रविवार, २६ मार्च, २०२३

लेख (६९) २६ मार्च २०२३



 



मैया , नर्मदे हर !!        

                        (पूर्वइतिहास आणि परिक्रमा एक अनुभव) 

(१)

नवजात शिशुला न्हाऊ घालताना आई , आज्जी " गंगेश्च यमुने चैव गोदावरि सरस्वति । नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन् संनिधिं कुरु" हा श्लोक म्हणतच नर्मदे मैयाची पहिली ओळख करून आपल्यावर संस्कार होतात. पुढे शालेय शिक्षणात पश्चिम वाहिनी नद्यांतील, मध्य प्रदेशात उगम होऊन , महाराष्ट्र, गुजरात राज्यातून १३१२ किमी वाहणारी सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नर्मदा नदी आहे हे कळते. भगवान शिवाच्या शिवलिंगातून उगवणाऱ्या नर्मदेला रेवा, अमरजा, मेकलकन्या, रुद्रकन्या अशीही नावे आहेत. मध्य प्रदेशात लोकांच्या जीवनात नर्मदा नदीचे महत्वाचे स्थान असल्यामुळे मैया नावानेच संबोधित केले जाते . मैयाला विवाह प्रसंगी एका कटू प्रसंगास सामोरे जावे लागल्यामुळ, मैयाने स्वतःचा प्रवाह बदलवित्त पश्चिम वाहिनी होऊन कुमारी राहण्याचे व्रत घेतले अशी आख्यायिका आहे. चार वेदांपैकी मैयेस, सामवेद मानले जाते. मत्स्य आणि पद्म पुराणानुसार नर्मदा सर्वत्र पूजनीय आहे, मग ती खेड्यात असो वा अरण्यात. नर्मदा अपराध्याला नुसते बघून शुद्ध करते. जो कोणी माता नर्मदेची प्रदक्षिणा करतो त्याचे सर्व दु:ख आणि वेदना दूर होतात आणि मृत्यूनंतर ती व्यक्ती मोक्ष प्राप्त करून थेट स्वर्गात जाते.  

नर्मदा नदीला प्रदक्षिणा घालण्याच्या उपक्रमाला नर्मदा परिक्रमा म्हणतात. या परिक्रमेची सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर अथवा प्रबोधिनी एकादशी झाल्यावर होते. मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली होती अशी धारणा आहे. मार्कंडेय ऋषींनी नद्या न ओलांडता ४५ वर्षात ही परिक्रमा पूर्ण केली. परिक्रमेस ॐकारेश्वर हुन सुरुवात करता येते. परिक्रमा चालू असताना नर्मदेचे पात्र ओलांडता येत नाही. म्हणजे नर्मदेतून वाहणारे व निघणारे पाणी ओलांडणे निषिद्ध आहे, सदावर्तात शिधा घेऊन अन्न शिजवणे, किंवा ५ घरी भिक्षा मागून जेवणे, वाटेत मिळेल ते पाणी पिणे, जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करणे या पद्धतीने परिक्रमा करावी लागते. रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ नर्मदेची पूजा, स्नान, संध्यावंदन व नित्य पाठ करून, परिक्रमा दरम्यान सतत ॥ॐ नर्मदे हर॥ या मंत्राचा जप व नामस्मरण केले जाते. पायी केल्यास ही यात्रा ३ वर्षे ३ महिने आणि तेरा दिवसात पूर्ण होते असा समज आहे. यासाठी एकूण २६०० किलोमीटर अंतर पायी चालावे लागते. आता भौगोलिक बदलांमुळे आणि आधुनिकीकरणामुळे १३१ दिवसात परिक्रमा पूर्ण होते. 

उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमा : तिलकवाडा (गुजरात) येथे नर्मदा नदी उत्तरावाहिनी होते आणि पुढे रामपुरापर्यंत ती उत्तरावाहिनी राहते आणि नंतर तिचा प्रवाह पूर्ववत होतो. तिलकवाडा-रामपुरा-तिलकवाडा या २१ किलोमीटरच्या टप्प्यावर नर्मदेच्या तीरावरून केल्या जाणाऱ्या परिक्रमेला उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमा म्हणतात. ज्यांना संपूर्ण परिक्रमा करणे शक्य नाही असे भाविक उत्तरावाहिनी प्रदक्षिणा करतात. तिलकवाडा ते रामपुरा या परिसरात फक्त चैत्र महिन्यात ही उत्तरवाहिनी परिक्रमा केली जाते. जो कुणी चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करेल, त्याला संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य मिळेल, असे नर्मदा पुराणामध्ये व स्कंद पुराणामध्ये म्हटले आहे.

ही परिक्रमा तिलकवाडा येथून उत्तर तटावरून सुरू होते, उत्तर तट संपल्यावर नावेने समोरील तीरावर म्हणजे दक्षिण तट रामपुरा येथे यावे लागते. येथे आल्यावर प्रथम घाटावर स्नान करून तेथील नर्मदामैयाचे जल घेऊन घाटावरील तीर्थेश्‍वर महादेव मंदिरात शंकराच्या पिंडीवर अर्पण करून दक्षिण तटावरून परिक्रमा चालू होते. दक्षिणतट पूर्ण झाल्यावर नावेने पुन्हा उत्तर तटावर आल्यावर स्नान करून परिक्रमेची समाप्ती होते.

(२)

" परिक्रमा एक अनुभव "

चैत्र शु चतुर्थी शके १९४५ , शनिवार दि २५ मार्च २०२३ रोजी, या अमृत क्षणांचे पुण्य असणाऱ्या परिक्रमा करण्याचे भाग्य मिळाले. सौ सुवर्णा आणि मी , शुक्रवार दि २४ मार्च रोजी गुजरातच्या भरूच अंकलेश्वर पासून ७० किमी अंतरावर नदीच्या दक्षिण तीरावरील मांगरोल गावात रात्रीचा मुक्काम केला. शुक्रवारी भल्या पहाटे अमृतवेळी ३ वाजताच उठून आवराआवर केली आणि “कर्दळीवन यात्रा पुणे” स्वयंसेवकांच्या मार्गदर्शानुसार पहाटे ४ वाजता सोबत असलेल्या यात्रेकरूंसोबत "नर्मदे हर " उच्चारीत उत्तरवाहिनी परिक्रमेस प्रस्थान करण्यात आले'. पहाट होण्यास एक प्रहर उरला होता, गाव अजून निद्रेच्या कुशीत विसावलं होत. सुखावणारा गार वारा अंगाला स्पर्श करून जात होता . चैत्र शु चतुर्थी असल्या कारणाने लोभस चंद्राची कोर चार पाच ग्रहांमध्ये ठळक दिसत होती. सध्या गुरु, शुक्र, शनी आणि मंगळ हे सारे ग्रह पृथ्वी जवळून जात आहेत असे वाचनात आले होते , आकाशातील तारकांच्या पुंज्यात शुक्र आणि गुरु उघड्या डोळ्यांनी दिसतात असे मानून घेतले, पण वेळ दवडायचा नव्हता, महत्व चालण्याला होते, म्हणून तारका दर्शनाच अल्पसा लाभ घेत मांगरोल गावाबाहेर कूच केले . आता जास्तच गडद अंधार जाणवायला लागला होता. अर्थात नेहमीप्रमाणे काहीतरी विसरणे यात टॉर्च राहिली आणि मोबाईलच्या टॉर्च वर चालायला सुरुवात केली. थोडीशी डांबरी सडक असल्याकारणे , सेवेकरांच्या दुचाकी फटफट आवाज करीत थोडासा उजेड दाखवून जात होत्या. सडकेच्या दुतर्फा बाभळीची, विलायती चिंचेची आणि गर्द दाट रानटी वेलींनी मढलेली पांदी दिसत होती , नुकतेच दव पडू लागल्याने एक वेगळाच सुगंध दरवळू लागला. तसे दैनंदिन चालण्याचा थोडाफार सराव आहे , पण वारीचा, परिक्रमेचा फारसा अनुभव पाठीशी नव्हता, पण सर्वच साधकांसोबत चालताना काहीतरी विशेष चालायचे आहे असे दोघांना वाटू लागले , पहिल्या तीन किमी अंतरातच चालणाऱ्यात अंतर पडू लागले, दोघ मोबाईल टॉर्च सोबत अंधारात पुढे पुढे सरकू लागलो , थोडे फार एकटे वाटू लागताच , परिक्रमा वासीयांच्या सेवेसाठी आधीच तप्तर असलेले सेवेकरी खुर्च्या टेबल , छोटासा मंडप टाकून चहा , कुरमुरे चिवडा, फळे खाण्यासाठी आग्रह करू लागलेत . इथूनच यांच्या सेवेची तप्तरता दिसून आली . पुढे नर्मदे तिरी आयुष्य व्यतीत केलेल्या साधू संतांचे आश्रम, धर्मशाळा दिसू लागल्यात . या पुढे प्रत्यक्ष नदीतीरी पायऱ्यांवरून उतरलो आणि अंधुकश्या उजेडात एवढ्या उन्हाळ्यातही वाहणारे पाणी, अथांग पसरलेले विस्तीर्ण पात्र चमकत होते आणि मैयाचे दर्शन झाले. साऱ्याच प्रवाहात मैयाचे लांबलचक विस्तीर्ण पात्र असून, नावे शिवाय मैयाच्या पैलतीरी जाता येत नाही, असे सांगण्यात आले . नर्मदेचे