मुखभंगास सारेच जबाबदार !!
२ मार्च २०२३ च्या लोकसत्तातील "मुखपत्रांचा मुखभंग!" वृत्तपत्राचे महत्व अधोरेखित करणारे संपादकीय वाचले. आपल्या राज्याचाच विचार केला असता, स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्योत्तर आणि नंतर प्रत्येक दशकात वृत्तपत्र माध्यमात बदल घडलेले आहेत. संपादकीयात म्हटल्याप्रमाणे सत्ताधाऱ्यांच्या आडोश्यास राहून भलामण करणारी वृत्तपत्रे समाजाला दिसत नाही असे नाही. वर्षानुवर्षे राजकीय पक्ष सत्तेत असल्यामुळे अशा वृत्तपत्रांचे सुगीचे दिवस होते. परंतु आणीबाणी नंतर गेल्या चाळीस वर्षात अनेक सत्तांतरे झाल्यामुळे अशांची पंचाईत होऊ लागली. जो काही कार्यकाळ सत्ताधाऱ्यांच्या सानिध्यात मिळू लागला, त्यावर चमकणे आणि उर्वरित काळात त्या पक्षाच्या शिरस्थ नेत्याच्या माध्यमातूनच प्रतिस्पर्ध्यांच्या विरोधात रान उठविणे होऊ लागले. यात बदल न झाल्यास प्रतिस्पर्ध्यांच्या विरोधात अन्य वृत्तपत्रात छापून आलेले मथळे स्वतःच्या इ माध्यमावर टाकण्याची सुद्धा वेळ यांनी आणली आहे. सामाजिक भान जपत अन्य वृत्तपत्रे काम करीत असतानाच, राजकीय पक्षांची स्वतःचीच वृत्तपत्रे आकारास येऊ लागली आणि त्यातून कायमच विरोधातील सुर आवळला जावू लागला. विरोध तत्वाला, वृत्तीला आणि फारतर वागण्याला असावा, परंतु काही वृत्तपत्रांनी सत्ताधाऱ्यांच्या लालसेपोटी गोबेल्स निती वापरून काहींचे वैयक्तिक आयुष्याचे नित्य नियमाने धिंडवडे काढून त्यांना आयुष्यातून संपविल्याची उदाहरणे आहेत, यात कुठेच पत्रकारिता, सामाजिक भान याची तत्वे पाळली गेल्याचे दिसून येत नाही. सध्याचाच विचार केला तर, सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत घेतलेले निर्णय चुकीचेच आहे, त्यांचा प्रत्येक निर्णय चुकीचाच आहे, असेच बिंबविले जाते. यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मत प्रदर्शित करणे म्हणजे पत्रकारिता आहे का खरंच चुकीचे निर्णय आहेत हेच कळेनासे होते. खरेतर बाळशास्त्री जांभेकरांची पत्रकारितेची परंपरा जपणाऱ्या राज्याला आजही स्पष्टपणे मत व्यक्त करणारे संपादक, पत्रकार लाभले आहेत. पण रोजच्या रोज, प्रत्येक प्रहराला ब्रेकिंग न्युज येते आणि निस्पृहतेने, पोटतिडकीने संपादकांनी मांडलेले विचार, मत, मुख्य विषय बाजूला पडतो किंवा त्याची तीव्रता कमी होते. संपादकांचे विचार सर्वदूर न पोहोचणे , त्यावर साधक बाधक चर्चा न होणे असे परिणामकारक शस्त्र न राहिल्यामुळे व्यावसायिक , राजकीय माध्यमातून वृत्तपत्रे चालविणारे जमेल तसा सत्ताधाऱ्यांचा, वजनदार नेतृत्वाच्या दावणीला बांधून घेत पत्रकारितेचा, अर्थात वाचकांचा मुखभंग वर्षानुवर्षे करीत आहेत, या अवस्थेला सत्ताधारी, विरोधी, वृत्तपत्रं, वाचक सारेच जबाबदार आहेत.
विजयकुमार आप्पा वाणी, पनवेल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा