समन्वयातून प्रगती साधावी !!
वृत्तपत्र आणि सोशल मिडिया माध्यमातून राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित ग्रीनफिल्ड रिफायनरीस स्थानिकांचा विरोध आणि सत्ताधारी , विरोधी पक्ष नेत्यांच्या आरोप, प्रत्यारोपांच्या प्रतिक्रिया वाचनात आल्यात. प्रकल्प कोणताही असो त्यासाठी जमीन ग्रहणाचा महत्वाचा भाग असतो आणि ह्याच मुद्द्याला ग्रामस्थांचा विरोध असतो. सारासार विचार करता, राज्याच्या पश्चिम किनाऱ्यालगत केंद्र शासनाच्या प्रकल्पांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर जमिनींचे अधिग्रहण झाले असून, सर्वच प्रकल्प शासनाच्या, खाजगीकरणाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीस हातभार लावत आहेत. या साऱ्या गावांची नावे, प्रकल्पांची नावे, जमिनी ग्रहणा आधीची स्थिती, प्रकल्पात मिळालेल्या रोजगार , व्यवसाय संधी, शिक्षणासाठी संधी, रस्ता, रेल्वे, प्रवासी, रुग्णालय, सुविधा, या साऱ्या बाबींचा एक तक्ता बनवावा. यातील प्रगती आणि अधोगती असलेले ठळक मुद्दे अधोरेखित करावेत. उपरोक्त प्रकल्पामुळे मिळणाऱ्या सोय सुविधा, जीवनमान, राहणीमान यावर होणारा परिणाम याची तुलना करावी. हे सारे काम सत्ताधारी, विरोधी पक्षाने समन्वयाने केले पाहिजे. यात फक्त स्थानिकांचेच समुपदेशन करावे , बाह्य नेतृत्व यांना मज्जाव करावा जेणेकरून स्थानिकांना निर्णय घेण्यास सोप्पे होईल. अजूनही वेळ गेलेली नाही, सत्ताधाऱ्यांनी उदाहरणासाठी असे नियोजन करावे जेणेकरून समन्वयातून प्रगती साधली जाईल, अन्यथा लोकविरोधामुळे गाशा गुंडाळावा लागून आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर जाण्याची संभावना नाकारता येणार नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा