बुधवार, २६ एप्रिल, २०२३

लेख (७७) २७ एप्रिल २०२३



समन्वयातून प्रगती साधावी !!

वृत्तपत्र आणि सोशल मिडिया माध्यमातून राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित ग्रीनफिल्ड रिफायनरीस स्थानिकांचा विरोध आणि सत्ताधारी , विरोधी पक्ष नेत्यांच्या आरोप, प्रत्यारोपांच्या प्रतिक्रिया वाचनात आल्यात. प्रकल्प कोणताही असो त्यासाठी जमीन ग्रहणाचा महत्वाचा भाग असतो आणि ह्याच मुद्द्याला ग्रामस्थांचा विरोध असतो. सारासार विचार करता, राज्याच्या पश्चिम किनाऱ्यालगत केंद्र शासनाच्या प्रकल्पांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर जमिनींचे अधिग्रहण झाले असून, सर्वच प्रकल्प शासनाच्या, खाजगीकरणाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीस हातभार लावत आहेत. या साऱ्या गावांची नावे, प्रकल्पांची नावे, जमिनी ग्रहणा आधीची स्थिती, प्रकल्पात मिळालेल्या रोजगार , व्यवसाय संधी, शिक्षणासाठी संधी, रस्ता, रेल्वे, प्रवासी, रुग्णालय, सुविधा, या साऱ्या बाबींचा एक तक्ता बनवावा. यातील प्रगती आणि अधोगती असलेले ठळक मुद्दे अधोरेखित करावेत. उपरोक्त प्रकल्पामुळे मिळणाऱ्या सोय सुविधा, जीवनमान, राहणीमान यावर होणारा परिणाम याची तुलना करावी. हे सारे काम सत्ताधारी, विरोधी पक्षाने समन्वयाने केले पाहिजे. यात फक्त स्थानिकांचेच समुपदेशन करावे , बाह्य नेतृत्व यांना मज्जाव करावा जेणेकरून स्थानिकांना निर्णय घेण्यास सोप्पे होईल. अजूनही वेळ गेलेली नाही, सत्ताधाऱ्यांनी उदाहरणासाठी असे नियोजन करावे जेणेकरून समन्वयातून प्रगती साधली जाईल, अन्यथा लोकविरोधामुळे गाशा गुंडाळावा लागून आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर जाण्याची संभावना नाकारता येणार नाही. 



 

सोमवार, २४ एप्रिल, २०२३

लेख (७६) २६ एप्रिल २०२३



कामाचे तासांवर सारेच गणित अवलंबून !!

दिनांक २५ एप्रिल २०२३ लोकसत्ताच्या "ॲपल पोटे" संपादकीयात कामाच्या तासांसंबधी विश्लेषण केले आहे. कामाचे तास हे शासकीय, निमशासकीय, औद्योगिक, अत्यावश्यक सेवा, खाजगी अशा संस्थानुरुप वेगवेगळे आहे. औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या गृहोद्योग पद्धतीत दररोज कामाचे तास सामान्यतः १२ तासांच्या पेक्षा जास्त नसत, याचे कारण त्या वेळी कृत्रिम उजेडाची सोय नव्हती व कामाचे स्वरुपही भिन्न होते. औद्योगिक क्रांतीनंतर कामगार व कारखानदार यांच्यातील संबंधांस कराराचे स्वरुप् प्राप्त झाले. वेगवेगळ्या देशातील वातावरण, उत्पादन संबधित आधारित कायदे आहेत. १९४८ च्या कायद्याने कारखान्यांतून ४८ तासांचा आठवडा व ९ तासांचा दिवस ठरविला आहे. तरीसुद्धा अजूनही बऱ्याच क्षेत्रात कामाच्या स्वरुपाप्रमाणे ४८ ते ५४ तासांचा आठवडा आहे. आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी विदेशी क्लायंटच्या नावे सर्व मापदंड ओलांडले आहेत. संपादकीयात म्हटल्याप्रमाणे कामगार कायद्यात बदल होणे आवश्यक आहेत, त्यात फक्त कामाच्या तासांचा विचार न होता, १२ तासांचे प्रहर (सकाळ रात्र) नियोजन, नियमाप्रमाणे आठवड्यातील एकूण कामाच्या तासांची संख्या ४८ ते ५४ तासांपेक्षा जास्त नको, त्या प्रमाणे साप्ताहिक सुट्टी, ओव्हर टाईम रेट (नाईट अलॉउन्स वेगळा), सर्व प्रकारच्या रजा, महिलांसाठी धोरण, सुरक्षा धोरण (युनिफॉर्म, योग्य सेफ्टी उपकरणे , हाय रिस्क अलॉउन्स) पी एफ, ग्रॅच्युइटी मोजण्याच्या प्रक्रियेत बदल, फिक्स्ड जॉब (टर्म पोस्टिंग - काही महिन्यांसाठी पोस्टिंग विरोध), पिरियोडिक ट्रान्स्फर, आरोग्य विमा (पॅनल डॉ, हॉस्पिटल सह) एल टी सी सुविधा, वर्क फ्रॉम होम (त्या संबंधी नियमावली) , संप आणि धरणे याचे नियम, या सर्व बाबींचा समावेश, अथवा विचार होणे आवश्यक आहे. कामाच्या तासांवर कामगारांची शारीरिक क्षमता, त्यानुसार उत्पादकता आणि नफा, याचे सारे गणित अवलंबून असते. ब्रिटिशांच्या राजवटीतील कायदे नियम, त्यात गेल्या ७५ वर्षातील सुधारणा, राज्याराज्यांत कायद्यात होणारा बदल, याचे सर्व एकत्रित करून, साऱ्याच क्षेत्रात बंधनकारक ठरवून, पुढच्या कामगार दिनापर्यंत कायम स्वरुपी नवीन धोरण बनविल्यास 

आधुनिक भारताच्या बांधणीस अधिक वेग येईल, त्याचा परिणाम आयात निर्यात परदेशी गुंतवणूक , चलनवलन या साऱ्या बाबींवर आपोआप होईल. 


विजयकुमार वाणी, पनवेल

रविवार, २३ एप्रिल, २०२३

लेख (७५) २४ एप्रिल २०२३

 

शतायुषी भव !! सचिन ,

क्रिकेट जगतातील असंख्य विक्रमांचा राजा, तसेच असंख्य पुरस्कारांचा विक्रमादित्य भारतरत्न सच्चू , पन्नासवर्षांपूर्वी वैशाखातल्या प्रखर उन्हाळ्यात, त्यात भुमिशी संबंधित मंगळवारचा जन्म म्हणूनच की काय साक्षात सूर्यनारायणाच्या साक्षीने विश्वातल्या शेकडो मैदानावर तळपत राहिला. वयाच्या पंधराव्या वर्षी आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यास संधी मिळणे हे धैर्य, चिकाटी, सातत्य, संयम, शांतता, दृष्टी, अपयश पचविण्याची शक्ती हे सारे गुण, बाळकडू जन्मतःच मिळालेले असल्यामुळे शक्य झाले आहे. संतांच्या प्रत्येक श्लोकाचे निरूपण प्रत्येक किर्तनकार आपापल्या परीने करीत असतात, त्याप्रमाणेच क्रिकेटच्या या देवाच्या प्रत्येक डावाच्या, खेळाच्या शैलीचे वर्णन, असंख्य शेकडो क्रिकेट तज्ञांपासून सामान्यजन करीत असतात. कारण प्रत्येकास सचिन त्याच्या त्याच्या परीने कळला आहे. पराकोटीचे प्रेम , आदर मिळाल्यावर श्री राम, श्रीकृष्ण देवांचाही एकेरी उल्लेख होतो. असाच एकेरी उल्लेख भारतातल्या कमीतकमी १०० कोटींच्या तोंडी सच्चू सचिन असाच होत आहे आणि भविष्यातही राहील. सच्चूच्या अर्धशतकी वयाच्या दिवशी शतायुषी हो अशा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आणि अक्षय होत राहील.


विजयकुमार वाणी, पनवेल


सोमवार, १७ एप्रिल, २०२३

लेख (७४) १७ एप्रिल २०२३


सोनगीर

धुळ्याहून निघाल्यास अर्धा तासात सोनगीर फाटा, पोलीस ठाणे, एन जी बागुल हायस्कूल ओलांडल्यावर एका पांढऱ्या गोल घुमटाकार दर्ग्याजवळ कडू निंबाच्या झाडाजवळ बस थांबे. त्याकाळातील मध्यभागी उंचवटा असलेली आणि दोन्ही कडांवर उतरलेली एकेरी डांबरी सडक , नागमोडी वळणं घेऊन पुढे नरढाण्यास जात असे. एसटी तून उतरल्यावर मैलाच्या दगडाच्या आणि तिरक्या वाढलेल्या बाभळीच्या मधून छोट्याश्या पायवाटेने "सोनगीर" गावात प्रवेश होत असे. छोटी नाली , एक दोन टपऱ्या ओलांडून भरगच्च हिरवागार कडुलिंबाच्या सावलीतून रथगल्लीत प्रवेश होत असताना, कासार गल्लीतील तांब्याच्या भांड्यावरील ठोके ऐकायला येत असत. डॉ भानुदास जोशी यांचा दवाखाना, मामांचा एस्पैस वाडा ओलांडून समोर पांडू सोनार यांचे दुकानानंतर नाना मामाचे दुकान दिसे. दुकानाच्या छोट्याश्या उंच जागेवर मोनॅको बिस्किटांच्या जाळी सारखी एक चारपायी लोखंडी खुर्ची दिसे आणि आतल्या गल्ल्यावर पांढरी टोपी, तलम बंडी, धोतर नेसलेल बारीक व्यक्तिमत्त्व तात्यांचे आणि लाल गंध लावून पांढरे शुभ्र कपडे परिधान करणाऱ्या नाना मामाचे दर्शन होत असे. या पुढील पायऱ्या म्हणजे घराचा मुख्य दरवाजा. दोन तीन पायऱ्या चढल्यावर मोकळ्या सारवलेल्या , गोल काळया कुळकुळीत खांबाचा आधार घेत उभे असलेले धाब्याच्या घराची सुरवात होई. भला मोठा जाड जुड नक्षीकाम असलेला दोन दारी दरवाजा, त्यावरील असलेल्या पितळेच्या नक्षीदार गोलाकार चकत्या, तीन चार अंडाकृती आकाराच्या साखळीयुक्त कडी, लक्ष वेधून घेई.   

प्रवेशाच्या सुरवातीस उजवीकडील भिंतीवरील गोखले दिसे. दोन चौकोनी खांबातील मोकळ्या जागेत ऐसपैस मोठाली बंगळी अडकवलेली दिसे. त्या मागील जागेत कपाशी, भुईमूग, ज्वारीचे पीक धाब्या पर्यंत उंचच्या कनातीत बांधून ठेवलेले असे. यावर एक मोठाले असे बुद्धिबळाच्या चौकटीत मावतील एवढ्या सळ्यांचे साने होते. त्या सान्याच्या खालीच, दिवे लगणीच्या वेळेस, चिमण्या, कंदील, गोल काचेचा दिवा यांना साफ सुफ करीत, मोठी आई दुधाचे भांडे, मापले घेऊन बसलेली दिसे. उजव्या बाजूसच कुलूपबंद खोली होती, जिथे फक्त मोठ्यानाच प्रवेश असावा असे वाटायचे. पुढच्या मोकळ्या जागेत मोठाली लाकडी जेवणाची पाटे, तसेच दुकानाच्या मागील भागातील सामानाच्या खोलीच्या खिडक्या होत्या. तिथे आलेल्या सर्व पै पाहुण्यांचे सामान असे. डाव्या बाजूस स्वैपाकाच्या खोली बाहेरील मोकळ्या जागेत लहान बाळाच्या पाळण्याची जागा होती. स्वैपाक घरातच देवघर, आणि सारवलेली चूल आणि दुधाचे जाळीचे कपाट होते. स्वैपाक घराच्या समोरील दरवाजातून बैठकीच्या खोलीत जाण्याचा दरवाजा होता. बैठकीतून बाहेर रथगल्लीत उघडणाराही दरवाजा होता, तो फार कमी वापरला जाई. बैठकीतूनच दुकानात जाणाराही दरवाजा होता. बैठक शिसमाच्या लाकडी काळया रंगाची दिसायची. त्यास एक खिडकी होती आणि एक छोटेसे छिद्र होते, त्या छिद्रातून गल्लीतून चालणाऱ्या व्यक्तीच्या प्राण्यांच्या, सावल्या प्रतिमा छतावर दिसत असत. एकदा म्हणे एक भला मोठे जनावर तिथून आत येण्याचे प्रयत्न करीत होते, त्यास नानामामाने अस्मान दाखवून , ते छिद्रही बंद केले. विशेष म्हणजे बैठकीच्या खोलीस बाहेर पडताना एकच पायरी होती. तर स्वैपाकाच्या बाहेरील जागेत घडवंची वर गादी उशसा, चादरी, घड्यांची मांडणी होती. इथून पुढे दिसे ते गरबड चे घर, यास गरबडचे का म्हणत असे, ठावूक नाही पणं म्हणायचे. उजव्या बाजूस तीन चार घडवांच्या वर ठेवलेले भले मोठे रांजण, माठ, त्यावरील गोल झाकणे, कडीवाले गटू, एका छोट्याश्या ओटल्यावर असत. तिथपासून ते मागच्या दारा पर्यंत जाईस्तो भल्या मोठ्या कणग्या , धन धान्याने भरलेल्या विपुलतेचे लक्षण दाखवित. गरबडच्या दारातूनही रथगल्लीत बाहेर पडता येत असे, पणं इथेही पायऱ्या होत्याच. याच ओट्यावरून साठ्यावरून धाब्यावर जाण्याचा मार्ग होता, जे धाबे या सर्व घराचे वरूनचे एकत्रित चित्र दाखवित असे. मागच्या दाराचे चित्र काही वेगळेच होते. खरबडीत मातीचे, कधी गुरांचे वास्तव्य, कधी चारा, कधी अडगळीचे सामान ठेवायची जागा , न्हाणी घरापर्यंत भरलेल असे. पहाटेपासून चुलीत बळतन, सरपण सरकावित तापविलेल्या हंड्यातून किती आंघोळी व्हायच्या ते गणित कळल्लेच नाही. सकाळच्या प्रहरी ते बऱ्याचदा उन्ह डोक्यावर येईस्तवर धुराच्या साम्राज्यात असलेले न्हाणी घर, उजव्या बाजूस हौद, भले मोठे गंगाळ , काळया चौकोनी दगडावर आंघोळी व्हायच्यात, इथेही एक भले मोठे साने होते. मागच्या दारातून बाहेर पडणारा रस्ता डावीकडे शनी मंदिराकडे निघे तर उजवीकडचा ग्रामपंचायतीकडे . असे तिन्ही दिशांना बाहेर पडण्यास वाव असलेलं अंदाजे चार पाच गुंठ्यांतले घर नव्हे तर वास्तूच.  

बैठकीच्या दारात कायम गाई म्हशींना रात्रीचे बांधून ठेवले जाई, त्यातील चंद्री, भुरी म्हैस, तांबडी गाय, काळया गाईचा गोऱ्हा, आठवणीत आहेत. या रात्री चर्वण करीत त्यावेळेस त्यांच्या गळ्यातील घंटेचा नाद अजूनही कानात रूंजतोय. बैठकीच्या शेजारील खोलीही कधीकाळी उघडली जायची. समोरील बाबू सोनार, पाठक गुरुजी, छोटू मामा, काशिनाथ मामाचे दुकान, उजवीकडील पांडू सोनार, भाऊ आणि चिरेवाले यांची घर जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी राहतात. गल्लीतून पुढे जाताना खिंडार लागायचं, तिथे रात्रीची भिती वाटायची, पुढे वाणी मंगल कार्यालय, ब्राह्मणकर गुरुजी, देशमुखांची घर लागायचीत आणि पुढे बालाजी रथाचे दर्शन, रथाकडील डावी कडील मार्गावरून किल्यावर तथा समाधीकडे जायचे. किल्ल्याला जाणारा मार्ग इथूनच सुरू होतो, हजार दिड हजार फुटांच्या किल्याच्या मध्यावर पांढरा रंग लावल्याने भला मोठा दरवाजा दिसे. किल्ल्याच्या उजव्या बाजूस थोड्याशा अंतरावर आनंदवन संस्थान आणि ३२ रहटांची गोड विहीर, आनंदवन संस्थानचे श्री गुरु गोविंद महाराज, सद्गुरु श्री केशवदत्त महाराज, सद्गुरु श्री मधुसूदन महाराज यांच्या वास्तव्याने पवित्र भूमीचे दर्शन व्हायचे. त्यापुढील गोलाकार टेकडीचे नयनरम्य दर्शन होते. 

बैठकीच्या दारातील रस्त्याने उजवीकडील रस्ता कृष्ण मंदिराकडे अर्थात कासार गल्लीत. दुकानाच्या उजव्या बाजूने शनी मंदिराचे दर्शन घेऊन बाजारातला रस्ता. आण्णा मामा घरातून निघताना सर्वांना हाक मारून निघायचे, आण्णांच्या पाठी, पासष्ट पर्यंत जन्मलेले सर्व भाचे धावायचे. शनी मंदिरा जवळील चंदुला हाक मारत, पहिला स्टॉप जगू नानाचे दुकान, पुढे दामू रसवाला, पंढरी मामा टेलर, विनू मामा मेडिकल, मन्नालाल पितांबर ते सुधाकर लक्ष्मण, अशा सर्व प्रवासात डांगर टरबूज, आंबे घेऊनच घरी. घरी आल्यावर आंब्याचा रस काढण्याच्या कामास फक्त मोठ्यांची नियुक्ती होई. सर्व आंबे पिळून रस काढून झाल्यावर, कोयी आणि मुद्दामहून ठेवलेले रसिले साल खाण्यात आत्मिक समाधान मिळे. धाब्यावर जाऊन सान्यातून डोकावण्याची मजा औरच असे. मोठ्या मामी, धाकट्या मामी यांचे तान्ही मुले झोपलेली असत अन् आम्ही थोडेसे पणं मोठाले भाचे सान्यातून कल्ला करत असू, दुकानातील लिमलेटच्या गोळ्या काढताना कधी हात अडकला, कधी झाकण पडल तर पंचाईत व्हायची पणं मामा सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करून म्हणायचे कोण आहे रे? दोन्ही मामींच्या तान्ह्याना पाळणा हलविताना गायलेली अंगाई अजूनही कानात गुंजतात, येग येग गाई गोठ्यात , असो की हम्मा ये दुधु दे असो, खर सांगायचं तर आता आमच्या नातुंसाठी म्हणताना यांच्या आठवणीने कंठ दाटून डोळे पाणावतात. मोठी आई एक वेगळे रसायन, शेतात, वावरात, वाड्यात, सहज वावरणारी धोरणी कुटुंब वत्सल स्त्री. एवढ्या मोठ्या घरातील प्रत्येक दरवाजावर, सान्यावर बारीक लक्ष ठेवणारी, दुधाची बादली आल्यानंतर घरासाठी, नातवांसाठी, बोघणे भरून ठेवत, उर्वरित गरिबांना अत्यंत अल्प दरात वाटत असे. शेतीतून बैल गाडीतून आलेले धन धान्य उतरवून घरात साठवणूक करणे, भुईमूग फोडण्यासाठी बाया लावणे, वैगेरे कामे सहज निपटायची. आप्पांच्या हयातीत सुद्धा मुकटी, पारोळा, अमळनेर, लोहठार असो का मुलामुलींचे, सून जावयांचे सासर माहेर असो, प्रत्येक नातेवाईकांशी जोडणे हे तर प्रथम कर्तव्य होते. आप्पा, मोठी आई,आण्णा मामा यांच्या जाण्याने रिक्त जागा , नाना मामा, मामी, मोठी मामी यांनी सहज भरून काढली. ह्या साऱ्या आठवणी ऐशीच्या दशकातील असल्याकारणे कमी उल्लेख असण्याची शक्यता आहे. पण आठवणी आठवीत, साठी कधी आली कळले देखील नाही. 

                               




रविवार, १६ एप्रिल, २०२३

लेख (७३) १७ एप्रिल २०२३

 


सत्ताधा-यांच्या चुकीच्या धोरणांचा विचार करणे आवश्यक ।

गेल्या पंधरा दिवसांचा लोकसत्ता वाचनाचा सहजच आढावा घेतला. लोकसत्तातील संपादकीय, स्तंभलेख, वृत्त बऱ्याचदा सत्ताधा-यांच्या  घडलेल्या चुका दर्शविणे सोबत दिशा देणारे सुद्धा असते . बरेचसे स्तंभलेख, वृत्त विरोधकांना बळ  मिळविण्यासाठी, जागृत करण्यासाठी असतात हे जाणवते .  उदाहरण द्यायचे असल्यास  न्यायालयांचे एन्काऊंटर , सुरुवात आणि सातत्य , आनंदामागील अर्थ, फेक की नेक ?, पवारांची  अदानी अदा,  विश्रांतीमागील वास्तव , नामांतरानंतर , दूरचे दिवे हे सारे संपादकीय, सत्ताधारकांचे कान टोचणारे,  चुकीचे निर्णय, धोरण आणि एकाधिकारशाहीचे द्योतक असल्याचे दर्शविते.  त्या सोबतच तज्ञ लेखकांचे स्तंभलेख जसे आता विरोधी पक्ष काय करणार ?,  सरकारच न्यायाधीश , लोकशाही विरोध लोकांना कसा खपेल ? भाजपविरोधी मोर्चे बांधणीला वेग , विकासदर सहा टक्क्यांखाली , स्थानिक यशाची काँग्रेसला गरज , विरोधी बिगुल निर्धाराने वाजवावा , २०२४ नाही, तर नंतरही नाही. , कर्नाटक जिंकेल तो राजकारण भेदेल,  हे सारे विरोधकांचे मनोधैर्य वाढवणारे वाटतात .  तसेच ध्रुवीकरणाच्या भूमीतून , डिजिटल इंडिया मागील दूरदृष्टी  हे अभ्यासू लेख या पसाऱ्यात वाचावयास मिळतात .  परंतु या आढाव्यात एकंदरीत देशाचे , सत्ताधा-यांचे असे नकारात्मक चित्र निर्माण होते.  म्हणजे या सरकारने गेल्या आठ नऊ वर्षात जे केले आहे ते सारे चुकीचेच आहे का? असे साहजिकच वाटू लागते.  एवढी नकारात्मकता यातून दिसून येते .  यासाठी या सरकारचे गेल्या आठ नऊ वर्षातील घेतलेले मोठे सर्व  निर्णय आणि त्याचे परिणाम याचे विश्लेषण होणे आवश्यक आहे , जेणेकरून सामान्यांना , विरोधकांना सत्ताधा-यांच्या चुकीच्या धोरणांचा विचार करता येऊन पुढची संधी द्यावी की न द्यावी याचा विचार करता येईल. 

विजयकुमार आप्पा वाणी , पनवेल  

मंगळवार, ४ एप्रिल, २०२३

लेख (७२) ०५ एप्रिल २०२३

 


त्यांची नाटो तर आपली वाटो 

दिनांक ५ एप्रिल २०२३ लोकसत्ताचे "नाटो नाटो " संपादकीय वाचले. ४ एप्रिल रोजीच नाटोस ७४ वर्षे पूर्ण झालीत आणि फिनलँड ३१ वा देश सहभागी झाला. पाश्चिमात्य देशांचा इतिहास पाहता वर्णभेद आणि पौर्वात्य देशांचा दुस्वास हा कळीचा मुद्दा ठरतो . कारण जर्मनी, सोव्हिएट युनियन विरोधात स्थापन झालेली संघटना, पाच वर्षातच जर्मनीस सदस्य करून, पौर्वात्य देशांना वेगळे पाडण्याचा घाट असू शकतो . आजही सर्वच आंतरराष्ट्रीय संघटनांवर (डब्ल्यूटीओ ,जी ७, आयएमएफ, डब्ल्यूएचओ, न्यायालय वै) यांचेच वर्चस्व अबाधित आहे . अमेरिका कितीही म्हटलं तरी वसाहतवादी देश असून, या वसाहती युरोपातीलच आहेत. चलाखी आणि बुद्धी चातुर्याने एक सामूहिक सुरक्षा प्रणाली तयार करून एकत्रित लष्करी खर्च केला जावून , बाह्य पक्षाच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सक्षमता दाखविली आहे. याच चातुर्याने या देशांनी खनिज तेल देशांवर वर्चस्व ठेवून जागतिकीकरणात अग्रभागी आहेत . हेच नेमके पौर्वात्य देशांना जमलेले दिसत नाही. ऑस्ट्रेलिया, जपान, सिंगापूर ,कोरिया ,भारत, चीन ते रशिया देश, स्वतःस सार्वभोमत्व मानून शेजारील राष्ट्रांत कुरापती काढत बसतात, त्यामुळे पूर्वेतही एकटे पडतात आणि पश्चिमी बलाढ्य राष्ट्रांपुढे टिकाव धरू शकत नाही . त्यातल्या त्यात नॉन अलाइन कॉन्फरेन्स , जी ७, जी २०, क्वाड , सार्क अनेक प्रयोग करून भारत प्रगतीच्या वाटा शोधीत आहे , परंतु अजूनही म्हणावे तसे यश मिळत नाही . मुद्दा हाच की , पाश्चिमात्य देशांचे वर्षानुवर्षे असलेले वर्चस्व मोडीत काढून पूर्वेकडील आघाडी बनविणे कठिण तर आहेच पण पूर्वेच्या खोडी काढणाऱ्या शत्रू विरोधात तरी कमीत कमी वेस्टर्न आशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन (वाटो ) स्थापन करून, शक्यही आहे . 

विजयकुमार आप्पा वाणी , पनवेल 

रविवार, २ एप्रिल, २०२३

लेख (७१) ३ एप्रिल २०२३

 

प्रसिद्धी मिळवून देणारी लाचखोरी ? 

दिनांक ३ एप्रिल २०२३ म. टा. च्या प्रथम पानावरील " राज्यात लाचखोरीची कोटीच्या कोटी उड्डाणे" बातमी क्लेशदायक आहे. सदर बातमीत प्रत्येक विभागाची जिल्ह्यासह आकडेवारी देऊन तीन महिन्यात २६ टक्क्यांची वाढ झाली असेही म्हटले आहे. टाइम्सच्या या वृत्ताची सरकार दफ्तरी दखल घेणारे पोलीस खाते सुद्धा लाचखोरीत आघाडीवर आहे. सामान्य माणसाला वेठीस धरून, वेळ प्रसंगी नियमांची भिती दाखवून वर्षानुवर्षे लाचखोरी होत आहे. दिलेली आकडेवारी उघडकीस आलेल्या प्रकरणांची आहे, या व्यतिरिक्त दुप्पट प्रकरणे याच लाचखोरानी दडपली असतील. ऑनलाईन सुविंधामुळे थोडे सोपे झालेले वाटते, आता काम होईल असे वाटत असतानाच कार्यालयात खेटे घालावे लागतात आणि चिरीमिरी देऊनच काम होते. दुचाकी पकडण्या पासून, जन्म मृत्यू, अधिवास, उत्पन्न, दस्तऐवज नोंदणी, पाणी, मालमत्ता कर, अशा अनेक दाखल्यांसाठी एक दोन वर्षात संबंध येतोच आणि सुटका म्हणून चिरीमिरी . स्वच्छ प्रशासन, लोकांचे सरकार फक्त घोषणाच असतात. यासाठी उपहासाने का होईना म्हणावेसे वाटते की, एकाच पक्षाचे सरकार निवडून द्यावे, कारण लाचखोरीच्या, भ्रष्टाचाराच्या नावे अन्य विरोधी पक्ष तुटून पडतात आणि सरकारला कारवाई करण्याचे भाग पडते.