गुरुवार, ४ जानेवारी, २०२४
लेख (१६१) ५ जानेवारी २०२४
बाबू काय, प्रतिनिधी काय सामान्यांना दोन्हींकडून बुक्क्यांचा मार !!दिनांक ४ जानेवारी २०२४ लोकसत्ता अंकातील " बाबू काल" संपादकीयात, राज्यातील प्रशासकीय कारभारामुळे लोकशाही व्यवस्थेची, धोरणांची होत असलेली पायम्मली निदर्शनास आणली आहे. राज्यातील एकूण २९ महापालिका, २२६ नगरपालिका क्षेत्रात आजच्या घडीला प्रशासकीय यंत्रणा राबविली जात आहे. यास केवळ सामान्यजन, नागरीक सर्वार्थाने जबाबदार आहेतच, पण त्याहून अधिक, निवडून आलेले पंचायत, पालिका, विधायक, सासंद त्या पेक्षाही जास्त जबाबदार आहेत. राज्यातील सर्वच महानगरांमध्ये लोकसंख्या वाढीच्या वेगात निवासी विभागाचा विस्तार होत गेला. तथाकथित लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादामुळे निम्म्याहून अधिक बेकायदेशीर अतिक्रमणे उभी राहिलीत. अनेकदा उच्च न्यायालयानेही याची दखल घेत, आजही कोरडे ओढत आहे. परिणामी शहरांचा बकालपणा वाढून पालिकेच्या नागरी सुविधा पुरविण्यात ताण पडू लागला. यामुळेच मुद्यात आणखी एक भर पडली ती मतदारसंघ पुनर्रचनेची. स्थानिक पुढाऱ्यांना वाढीव बेकायदेशीर विभाग, आपल्या मतदार संघात जोडण्यासाठी अहमिका लागली आणि जीवघेणी स्पर्धा होऊन परिणामी बऱ्याच पालिकांची पुनर्रचना आजही न्यायालयात प्रलंबित असल्यामुळेही निवणुकांना विलंब होत आहे हे सर्वश्रुत आहे.
लेखातील नगरसेवक काही कामाचे नाहीत, या मुद्यावरही मतमतांतरे असू शकतात. कारण पाच वर्षांसाठी निवडून दिलेल्या प्रतिनिधींची कामागिरी तशी बऱ्याच बाबतीत असमाधानकारक असते. केवळ स्थानिक भागाचा विकास करताना संपूर्ण शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष होते हे यांच्या गावीही नसते. आज सर्वच शहरांची अवस्था,पालिकांकडील
अपुरे मनुष्यबळ, निधीची कमतरता, बाबूंचा कामचुकारपणा या कात्रीत सापडल्यामुळे पाणी, मलनिःसारण, वाहतूक कोंडी, प्रदूषण, अतिक्रमण, अस्वच्छता, आरोग्य , या सर्व व्यवस्था अव्यवस्था झालेल्या आहेत. यासाठी योग्य कारवाई करणाऱ्या कडक शिस्तीच्या आयुक्तांची, अधिकाऱ्यांची सहा महिन्यात उचलबांगडी करणाऱ्यात बाबूंचीच जास्त कारागिरी असते. त्यामुळे बाबू काय, प्रतिनिधी काय सामान्यांना दोन्हींकडून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. आता सामान्यांनीच उच्च /सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी हाच पर्याय उरलेला आहे, जेणेकरून निवडणुकांचे बिगुल वाजून प्रतिनिधींसोबत बाबूही कार्यमग्न होऊन लोकशाहीचे चांगभले होईल हिच काय आशा.
विजयकुमार वाणी, पनवेल
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा