उद्वेग आणणाऱ्या जनांचे काय करावे.
राज्यातली गुंतवणूक गेली, पक्ष चिन्ह गोठविले, पुल दुर्घटना, एमसीए क्रिकेट निवडणूक, महिला पत्रकाराची कुंकू टिकली, हिमाचल गुजरात निवडणूक घोषणा आधी का नंतर का, महिला खासदारांविषयी असभ्य अर्वाच्य भाषा, ऐतिहासिक चित्रपटात लिखाणावरून छत्रपतींचे वारसदार त्रस्त, राजकीय वारसदारांनी हर हर महादेव शो थांबविले, २४ तासात कृषी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, काँग्रेसचे ट्विटर अकाऊंट रद्द, यात्रा थांबवून दाखवा, या आणि अनेक मनास उद्वेग आणणाऱ्या बातम्या मागच्या आठवड्यात आणि विशेषतः सोमवार, मंगळवारच्या वृत्तपत्रात वाचावयास मिळाल्यात. खरचं असेच चित्र आहे का राज्यात, काहीच सकारात्मक घडत नाही का?
गेले कित्येक महिने सारे वृत्तपत्र, साऱ्या चित्रवाहिन्यावर हेच चित्र दिसत आहे. कंटाळा आणलाय यांच्या वागण्याने. एकही गोष्ट चांगल्या नजरेने बघितली जात नाही. काही घडले , काही केले तर त्याच्या दुसऱ्या बाजुत वाईटच दडले आहे आणि ते इतके ठासून वाजवून सांगितले जाते आणि बिंबविले जाते. साऱ्याच वृत्तपत्र / चित्रवाणी माध्यमातून यावर ताशेरे ओढले जातात, परंतु कुणीही ऐकण्याच्या मुड मध्ये नाही. प्रत्येक क्षेत्रातील वृत्तावर सारेच तज्ञ आहेत. अगदी अमेरिकेच्या मंगळावरील यानावर सुद्धा कमेंट्स करण्याचा यांना अधिकार आहे, तर त्यापुढे देशाची अर्थव्यवस्था, जिडीपी, जीएसटी, न्यायाधीशांचे निकाल, निवडणूक आयुक्तांचे अधिकार ते कुणास एक्स, वाय , झेड सिक्युरिटी काढणे पुरविणे, निष्ठावान का गद्दार, पूर्वीचे वैरी गळ्यातले ताईत बनणारे, हेच या साऱ्या विषयांचे तज्ञ हिरहिरीने किंचाळत, केकटून बाईट्स देण्यास तयारच असतात. निवडणूक राजकीय विषेतज्ञ असा आविर्भाव आणतात की यांना प्रत्येक मतदार संघाचे, राजकीय पक्षाचे ज्ञान आहे, पणं निकालानंतर हे सारेच गायब होतात आणि हे असे होणारच होते अशी पुष्टी जोडायला देखील यांना कमीपणा वाटत नाही. यांना ऐन केन प्रकरण प्रसिद्धी हवी असते.
यात खरे हेच असते की प्रत्यक्ष काम करणारे , चांगले काम करणारे , कृती करणारे एक दोन जणच असतात, पणं त्यांच्या या कृतीवर तुटून पडणारे असंख्य असतात. त्यामुळे या अनेकांच्या प्रहाराने सकारात्मक विषय सुद्धा , नकारात्मक होऊन डोक्यात भिनला जातो आणि खरोखर वाचनीय, कौतुक वाटणाऱ्या वृत्तांवर अक्षरशः पांघरूण घातले जाते. त्यामुळे खरोखरचं वृत्तपत्र वाचन, टिव्ही वरील २४ तास चालणाऱ्या बातम्या पाहण्याचा उबग आला आहे. वृत्तपत्रातील स्तंभलेख, अग्रलेख, विचारवंतांचे लेख वा एखाद्या पुस्तकाचे परीक्षण एवढेच वाचावेसे वाटते आणि टिव्हीवर देखील २४ तास चालणाऱ्या बातम्या, सूनांच्या भांडणा व्यतिरिक्त, संतांच्या सिरीयल आणि कॉमेडी शो अगदी बिग बॉस सुद्धा बघावेसे वाटतात.
या साऱ्या घडामोडींचा परामर्श घेणाऱ्या तज्ञ , जाणकारांना सुद्धा याची जाणीव होत आहे पणं हि मंडळी, या साऱ्यांपुढे हतबल आहेत, असमर्थ आहेत कारण त्यांनाही इतका उबग आला आहे यांचा, कारण या कमेंट्स वाचाळ विरानी , एलान मस्कच्या ट्विटरच्या संबधित सुद्धा ताशेरे ओढले आहेत की ज्यांना एकूण व्यवहारात किती शून्य आहेत हे सुध्दा सांगता येणार नाही. कुणी थांबवू शकते का हे, सगळ्याच विषयांवर साऱ्यांचेच कमेंट्स करणे. सामान्यांना अभिप्रेत आहे आपआपल्या क्षेत्रात असलेल्या विषयांवर मर्यादित कमेंट्स , टीका टिप्पणी करणे. पण दुर्दैव आहे याला आता पायाबंद घालणं मुश्किल होऊन बसले आहे. या साऱ्यांना वृत्तपत्र चित्रवाणी माध्यमांनी, व्यक्त होण्यास संधी दिली नाही तरी, हे कमेंट्स महाशय व्हॉट्सॲप, एफ बी, इंस्टाग्राम, ट्विटर या सोशल साईट्स वर मुक्तपणे व्यक्त होतील आणि वादांची परंपरा चालूच ठेवतील. मरण हे सामान्य वाचकांचे वेळ काढून टिव्ही पाहणाऱ्यांच्या नशीबी आले आहे आणि हेच सांगणे आम्हा साऱ्यांचे आहे.
विजय आप्पा वाणी, पनवेल

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा