शतायुषी भव !! सचिन ,
क्रिकेट जगतातील असंख्य विक्रमांचा राजा, तसेच असंख्य पुरस्कारांचा विक्रमादित्य भारतरत्न सच्चू , पन्नासवर्षांपूर्वी वैशाखातल्या प्रखर उन्हाळ्यात, त्यात भुमिशी संबंधित मंगळवारचा जन्म म्हणूनच की काय साक्षात सूर्यनारायणाच्या साक्षीने विश्वातल्या शेकडो मैदानावर तळपत राहिला. वयाच्या पंधराव्या वर्षी आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यास संधी मिळणे हे धैर्य, चिकाटी, सातत्य, संयम, शांतता, दृष्टी, अपयश पचविण्याची शक्ती हे सारे गुण, बाळकडू जन्मतःच मिळालेले असल्यामुळे शक्य झाले आहे. संतांच्या प्रत्येक श्लोकाचे निरूपण प्रत्येक किर्तनकार आपापल्या परीने करीत असतात, त्याप्रमाणेच क्रिकेटच्या या देवाच्या प्रत्येक डावाच्या, खेळाच्या शैलीचे वर्णन, असंख्य शेकडो क्रिकेट तज्ञांपासून सामान्यजन करीत असतात. कारण प्रत्येकास सचिन त्याच्या त्याच्या परीने कळला आहे. पराकोटीचे प्रेम , आदर मिळाल्यावर श्री राम, श्रीकृष्ण देवांचाही एकेरी उल्लेख होतो. असाच एकेरी उल्लेख भारतातल्या कमीतकमी १०० कोटींच्या तोंडी सच्चू सचिन असाच होत आहे आणि भविष्यातही राहील. सच्चूच्या अर्धशतकी वयाच्या दिवशी शतायुषी हो अशा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आणि अक्षय होत राहील.
विजयकुमार वाणी, पनवेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा