सोनगीर
धुळ्याहून निघाल्यास अर्धा तासात सोनगीर फाटा, पोलीस ठाणे, एन जी बागुल हायस्कूल ओलांडल्यावर एका पांढऱ्या गोल घुमटाकार दर्ग्याजवळ कडू निंबाच्या झाडाजवळ बस थांबे. त्याकाळातील मध्यभागी उंचवटा असलेली आणि दोन्ही कडांवर उतरलेली एकेरी डांबरी सडक , नागमोडी वळणं घेऊन पुढे नरढाण्यास जात असे. एसटी तून उतरल्यावर मैलाच्या दगडाच्या आणि तिरक्या वाढलेल्या बाभळीच्या मधून छोट्याश्या पायवाटेने "सोनगीर" गावात प्रवेश होत असे. छोटी नाली , एक दोन टपऱ्या ओलांडून भरगच्च हिरवागार कडुलिंबाच्या सावलीतून रथगल्लीत प्रवेश होत असताना, कासार गल्लीतील तांब्याच्या भांड्यावरील ठोके ऐकायला येत असत. डॉ भानुदास जोशी यांचा दवाखाना, मामांचा एस्पैस वाडा ओलांडून समोर पांडू सोनार यांचे दुकानानंतर नाना मामाचे दुकान दिसे. दुकानाच्या छोट्याश्या उंच जागेवर मोनॅको बिस्किटांच्या जाळी सारखी एक चारपायी लोखंडी खुर्ची दिसे आणि आतल्या गल्ल्यावर पांढरी टोपी, तलम बंडी, धोतर नेसलेल बारीक व्यक्तिमत्त्व तात्यांचे आणि लाल गंध लावून पांढरे शुभ्र कपडे परिधान करणाऱ्या नाना मामाचे दर्शन होत असे. या पुढील पायऱ्या म्हणजे घराचा मुख्य दरवाजा. दोन तीन पायऱ्या चढल्यावर मोकळ्या सारवलेल्या , गोल काळया कुळकुळीत खांबाचा आधार घेत उभे असलेले धाब्याच्या घराची सुरवात होई. भला मोठा जाड जुड नक्षीकाम असलेला दोन दारी दरवाजा, त्यावरील असलेल्या पितळेच्या नक्षीदार गोलाकार चकत्या, तीन चार अंडाकृती आकाराच्या साखळीयुक्त कडी, लक्ष वेधून घेई.
प्रवेशाच्या सुरवातीस उजवीकडील भिंतीवरील गोखले दिसे. दोन चौकोनी खांबातील मोकळ्या जागेत ऐसपैस मोठाली बंगळी अडकवलेली दिसे. त्या मागील जागेत कपाशी, भुईमूग, ज्वारीचे पीक धाब्या पर्यंत उंचच्या कनातीत बांधून ठेवलेले असे. यावर एक मोठाले असे बुद्धिबळाच्या चौकटीत मावतील एवढ्या सळ्यांचे साने होते. त्या सान्याच्या खालीच, दिवे लगणीच्या वेळेस, चिमण्या, कंदील, गोल काचेचा दिवा यांना साफ सुफ करीत, मोठी आई दुधाचे भांडे, मापले घेऊन बसलेली दिसे. उजव्या बाजूसच कुलूपबंद खोली होती, जिथे फक्त मोठ्यानाच प्रवेश असावा असे वाटायचे. पुढच्या मोकळ्या जागेत मोठाली लाकडी जेवणाची पाटे, तसेच दुकानाच्या मागील भागातील सामानाच्या खोलीच्या खिडक्या होत्या. तिथे आलेल्या सर्व पै पाहुण्यांचे सामान असे. डाव्या बाजूस स्वैपाकाच्या खोली बाहेरील मोकळ्या जागेत लहान बाळाच्या पाळण्याची जागा होती. स्वैपाक घरातच देवघर, आणि सारवलेली चूल आणि दुधाचे जाळीचे कपाट होते. स्वैपाक घराच्या समोरील दरवाजातून बैठकीच्या खोलीत जाण्याचा दरवाजा होता. बैठकीतून बाहेर रथगल्लीत उघडणाराही दरवाजा होता, तो फार कमी वापरला जाई. बैठकीतूनच दुकानात जाणाराही दरवाजा होता. बैठक शिसमाच्या लाकडी काळया रंगाची दिसायची. त्यास एक खिडकी होती आणि एक छोटेसे छिद्र होते, त्या छिद्रातून गल्लीतून चालणाऱ्या व्यक्तीच्या प्राण्यांच्या, सावल्या प्रतिमा छतावर दिसत असत. एकदा म्हणे एक भला मोठे जनावर तिथून आत येण्याचे प्रयत्न करीत होते, त्यास नानामामाने अस्मान दाखवून , ते छिद्रही बंद केले. विशेष म्हणजे बैठकीच्या खोलीस बाहेर पडताना एकच पायरी होती. तर स्वैपाकाच्या बाहेरील जागेत घडवंची वर गादी उशसा, चादरी, घड्यांची मांडणी होती. इथून पुढे दिसे ते गरबड चे घर, यास गरबडचे का म्हणत असे, ठावूक नाही पणं म्हणायचे. उजव्या बाजूस तीन चार घडवांच्या वर ठेवलेले भले मोठे रांजण, माठ, त्यावरील गोल झाकणे, कडीवाले गटू, एका छोट्याश्या ओटल्यावर असत. तिथपासून ते मागच्या दारा पर्यंत जाईस्तो भल्या मोठ्या कणग्या , धन धान्याने भरलेल्या विपुलतेचे लक्षण दाखवित. गरबडच्या दारातूनही रथगल्लीत बाहेर पडता येत असे, पणं इथेही पायऱ्या होत्याच. याच ओट्यावरून साठ्यावरून धाब्यावर जाण्याचा मार्ग होता, जे धाबे या सर्व घराचे वरूनचे एकत्रित चित्र दाखवित असे. मागच्या दाराचे चित्र काही वेगळेच होते. खरबडीत मातीचे, कधी गुरांचे वास्तव्य, कधी चारा, कधी अडगळीचे सामान ठेवायची जागा , न्हाणी घरापर्यंत भरलेल असे. पहाटेपासून चुलीत बळतन, सरपण सरकावित तापविलेल्या हंड्यातून किती आंघोळी व्हायच्या ते गणित कळल्लेच नाही. सकाळच्या प्रहरी ते बऱ्याचदा उन्ह डोक्यावर येईस्तवर धुराच्या साम्राज्यात असलेले न्हाणी घर, उजव्या बाजूस हौद, भले मोठे गंगाळ , काळया चौकोनी दगडावर आंघोळी व्हायच्यात, इथेही एक भले मोठे साने होते. मागच्या दारातून बाहेर पडणारा रस्ता डावीकडे शनी मंदिराकडे निघे तर उजवीकडचा ग्रामपंचायतीकडे . असे तिन्ही दिशांना बाहेर पडण्यास वाव असलेलं अंदाजे चार पाच गुंठ्यांतले घर नव्हे तर वास्तूच.
बैठकीच्या दारात कायम गाई म्हशींना रात्रीचे बांधून ठेवले जाई, त्यातील चंद्री, भुरी म्हैस, तांबडी गाय, काळया गाईचा गोऱ्हा, आठवणीत आहेत. या रात्री चर्वण करीत त्यावेळेस त्यांच्या गळ्यातील घंटेचा नाद अजूनही कानात रूंजतोय. बैठकीच्या शेजारील खोलीही कधीकाळी उघडली जायची. समोरील बाबू सोनार, पाठक गुरुजी, छोटू मामा, काशिनाथ मामाचे दुकान, उजवीकडील पांडू सोनार, भाऊ आणि चिरेवाले यांची घर जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी राहतात. गल्लीतून पुढे जाताना खिंडार लागायचं, तिथे रात्रीची भिती वाटायची, पुढे वाणी मंगल कार्यालय, ब्राह्मणकर गुरुजी, देशमुखांची घर लागायचीत आणि पुढे बालाजी रथाचे दर्शन, रथाकडील डावी कडील मार्गावरून किल्यावर तथा समाधीकडे जायचे. किल्ल्याला जाणारा मार्ग इथूनच सुरू होतो, हजार दिड हजार फुटांच्या किल्याच्या मध्यावर पांढरा रंग लावल्याने भला मोठा दरवाजा दिसे. किल्ल्याच्या उजव्या बाजूस थोड्याशा अंतरावर आनंदवन संस्थान आणि ३२ रहटांची गोड विहीर, आनंदवन संस्थानचे श्री गुरु गोविंद महाराज, सद्गुरु श्री केशवदत्त महाराज, सद्गुरु श्री मधुसूदन महाराज यांच्या वास्तव्याने पवित्र भूमीचे दर्शन व्हायचे. त्यापुढील गोलाकार टेकडीचे नयनरम्य दर्शन होते.
बैठकीच्या दारातील रस्त्याने उजवीकडील रस्ता कृष्ण मंदिराकडे अर्थात कासार गल्लीत. दुकानाच्या उजव्या बाजूने शनी मंदिराचे दर्शन घेऊन बाजारातला रस्ता. आण्णा मामा घरातून निघताना सर्वांना हाक मारून निघायचे, आण्णांच्या पाठी, पासष्ट पर्यंत जन्मलेले सर्व भाचे धावायचे. शनी मंदिरा जवळील चंदुला हाक मारत, पहिला स्टॉप जगू नानाचे दुकान, पुढे दामू रसवाला, पंढरी मामा टेलर, विनू मामा मेडिकल, मन्नालाल पितांबर ते सुधाकर लक्ष्मण, अशा सर्व प्रवासात डांगर टरबूज, आंबे घेऊनच घरी. घरी आल्यावर आंब्याचा रस काढण्याच्या कामास फक्त मोठ्यांची नियुक्ती होई. सर्व आंबे पिळून रस काढून झाल्यावर, कोयी आणि मुद्दामहून ठेवलेले रसिले साल खाण्यात आत्मिक समाधान मिळे. धाब्यावर जाऊन सान्यातून डोकावण्याची मजा औरच असे. मोठ्या मामी, धाकट्या मामी यांचे तान्ही मुले झोपलेली असत अन् आम्ही थोडेसे पणं मोठाले भाचे सान्यातून कल्ला करत असू, दुकानातील लिमलेटच्या गोळ्या काढताना कधी हात अडकला, कधी झाकण पडल तर पंचाईत व्हायची पणं मामा सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करून म्हणायचे कोण आहे रे? दोन्ही मामींच्या तान्ह्याना पाळणा हलविताना गायलेली अंगाई अजूनही कानात गुंजतात, येग येग गाई गोठ्यात , असो की हम्मा ये दुधु दे असो, खर सांगायचं तर आता आमच्या नातुंसाठी म्हणताना यांच्या आठवणीने कंठ दाटून डोळे पाणावतात. मोठी आई एक वेगळे रसायन, शेतात, वावरात, वाड्यात, सहज वावरणारी धोरणी कुटुंब वत्सल स्त्री. एवढ्या मोठ्या घरातील प्रत्येक दरवाजावर, सान्यावर बारीक लक्ष ठेवणारी, दुधाची बादली आल्यानंतर घरासाठी, नातवांसाठी, बोघणे भरून ठेवत, उर्वरित गरिबांना अत्यंत अल्प दरात वाटत असे. शेतीतून बैल गाडीतून आलेले धन धान्य उतरवून घरात साठवणूक करणे, भुईमूग फोडण्यासाठी बाया लावणे, वैगेरे कामे सहज निपटायची. आप्पांच्या हयातीत सुद्धा मुकटी, पारोळा, अमळनेर, लोहठार असो का मुलामुलींचे, सून जावयांचे सासर माहेर असो, प्रत्येक नातेवाईकांशी जोडणे हे तर प्रथम कर्तव्य होते. आप्पा, मोठी आई,आण्णा मामा यांच्या जाण्याने रिक्त जागा , नाना मामा, मामी, मोठी मामी यांनी सहज भरून काढली. ह्या साऱ्या आठवणी ऐशीच्या दशकातील असल्याकारणे कमी उल्लेख असण्याची शक्यता आहे. पण आठवणी आठवीत, साठी कधी आली कळले देखील नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा