शुक्रवार, ३१ मार्च, २०२३

लेख (७०) ३१ मार्च २०२३


विधानसभा निवडणूक सार्वत्रिक निवडणुकीचा आरसा नव्हे!!

लोकसत्ता दिनांक ३१ मार्च २०२३, योगेंद्र यादव यांचे देशकाल वाचले. कर्नाटक निवडणुकीचे भाकीत आणि त्याचे सार्वत्रिक निवडणुकीवर परिणामांत सत्ताधारी भाजपची पिछेहाट असा हिंदळणाऱ्या लोलकाचा एकक्कली कयास योगेंद्रजींच्या लेखात आहे. यापूर्वीच्या अनेक लेखात त्यांनी भारत जोडो यात्रेचे, राहुलच्या हिमंतीचे वारेमाप कौतुक केले आहे. पण या लेखात मात्र " यात्रेने प्रश्नही उपस्थित केले आहेत, गर्दीचे रूपांतर कायम प्रतिसाद, मतांमध्ये होऊ शकते का? " अगदी राहुलच्या सहभागाबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. असे अनेक वाक्ये लिहून संभ्रम निर्माण केले आहेत. एकीकडे भाजप जेडीएस युती, काँग्रेसला मुस्लिमांना गृहीत धरता येणार नाही म्हणतात. महाराष्ट्रतील सत्ता गेल्यानंतर निधीची कमतरता असलेल्या विरोधकांना किमान एका राज्यात सुस्थिती असणे , असे आक्षेपार्ह विधाने बरेच काही सांगून जाते. अशा अनेक विरोधाभासी वाक्यांनी नटलेल्या लेखास मात्र हास्यास्पद शीर्षक "कर्नाटक देशाला दिशा दाखविणार" दिले आहे. लेखक अनेक अंगांनी मोडलेल्या काँग्रेस विषयी सकारात्मक आहेत , पणं त्याच बरोबर विरोधात जाणाऱ्या भाजपची ११ राज्यात स्वतंत्र आणि ५ राज्यात युती सरकारे आहेत. म्हणजेच सर्वाधिक प्रतिनिधी निवडून येणारी महत्वाची राज्ये भाजपच्या अधीन असून याच जागांमधून सत्तेचा सारीपाट वर्षानुवर्षे खेळला जात आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात, भाजपचा कर्नाटकातील पराभव, दक्षिण भारतातून बाहेर पडण्याची सुरुवात वैगेरे वल्गना कितपत टिकावू ठरते हे पाहणे योग्य ठरेल. 

विजयकुमार आप्पा वाणी, पनवेल 

रविवार, २६ मार्च, २०२३

लेख (६९) २६ मार्च २०२३



 



मैया , नर्मदे हर !!        

                        (पूर्वइतिहास आणि परिक्रमा एक अनुभव) 

(१)

नवजात शिशुला न्हाऊ घालताना आई , आज्जी " गंगेश्च यमुने चैव गोदावरि सरस्वति । नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन् संनिधिं कुरु" हा श्लोक म्हणतच नर्मदे मैयाची पहिली ओळख करून आपल्यावर संस्कार होतात. पुढे शालेय शिक्षणात पश्चिम वाहिनी नद्यांतील, मध्य प्रदेशात उगम होऊन , महाराष्ट्र, गुजरात राज्यातून १३१२ किमी वाहणारी सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नर्मदा नदी आहे हे कळते. भगवान शिवाच्या शिवलिंगातून उगवणाऱ्या नर्मदेला रेवा, अमरजा, मेकलकन्या, रुद्रकन्या अशीही नावे आहेत. मध्य प्रदेशात लोकांच्या जीवनात नर्मदा नदीचे महत्वाचे स्थान असल्यामुळे मैया नावानेच संबोधित केले जाते . मैयाला विवाह प्रसंगी एका कटू प्रसंगास सामोरे जावे लागल्यामुळ, मैयाने स्वतःचा प्रवाह बदलवित्त पश्चिम वाहिनी होऊन कुमारी राहण्याचे व्रत घेतले अशी आख्यायिका आहे. चार वेदांपैकी मैयेस, सामवेद मानले जाते. मत्स्य आणि पद्म पुराणानुसार नर्मदा सर्वत्र पूजनीय आहे, मग ती खेड्यात असो वा अरण्यात. नर्मदा अपराध्याला नुसते बघून शुद्ध करते. जो कोणी माता नर्मदेची प्रदक्षिणा करतो त्याचे सर्व दु:ख आणि वेदना दूर होतात आणि मृत्यूनंतर ती व्यक्ती मोक्ष प्राप्त करून थेट स्वर्गात जाते.  

नर्मदा नदीला प्रदक्षिणा घालण्याच्या उपक्रमाला नर्मदा परिक्रमा म्हणतात. या परिक्रमेची सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर अथवा प्रबोधिनी एकादशी झाल्यावर होते. मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली होती अशी धारणा आहे. मार्कंडेय ऋषींनी नद्या न ओलांडता ४५ वर्षात ही परिक्रमा पूर्ण केली. परिक्रमेस ॐकारेश्वर हुन सुरुवात करता येते. परिक्रमा चालू असताना नर्मदेचे पात्र ओलांडता येत नाही. म्हणजे नर्मदेतून वाहणारे व निघणारे पाणी ओलांडणे निषिद्ध आहे, सदावर्तात शिधा घेऊन अन्न शिजवणे, किंवा ५ घरी भिक्षा मागून जेवणे, वाटेत मिळेल ते पाणी पिणे, जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करणे या पद्धतीने परिक्रमा करावी लागते. रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ नर्मदेची पूजा, स्नान, संध्यावंदन व नित्य पाठ करून, परिक्रमा दरम्यान सतत ॥ॐ नर्मदे हर॥ या मंत्राचा जप व नामस्मरण केले जाते. पायी केल्यास ही यात्रा ३ वर्षे ३ महिने आणि तेरा दिवसात पूर्ण होते असा समज आहे. यासाठी एकूण २६०० किलोमीटर अंतर पायी चालावे लागते. आता भौगोलिक बदलांमुळे आणि आधुनिकीकरणामुळे १३१ दिवसात परिक्रमा पूर्ण होते. 

उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमा : तिलकवाडा (गुजरात) येथे नर्मदा नदी उत्तरावाहिनी होते आणि पुढे रामपुरापर्यंत ती उत्तरावाहिनी राहते आणि नंतर तिचा प्रवाह पूर्ववत होतो. तिलकवाडा-रामपुरा-तिलकवाडा या २१ किलोमीटरच्या टप्प्यावर नर्मदेच्या तीरावरून केल्या जाणाऱ्या परिक्रमेला उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमा म्हणतात. ज्यांना संपूर्ण परिक्रमा करणे शक्य नाही असे भाविक उत्तरावाहिनी प्रदक्षिणा करतात. तिलकवाडा ते रामपुरा या परिसरात फक्त चैत्र महिन्यात ही उत्तरवाहिनी परिक्रमा केली जाते. जो कुणी चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करेल, त्याला संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य मिळेल, असे नर्मदा पुराणामध्ये व स्कंद पुराणामध्ये म्हटले आहे.

ही परिक्रमा तिलकवाडा येथून उत्तर तटावरून सुरू होते, उत्तर तट संपल्यावर नावेने समोरील तीरावर म्हणजे दक्षिण तट रामपुरा येथे यावे लागते. येथे आल्यावर प्रथम घाटावर स्नान करून तेथील नर्मदामैयाचे जल घेऊन घाटावरील तीर्थेश्‍वर महादेव मंदिरात शंकराच्या पिंडीवर अर्पण करून दक्षिण तटावरून परिक्रमा चालू होते. दक्षिणतट पूर्ण झाल्यावर नावेने पुन्हा उत्तर तटावर आल्यावर स्नान करून परिक्रमेची समाप्ती होते.

(२)

" परिक्रमा एक अनुभव "

चैत्र शु चतुर्थी शके १९४५ , शनिवार दि २५ मार्च २०२३ रोजी, या अमृत क्षणांचे पुण्य असणाऱ्या परिक्रमा करण्याचे भाग्य मिळाले. सौ सुवर्णा आणि मी , शुक्रवार दि २४ मार्च रोजी गुजरातच्या भरूच अंकलेश्वर पासून ७० किमी अंतरावर नदीच्या दक्षिण तीरावरील मांगरोल गावात रात्रीचा मुक्काम केला. शुक्रवारी भल्या पहाटे अमृतवेळी ३ वाजताच उठून आवराआवर केली आणि “कर्दळीवन यात्रा पुणे” स्वयंसेवकांच्या मार्गदर्शानुसार पहाटे ४ वाजता सोबत असलेल्या यात्रेकरूंसोबत "नर्मदे हर " उच्चारीत उत्तरवाहिनी परिक्रमेस प्रस्थान करण्यात आले'. पहाट होण्यास एक प्रहर उरला होता, गाव अजून निद्रेच्या कुशीत विसावलं होत. सुखावणारा गार वारा अंगाला स्पर्श करून जात होता . चैत्र शु चतुर्थी असल्या कारणाने लोभस चंद्राची कोर चार पाच ग्रहांमध्ये ठळक दिसत होती. सध्या गुरु, शुक्र, शनी आणि मंगळ हे सारे ग्रह पृथ्वी जवळून जात आहेत असे वाचनात आले होते , आकाशातील तारकांच्या पुंज्यात शुक्र आणि गुरु उघड्या डोळ्यांनी दिसतात असे मानून घेतले, पण वेळ दवडायचा नव्हता, महत्व चालण्याला होते, म्हणून तारका दर्शनाच अल्पसा लाभ घेत मांगरोल गावाबाहेर कूच केले . आता जास्तच गडद अंधार जाणवायला लागला होता. अर्थात नेहमीप्रमाणे काहीतरी विसरणे यात टॉर्च राहिली आणि मोबाईलच्या टॉर्च वर चालायला सुरुवात केली. थोडीशी डांबरी सडक असल्याकारणे , सेवेकरांच्या दुचाकी फटफट आवाज करीत थोडासा उजेड दाखवून जात होत्या. सडकेच्या दुतर्फा बाभळीची, विलायती चिंचेची आणि गर्द दाट रानटी वेलींनी मढलेली पांदी दिसत होती , नुकतेच दव पडू लागल्याने एक वेगळाच सुगंध दरवळू लागला. तसे दैनंदिन चालण्याचा थोडाफार सराव आहे , पण वारीचा, परिक्रमेचा फारसा अनुभव पाठीशी नव्हता, पण सर्वच साधकांसोबत चालताना काहीतरी विशेष चालायचे आहे असे दोघांना वाटू लागले , पहिल्या तीन किमी अंतरातच चालणाऱ्यात अंतर पडू लागले, दोघ मोबाईल टॉर्च सोबत अंधारात पुढे पुढे सरकू लागलो , थोडे फार एकटे वाटू लागताच , परिक्रमा वासीयांच्या सेवेसाठी आधीच तप्तर असलेले सेवेकरी खुर्च्या टेबल , छोटासा मंडप टाकून चहा , कुरमुरे चिवडा, फळे खाण्यासाठी आग्रह करू लागलेत . इथूनच यांच्या सेवेची तप्तरता दिसून आली . पुढे नर्मदे तिरी आयुष्य व्यतीत केलेल्या साधू संतांचे आश्रम, धर्मशाळा दिसू लागल्यात . या पुढे प्रत्यक्ष नदीतीरी पायऱ्यांवरून उतरलो आणि अंधुकश्या उजेडात एवढ्या उन्हाळ्यातही वाहणारे पाणी, अथांग पसरलेले विस्तीर्ण पात्र चमकत होते आणि मैयाचे दर्शन झाले. साऱ्याच प्रवाहात मैयाचे लांबलचक विस्तीर्ण पात्र असून, नावे शिवाय मैयाच्या पैलतीरी जाता येत नाही, असे सांगण्यात आले . नर्मदेचे गोटे म्हणजे काय आणि त्यांच्या सर्वत्र पसरण्यामुळे चालताना पाय अडखळत होते. आता मैयाच्या तीरावरून प्रवास सुरु झाला होता . दूरवर मिणमिणते दिवे दिसायचे पण गडद अंधारात त्यांचे प्रत्यक्ष ठिकाण कळत नव्हते . दिड दोन किमी चालल्या नंतर फटफट फट नावेच्या इंजिनाचा आवाज ऐकू येऊ लागला आणि पैलतीराला जाण्याचे वेध लागू लागले , पण अंधारात उमगत नव्हते, चालणे चालूच होते , त्या मिट्ट अंधारात मोबाईलच्या टॉर्चच्या मर्यादित उजेडात, नावे कडे जाणारा दिशा दर्शक ध्वज दिसला नाही आणि पुढे चालू लागलो', का कुणास ठावूक मैयाने जाणीव केली आणि चुकल्या सारखं वाटलं. सोबतीच्या साधकांनी मागवून येण्याऱ्या साधकांच्या सहाह्याने नावेपर्यंत नेले .इथे पहिला टप्पा संपला होता. अंधारातच नावेने पैलतीरी वसलेल्या तिलकवाडा उत्तर तटावर जलप्रवासास सुरुवात झाली. अथांग पसरलेल्या मैयाच्या कुशीतून जाताना कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते. सात आठ मिनिटांच्या प्रवासानंतर घाटावर उतरविण्यात आले . बाराही मास मैयाचा प्रवाह सरु असतो, त्यामुळे निसर्गानेच मैयाच्या तीरावर दुतर्फा छोट्या मोठ्या डोंगरांच्या कडा उभ्या केल्या आहेत. संगमरवरी खडकांमधून उगम पावत नदी नर्मदाघाटी म्हणून ओळखले जातात . अशाच एका चाळीस पन्नास फूट उंच डोंगरातून वाट काढीत तिलकवाड्याच्या तीरावर पोहोचलो . वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबे स्वामी (मूळ : माणगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग - वासुदेवानंद सरस्वतींना दत्तसंप्रदायात श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानले जाते, नर्मदा मैयाच्या ओढीने स्वामींनी आपले नर्मदा जिल्ह्यातच कार्य क्षेत्र ठेवले आणि त्यांनी श्री गरुडेश्वर येथे सन १९१४ साली समाधी घेतली) तर स्वामींच्या आश्रमात , श्री दत्त मंदिरात उत्तरवाहिनी परिक्रमेस आलेल्या साधकांची लगबग सुरूच होती. श्री दत्त दर्शनाने परिक्रमेस सुरुवात केली आणि चालण्याचा दुसरा टप्पा सुरु झाला . सप्तमातृका मंदिर , गौतमेश्वर मंदिर , आत्मज्योती आश्रम , मैया नर्मदा मंदिर, या मंदिरांचे दर्शन घेत तिलकवाडा गावातील चालणे सुरु होते . गाव मात्र अतिशय जुने होते , जुन्या पद्धतीच्या हवेली, दुमजली इमारती, लाकडाच्या नक्षीकामाच्या दरवाजे खिडक्या, अजूनही साक्ष देत आहेत . थोडे अंतर चालल्यानंतर उपनदी वरील पुलावरून मैया संगमाचे देखणे रूप दिसले . इथूनच कमी अधिक अंतरावर असलेल्या साधकांच्या सेवार्थ अल्पोपहार , भोजन छत्रांना सुरुवात झाली . रस्त्याच्या दुतर्फा शेती लक्ष वेधून घेत होती . मैयाच्या खोऱ्यातील काळ्या जमिनीत केळीची , पांढरे सोने (कपाशी) ची श्रीमंती उठून दिसत होती. मध्येच मका, डाळिंबांची लागवड शेतीच्या खुशहालीची साक्ष देत होती . श्री मणी नागेश्वर महादेव मंदिर , भवानी माता मंदिर , मुनी आश्रम , आणि स्वामी विष्णुगिरी महाराज आश्रमानंतर मैयाच्या उत्तर तीरावरील पात्रातील मार्गावर तिसरा टप्प्याची सुरुवात झाली . उजव्या हातास मैयाचे विशाल पात्र , पायी चालण्यासाठी छोटीसी पायवाट आणि डाव्या बाजूस खडकाळ मुरुमांची रांग उभी होती . चालताना लक्षात यायला लागले होते, हा टप्पा दिसायला सरळ लक्षाचा आहे परंतु तितकाच कठीण आहे, इथे आसपास सेवार्थी छत्र नव्हतीच, फक्त चालणे चालणेच होते . मजल दर मजल चालणे काय असते ते जाणवत होते. सकाळीच चार वाजता चालणे सुरु केले असल्याने इथे सतरा अठरा किमी अंतर पूर्ण होत, आठ साडे वाजले होते . एक नमूद करायला विसरलो होतो , खरे तर चालताना ठराविक अंतरावर लहान लहान मुले "नर्मदे हर " "नर्मदे हर " नामोच्चर करीत असतात. साधक स्वतः जवळील खाऊ वैगेरेचे वाटप करतात , पण त्याच बरोबर "नर्मदे हर " "नर्मदे हर ", नामोच्चार आपोआप श्रवण होतो आणि म्हटलाही जातो. तिसरा टप्पा अखंड साधारणतः सहा ते सात किमी, हा टप्पा संपताना शारिरीक क्षमतेची सुद्धा जाणीव करून देतो . नुकत्याच उगवत्या रवी राजाचे किरणे मैयाच्या पाण्यावर चमकायला सुरुवात झालेली असतेे. तशातच नावेत नंबर लागत, दक्षिण तीरावरील घाटावर उतरविले  इथे, स्नान संध्या विधी केले जातात . तिसऱ्या टप्प्यातील चालल्याने येथील सेवा अन्न छत्रात मिळलेला प्रसाद पटकन खाल्ला जातो. नंतर पुन्हा एकदा १८० कोनातील चढ चढल्यावर शिवलिंग मंदिर , संत निवासातील रणछोडदास (विठ्ठलाच्या रूपातील) कृष्णाची अप्रतिम मूर्ती , स्वामी रामानंद सरस्वती यांचा आश्रम आणि पुढे गोपालेश्वर महादेव मंदिर , मांगरोल गावाची डांबरी सडक मार्गाने पुन्हा अंतिम टप्प्यावर आलो. वाटेत, अत्यंत पुरातन साधारणतः चारशे वर्षांपूर्वीची वटवृक्ष (ज्यांच्या पारंब्या जमिनीला टेकल्यात), अश्वत्थ (पिंपळ) उभे आहेत. गावातील वातावरणात चालताना गायी गोठ्याच्या आतील घुंगराचा आवाज, मातीच्या घरातील चुलीचा धूर सारे मनास जाणवत होते , अंतिम टप्प्यातील जिथून प्रस्थान केले ते स्थान आले आणि मानस प्रचंड आनंद झाला. आश्रमाच्या बाहेर हालचाल जाणविली नाही, त्यामुळे आपणच पहिले या आविर्भात आत आलो तर काय, आमच्या तास भर आधी परिक्रमा पूर्ण करून आलेल्या पुण्याचा महिलांचा ग्रुप आराम करीत बसला होता. सकाळी चार ते सकाळी साडे नऊ अशा साडे पाच तासातील एकवीस किमी परिक्रमेची सांगता झाली. प्रत्यके टप्प्यात वेगवेगळे साधक होते त्यांच्या चालण्याचा वेगात आपणास जोडून घ्यावे लागत होते. एक लक्ष्य पूर्ण झाल्याचे समाधान मिळाले. या यात्रेतच स्टॅच्यू ऑफ युनिटी (सरदार वल्लभ भाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा ) , श्री वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबे स्वामी मठ, गरुडेश्वर दत्त मंदिर पाहण्याचे भाग्य लाभले. परिक्रमा प्रस्थानापूर्वी आश्रमातील गुरुजींनी संकल्प करून घेतला होता, त्यात परिक्रमा सफल हो, मैया कुमारिका आहे, म्हणून प्रत्यक्ष कुमारिकांचे पूजन , मंदिरात दक्षिणा , गोमातेचे पूजन, या संकल्पपूर्तीत मनाला समाधान मिळाले . अर्थात हे सारे झाले कर्दळीवन यात्रा, पुणे, त्यांचे स्वयंसेवक , तिन्ही बस मधले पुणे, नाशिक, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील सर्व साधक यांचे मनःपूर्वक आभार . या पुढील दत्त यात्रेत या साऱ्यांची पुन्हा भेट होवो हि मैया चरणी प्राथर्ना 

विजयकुमार वाणी , पनवेल

(सोबत सौ सुवर्णा वाणी ) 


 


 


 


 


 


 


 


 



शुक्रवार, १७ मार्च, २०२३

लेख (६८) १८ मार्च २०२३


वडाळे तलाव -  सुर पनवेलचा


ऐतिहासिक शहर पनवेलच्या सौंदर्यात नाकातल्या नथी सारखा लांब गोलाकार वडाळे तलाव, आदिनाथ बल्लाळेश्वर, दिड शतकांचे धुतपापेश्र्वर, बांठीया हवेली, व्हिके हायस्कूल संकुल, मोक्षाचे स्थान वैकुंठ धाम, मुंबई पुणे महामार्ग, श्रींचे विसर्जन स्थळ,  विविध दुर्मिळ पक्षांचे माहेरघर अशा अनेक अंगांनी पनवेलच्या सीमांवर पहुडलेला.   शहराचे सौंदर्य खुलविण्यासाठी तलावाला तटबंदी करून नागरिकांना चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅकची निर्मिती करतानाच ,  ठराविक अंतरावर गोल काठड्यांचे व्ह्यू पॉइंट सह, एक सुंदरसा पायऱ्यांच्या घाटाची निर्मिती करण्यात आली.  विद्युत रोषणाईने घाटाचे, तलावाचे , पर्यायाने शहराचे सौंदर्य सायंकाळी अधिक खुलून दिसते.  अशा वातावरणात पनवेलकर तलाव परिसरात मुक्त पणे फिरतात, विश्रांती घेतात.
पण या साऱ्यासोबतच पनवेलकरांनी संस्कृतीची मूल्ये जपत, भल्या पहाटे संगीताचा आस्वाद घेत असतात. सप्ताहात , एक दिवस संगीत गायनाचे मोहून जाणारे स्वर शिंपणारे प्रतिभावंत कलावंत आपल्या गायनाने सारा परिसर भारावून टाकतात.  आज पर्यंत अनेक गायकांनी आपल्या परीने मैफिली सजविल्यात. त्यातली आजची मैफल जेएनपीए चे श्री शेखर माळवदे यांनी रंगविली. तबला साथ संगतीला कु.जाई ठाणेकर. श्री शेखरने, पहाटेच हार्मोनियम वरच्या पहिल्याच सुराने तळ्यातल्या पक्षांची किलबिल सुरू होऊन, सुरातल्या गोड स्वरांनी आलापित तळ्यात न्हाऊन घेऊ लागले.  मैफिलीचा आरंभ, भैरवीने केला. नंतर आदिदेव शिव शंकर, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा , पंडित अभिषेकी बुवांचे अभिर गुलाल उधळीत रंग, काटा रुते कुणाला, माझा भाव तुझे चरणी, हरी भजनाविन काळ घालवू नको रे, कबीर भजन चादरिया झिनी रे झीनी, अशा मराठी संगीतातील अजरामर पणं म्हणण्यासाठी कठीण अशा गीतांनी मैफिल रंगविली.  मैफलीची सांगता कुसुमाग्रजांच्या सर्वात्मका सर्वेश्र्वराने , ह्या गीताने सूर्योदयाने सारा परिसर उजळून निघत उपस्थितांना भारावून टाकले. शेखरच्या सादरीकरणात कमालीचा आत्मविश्वास होता, पहिल्या सुरापासूनच आवाजातील गोडवा जाणविला.  मुक्त आभाळाच्या व्यासपीठावर अलगदपणे सुरांची मुशाफिरी करीत उपस्थितांना मॉर्निंग वॉक थांबविण्यास भाग पाडले. कु जाईची तबल्याची साथ तर परिपक्व अभिजात संगीताची जाण असल्याचे द्योतक होते. लय, ताल, ठेका अलगद हातातून बोटातून तबल्यावर उतरत होते. एकंदरीत नवीन वर्षाच्या पूर्वेला , पापमोचनी एकादशीस पनवेल महानगरातील श्री शेखर याचे गायन आणि जाईचे तबला वादन आज पनवेलकरांना सुखावून गेले.  


विजयकुमार आप्पा वाणी, पनवेल 

गुरुवार, १६ मार्च, २०२३

लेख (६७) १७ मार्च २०२३

 


दिनांक १७ मार्च २०२३ महाराष्ट्र टाइम्स "अवकाळीचे तप्त अश्रू" संपादकीय वास्तविक परिस्थितीची जाणीव करून देणारे आहे. राज्यात वातावरणातील बदल, वेळी अवेळी पडणारा पाऊस, उष्णतामान, जमिनी, पीक पद्धती, या साऱ्यामुळे आणि अनिश्चित पीक उत्पादनामुळे, शेतीच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. शासनाने दिर्घ कालीन योजना आखून कठीण परिस्थितीतून बळीराजाला बाहेर काढणे गरजेचे आहे. बळीराजाच्या कायम स्वरुपी उत्पन्नासाठी, त्या, त्या भागातील गरजेनुसार योजना आखणे जरुरीचे आहे. खरीप पिकांचे नियोजन, रब्बी हंगामाचे नियोजन, उन्हाळी पिक वाढीच्या महत्वाच्या अवस्था, गरजेनुसार पिकांचे पाणी व्यवस्थापन, सिंचन पद्धतीचा अवलंब, विहीर पुनर्भरण, यासह अनेक योजनांची अंमबजावणी होणे महत्वाचे आहे. ग्रामपंचायतासाठी किंवा १०० हेक्टर परिसरासाठी, कृषी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, त्यांच्या साहाय्यासाठी पदवीधर बेरोजगार तरुणांना माहिती संकलनासाठी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीत सामावून घ्यावे. त्यांच्या अभ्यासानुसार पीक लागवड, उत्पादन ते विक्री यासाठी साखळी बनवून प्रत्येकास आवश्यक पीक उत्पादनावर लक्ष्य देणे शक्य होईल जेणेकरून बळीराजा या संकटातून बाहेर येईल. 


विजय आप्पा वाणी, पनवेल. 

लेख (६६) १६ मार्च २०२३

 



लोकशाही माझी मी लोकशाहीचा ! 

दिनांक १६ मार्च २०२३ लोकसत्ताचे संपादकीय " लोकशाहीचे पालकत्व" वाचले. संपादकीयात एकूणच संसद ते परदेशातील वक्तव्ये यांचा समाचार घेण्यात आला आहे. अनेक देशांमध्ये सुद्धा लोकशाही अस्तित्वात आहे. तेथील राजकारण्यांनी, त्यांच्या देशातील घडामोडींचा, परदेशात जावून अनादर केल्याचे कधी वाचनात येत नाही. भले त्या देशात कितीही अंतर्गत कुरबुरी असोत. अमेरिकेत भांडवलशाही अर्थव्यवस्था असूनही, २००८ आणि आताची बँकिंग क्षेत्रातील दिवाळखोरी, अर्जेंटिना, ग्रीस, रशिया , ब्रिटन , युरोपातील राज्ये यांच्या घसरलेल्या अर्थ व्यवस्थेवर, यांचे प्रतिनिधी देशोदेशी जावून वाईट प्रचार प्रसार करीत नाहीत, उलट अर्थ व्यवस्था वाढीसाठी उपाय योजनेसाठी सत्ताधाऱ्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या सहाय्य करीत असतात. खरे तर लोकशाहीचे यश भैगोलिक क्षेत्रफळ, कमी लोकसंख्या, शैक्षणिक, आर्थिक स्थिती यावर अवलंबून असते. हे सारे माहिती असूनही, आपले राजकारणी, तज्ञ, विचारवंत, तारांकित व्यक्ती, कोणताही मागचा पुढचा विचार , अभ्यास, विश्लेषण न करता, केवळ विरोधाला विरोध, प्रसिद्धी लालसेपोटी, पुरस्कारांची वापसी, देशात राहणे धोक्यात, परिणामांची पर्वा न करता तारे तोडत देशांतर्गत वाद निर्माण करतातच, पणं अन्य देशात जावूनही आपल्या ज्ञानाचे दीप उजळून येतात. बरं परदेशात यांची वक्तव्ये कुणासमोर असतात तर ती, उदरनिर्वाहासाठी परदेशातील नागरिकत्व स्वीकारलेले, की ज्यांना स्वदेशाशी काही देणे घेणे नाही. त्यांच्यासाठी प्रथम प्राधान्य त्यांचा देश आणि त्यांच्या संस्थेची प्रगती. मग अशांसमोर देशाचे विदारक चित्र निर्माण का करावे ? त्यांच्याकडून कोणत्या अपेक्षा आहेत, की ज्यांना देशाची स्थिती सांगितली जावी. याचा सांगोपांग विचार, ना सत्ताधारी, ना विरोधी पक्ष करतात. संसदीय लोकशाहीचा विचार केला तर, केंद्रात, राज्यात, अधिवेशन काळात पटलावरिल प्रश्न सोडविणे याचा प्राधान्यक्रम सोडून, आरोप प्रत्यारोप , हक्क भंग, चौकशी, गदारोळ, सभात्याग याचा वापर करून संसद सभा बंद पाडून, यांची लोकशाही कधीच धोक्यात येत नाही. पणं ती येते, केवळ चौकशी लावल्याने, बँका बुडल्याने, कायद्याचा वापर केल्यानेच. गेल्या ७५ वर्षांच्या कालावधीत अंदाजे १२ हजाराच्या वर संसद सदस्य आणि अर्धा लाखाच्या वर होऊन गेलेले आमदार यापैकी दोन तृतीयांश सदस्यांचे मार्गक्रमण असेच चालत आले आहे. वर्तमानकाळात तर लोकशाही वाचविण्याच्या नादात, एकमेकांवरील कुरघोडीत कोणत्याही थराला जावून चारित्र्यहननाचे प्रकार वारंवार घडत आहेत. लोकशाही संस्कृतीचे कोणतेही सोयर सुतक यांना राहिले नाही. संपादकांनी वेळोवेळी घडलेल्या घटनांचा विचार करून, संदर्भ देऊन, समुदेशनपर लेख लिहावे, वाचकांनी वाचावे, प्रतिक्रिया द्याव्यात. पणं लोकशाही या साऱ्यांच्या मुठीत आहे, तरीही कायम धोक्यातच राहते. आपण केवळ बालपणाची देशाची प्रतिज्ञा घोळवत रहात, लोकशाही माझी मी लोकशाहीचा म्हणत गोडवे गात रहावे.

विजयकुमार आप्पा वाणी, पनवेल. 

गुरुवार, ९ मार्च, २०२३

लेख (६५) ०९ मार्च २०२३

 




फॅक्टरी परावर्तित गोडाऊन !

दिनांक ९ मार्च २०२३ लोकसत्तातील " हरिश्चंद्राची फॅक्टरी" संपादकीय वाचले. भाजपच्या स्थापनेआधी जनसंघाचा इतिहास पाहता ६७ मध्ये युतीचे राजकारण करून मध्यप्रदेश, बिहार व उत्तरप्रदेश मध्ये सरकारे स्थापन केली. १९७७ साली लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. १९८० पासून अनेक चढ उतराना तोंड देत सत्ता मिळवित, मोदी कालाचा प्रारंभ होऊन १४ मध्ये एनडीए माध्यमातून सत्ता हस्तगत केली. राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता,लोकशाही, गांधी समाजवाद, 'सर्वधर्म समभाव' यांना गुंडाळून ठेवत सत्ता हस्तगत करण्याचा चंग बांधला गेला. सत्ता मिळत गेल्यामुळे, राज्याराज्यांतील सत्तेचा मोह सुटू लागला. जिथे सत्ता नाही तिथे वर्षानुवर्षे सत्तेत असणाऱ्यांनी थोडीफार फळे चाखली होती ते यांना दिसू लागले आणि जास्त विरोध दर्शविला तर ससेमिरा अस्त्र लावल्याने खरे इनकमिंग सुरू झाले. राजकारणाचा, सत्ता हस्तगत करण्याचा एक डाव असू शकतो आणि त्याचा लाभ घेत सत्ता संपादन होऊ लागले. नऊ विरोधी पक्षांच्या म्हणण्यानुसार सरकारी यंत्रणांचा वापर सुड भावनेने होत आहे शिवाय जे त्रस्त होऊन फॅक्टरीत आलेत, त्यांच्यावरील कारवाई थांबविली गेली. जसे विरोधी त्रस्त आहेत, त्याच कारणाने मुळ भाजपवासीही त्रस्त आहेत. इनकमिंग मुळे फॅक्टरीत आधीच पिढ्यानपिढ्या असलेले ७० टक्के पदाधिकाऱ्यांवर अन्याय वाढीस लागला आहे. फॅक्टरीचे आता गोडाऊन झाले आहे. कॅडर मास पक्ष गोंधळलेल्या स्थितीत आहे. त्याचे सूक्ष्म परिणाम पोट निवडणुकीत दिसून आलेत. विरोधातही काही आलबेल नाही, नऊ पक्षात मुख्य काँग्रेस नाही. अजून भारतजोडो यात्रेतून बाहेर यायला तयार नाहीत. राहुल अजूनही बेछूट आरोपांची मालिका थांबवायला तयार नाहीत. आपचे काँग्रेसचे जमत नाही. तेलंगणाचे केसीआर यांनी राष्ट्रीय राजकारणात महाराष्ट्रातून केलेला प्रवेश, सेना (उद्धव गटास) शून्यातून परत उभे राहायचे आव्हान, राजस्थानातील सुंदोपसुंदी, असे अनेक कच्चे पक्के दुवेच फॅक्टरीची शक्तिस्थळे आहेत. त्यांच्यापुढे फक्त एकच कार्यक्रम असा की, फॅक्टरीतल्या गोडाऊन रुपी शक्तीला एकत्र बांधून करेक्ट कार्यक्रम आखायचा, अन् त्यातही यशस्वी ठरले तर मुख्य विरोधी पक्षांनी प्रादेशिक पक्षांसोबत पंचायत, पालिका, पोट निवडणुकीतल्या विजयावर टेंभे मिरवावे हेच बाकी असेल. मग त्यास आता गोडाउनचे यशच म्हणावे लागेल. 

विजयकुमार आप्पा वाणी, पनवेल  

लेख (६४) ०८ मार्च २०२३


मी , मीच . . . .

मीच मुलगी, मीच कन्या, मीच बालिका, मीच स्त्री, मीच बाई या सर्वनामाने, सर्वसाधारण समाजात, अहं,  जगात ओळखली जाणारी मी.  मीच मला जन्म देणारी, मीच मला वाढवणारी, मीच मला ओळख देणारी, अशी अनेक रूपे या विधात्याने मला बहाल केलीत.  आदिनाथाची पार्वती ते पृथ्वीतलावावरील एखाद्या गरीब कुटुंबातील द्रूपदा पणं मीच.  या विविध रुपात मी, मला वेगवेगळ्या पद्धतीने वागविते.  कुठे माझा सन्मान, तर कुठे माझा अपमान.  काही कार्यात पहिले स्थान तर काही ठिकाणी दुय्यम स्थान.  मीच माझे कौतुक करते, मीच मला आनंद देते, मीच माझा आदर करते आणि तीच मी माझा दुस्वास करते,  मीच मला दुःख देते, मीच माझा अनादर करते. 
होय, आदिमाया शक्ती धारण करणारी, दुर्जनांचा संहार करणारी दुर्गा,  सत्यवानाचा प्राण वाचविणारी सावित्री, ज्ञानदेवाची मुक्ताई, राजमाता जिजाई, पुण्यश्लोकी अहिल्याबाई, शिक्षणाचे धडे देणारी सावित्रीमाई, भारताचे सार्वभौमत्व सांभाळणारी इंदिरा, कॉम्पुटर युगात स्वतःचे मालकीचे स्थान घट्ट रोवणारी सुधा मूर्ती, अशा प्रत्येक युगात,शतकात, दशकात, वर्षात, महिन्यात, पंधरवड्यात, सप्ताहात, नव्हे रोजच कर्तबगार रत्ने जन्माला येत होत्या, आहेत आणि येतील.  पण ? माझ्या घरी नको ती दुसऱ्याच्या घरी आली पाहिजे हा विचार करणारी मीच, तिचा जन्म नाकारणारी मीच, तिच्यावर संस्कार करताना हात आखडता घेणारी मीच, तिला दुय्यम स्थान देणारी मीच, तिच्या आकांक्षा, महत्त्वाकांक्षा यांना मुरड घालणारी मीच, तिला सून म्हणून आणताना तिच्यावर बंधन घालणारी मीच, तिला जास्तीत जास्त उपहासात्मक वागणूक देणारी मीच, तिच्या पोटी मीच आली तरी तिला अव्हेरणारी, अस्तित्व नाकारणारी मीच. इतकंच काय वास्तविकतेच्या दुनियातील सर्वच वाहिन्यांच्या मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये, छोट्या छकुली ते आजीवर अन्याय करणारी मीच. 
मग कुणा फुकाचा दोष का द्यावा, त्यातला त्यात महिला सक्षमीकरण, सबलीकरण, लेडीज फर्स्ट, सत्तेत तेहत्तीस टक्के आरक्षण, अबोली रिक्षा, बस, ट्रेन मध्ये बसण्यास आरक्षण,  बाळंतपणाची रजा, हिरकणी कक्ष,माझे रूप छान दिसण्यासाठी ड्रेस साडी डिझायनिंग मध्ये लक्षावधी रंगसंगतीचे पेहराव, केशरचना, छान पाककृती करणारी मी पणं जागतिक पातळीवरील आधुनिकता दाखविणारे  बल्लवाचार्य (शेफ),
ब्बाबा,  अंतता एकच सर्वार्थाने काळजी घेणारे हे सारे राम, शंकर, नारायणच असतात. तरी त्यांचाच दुस्वास. आपण मात्र आपल्याच कर्तुत्वाने, वर्तणुकीने, कार्याने आपलेच नुकसान करून घेत आलो आहोत. म्हणून महिला दिन साजरी करताना माझी स्वतःची, स्वत:बद्दलच तक्रार आहे. आता हे सारे ऐकल्यावर , मी नाही बाबा त्यातली, मी स्वतंत्र्य विचारांनी वाढले, माझ्या मुलींस , सूनेस, हवं तेवढे स्वातंत्र्य दिले, देते, हे सारे होते ते तीच्याघरी असे म्हणून पुन्हा मीच माझ्याकडेच बोट दाखविले हेच मुळी मी विसरले. 
महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !!!

शुक्रवार, ३ मार्च, २०२३

लेख (६३) ०३ मार्च २०२३

 


गण गण गणात बोते🙏🙏
फाल्गुन एकादशी निमित्त संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज शेगांव यांच्या दर्शनाचा योग आला.  शेगावची माऊली म्हणजे साऱ्या विदर्भाची पंढरी, नित्य नियमाने येणाऱ्या भाविकांची येथे बाराही मास दर्शनासाठी आस असते. मुंबई, पुणे, नाशिक शहरातील भक्त मंडळी तर जोडून सुट्ट्यांचा लाभ घेत तर विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मंडळी शेती, व्यवसायातून सवड काढून महाराजांच्या दर्शनाला येत असतात.  मडगाव नागपूर साप्ताहिक विशेष गाडी शेगाव येथे थांबा मिळाल्यामुळे दर्शनास येणे सोयीचे झाले.  आमच्याच कंपार्टमेंट मध्ये मडगावचे कुटुंब होते, साहजिकच गप्पांमध्ये तेही महाराजांच्या दर्शनाला येत होते. देसाई कुटुंब, त्यांच्या आईने वयाच्या १४ व्या वर्षी शेगावी येऊन दर्शन घेतले होते. आज ४५ वर्षांनी येणे झाले.  संदर्भ असा की, महाराजांचे भक्त दूरवर आहेत, त्यांच्यावर महाराजांची कृपा आहे, म्हणूनच भक्तांना भेटीची ओढ कायम असते.  द्वादशीच्या माऊलींच्या दर्शनानंतर, दोन ८२- ८५ वर्षीय आजी महाराजांच्या दर्शनानंतर प्रदक्षिणा घालताना भेटल्यात. कमरेत वाक आला तरी, महाराजांच्या निस्सीम भक्तीची ओढ त्यांच्या डोळ्यात, चालण्यात होती.  पाहिल्याबरोबर त्यांना भेटण्याची आतुरता लागली.  एक आजी बुलढाणातील खेडे गावच्या तर दुसऱ्या आजी मल्हारा, परतवाडाच्या, नगझिरे कुटुंबातील त्यांचा नातू दर्शनासाठी घेऊन आला होता.  या साऱ्यांची महाराजांप्रती असलेली श्रद्धा, भक्ती पाहून मन अचंबित होते, ओलावून जाते. यांच्या भक्तीतून परमार्थाचा रस वहात असतो. कर्ता करविता तोच, आपण मात्र निमित्त, फुकाचा अभिमान बाळगत मी, आम्ही, आपण, तुम्ही, तुमचे करत सार्थ अभिमान बाळगत असतो.  गण गण गणात बोते.🙏🙏

बुधवार, १ मार्च, २०२३

लेख (६२) ०३ मार्च २०२३



मुखभंगास सारेच जबाबदार !!

२ मार्च २०२३ च्या लोकसत्तातील "मुखपत्रांचा मुखभंग!" वृत्तपत्राचे महत्व अधोरेखित करणारे संपादकीय वाचले. आपल्या राज्याचाच विचार केला असता, स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्योत्तर आणि नंतर प्रत्येक दशकात वृत्तपत्र माध्यमात बदल घडलेले आहेत. संपादकीयात म्हटल्याप्रमाणे सत्ताधाऱ्यांच्या आडोश्यास राहून भलामण करणारी वृत्तपत्रे समाजाला दिसत नाही असे नाही. वर्षानुवर्षे राजकीय पक्ष सत्तेत असल्यामुळे अशा वृत्तपत्रांचे सुगीचे दिवस होते. परंतु आणीबाणी नंतर गेल्या चाळीस वर्षात अनेक सत्तांतरे झाल्यामुळे अशांची पंचाईत होऊ लागली. जो काही कार्यकाळ सत्ताधाऱ्यांच्या सानिध्यात मिळू लागला, त्यावर चमकणे आणि उर्वरित काळात त्या पक्षाच्या शिरस्थ नेत्याच्या माध्यमातूनच प्रतिस्पर्ध्यांच्या विरोधात रान उठविणे होऊ लागले. यात बदल न झाल्यास प्रतिस्पर्ध्यांच्या विरोधात अन्य वृत्तपत्रात छापून आलेले मथळे स्वतःच्या इ माध्यमावर टाकण्याची सुद्धा वेळ यांनी आणली आहे. सामाजिक भान जपत अन्य वृत्तपत्रे काम करीत असतानाच, राजकीय पक्षांची स्वतःचीच वृत्तपत्रे आकारास येऊ लागली आणि त्यातून कायमच विरोधातील सुर आवळला जावू लागला. विरोध तत्वाला, वृत्तीला आणि फारतर वागण्याला असावा, परंतु काही वृत्तपत्रांनी सत्ताधाऱ्यांच्या लालसेपोटी गोबेल्स निती वापरून काहींचे वैयक्तिक आयुष्याचे नित्य नियमाने धिंडवडे काढून त्यांना आयुष्यातून संपविल्याची उदाहरणे आहेत, यात कुठेच पत्रकारिता, सामाजिक भान याची तत्वे पाळली गेल्याचे दिसून येत नाही. सध्याचाच विचार केला तर, सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत घेतलेले निर्णय चुकीचेच आहे, त्यांचा प्रत्येक निर्णय चुकीचाच आहे, असेच बिंबविले जाते. यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मत प्रदर्शित करणे म्हणजे पत्रकारिता आहे का खरंच चुकीचे निर्णय आहेत हेच कळेनासे होते. खरेतर बाळशास्त्री जांभेकरांची पत्रकारितेची परंपरा जपणाऱ्या राज्याला आजही स्पष्टपणे मत व्यक्त करणारे संपादक, पत्रकार लाभले आहेत. पण रोजच्या रोज, प्रत्येक प्रहराला ब्रेकिंग न्युज येते आणि निस्पृहतेने, पोटतिडकीने संपादकांनी मांडलेले विचार, मत, मुख्य विषय बाजूला पडतो किंवा त्याची तीव्रता कमी होते. संपादकांचे विचार सर्वदूर न पोहोचणे , त्यावर साधक बाधक चर्चा न होणे असे परिणामकारक शस्त्र न राहिल्यामुळे व्यावसायिक , राजकीय माध्यमातून वृत्तपत्रे चालविणारे जमेल तसा सत्ताधाऱ्यांचा, वजनदार नेतृत्वाच्या दावणीला बांधून घेत पत्रकारितेचा, अर्थात वाचकांचा मुखभंग वर्षानुवर्षे करीत आहेत, या अवस्थेला सत्ताधारी, विरोधी, वृत्तपत्रं, वाचक सारेच जबाबदार आहेत. 

विजयकुमार आप्पा वाणी, पनवेल.