गोटे म्हणजे काय आणि त्यांच्या सर्वत्र पसरण्यामुळे चालताना पाय अडखळत होते. आता मैयाच्या तीरावरून प्रवास सुरु झाला होता . दूरवर मिणमिणते दिवे दिसायचे पण गडद अंधारात त्यांचे प्रत्यक्ष ठिकाण कळत नव्हते . दिड दोन किमी चालल्या नंतर फटफट फट नावेच्या इंजिनाचा आवाज ऐकू येऊ लागला आणि पैलतीराला जाण्याचे वेध लागू लागले , पण अंधारात उमगत नव्हते, चालणे चालूच होते , त्या मिट्ट अंधारात मोबाईलच्या टॉर्चच्या मर्यादित उजेडात, नावे कडे जाणारा दिशा दर्शक ध्वज दिसला नाही आणि पुढे चालू लागलो', का कुणास ठावूक मैयाने जाणीव केली आणि चुकल्या सारखं वाटलं. सोबतीच्या साधकांनी मागवून येण्याऱ्या साधकांच्या सहाह्याने नावेपर्यंत नेले .इथे पहिला टप्पा संपला होता. अंधारातच नावेने पैलतीरी वसलेल्या तिलकवाडा उत्तर तटावर जलप्रवासास सुरुवात झाली. अथांग पसरलेल्या मैयाच्या कुशीतून जाताना कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते. सात आठ मिनिटांच्या प्रवासानंतर घाटावर उतरविण्यात आले . बाराही मास मैयाचा प्रवाह सरु असतो, त्यामुळे निसर्गानेच मैयाच्या तीरावर दुतर्फा छोट्या मोठ्या डोंगरांच्या कडा उभ्या केल्या आहेत. संगमरवरी खडकांमधून उगम पावत नदी नर्मदाघाटी म्हणून ओळखले जातात . अशाच एका चाळीस पन्नास फूट उंच डोंगरातून वाट काढीत तिलकवाड्याच्या तीरावर पोहोचलो . वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबे स्वामी (मूळ : माणगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग - वासुदेवानंद सरस्वतींना दत्तसंप्रदायात श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानले जाते, नर्मदा मैयाच्या ओढीने स्वामींनी आपले नर्मदा जिल्ह्यातच कार्य क्षेत्र ठेवले आणि त्यांनी श्री गरुडेश्वर येथे सन १९१४ साली समाधी घेतली) तर स्वामींच्या आश्रमात , श्री दत्त मंदिरात उत्तरवाहिनी परिक्रमेस आलेल्या साधकांची लगबग सुरूच होती. श्री दत्त दर्शनाने परिक्रमेस सुरुवात केली आणि चालण्याचा दुसरा टप्पा सुरु झाला . सप्तमातृका मंदिर , गौतमेश्वर मंदिर , आत्मज्योती आश्रम , मैया नर्मदा मंदिर, या मंदिरांचे दर्शन घेत तिलकवाडा गावातील चालणे सुरु होते . गाव मात्र अतिशय जुने होते , जुन्या पद्धतीच्या हवेली, दुमजली इमारती, लाकडाच्या नक्षीकामाच्या दरवाजे खिडक्या, अजूनही साक्ष देत आहेत . थोडे अंतर चालल्यानंतर उपनदी वरील पुलावरून मैया संगमाचे देखणे रूप दिसले . इथूनच कमी अधिक अंतरावर असलेल्या साधकांच्या सेवार्थ अल्पोपहार , भोजन छत्रांना सुरुवात झाली . रस्त्याच्या दुतर्फा शेती लक्ष वेधून घेत होती . मैयाच्या खोऱ्यातील काळ्या जमिनीत केळीची , पांढरे सोने (कपाशी) ची श्रीमंती उठून दिसत होती. मध्येच मका, डाळिंबांची लागवड शेतीच्या खुशहालीची साक्ष देत होती . श्री मणी नागेश्वर महादेव मंदिर , भवानी माता मंदिर , मुनी आश्रम , आणि स्वामी विष्णुगिरी महाराज आश्रमानंतर मैयाच्या उत्तर तीरावरील पात्रातील मार्गावर तिसरा टप्प्याची सुरुवात झाली . उजव्या हातास मैयाचे विशाल पात्र , पायी चालण्यासाठी छोटीसी पायवाट आणि डाव्या बाजूस खडकाळ मुरुमांची रांग उभी होती . चालताना लक्षात यायला लागले होते, हा टप्पा दिसायला सरळ लक्षाचा आहे परंतु तितकाच कठीण आहे, इथे आसपास सेवार्थी छत्र नव्हतीच, फक्त चालणे चालणेच होते . मजल दर मजल चालणे काय असते ते जाणवत होते. सकाळीच चार वाजता चालणे सुरु केले असल्याने इथे सतरा अठरा किमी अंतर पूर्ण होत, आठ साडे वाजले होते . एक नमूद करायला विसरलो होतो , खरे तर चालताना ठराविक अंतरावर लहान लहान मुले "नर्मदे हर " "नर्मदे हर " नामोच्चर करीत असतात. साधक स्वतः जवळील खाऊ वैगेरेचे वाटप करतात , पण त्याच बरोबर "नर्मदे हर " "नर्मदे हर ", नामोच्चार आपोआप श्रवण होतो आणि म्हटलाही जातो. तिसरा टप्पा अखंड साधारणतः सहा ते सात किमी, हा टप्पा संपताना शारिरीक क्षमतेची सुद्धा जाणीव करून देतो . नुकत्याच उगवत्या रवी राजाचे किरणे मैयाच्या पाण्यावर चमकायला सुरुवात झालेली असतेे. तशातच नावेत नंबर लागत, दक्षिण तीरावरील घाटावर उतरविले  इथे, स्नान संध्या विधी केले जातात . तिसऱ्या टप्प्यातील चालल्याने येथील सेवा अन्न छत्रात मिळलेला प्रसाद पटकन खाल्ला जातो. नंतर पुन्हा एकदा १८० कोनातील चढ चढल्यावर शिवलिंग मंदिर , संत निवासातील रणछोडदास (विठ्ठलाच्या रूपातील) कृष्णाची अप्रतिम मूर्ती , स्वामी रामानंद सरस्वती यांचा आश्रम आणि पुढे गोपालेश्वर महादेव मंदिर , मांगरोल गावाची डांबरी सडक मार्गाने पुन्हा अंतिम टप्प्यावर आलो. वाटेत, अत्यंत पुरातन साधारणतः चारशे वर्षांपूर्वीची वटवृक्ष (ज्यांच्या पारंब्या जमिनीला टेकल्यात), अश्वत्थ (पिंपळ) उभे आहेत. गावातील वातावरणात चालताना गायी गोठ्याच्या आतील घुंगराचा आवाज, मातीच्या घरातील चुलीचा धूर सारे मनास जाणवत होते , अंतिम टप्प्यातील जिथून प्रस्थान केले ते स्थान आले आणि मानस प्रचंड आनंद झाला. आश्रमाच्या बाहेर हालचाल जाणविली नाही, त्यामुळे आपणच पहिले या आविर्भात आत आलो तर काय, आमच्या तास भर आधी परिक्रमा पूर्ण करून आलेल्या पुण्याचा महिलांचा ग्रुप आराम करीत बसला होता. सकाळी चार ते सकाळी साडे नऊ अशा साडे पाच तासातील एकवीस किमी परिक्रमेची सांगता झाली. प्रत्यके टप्प्यात वेगवेगळे साधक होते त्यांच्या चालण्याचा वेगात आपणास जोडून घ्यावे लागत होते. एक लक्ष्य पूर्ण झाल्याचे समाधान मिळाले. या यात्रेतच स्टॅच्यू ऑफ युनिटी (सरदार वल्लभ भाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा ) , श्री वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबे स्वामी मठ, गरुडेश्वर दत्त मंदिर पाहण्याचे भाग्य लाभले. परिक्रमा प्रस्थानापूर्वी आश्रमातील गुरुजींनी संकल्प करून घेतला होता, त्यात परिक्रमा सफल हो, मैया कुमारिका आहे, म्हणून प्रत्यक्ष कुमारिकांचे पूजन , मंदिरात दक्षिणा , गोमातेचे पूजन, या संकल्पपूर्तीत मनाला समाधान मिळाले . अर्थात हे सारे झाले कर्दळीवन यात्रा, पुणे, त्यांचे स्वयंसेवक , तिन्ही बस मधले पुणे, नाशिक, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील सर्व साधक यांचे मनःपूर्वक आभार . या पुढील दत्त यात्रेत या साऱ्यांची पुन्हा भेट होवो हि मैया चरणी प्राथर्ना 

विजयकुमार वाणी , पनवेल

(सोबत सौ सुवर्णा वाणी ) 


 


 


 


 


 


 


 


 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: