिक खुलून दिसते. अशा वातावरणात पनवेलकर तलाव परिसरात मुक्त पणे फिरतात, विश्रांती घेतात.
पण या साऱ्यासोबतच पनवेलकरांनी संस्कृतीची मूल्ये जपत, भल्या पहाटे संगीताचा आस्वाद घेत असतात. सप्ताहात , एक दिवस संगीत गायनाचे मोहून जाणारे स्वर शिंपणारे प्रतिभावंत कलावंत आपल्या गायनाने सारा परिसर भारावून टाकतात. आज पर्यंत अनेक गायकांनी आपल्या परीने मैफिली सजविल्यात. त्यातली आजची मैफल जेएनपीए चे श्री शेखर माळवदे यांनी रंगविली. तबला साथ संगतीला कु.जाई ठाणेकर. श्री शेखरने, पहाटेच हार्मोनियम वरच्या पहिल्याच सुराने तळ्यातल्या पक्षांची किलबिल सुरू होऊन, सुरातल्या गोड स्वरांनी आलापित तळ्यात न्हाऊन घेऊ लागले. मैफिलीचा आरंभ, भैरवीने केला. नंतर आदिदेव शिव शंकर, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा , पंडित अभिषेकी बुवांचे अभिर गुलाल उधळीत रंग, काटा रुते कुणाला, माझा भाव तुझे चरणी, हरी भजनाविन काळ घालवू नको रे, कबीर भजन चादरिया झिनी रे झीनी, अशा मराठी संगीतातील अजरामर पणं म्हणण्यासाठी कठीण अशा गीतांनी मैफिल रंगविली. मैफलीची सांगता कुसुमाग्रजांच्या सर्वात्मका सर्वेश्र्वराने , ह्या गीताने सूर्योदयाने सारा परिसर उजळून निघत उपस्थितांना भारावून टाकले. शेखरच्या सादरीकरणात कमालीचा आत्मविश्वास होता, पहिल्या सुरापासूनच आवाजातील गोडवा जाणविला. मुक्त आभाळाच्या व्यासपीठावर अलगदपणे सुरांची मुशाफिरी करीत उपस्थितांना मॉर्निंग वॉक थांबविण्यास भाग पाडले. कु जाईची तबल्याची साथ तर परिपक्व अभिजात संगीताची जाण असल्याचे द्योतक होते. लय, ताल, ठेका अलगद हातातून बोटातून तबल्यावर उतरत होते. एकंदरीत नवीन वर्षाच्या पूर्वेला , पापमोचनी एकादशीस पनवेल महानगरातील श्री शेखर याचे गायन आणि जाईचे तबला वादन आज पनवेलकरांना सुखावून गेले.
विजयकुमार आप्पा वाणी, पनवेल

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा