रोजगार संधीचा बुडबुडा.
शुक्रवार दिनांक ११ नोव्हेंबर २२ "बडबडे बुडबुडे" संपादकीय लेखात आय टी संबधित क्षेत्रातील कंपन्यांच्या मनुष्य बळ कपाती विषयी भाष्य केले आहे. यातील अंतिम परिच्छेद अत्यंत महत्वाचा आहे. अधिकाधिक रोजगारक्षम उद्योग, कारखानदारी, कृषी क्षेत्राला प्राधान्य, या सेवांमध्ये मनुष्यबळ , रोजगार उपलब्ध होण्याची संधी जास्त प्रमाणात असते. देशाची आर्थिक स्थिती, कोरोनाची कारणे, रशिया युक्रेन युद्धामुळे वाढलेले तेलाचे भाव, साऱ्यांचा विचार बाजूला ठेवून, महाराष्ट्राचा विचार (एमपीएससी अभ्यासक्रम नुसार) केल्यास १० ते ११ कोटी लोकसंख्येत, २५ टक्के विद्यार्थी, २५ टक्के निवृत्त आणि वयस्क धरल्यास, उर्वरित ५० टक्के म्हणजे ५ कोटी लोकांना रोजगार उपलब्ध असावयास हवा. त्यापैकी २० टक्के म्हणजे २ कोटी शेतकरी, २० टक्के म्हणजे २ कोटी व्यापार रोजंदारी किरकोळ फेरीवाले, २.५ टक्के म्हणजे २५ लक्ष सर्व शाळा महाविद्यालय बँका राज्य आणि केंद्र शासकीय निमशासकीय आस्थापना, खाजगी कंपन्या, कारखाने इत्यादी विभागला गेला. तरीपण उर्वरित ७.५ टक्के म्हणजे ७५ लक्ष कशातही न मोडणारा वर्ग आहे, ज्यास रोजगार साधनं उपलब्ध नाही. याचाच अर्थ महाराष्ट्र राज्याचे उदाहरणात साधारणतः ७५ लक्ष आणि अधिक बेरोजगारी समस्या कायम रहात आहे. यासाठीचे नियोजन आयोजन वर्षानुवर्षे अपुरे राहिले आहे. राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यातील एमआयडीसी, आयटी पार्क, सेझ, टेक्स्टटाईल्स पार्क, यांच्या ४० हजाराच्या वर छोट्या मोठ्या कारखान्यात १० लक्ष रोजगार उपलब्ध आहे. गेल्या ५० वर्षातील कापड गिरणी, हातमाग, सुत गिरणी, साखर कारखाने, सिमेंट कारखाने, यांची आजची स्थिती समाधानकारक नसून वाईट आर्थिक अवस्थेत आहेत. या सर्व कारखान्यांची डागडुजी, आर्थिक बळ देऊन नूतनीकरण आणि गुंतवणूकीद्वारे येणारे नवीन प्रकल्प यांचा ताळमेळ साधला तर लोकसंख्येच्या गणितात कमीतकमी ५ टक्के रोजगार संधी उपलब्धता करता येईल. त्याप्रमाणेच कृषी क्षेत्रात छोट्या शेतकऱ्यांसाठी स्थानिक पातळीवर कॉन्ट्रॅक्ट शेतीचा पर्याय स्वीकारून नांगरणी ते पीक विक्री करण्याची व्यवस्था निर्माण करून, एक ठराविक उत्पन्न शेतकऱ्यास मिळेल जेणेकरून कर्ज घेण्याची वृत्ती कमी होऊन स्थिरता प्राप्त होईल. या रोजगार उपलब्धतेवर, लोकांची क्रय शक्ती वाढून पुढची निवास, व्यापार, मनोरंजन, प्रवास,या क्षेत्राची अर्थ व्यवस्था हळू हळू मजबूत होण्यास विलंब लागणार नाही. कारण आयटी क्षेत्रातील दोलायमान परिस्थिती , मध्येच बंद होणारे स्टार्ट अप किंवा राजकीय इर्षेपोटी कागदावर घोषणा केलेले प्रकल्प असो, येत राहतील आणि मोडीत कधी निघतील पत्ता लागत नाही. पण रोजगार निर्मितीत अस्थिरता निर्माण होते. कायमचा रोजगार निर्मिती साठी, सत्ताधाऱ्यांकडून इच्छा शक्ती हवी, अभ्यासपूर्ण नियोजन हवे, अर्थात सत्ता सरकारकडे तेवढा कालावधी हवा हे ही महत्वाचे आहे, म्हणजे मग रोजगार संधीचा बुडबुडा न तुटता फुटता राहील, त्यामुळे राज्याची स्थिती सुधारली तरच देशाची सुधारेल.
विजय आप्पा वाणी, पनवेल

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा