गुरुवार, ९ मार्च, २०२३

लेख (६५) ०९ मार्च २०२३

 




फॅक्टरी परावर्तित गोडाऊन !

दिनांक ९ मार्च २०२३ लोकसत्तातील " हरिश्चंद्राची फॅक्टरी" संपादकीय वाचले. भाजपच्या स्थापनेआधी जनसंघाचा इतिहास पाहता ६७ मध्ये युतीचे राजकारण करून मध्यप्रदेश, बिहार व उत्तरप्रदेश मध्ये सरकारे स्थापन केली. १९७७ साली लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. १९८० पासून अनेक चढ उतराना तोंड देत सत्ता मिळवित, मोदी कालाचा प्रारंभ होऊन १४ मध्ये एनडीए माध्यमातून सत्ता हस्तगत केली. राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता,लोकशाही, गांधी समाजवाद, 'सर्वधर्म समभाव' यांना गुंडाळून ठेवत सत्ता हस्तगत करण्याचा चंग बांधला गेला. सत्ता मिळत गेल्यामुळे, राज्याराज्यांतील सत्तेचा मोह सुटू लागला. जिथे सत्ता नाही तिथे वर्षानुवर्षे सत्तेत असणाऱ्यांनी थोडीफार फळे चाखली होती ते यांना दिसू लागले आणि जास्त विरोध दर्शविला तर ससेमिरा अस्त्र लावल्याने खरे इनकमिंग सुरू झाले. राजकारणाचा, सत्ता हस्तगत करण्याचा एक डाव असू शकतो आणि त्याचा लाभ घेत सत्ता संपादन होऊ लागले. नऊ विरोधी पक्षांच्या म्हणण्यानुसार सरकारी यंत्रणांचा वापर सुड भावनेने होत आहे शिवाय जे त्रस्त होऊन फॅक्टरीत आलेत, त्यांच्यावरील कारवाई थांबविली गेली. जसे विरोधी त्रस्त आहेत, त्याच कारणाने मुळ भाजपवासीही त्रस्त आहेत. इनकमिंग मुळे फॅक्टरीत आधीच पिढ्यानपिढ्या असलेले ७० टक्के पदाधिकाऱ्यांवर अन्याय वाढीस लागला आहे. फॅक्टरीचे आता गोडाऊन झाले आहे. कॅडर मास पक्ष गोंधळलेल्या स्थितीत आहे. त्याचे सूक्ष्म परिणाम पोट निवडणुकीत दिसून आलेत. विरोधातही काही आलबेल नाही, नऊ पक्षात मुख्य काँग्रेस नाही. अजून भारतजोडो यात्रेतून बाहेर यायला तयार नाहीत. राहुल अजूनही बेछूट आरोपांची मालिका थांबवायला तयार नाहीत. आपचे काँग्रेसचे जमत नाही. तेलंगणाचे केसीआर यांनी राष्ट्रीय राजकारणात महाराष्ट्रातून केलेला प्रवेश, सेना (उद्धव गटास) शून्यातून परत उभे राहायचे आव्हान, राजस्थानातील सुंदोपसुंदी, असे अनेक कच्चे पक्के दुवेच फॅक्टरीची शक्तिस्थळे आहेत. त्यांच्यापुढे फक्त एकच कार्यक्रम असा की, फॅक्टरीतल्या गोडाऊन रुपी शक्तीला एकत्र बांधून करेक्ट कार्यक्रम आखायचा, अन् त्यातही यशस्वी ठरले तर मुख्य विरोधी पक्षांनी प्रादेशिक पक्षांसोबत पंचायत, पालिका, पोट निवडणुकीतल्या विजयावर टेंभे मिरवावे हेच बाकी असेल. मग त्यास आता गोडाउनचे यशच म्हणावे लागेल. 

विजयकुमार आप्पा वाणी, पनवेल  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: