शुक्रवार, १९ जानेवारी, २०२४

लेख (१६६) १८ जानेवारी २०२४

 



लिहिता वाचता येत नाही हेच बरे , अन्यथा शासनाला अधिक रोजगार उपलब्ध करावा लागेल .  

दिनांक १९ जानेवारी २०२४ लोकसत्ता अंकातील " दुआओं का असर  " संपादकीयात शिक्षण पद्धत , विद्यार्थ्यांची बौद्धिक दारिद्र्यता यावरचे विवेचन वाचले .  अठरा पगड जातीच्या, बारा बलुतेदार पद्धती अस्तंगत पावल्यामुळे, भारतीय शिक्षण पद्धतीकडे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन,  याच अर्थाने विद्यार्थ्यांच्या मनात वर्षानुवर्षे बिंबविले गेले.  शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल अभ्यासाकडे राहिलंच,  हा कायम प्रश्नच राहिला आहे.  देशातील ७० टक्के नागरिक शेती , कामगार वर्गात मोडले जातात.  अर्थातच त्यांच्या मुलांच्या शाळा ह्या अती दुर्गम भाग , ग्रामीण भाग , शहरातील दुर्लक्षित मागासलेल्या भागातील पालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या शाळा अग्रक्रमाने येतात, त्यातील विद्यार्थ्यांची संख्याही एकूण विद्यार्थ्यांच्या ७० टक्केच्या आसपास आहे .  या शाळा सरकारी असल्याने त्यांच्या इमारतींची अवस्था , बाक बाकडे , पुसटसे फळे , अस्वच्छता , शिक्षकांच्या  नेमणुका, त्यांची उपस्थिती आणि शिकविण्याची पद्धत यांवर ताण म्हणजे विद्यार्थ्यांना शिकण्याची आस , या परिस्थितीवर खरेच,  बरेच अवलंबून असते .  लेखातील ' शिक्षण व्यवस्था - विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या हुशारीमुळेच टिकून आहे ' या म्हणण्याला पुष्टी मिळते .  आता प्रश्न उरतो तो, या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या ज्ञानाचा.  बालवाडी प्राथमिक माध्यमिक शिक्षण मिळत असताना केवळ उपस्थितीच यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण असते .  केवळ साडे- सात आठच महिने भरणाऱ्या शाळेत , १५ धड्यांचे म्हणजेच सहा विषयांतील ९० धड्यांचा (शिकविलेल्या किंवा न शिकविलेल्या ) अभ्यास करून आत्मसात करणे,  विद्यार्थ्यंसांठी खरेच कठीण असते .  यास बरेच कारणे असू शकतात . घरातील पोषक वातावरण , मुळात मुलांमध्ये अभ्यासाचा कंटाळा ,  आकलन शक्ती , आणि महत्वाचे म्हणजे त्यांना मिळालेल्या शिक्षकाची शिकविण्याची पद्धत,  यावर अभ्यासाचा स्थर अवलंबून आहे .  ७० टक्के विद्यार्थ्यांमधल्या केवळ थोड्याच मुलांना याची जाणीव होत राहून ते उच्च शिक्षणासाठी पात्र ठरतात.  लेखात म्हटल्याप्रमाणे , सोळा सतरा वयोगटातील विद्यार्थ्यांना मूलभूत ज्ञानाचीही माहिती नसणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही .  खरे तर शासनाच्या नेमून दिलेल्या शिक्षण विभागाने काटेकोरपणे शिस्त अवलंबिल्यास शाळेची निगा राखणी , शिक्षकांची नियुक्ती, विद्यार्थ्यांसाठीच्या सर्व योजना पद्धतशीर राबविल्यास,  यात पंचवीस टक्के तरी फरक पडण्याची नक्कीच शक्यता आहे .  परंतु कामाचा अभाव आणि राजकीय हस्तक्षेप यातून अंदाधुंदी या पलीकडे काहीही शिल्लक राहत नाही .   या वातावरणातून, तावून सुलाखून बाहेर पडणाऱ्यां विद्यार्थ्यांपुढेही आरक्षण , भरमसाठ फी आदींचे चक्रव्यूह असतेच, नोकरी मिळणे तर खूपच दूरची गोष्ट राहते .  असे  प्रथम , असर अहवाल बासनात गुंडाळून ठेवण्यातच आनंद आहे , कारण ह्या ७० टक्क्यातील विद्यार्थीही शिकू लागल्यास त्यांच्यासाठी आणखी कोणत्या नोकऱ्या शासन उपलब्ध करून देऊ शकते ,   गुणाकार भागाकार येत नसल्यामुळे, अल्प शिक्षण प्राप्त करून शेती , कामगार , रोजंदारी करावी ह्यातच शासनाची दूरदृष्टी असावी. 

विजयकुमार वाणी , पनवेल 

बुधवार, १७ जानेवारी, २०२४

लेख (१६५) १६ जानेवारी २०२४

(१)

मराठीची गळचेपी कायमचीच !!  

म, टा.  दिनांक  १६ जानेवारी २०२४ "मराठीचे (जुनेच ) आक्रंदन"  संपादकीय वाचले.  या आधीही २५ ऑक्टो २०२३ रोजी "मराठीची मानगूट - इंग्रजीचे भूत " संपादकीय लिहून या विषयावर प्रकाश टाकण्यात आला होता .  स्वातंत्र्यानंतर, मराठी संस्थांच्या उभ्या राहिलेल्या मराठी शाळा आणि पालिका , जिल्हा परिषद 
विद्यालयांतच मराठी माध्यमाचे शिक्षण मिळू लागले, जे चित्र आजतागायत आहे. आज मितीला प्रत्येक शहरात  पंचाहत्तर टक्के आणि ग्रामीण भागात सुद्धा पन्नास टक्के इंग्रजी शाळेचे प्राबल्य आहे.  त्यात सेमी इंग्रजी माध्यमांमुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे.  आजही ग्रामीण भागातील मराठी टक्का, कसेबसे पदवीपर्यंत शिक्षण घेत स्पर्धा परीक्षांची तयारी करीत वर्षानुवर्षे घालवत आहे.  राज भाषेचा दर्जा मिळविण्यासाठीचे प्रयत्न,  इतर भाषिंकांसाठी मराठी भाषेची सक्ती , शासनाच्या, न्यायालयाच्या आस्थापनात मराठी भाषेत कामकाज,  मराठी पाट्यांची सक्ती याचे रडगाऱ्हाणे निरंतरच आहे . अशा अनेक प्रकारात शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे .   शासन नियुक्त महामंडळे , परिषदा, यांचे मराठी भाषेविषयी प्रेम सर्वश्रुत आहे .  आजमितीला मराठी कुटुंबातील, २००० सालाच्या आत जन्मलेल्या मुलांनाच मराठी भाषेत शिक्षण मिळाले असेल.  आजच्या  घडीला पंचाऐशी टक्के मराठी भाषिक, इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण घेत असतील.  मराठी भाषेची गळचेपी उच्चभ्रू आणि सामान्यांच्या कृती, वृत्तीवरून होत, भाषेचा स्थर  निस्तेज होत आहे,   हे वास्तविक स्वीकारायला कुणी तयार नाही.  विश्व मराठी संमेलने , साहित्य संमेलने शासनाच्या  बेगडी प्रेमाचे प्रतीके आहेत. 


विजयकुमार वाणी , पनवेल 

(२)

मराठीची गळचेपी कायमचीच !!  

म, टा.  दिनांक  १६ जानेवारी २०२४ "मराठीचे (जुनेच ) आक्रंदन"  संपादकीय वाचले.  या आधीही २५ ऑक्टो २०२३ रोजी "मराठीची मानगूट - इंग्रजीचे भूत " संपादकीय लिहून या विषयावर प्रकाश टाकण्यात आला होता .  स्वातंत्र्यानंतर, मराठी संस्थांच्या उभ्या राहिलेल्या मराठी शाळा आणि पालिका , जिल्हा परिषद 
विद्यालयांतच मराठी माध्यमाचे शिक्षण मिळू लागले, जे चित्र आजतागायत आहे. आज मितीला प्रत्येक शहरात  पंचाहत्तर टक्के आणि ग्रामीण भागात सुद्धा पन्नास टक्के इंग्रजी शाळेचे प्राबल्य आहे .  त्यात सेमी इंग्रजी माध्यमांमुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे.  आजही ग्रामीण भागातील मराठी टक्का, कसेबसे पदवीपर्यंत शिक्षण घेत स्पर्धा परीक्षांची तयारी करीत वर्षानुवर्षे घालवत आहे.  राज भाषेचा दर्जा मिळविण्यासाठीचे प्रयत्न,  इतर भाषिंकांसाठी मराठी भाषेची सक्ती , शासनाच्या, न्यायालयाच्या आस्थापनात मराठी भाषेत कामकाज,  मराठी पाट्यांची सक्ती याचे रडगाऱ्हाणे निरंतरच आहे . अशा अनेक प्रकारात शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे .   शासन नियुक्त महामंडळे , परिषदा, यांचे मराठी भाषेविषयी प्रेम सर्वश्रुत आहे .  आजमितीला मराठी कुटुंबातील, २००० सालाच्या आत जन्मलेल्या मुलांनाच मराठी भाषेत शिक्षण मिळाले असेल.  आजच्या  घडीला पंचाऐशी टक्के मराठी भाषिक, इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण घेत असतील.  मराठी भाषेची गळचेपी उच्चभ्रू आणि सामान्यांच्या कृती, वृत्तीवरून होत, भाषेचा स्थर  निस्तेज होत आहे,   हे वास्तविक स्वीकारायला कुणी तयार नाही.  विश्व मराठी संमेलने , साहित्य संमेलने शासनाच्या  बेगडी प्रेमाचे प्रतीके आहेत. 


विजयकुमार वाणी , पनवेल 

शनिवार, १३ जानेवारी, २०२४

लेख (१६४) १३ जानेवारी २०२४

 (१)

चिंताजनक पेपरफुटी 

दिनांक ११ जानेवारी  २०२४ म टा अंकातील  " बार्टी , सारथी , महाज्योती परीक्षेत पेपरफुटी ? " वृत्त वाचले .  गेल्या वर्षभराच्या वृत्तांचा आढावा घेतल्यास, जवळ जवळ सर्वच परीक्षांमध्ये एका तरी विषयाचा  पेपर फुटण्याची बातमी आहे.   यात विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होऊन वर्ष वाया जात आहे.   याचे भान ना संस्थांना ,सरकारला ना विद्यार्थी संघटनांना आहे .  राजस्थान आणि उत्तराखंड राज्यात पेपरफुटी विरोधात कायदे उपलब्ध आहेत .  त्याच धर्तीवर राज्यात कायदा व्हावा हि साधी मागणी देखील पूर्णत्वास जात नाही .  सरकारने पोलिसांची, शिक्षण क्षेत्रातील संघटनांची , दक्षता समिती स्थापून पेपर फोडणाऱ्या टोळ्यांचा बिमोड करावा ,  पकडल्यास अजामीनपात्र गुन्हा नोंदवावा .  पेपर फोडणारे दोषी आहेतच , परंतु त्यांच्याकडून सेटिंग करून घेणारे उमेदवार, त्यांचे पालक सुद्धा तितकेच दोषी आहेत, अशांना , लक्षावधी रुपयांचा दंड ठोठावा , शिक्षा व्हावी , नोकर भरतीत कायमची बंदी (ब्लॅक लिस्ट ) करावे .  जेणेकरून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळून वेळेत परीक्षा , निकाल आणि पुढील शिक्षण अथवा नोकरी मिळाल्याचे समाधान मिळेल . 


(२) 
अमर्यादित सार्वजनिक वाहतूक आणि मर्यादित मेट्रोचा वापर 

दिनांक ११ जानेवारी २०२४ लोकसत्ता अंकातील " मेट्रो पांढरा हत्ती ठरतोय का ?  " "विश्लेषण" सदरात  प्रवासी संख्या, सार्वजनिक वाहतूक , आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य  यावर विवेचन केले आहे. देशातील  नवी मुंबई वगळता, सर्वच जुन्याच शहरांचे महानगरात रूपांतर झाल्याने आणि महत्वाचे केंद्रे, सर्वच कार्यालये , रेल्वे बस स्थानक , एकाच ठिकाणी वसल्या मुळे सर्वत्र गर्दी केंद्री होत असते.  या भागात क्वचितच साठ फुटांपेक्षा रुंदीचे रस्ते आढळतात, परिणामी वाहतूक कोंडी निर्माण होत राहते .  सर्वच महानगरातील वाहतूक कोंडीच्या समस्येला एकेरी वाहतूक , उड्डाण पूल , फ्री वे , बाय पास यांच्या वापरा नंतरही वाहतुक कोंडीचा प्रचंड ताण शहरांवर पडत असल्यामुळे  मेट्रो प्रकल्प म्हणजे वाहतुक कोंडीसाठी निवडलेला एक उत्तम पर्याय आहे.  राज्यातील मुंबई,पुणे, नागपूर या शहरातील मेट्रोचे जाळे शहरांच्या मुख्य भागातूनच आहे .  घाटकोपर ,अंधेरी, तसेच बेलापूर रेल्वे आणि मेट्रो स्टेशन एकाच फलाटावर आहेत, त्यामुळे मेट्रो स्थानके चालत पोहोचता येतील अशा अंतरावर नाहीत हे म्हणता येणार नाही . मोठे आणि मोकळे रस्ते , कमी रहदारी  यामुळे युरोपीय देशांमध्ये मेट्रो , ट्राम हि रस्त्यांवरील मधल्या मार्गिकांमध्ये चालविल्या जातात, साहजिकच जास्तीतजास्त ट्रामचा वापर केला जातो .  आपल्या देशात शहरांतर्गत चौपदरी , सहापदरी रस्त्यांची वानवा आहे, त्यामुळे मेट्रोसाठी उड्डाणपूल, त्यावर लोहमार्ग आणि स्थानके बांधावी लागत आहेत , त्यावर वारेमाप खर्च होत आहे, शिवाय मेट्रोचे कम्पार्टमेन्ट सुद्धा आयात करावी लागत आहेत, या सर्वांसाठी प्रचंड प्रमाणात गुंतवणूक होत आहे.  मुंबई शहराचाच विचार केल्यास सर्वच मेट्रो बांधकामांचा खर्च कित्येक लक्ष कोटींच्या पुढे आहे .  एवढ्या मोठ्या रकमेची गुंतवणूक झाल्यामुळे साहजिकच त्याचा मुख्य परतावा प्रवाशांच्या प्रवास भाड्यातूनच व्हावा हि अपेक्षा रास्तच आहे .  मेट्रोचे जाळे विणण्यास आणि कोरोना काळाचा घाला याची सांगड घालता असेही निदर्शनास येते की , कोरोना काळात / नंतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर कमी होऊन , शक्यतो खाजगी दोन चाकी , चार चाकी वाहनांना पसंती मिळू लागली.  त्यामुळे गेल्या दोन वर्षात ऑटोमोबाईल सेक्टर उत्पनादनांचा उच्चांक गाठीत आहेत.  परिणामी पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना सर्व शहरे करीत आहेत .  एकीकडे पायाभूत सुविधांवर खर्च करणे आणि सार्वजनिक वाहतुकीस  प्रतिसाद न मिळणे ह्या कात्रीत सरकार , मेट्रो ऑपेरेटर्सही  विवंचनेत आहेत.  यावर उपाय म्हणजे सर्वच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडविणे अपेक्षित आहे .  सोमवार ते शुक्रवार या कार्यालयीन कामकाज दिवसात लांब पल्ल्यांच्या रेल्वे, एस टी , ट्रॅव्हल्स आणि खाजगी गाडयांना ठराविक वेळेतच शहरात ये जा करण्यासाठी वेळेचे बंधन घालावे. अशा अनेक मार्गांचे पर्याय शोधून जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढल्यासआणि महिला सन्मान योजनांमुळे एस टी चे प्रवासी वाढले , तसे अन्य उपक्रमांत सवलती दिल्यास सार्वजनिक वाहतूक नक्कीच फायदेशीर ठरेल. 

विजयकुमार वाणी , पनवेल  



सोमवार, ८ जानेवारी, २०२४

लेख (१६३) ८ जानेवारी २०२४

 (१)

आर्थिक उन्नतीत  शेतीही महत्वाचा घटक . . . . 

दिनांक ८ जानेवारी २०२४  म .टा. अंकातील " अर्थ आणि परमार्थ  " संपादकीयात कृषी क्षेत्राची अल्पशी वाढ हे चिंताजनक आहे .  कृषी क्षेत्र,  देशाच्या महसूल वाढीत उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे, परंतु कमी पर्जन्यमान, हवामान बदल इतर घटकांचा एकत्रित परिणामी होऊन, कृषी उत्पादन घसरत चालले आहे .  उत्पादनांची कमतरता झाल्यास, शेत मालाला वाढीव भाव मिळतो आणि  शेतकरी तेच उत्पादन घेतो.  परंतु पुरवठा जास्त आणि मागणी कमी झाल्यामुळे, शेतमालाची नासाडी होउन, शेतकरी पुन्हा शून्यावर येतो .  त्यात केंद्र / राज्य सरकारांच्या उत्पादन क्षेत्र संबधी निर्यात धोरणही शेतकऱ्यांना त्रासदायक ठरते .   म्हणून केंद्राने , राज्याने  शेती विषयक धोरणांची, कृषी पायाभूत सुविधा योग्य प्रकारे विकसित करून , अंमलबजावणी केल्यास छोटा शेतकरी ते जमीनदार, मान्सून, हवामान बदला व्यतिरिक्त वर्षभराच्या पिकांतून उत्पन्न मिळवून देशाच्या उन्नतीस नक्कीच हातभार लावत उद्देश हाच की , पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या आणि पुढच्या क्रमांकावर जात असताना,  कृषी घटकाचा विसर न व्हावा . 

विजयकुमार वाणी , पनवेल  

(२)
आहे ते सांभाळण्याचा विरोधकांचा कल . . . 

चेअरमन, लोकमत समूह  यांचा " यात्रेआधीच इंडियात धुसपूस " विषयातील  न्याय यात्रा, काँग्रेस आणि इंडियातल  घटक पक्ष यांच्यातील ताळमेळ बिघडत चालला आहे या संबधी विचार मांडलेत ते वाचलेत .  विरोधकांचे एकत्र न येणे याच्या प्रमुख कारणांपैकी प्रत्येक नेत्याची 
वैयक्तिक महत्त्वाकांक्षा
 ईडी आदींच्या रडारवर येण्याची भीती, आपसातील फाटाफूट यामुळेजिंकून येण्यापेक्षा आहे ते सांभाळण्याचा विरोधकांचा कल एव्हाना स्पष्ट झाला आहे . गेल्या पाच वर्षातील सर्वच निवडणुकीचा सारासार विचार केला तर , दोन तीन राज्ये सोडल्यास, सत्ताधारी पक्षास ठळक यश मिळालेले आहे .  नऊ वर्षांची केंद्रातील सत्ता , निवडून आलेले एकूण सहस्त्रावधी सांसद , विधायक, नगरसेवक यांची आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांची फौज एवढे प्राबल्य पाहूनच इंडिया आघाडीला 
धडकी न भरे तर नवलच .  अशा दिसून येणाऱ्या कारणाने इंडिया आघाडी कितपत तग धरेल यात खरोखर शंका आहेच , त्यात आगली बार चारसो पार घोषणेने आणखी गोंधळ वाढविला आहे. पाहूया काय निकालात निघते ते ? 


रविवार, ७ जानेवारी, २०२४

लेख (१६२) ६ जानेवारी २०२४

 



देव पाहावयासी कारणे देऊळे लागती पाहणे !!

दिनांक ६ जानेवारी २०२४ लोकसत्ता अंकातील "नसे राम ते धाम सोडोनि द्यावे .. " संपादकीयात, अयोध्येतील श्रीराम मंदिर स्थापनेमुळे इंडियन सायन्स काँग्रेसचे विज्ञान अधिवेशन पुढे ढकलल्या विषयी मत व्यक्त केले आहे .  या आधीही २८ सप्टेंबर २०२३ "काँग्रेस मुक्तीचा आनंद " संपादकीयात, इंडियन सायन्स काँग्रेस या संस्थेच्या विज्ञान परिषदेतून केंद्राच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याने अंग काढून घेतल्याचे निर्देशित केले होते.  लेखात म्हटल्याप्रमाणे आधुनिक युगातील संशोधनात, पुराण काळातील 
कहाण्यांच्या आधारे गोष्टी सांगण्याचे व्यासपीठ असो , सरकारचे 
अध्यात्मिक क्षेत्रातील सहभाग असो, अथवा कर्मकांडे होत असोत, असे असूनही देशाची विज्ञान क्षेत्रातील कामगिरी अभूतपूर्वच आहे हे मान्य करावे लागेलच .  भारताने गेल्या पंचाहत्तर वर्षात संशोधन क्षेत्रात मानाचे स्थान प्राप्त केले आहे.  प्रतिभा संपन्न शास्त्रज्ञांच्या 
कर्तबगारीने जागतिक महासत्तांच्या मांदियाळीत संशोधन क्षेत्रात भारताचे स्थान उंचावले आहे .  केंद्राच्या संशोधन क्षेत्राव्यतिरिक्त,  खाजगी टिआयएफआर , आयसीटी , आयआयटी ,  इन्स्टिटयूट ऑफ सायन्स एज्युकेशन यात सर्वाधिक शास्त्रज्ञ कार्यरत आहेत.  चांद्रयानाच्या यशस्वी भ्रमणामुळे आणि आदित्य एल १ नियोजित कक्षेत प्रस्थापित करण्यात आलेले नेत्रदिपक यश सर्व काही सांगून जाते .  
समर्थांनी  " नसे राम ते धाम सोडोनि द्यावे . . . .हे जरी म्हटले आहे , तरी पुढे समर्थ " देव पाहावयासी कारणे देऊळे लागती पाहणे , कोठेतरी देऊळाच्या गुणे , देव प्रगटे " असे म्हणून रामाचीच करुणा भाकली आहे, हे पण तितकेच महत्वाचे आहे .  आणि इंडियन सायन्स काँग्रेसला खरोखरच विज्ञान अधिवेशन भरवायचेच आहे, तर राज्य सरकारांच्या सहभागातून , प्रायोजकत्व मिळवून,  लखनौ परिषद यशस्वी करण्यास हरकत नसावी , त्यासाठी केंद्रानेच सहाय्य्य करावे म्हणून अधिवेशन पुढे ढकलून निराशा व्यक्त करत बसू नये . 


विजयकुमार वाणी , पनवेल .  

गुरुवार, ४ जानेवारी, २०२४

लेख (१६१) ५ जानेवारी २०२४


बाबू काय, प्रतिनिधी काय सामान्यांना दोन्हींकडून बुक्क्यांचा मार !!

दिनांक ४ जानेवारी २०२४ लोकसत्ता अंकातील " बाबू काल" संपादकीयात, राज्यातील प्रशासकीय कारभारामुळे लोकशाही व्यवस्थेची, धोरणांची होत असलेली पायम्मली निदर्शनास आणली आहे. राज्यातील एकूण २९ महापालिका, २२६ नगरपालिका क्षेत्रात आजच्या घडीला प्रशासकीय यंत्रणा राबविली जात आहे. यास केवळ सामान्यजन, नागरीक सर्वार्थाने जबाबदार आहेतच, पण त्याहून अधिक, निवडून आलेले पंचायत, पालिका, विधायक, सासंद त्या पेक्षाही जास्त जबाबदार आहेत.  राज्यातील सर्वच महानगरांमध्ये लोकसंख्या वाढीच्या वेगात निवासी विभागाचा विस्तार होत गेला.  तथाकथित लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादामुळे निम्म्याहून अधिक बेकायदेशीर अतिक्रमणे उभी राहिलीत. अनेकदा उच्च न्यायालयानेही याची दखल घेत, आजही कोरडे ओढत आहे.  परिणामी शहरांचा बकालपणा वाढून पालिकेच्या नागरी सुविधा पुरविण्यात ताण पडू लागला.  यामुळेच मुद्यात आणखी एक भर पडली ती मतदारसंघ पुनर्रचनेची.  स्थानिक पुढाऱ्यांना वाढीव बेकायदेशीर विभाग, आपल्या मतदार संघात जोडण्यासाठी अहमिका लागली आणि जीवघेणी स्पर्धा होऊन परिणामी बऱ्याच पालिकांची पुनर्रचना आजही न्यायालयात प्रलंबित असल्यामुळेही निवणुकांना विलंब होत आहे हे सर्वश्रुत आहे. 

लेखातील नगरसेवक काही कामाचे नाहीत, या मुद्यावरही मतमतांतरे असू शकतात.  कारण पाच वर्षांसाठी निवडून दिलेल्या प्रतिनिधींची कामागिरी तशी बऱ्याच बाबतीत असमाधानकारक असते. केवळ स्थानिक भागाचा विकास करताना संपूर्ण शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष होते हे यांच्या गावीही नसते. आज सर्वच शहरांची अवस्था,पालिकांकडील
अपुरे  मनुष्यबळ, निधीची कमतरता, बाबूंचा कामचुकारपणा या कात्रीत सापडल्यामुळे पाणी, मलनिःसारण, वाहतूक कोंडी,  प्रदूषण, अतिक्रमण, अस्वच्छता, आरोग्य , या  सर्व व्यवस्था अव्यवस्था झालेल्या आहेत. यासाठी योग्य कारवाई करणाऱ्या कडक शिस्तीच्या आयुक्तांची, अधिकाऱ्यांची सहा महिन्यात उचलबांगडी करणाऱ्यात बाबूंचीच जास्त कारागिरी असते. त्यामुळे बाबू काय, प्रतिनिधी काय सामान्यांना दोन्हींकडून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो.  आता सामान्यांनीच उच्च /सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी हाच पर्याय उरलेला आहे, जेणेकरून निवडणुकांचे बिगुल वाजून प्रतिनिधींसोबत बाबूही कार्यमग्न होऊन लोकशाहीचे चांगभले होईल हिच काय आशा. 

विजयकुमार वाणी,  पनवेल 

बुधवार, ३ जानेवारी, २०२४

३ जानेवारी २०२४

 साहेब, मी विजय वाणी ,  (३ जाने २०१९) आजपासून आपला पी ए म्हणून काम करणार आहे.  साहेबांनी पाहिलं,  " बरं " म्हणाले आणि *वरिष्ठ आय ए एस अधिकारी श्री संजय सेठी साहेब (१९९२)* यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली.  


साहेबांची एडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग मधील केबिनचे रीन्युवेशन काम सुरू होते, ते पूर्ण होई पर्यंत साहेबांना रहेजा सेंटर येथील ऑफिस मध्ये काम करायचे होते आणि १६ जानेवारी रोजी प्रवेश करण्याचे योजिले.  त्याच दिवशी साहेब, पहिल्या प्रहरात पोर्ट राऊंड करून एडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग मध्ये दुपारी प्रवेश करते झाले.  *लोकमत " बेस्ट पर्सनोलीटी आय ए एस अवॉर्ड "*  मिळविणाऱ्या साहेबांना पाहण्यासाठी संपूर्ण गर्दी झाली होती.  साहेबांसोबत सौ सोनिया सेठी आय ए एस अधिकारी पणं होत्या.  अशा प्रकारे कामकाजास सुरुवात झाली.  


२६ जानेवारी गणतंत्र दिवस साजरी होणार होता आणि साहेबांनी मराठीत भाषण करायचे म्हणून निर्णय सांगितला.  चेअरमन ऑफीसला येऊन १५ दिवसच झाले होते, पणं जे एन पी च्या ३३ वर्षांचा अनुभव गाठीशी असल्याने तीन पानांचे मराठीत भाषण लिहून दिले.  कामाच्या व्यापात साहेबांनी ते पाहिले देखील नाही आणि ध्वजवंदन समयी, साहेबांनी भाषण मागितले,  साहेबांनी ते तसेच वाचून दाखविले आणि माझ्यावरील विश्वास सार्थ ठरविला.  यापुढील साहेबांच्या प्रत्येक कामात महत्वाचा सहभाग मिळू लागला.  चुकांच्या वेळी साहेब रागवायचे पणं त्यांच्या रागवण्यात प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकायला मिळायचे.  


प्रत्येक पी ए चे एक स्वप्न असते, चेअरमन अर्थात आय ए एस अधिकाऱ्यांसोबत काम करायला मिळावे, ते स्वप्न पूर्ण झाले होते.  साहेबांची दर सोमवारी दुपारी ३ वाजता होणारी एच ओ डी मीटिंग आणि वाणी, हे साहेबांसाठी समीकरणच होते.  मीटिंगचे मिनिट्स केवळ औपचारिकता म्हणून पहात होते, एवढा विश्वास नक्कीच मिळविला होता.  फेब्रुवारी २०२० मध्ये श्री उन्मेश वाघ साहेब, आय आर एस यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यांच्याकडे काम करण्यास मी आग्रही होतो, साहेबांनी त्यांच्या कामातही लक्ष द्यावे लागेल, या अटीवरच पणं नाखुशीनेच परवानगी दिली.  पुढे कोरोना काळ , पोर्ट खाजगीकरण, वाढवणं पोर्ट, एस ई झेड, पार्किंग प्लाझा, या प्रकल्पांच्या प्रचंड कामात साहेबांनी नियोजनपूर्वक काम करून पूर्णत्वास नेले.  केवळ प्रकृतीची जपणूक (व्हि आर एस चा मोह ?) कारणामुळे सेवानिवृत्ती स्वीकारली आणि अत्यंत शिस्तबद्ध अधिकाऱ्यांच्या तालमीत मिळालेल्या गुणांना दुसऱ्या क्षेत्रात काम करण्यासाठी सिद्ध झालो. *साहेबांना अतिरिक्त सचिव पदाच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा*. 


विजयकुमार वाणी

लेख (१६०) २ जानेवारी २०२४

 


नवीन वर्ष नवीन आशा !!


दिनांक १ जानेवारी २०२४  म .टा. अंकातील " आशेची नवी ज्योत " संपादकीय वाचले.   एकंदरीत सकारात्मक स्थितीचे अवलोकन प्रस्तुत लेखात आहे .   २०२३ चा  कालखंड पाहता, देशाची आर्थिक स्थिती भक्कम होताना दिसत आहे.  गेल्या सहा महिन्यात बीए ई  निर्देशांकाने अठरा टक्क्यांनी वाढ दर्शवत पुढे तेजी कायम ठेवण्याची शक्यता आहे.  गुंतवणुकदारांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असून, मुंबईच्या पुढे उत्तर प्रदेशच्या गुंतवणूकदारांची संख्या वाढत आहे , हे आर्थिक साक्षरतेचे प्रमाण मानले जावे.  केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षात पायाभूत सुविधांचा विस्तार केल्यामुळे, अर्थव्यवस्था आज जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरली आहे. वित्तीय तुटीचा दर कमी त्यामुळे दहा वर्षात महागाईचा दर साडेचार टक्के ते सात टक्के राहिला. परदेशी गुंतवणुकीत मोठी वाढ झाली. पण आर्थिक प्रगती साधताना , काही त्रुटीही समोर येत आहेत . बेरोजगारीचे प्रमाण लोकसंख्येच्या मानाने सर्वोच्च आहे .  दरडोई उत्पन्नाबाबत सर्वात तळाला, भूक निर्देशकात शंभराच्या वरच्या स्थानावर आहे .  या बाबींचाही सखोल विचार होणे आवश्यक आहे .  केंद्र सरकारने सामान्यांचा आर्थिक स्थर उंचावण्यासाठी ठळक योजना , बेरोजगारांना रोजगार उपलब्धी , या दोन सेवांकडे लक्ष दिले तरी पंचवीस टक्के बेरोजगारी , दरडोई उत्पन्नात वाढ ,, भूक निर्देशकांत सुधारणा होऊ शकतो .  नवीन वर्ष नवीन आशा  घेईलच, अशी आशा व्यक्त करूया . 


विजयकुमार वाणी , पनवेल