प्रसिद्धी मिळवून देणारी लाचखोरी ?
दिनांक ३ एप्रिल २०२३ म. टा. च्या प्रथम पानावरील " राज्यात लाचखोरीची कोटीच्या कोटी उड्डाणे" बातमी क्लेशदायक आहे. सदर बातमीत प्रत्येक विभागाची जिल्ह्यासह आकडेवारी देऊन तीन महिन्यात २६ टक्क्यांची वाढ झाली असेही म्हटले आहे. टाइम्सच्या या वृत्ताची सरकार दफ्तरी दखल घेणारे पोलीस खाते सुद्धा लाचखोरीत आघाडीवर आहे. सामान्य माणसाला वेठीस धरून, वेळ प्रसंगी नियमांची भिती दाखवून वर्षानुवर्षे लाचखोरी होत आहे. दिलेली आकडेवारी उघडकीस आलेल्या प्रकरणांची आहे, या व्यतिरिक्त दुप्पट प्रकरणे याच लाचखोरानी दडपली असतील. ऑनलाईन सुविंधामुळे थोडे सोपे झालेले वाटते, आता काम होईल असे वाटत असतानाच कार्यालयात खेटे घालावे लागतात आणि चिरीमिरी देऊनच काम होते. दुचाकी पकडण्या पासून, जन्म मृत्यू, अधिवास, उत्पन्न, दस्तऐवज नोंदणी, पाणी, मालमत्ता कर, अशा अनेक दाखल्यांसाठी एक दोन वर्षात संबंध येतोच आणि सुटका म्हणून चिरीमिरी . स्वच्छ प्रशासन, लोकांचे सरकार फक्त घोषणाच असतात. यासाठी उपहासाने का होईना म्हणावेसे वाटते की, एकाच पक्षाचे सरकार निवडून द्यावे, कारण लाचखोरीच्या, भ्रष्टाचाराच्या नावे अन्य विरोधी पक्ष तुटून पडतात आणि सरकारला कारवाई करण्याचे भाग पडते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा