देव पाहावयासी कारणे देऊळे लागती पाहणे !!
दिनांक ६ जानेवारी २०२४ लोकसत्ता अंकातील "नसे राम ते धाम सोडोनि द्यावे .. " संपादकीयात, अयोध्येतील श्रीराम मंदिर स्थापनेमुळे इंडियन सायन्स काँग्रेसचे विज्ञान अधिवेशन पुढे ढकलल्या विषयी मत व्यक्त केले आहे . या आधीही २८ सप्टेंबर २०२३ "काँग्रेस मुक्तीचा आनंद " संपादकीयात, इंडियन सायन्स काँग्रेस या संस्थेच्या विज्ञान परिषदेतून केंद्राच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याने अंग काढून घेतल्याचे निर्देशित केले होते. लेखात म्हटल्याप्रमाणे आधुनिक युगातील संशोधनात, पुराण काळातील
कहाण्यांच्या आधारे गोष्टी सांगण्याचे व्यासपीठ असो , सरकारचे
अध्यात्मिक क्षेत्रातील सहभाग असो, अथवा कर्मकांडे होत असोत, असे असूनही देशाची विज्ञान क्षेत्रातील कामगिरी अभूतपूर्वच आहे हे मान्य करावे लागेलच . भारताने गेल्या पंचाहत्तर वर्षात संशोधन क्षेत्रात मानाचे स्थान प्राप्त केले आहे. प्रतिभा संपन्न शास्त्रज्ञांच्या
कर्तबगारीने जागतिक महासत्तांच्या मांदियाळीत संशोधन क्षेत्रात भारताचे स्थान उंचावले आहे . केंद्राच्या संशोधन क्षेत्राव्यतिरिक्त, खाजगी टिआयएफआर , आयसीटी , आयआयटी , इन्स्टिटयूट ऑफ सायन्स एज्युकेशन यात सर्वाधिक शास्त्रज्ञ कार्यरत आहेत. चांद्रयानाच्या यशस्वी भ्रमणामुळे आणि आदित्य एल १ नियोजित कक्षेत प्रस्थापित करण्यात आलेले नेत्रदिपक यश सर्व काही सांगून जाते .
समर्थांनी " नसे राम ते धाम सोडोनि द्यावे . . . .हे जरी म्हटले आहे , तरी पुढे समर्थ " देव पाहावयासी कारणे देऊळे लागती पाहणे , कोठेतरी देऊळाच्या गुणे , देव प्रगटे " असे म्हणून रामाचीच करुणा भाकली आहे, हे पण तितकेच महत्वाचे आहे . आणि इंडियन सायन्स काँग्रेसला खरोखरच विज्ञान अधिवेशन भरवायचेच आहे, तर राज्य सरकारांच्या सहभागातून , प्रायोजकत्व मिळवून, लखनौ परिषद यशस्वी करण्यास हरकत नसावी , त्यासाठी केंद्रानेच सहाय्य्य करावे म्हणून अधिवेशन पुढे ढकलून निराशा व्यक्त करत बसू नये .
विजयकुमार वाणी , पनवेल .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा