लोकशाही माझी मी लोकशाहीचा !
दिनांक १६ मार्च २०२३ लोकसत्ताचे संपादकीय " लोकशाहीचे पालकत्व" वाचले. संपादकीयात एकूणच संसद ते परदेशातील वक्तव्ये यांचा समाचार घेण्यात आला आहे. अनेक देशांमध्ये सुद्धा लोकशाही अस्तित्वात आहे. तेथील राजकारण्यांनी, त्यांच्या देशातील घडामोडींचा, परदेशात जावून अनादर केल्याचे कधी वाचनात येत नाही. भले त्या देशात कितीही अंतर्गत कुरबुरी असोत. अमेरिकेत भांडवलशाही अर्थव्यवस्था असूनही, २००८ आणि आताची बँकिंग क्षेत्रातील दिवाळखोरी, अर्जेंटिना, ग्रीस, रशिया , ब्रिटन , युरोपातील राज्ये यांच्या घसरलेल्या अर्थ व्यवस्थेवर, यांचे प्रतिनिधी देशोदेशी जावून वाईट प्रचार प्रसार करीत नाहीत, उलट अर्थ व्यवस्था वाढीसाठी उपाय योजनेसाठी सत्ताधाऱ्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या सहाय्य करीत असतात. खरे तर लोकशाहीचे यश भैगोलिक क्षेत्रफळ, कमी लोकसंख्या, शैक्षणिक, आर्थिक स्थिती यावर अवलंबून असते. हे सारे माहिती असूनही, आपले राजकारणी, तज्ञ, विचारवंत, तारांकित व्यक्ती, कोणताही मागचा पुढचा विचार , अभ्यास, विश्लेषण न करता, केवळ विरोधाला विरोध, प्रसिद्धी लालसेपोटी, पुरस्कारांची वापसी, देशात राहणे धोक्यात, परिणामांची पर्वा न करता तारे तोडत देशांतर्गत वाद निर्माण करतातच, पणं अन्य देशात जावूनही आपल्या ज्ञानाचे दीप उजळून येतात. बरं परदेशात यांची वक्तव्ये कुणासमोर असतात तर ती, उदरनिर्वाहासाठी परदेशातील नागरिकत्व स्वीकारलेले, की ज्यांना स्वदेशाशी काही देणे घेणे नाही. त्यांच्यासाठी प्रथम प्राधान्य त्यांचा देश आणि त्यांच्या संस्थेची प्रगती. मग अशांसमोर देशाचे विदारक चित्र निर्माण का करावे ? त्यांच्याकडून कोणत्या अपेक्षा आहेत, की ज्यांना देशाची स्थिती सांगितली जावी. याचा सांगोपांग विचार, ना सत्ताधारी, ना विरोधी पक्ष करतात. संसदीय लोकशाहीचा विचार केला तर, केंद्रात, राज्यात, अधिवेशन काळात पटलावरिल प्रश्न सोडविणे याचा प्राधान्यक्रम सोडून, आरोप प्रत्यारोप , हक्क भंग, चौकशी, गदारोळ, सभात्याग याचा वापर करून संसद सभा बंद पाडून, यांची लोकशाही कधीच धोक्यात येत नाही. पणं ती येते, केवळ चौकशी लावल्याने, बँका बुडल्याने, कायद्याचा वापर केल्यानेच. गेल्या ७५ वर्षांच्या कालावधीत अंदाजे १२ हजाराच्या वर संसद सदस्य आणि अर्धा लाखाच्या वर होऊन गेलेले आमदार यापैकी दोन तृतीयांश सदस्यांचे मार्गक्रमण असेच चालत आले आहे. वर्तमानकाळात तर लोकशाही वाचविण्याच्या नादात, एकमेकांवरील कुरघोडीत कोणत्याही थराला जावून चारित्र्यहननाचे प्रकार वारंवार घडत आहेत. लोकशाही संस्कृतीचे कोणतेही सोयर सुतक यांना राहिले नाही. संपादकांनी वेळोवेळी घडलेल्या घटनांचा विचार करून, संदर्भ देऊन, समुदेशनपर लेख लिहावे, वाचकांनी वाचावे, प्रतिक्रिया द्याव्यात. पणं लोकशाही या साऱ्यांच्या मुठीत आहे, तरीही कायम धोक्यातच राहते. आपण केवळ बालपणाची देशाची प्रतिज्ञा घोळवत रहात, लोकशाही माझी मी लोकशाहीचा म्हणत गोडवे गात रहावे.
विजयकुमार आप्पा वाणी, पनवेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा